फारुक नाईकवाडे

वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमधील इतिहास घटकाचा अभ्यास कसा करावा याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर भर देऊन भारताचा इतिहास असा उल्लेख आहे. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर यामध्ये केवळ आधुनिक भारताच्या इतिहासाचाच समावेश असल्याचे लक्षात येते. तयारी पुढीलप्रमाणे करता येईल:

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – भूगोल
mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
chittaranjan locomotive works clw recruitment 2024 for 492 apprentice posts
CLW Bharti 2024: ‘चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स’मध्ये मेगा भरती; जाणून घ्या पदसंख्या, पात्रता आणि वेतन

ब्रिटिशांच्या भारतातील प्रवेशानंतर ठळक राजकीय व आर्थिक घडामोडी व त्यांचा परिणाम, ब्रिटिश राज्यकर्ते विशेषत: मुंबई इलाख्यातील राज्यकर्त्यांची महत्त्वाची कार्ये / निर्णय, योगदान, नकारात्मक कारवाया यांचा बारकाईने अभ्यास करावा.

सन १८५७ चा उठाव त्याची कारणे, त्यातील सहभागी नेते, महत्त्वाचे संघर्ष, सहभागी संस्थानिक, अपयशाची कारणे, परिणाम या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावा. 

काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या राजकीय संस्था, ग्रामीण भारतातील उठाव यांचा आढावा टेबलमध्ये घ्यावा.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ व जहाल कालखंडांतील स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत, मागण्या, महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य, यशापयश, सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार, सांप्रदायिकतेचा उदय या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

गांधी युगातील असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इत्यादी चळवळी, त्यातील संघर्षांचे स्वरूप व महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास बारकाईने करावा. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. या चळवळींचा भाग म्हणून किंवा त्यांना समांतरपणे सुरू झालेले वैशिष्टय़पूर्ण संघर्ष तसेच या चळवळींमधील महाराष्ट्राचे योगदान यांचा अभ्यास बारकाईने करावा.

काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, साल, ठिकाण, अध्यक्ष व ठराव अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये अभ्यासता येतील.

क्रांतिकारी चळावळींचा अभ्यास उदयाची पार्श्वभूमी, स्वरूप, कार्ये, ठळक विचार, घडामोडी, महत्त्वाचे नेते व त्यांचे योगदान, भारताबाहेरील कार्ये आणि त्याचे स्वरूप, महिलांचा सहभाग, वृत्तपत्रे, साहित्य, खटले अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.

वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, असल्यास ब्रीदवाक्य, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रित माध्यमांचा अभ्यास करता येईल. यामध्ये काही संघटनांची मुखपत्रेसुद्धा महत्त्वाची आहेत. महत्त्वाच्या वृत्तपत्रांबाबत त्यांमधील महत्त्वाच्या लेखांची शीर्षके, जाहिराती, देणगीदार, मदतगार व्यक्ती यांचा आढावाही अतिरिक्त स्कोअरसाठी महत्त्वाचा ठरेल.

स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात फाळणीचे स्वरूप, परिणाम व उपाय आणि संस्थानांचे विलीनीकरण विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरच्या बाबतीत परिपूर्णपणे अभ्यासायला हवे. तसेच उशिरा विलीन झालेल्या संस्थानांबाबत महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घ्यावात.

नेहरू व इंदिरा गांधी यांचे महत्त्वाचे निर्णय, कारणे, परिणाम इत्यादी बाबी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी अभ्यासताना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

आणीबाणी कालखंडातील महत्त्वाच्या घडमोडी, नेते, त्यांचे कार्य, विचार यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत अंतर्गत राजकीय घडामोडींचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. यामध्ये राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रादेशिक राजकीय चळवळी उदा. जयप्रकाश नारायण यांचे विद्यार्थी आंदोलन, आनंदपूर साहिब प्रस्ताव, भाषावार प्रांत रचनेबाबतचे संघर्ष अशा मुद्दय़ांचा अभ्यास महत्त्वाचे नेते, त्यांचे महत्त्वाचे व प्रभावी समर्थक, पार्श्वभूमी, स्वरूप, घोषणा, कारणे, परिणाम, यशापयशाची कारणे, इतिहासकारांची मते अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.

भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारसी, संघर्ष, विशेषत: संयुक्त महाराष्ट्राबाबतच्या शिफारसी हा भाग काळजीपूर्वक अभ्यासावा.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास महत्त्वाचे नेते, विविध विचार प्रवाह, राजकीय पक्ष व त्यांच्या भूमिका, महत्त्वाच्या घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.

भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. धोरणाची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी, राष्ट्रीय गरज, कारणे, स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे त्यामध्ये होत गेलेले बदल व त्यांची कारणे, अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी, धोरणाचे परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि मूल्यमापन असे मुद्दे विचारात घ्यावेत.

समाजसुधारकांचा अभ्यास करताना त्यांची ठळक वैयक्तिक माहिती पूर्ण नाव, महत्त्वाचे नातेवाईक, शिक्षण, सोबती इत्यादी, स्थापन केलेल्या आणि महत्त्वाची भूमिका निभावलेल्या संस्था, असल्यास वृत्तपत्र / नियतकालिक,  साहित्य, त्यातील काही महत्त्वाचे उद्गार, महत्त्वाच्या घटना, कार्ये (कालानुक्रमे), असल्यास लोकापवाद  आणि इतर माहिती हे मुद्दे पहावेत.

महिला, दलित, मुस्लीम, आदिवासी यांच्यासाठीच्या संस्थांच्या अभ्यासात स्थापना, कार्यपद्धती, योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा.

दलित व मुस्लीम सुधारणा चळवळींचा अभ्यास पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, प्रतिक्रिया व व्यक्तिमत्त्वे या मुद्दय़ाच्या आधारे करणे आवश्यक आहे.