विद्यार्थी मित्रहो, आज आपण प्रशासनातील सभ्यता या घटकावरील प्रश्नांच्या उत्तर लिखाणाची तसेच त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या तयारीची चर्चा करणार आहोत.

प्रशासनातील सभ्यता या घटकामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो: लोकसेवेची संकल्पना, प्रशासन व सभ्यता यांचा तत्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाण घेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार (RTI), नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवाप्रदानाचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने इ.

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

या घटकांचा एकंदरीत विचार केल्यास असे लक्षात येते की, प्रशासनातील सभ्यतेच्या दृष्टीने व्यवस्था चांगल्या असणे, नियम आणि पद्धती सुयोग्य असणे याला महत्त्व दिले गेले आहे. आणि मग परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसा विचार करणे अपेक्षित आहे. अशा कोणत्या व कशाप्रकारच्या व्यवस्था आणि नियम प्रशासनात आले की प्रशासनात सभ्यता येऊ शकते याचे अचूक आणि सखोल आकलन विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे.

आता आपण २०२३ मध्ये या घटकांवरील काही प्रश्नांची चर्चा करणार आहोत.

 Q.  In the context of work environment,  differentiate between coercionl  and undue influence  with suitable examples. (150  words, 10  marks)

प्र. कामाच्या वातावरणाच्या संदर्भात, ‘जबरदस्ती’ आणि ‘अवाजवी प्रभाव’ यातील फरक योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा. (१५० शब्द, १० गुण)

(उत्तरासाठी सूचना – उत्तर लिहिताना फक्त फरक स्पष्ट करू नये. तर कामाच्या ठिकाणी जबरदस्ती व अवाजवी प्रभाव कसा वा का दिसून येते हे स्पष्ट करावे. आणि मग शेवटी हे दोन्हीही कसे अयोग्य आहे हे सांगून ते टाळण्यासाठी थोडक्यात उपाय सुचवावेत.)

उत्तर – कामाच्या ठिकाणी अनेक लोक काही उद्दिष्टे ठेऊन एकत्र येतात आणि एकमेकांशी सहकार्य करून काम करू लागतात. अशावेळी त्यांच्यामध्ये आंतरवैयक्तिक संबंध निर्माण होतात. हे संबंध कसे ठेऊन काम कसे करावे यासाठी संस्था नियमदेखील निर्माण करतात. परंतु सत्तेतील फरकामुळे आणि इतर हेतू बाळगल्यामुळे संस्थेने दिलेल्या नियमांचे कसोशीने पालन करून काम होईलच असे नाही. मग कधी कधी याची परिणीती जबरदस्ती वा अवाजवी प्रभावामधे झालेली दिसून येते.

जबरदस्ती म्हणजे बळाचा वा धमकीचा वापर करून एखाद्या व्यक्तीला असे कार्य करायला लावणे की तिने नाहीतर ते केले नसते. हे कार्य बऱ्याचदा नियमांना सोडून केले जाते. ते बेकायदा पण असू शकते. उदा. वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना बदलीची वा पदावनतीची धमकी देऊन बेकायदा कृत्य जसे की भ्रष्टाचारात सहभागी होऊन मदत करणे यासाठी परावृत्त करू शकतात.

अवाजवी प्रभाव म्हणजे इथे सत्तेतील व्यक्ती सत्ता नसलेल्या व्यक्तीला मानसिक वा भावनिक दृष्टय़ा प्रभावित करून आपल्याला हवे ते पण अनैतिक कृत्य करून घेत असते. असे कृत्य कधी कधी बेकायदा असेलच असे नाही. परंतु ते नैतिकतेला धरून नसते. जसे की वरिष्ठ आपल्या ज्ञानाचा वा अनुभवाचा डामडौल दाखवून कनिष्ठ सहकार्यावर अनुचित प्रभाव टाकून त्यांना अनैतिक कृती जसे की नियमबाह्य वर्तन, घालून दिलेल्या प्रथा वा पद्धतीचे उल्लंघन करायला लावू शकतात. यामध्ये कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या अडचणीचा गैरफायदाही घेतलेला दिसून येतो. जसे की सत्तेतील वरचढ पुरुष व्यक्ती कनिष्ठ पदावरील महिला अधिकाऱ्याच्या असहायतेचा गैरफायदा घेऊ शकतो आणि तिला अनैतिक वर्तन करण्यास भाग पडू शकतो.

