फारुक नाईकवाडे
अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये इतिहास घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे:

‘आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास’

गट ब आणि गट क सेवांसाठीची अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सन २०२३ पासून सुरू झाली आहे. गट ब सेवा पूर्व परीक्षा आणि अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ अशा मागील तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्गील लेखामध्ये पाहिले. त्यानुसार प्रत्यक्ष तयारीबाबत या लेखमध्ये पाहू.

आधुनिक भारताच्या इतिहासाचे दोन भाग स्पष्टपणे लक्षात घ्यावे लागतात – स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर. सन २०२३ च्या प्रश्नांवरून स्वातंत्र्यपूर्व कालखंडावरच प्रश्न विचारलेले दिसून येतात. पण स्वातंत्र्योत्तर इतिहासाची काही प्रमाणात तयारी करणे हा सुरक्षित अप्रोच ठरेल. तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात:

स्वातंत्र्यपूर्व इतिहास:

ब्रिटिशांचे आर्थिक धोरणा, त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, त्याबाबतचे अभ्यास आणी भारतीय राष्ट्रवादाच्या उदयामधील भूमिका या बाबी बारकाईने अभ्यासाव्या लागतील.

ब्रिटिशांचे राजकीय धोरण, त्यांचे विविध नागरी व राजकीय निर्णय / कायदे, त्यांवरील भारतीय नेत्यांच्या प्रतिक्रिया या बाबींचा कालानुक्रमे अभ्यास केल्यास त्यातील परस्परसंबंध समजून घेता येईल व जास्तीत जास्त मुद्दे लक्षात राहतील.

महत्वाच्या ऐतिहासिक घटनांच्या वेळी कार्यरत असलेले तसेच दूरगामी परिणाम करणारी धोरणे आखणारे आणि राबविणारे महत्त्वाचे व्हाईसरॉय / गव्हर्नर जनरल व त्यांचे ठळक निर्णय या बाबींचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करणे आवश्यक आहे.

१८५७चा उठाव हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मैलाचा दगड आहे. त्यामुळे या बाबतचे सर्व मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. सहभागी सामाजिक प्रवर्ग, त्यामागची कारणे, उठावाची सामाजिक – राजकीय कारणे, तात्कालिक कारणे, व्याप्ती, विविध नेते, त्यांचे कार्यक्षेत्र व उठावादरम्यान वा नंतरची त्यांची स्थिती, महत्त्वाच्या घोषणा इत्यादी.

ब्रिटिशांच्या धोरणांवर भारतीयांच्या प्रतिक्रिया, राजकीय संस्था / संघटनांची स्थापना आणि कार्ये यांचा आढावा घ्यावा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, तीन ठळक कालखंड, त्यांतील महत्त्वाची अधिवेशने व ठराव, आंदोलने, त्यांचे स्वरूप व परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.

काँग्रेसच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे, मवाळ व जहाल कालखंडाची तुलना, महत्त्वाचे नेते, महात्मा गांधीजींच्या कालखंडातील तीन महत्त्वाचे टप्पे व चळवळी, त्याला समांतर इतर राजकीय संघटनांच्या चळवळी, मागण्या, महत्त्वाचे नेते यांचा बारकाईने अभ्यास करायला हवा.

सशस्त्र / क्रांतिकारी चळवळींचे दोन कालखंड, त्यांतील महाराष्ट्र, पंजाब व बंगालमधील क्रांतिकारक, त्यांच्या संघटना, महत्त्वाच्या घडामोडी, दैनिके/ नियतकालिके, पुस्तके यांच्या टेबलमध्ये नोट्स काढता येतील. यामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबी समजून घ्याव्यात. उदाहरणार्थ साताऱ्याचे ‘पत्री’ सरकार, नाटकांचा प्रचारासाठी उपयोग, इत्यादी.

या कालखंडातील महाराष्ट्रातील नेते, घडामोडी, आंदोलने, राजकीय संस्था यांचा जास्त बारकाईने आढावा घ्यायला हवा. नागपूरचा झेंडा सत्याग्रह यांसारखे महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदान माहित असायला हवे.

देशातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचे महत्त्वाचे टप्पे, ठळक घडामोडी, महत्त्वाच्या समाज प्रबोधन संस्था/संघटाना, त्यांचे उद्देश आणि कार्य यांचा मुद्देसूद अभ्यास आवश्यक आहे.

देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पैलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते – जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी / व्यवसाय, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे. महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा. प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान, असल्यास विवाद/लोकापवाद, इत्यादी.

सामाजिक प्रबोधनाबरोबरच धार्मिक सुधारणांचाही यामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास :

सन २०२३ मध्ये या उपघटकावर प्रश्न विचारलेले दिसून येत नाहीत. पण पुढील दोन परीक्षांपर्यंत या घटकाची तयारी करणे सेफ ठरेल. पुढील दोन वर्षे या विभागावर प्रश्न विचारले गेले नाहीत तर आपला अभ्यासक्रम स्वातंत्र्यपूर्व इतिहासापुरता मर्यादीत करून अभ्यास करणे योग्य ठरेल. यामध्ये पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत:

घटनानिर्मिती प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका, संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका यांचा थोडक्यात आढावा घ्यायला हवा.

या कालखंडातील महत्वाच्या राजकीय चळवळी महत्त्वाच्या राजकीय पक्षांची स्थापना, वाटचाल समजून घ्यायला हवी.

महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मुंबई प्रांतातील घडामोडी आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठवाडा मुक्ति संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, स्वतंत्र विदर्भाची मागणी हे मुद्दे महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेऊन तयारी करायला हवी.

मराठी साहित्य संमेलने, भाषावार प्रांत रचनेची मागणी, संयुक्त महाराष्ट्र सभा, महाराष्ट्र एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांची स्थापना, नेते, मागण्या, उपक्रम, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रयत्नशील वृत्तपत्रे, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांची माहिती असायला हवी. त्यानंतर नागपूर करार, स्वतंत्र विदर्भाबाबतच्या घडामोडी यांचाही आढावा आवश्यक आहे.

पंडित नेहरू आणि त्यांचे अलिप्ततावादी धोरण, इंदिरा गांधी आणि त्यांचे परराष्ट्र धोरण, आणीबाणी या बाबींचा आढावा घ्यावा.

त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंच्याहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणाने चर्चेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास करावा.