कामकाजाच्या ठिकाणी जबरदस्ती आणि अवाजवी प्रभाव हे दोन्हीही टाळायचे असेल तर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि वस्तुनिष्ठता यासारख्या मूल्यांची अंमलबजावणी उत्तमरित्या करता यावी यासाठी व्यवस्थात्मक सुधारणा करणे गरजेचे आहे. जसे की माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पाळत ठेवणे, कामासाठी वस्तुनिष्ठ नियम तयार करणे, प्रतिसाद देणारी यंत्रणा तयार करणे, व्हिसल ब्लोअर्सना संरक्षण देणे आणि बढावा देणे. तरच कामाच्या ठिकाणी योग्य आंतर वैयक्तिक संबंध निर्माण होतील.

Q. Probity is essential for an effective system of governance and socio- economic development.  Discuss. (150  words, 10  marks)

प्र. ‘एका प्रभावी प्रशासकीय व्यवस्थेसाठी आणि सामाजिक, आर्थिक विकासासाठी प्रशासनातील सभ्यता आवश्यक आहे.’ चर्चा करा. (१५० शब्द, १०गुण)

(उत्तरासाठी सूचना – या प्रश्नाच्या उत्तरामध्ये प्रभावी प्रशासकीय व्यवस्था आणि सामाजिक आर्थिक विकास यांसाठी काय गरजेचे असते याची चर्चा करावी. आणि जे काही गरजेचे असते ते प्रशासनातील सभ्येतेमुळे कसे शक्य होते हे स्पष्ट करावे. हे स्पष्ट करत असताना दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या चौथ्या अहवालाचा संदर्भ वापरावा. तसेच शक्य असेल तर काही अधिकाऱ्यांच्या योगादानाचेही उदाहरण द्यावे.)

उत्तर – कोणत्याही समाजामध्ये प्रभावी प्रशासकीय व्यवस्था हव्या असतील आणि त्यांद्वारे सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणायचा असेल तर व्यवस्थेच्या अंतर्गत व्यवस्थेला चालना देणाऱ्या गोष्टी आणि व्यक्ती यांच्या विकासाकडे लक्ष दिले गेले पाहिजे.

परंतु दर वेळी नैतिक वर्तनाची जबाबदारी फक्त व्यक्तीवरच सोडणे योग्य नसते. त्यासाठी व्यवस्थादेखील अशा असायला पाहिजेत की जिथे व्यक्तीला सचोटीने आणि मूल्याधारित वर्तन करणे सहज सुलभ होईल. जसे की पारदर्शकता आणणारा कायदा असायला पाहिजे, नैतिक आचरण म्हणजे काय हे सांगणारी संहिता पाहिजे, तसेच वेळोवेळी नागरी अधिकाऱ्यांचे नैतिक वर्तन म्हणजे काय हे शिकवणारे प्रशिक्षण झाले पाहिजे. नागरिकांनाही त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि त्यांनी प्रशासनात सक्रीय सहभाग घ्यावा यासाठी नागरिकांची सनद व्यवस्थेने राबवली पाहिजे. तसेच सामाजिक लेखापरीक्षणाला बढावा दिला पाहिजे. यामुळे नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या वस्तू आणि सेवांचा दर्जा चांगला राखता येईल. तसेच जो काही निधी सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी दिला जातो त्याचा उत्तम वापर करण्यासाठी उत्तरदायित्वाच्या स्वरूपाचा विस्तार आणि अंमलबजावणी झाली पाहिजे. तरच प्रशासन प्रभावीपणे काम करू शकेल आणि त्याद्वारे समाजाचा सर्वागीण विकास घडवून आणू शकेल.

हे सर्व प्रशासनातील सभ्यतेमुळे शक्य होते. वर नमूद केलेले सर्व उपाय हे प्रशासनात सभ्यता आणण्याचे उत्तम उपाय आहेत. या उपायामुळे भ्रष्टाचाराच्या आव्हानांवर मात करता येते आणि सुशासन अस्तिवात आणणे सोपे होते.

या पुढील लेखांमध्ये आपण घटना अभ्यासावरील (Case Studies) प्रश्नांची चर्चा करणार आहोत.