रोहिणी शहा

योग्य पद्धतीने विश्लेषण करून तयारी केली तर कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना विज्ञान हा विषय हमखास गुण मिळवून देणारा आहे. पण योग्य अ‍ॅप्रोच नसेल तर विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठीसुद्धा हा विषय थोडा अवघडच ठरतो.

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

विज्ञान हा विषय सोपा करून अभ्यासायचा असेल तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि राज्य पाठय़ पुस्तक मंडळाची पुस्तके या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इतर पारंपरिक विषयाच्या तुलनेत विज्ञान या विषयाची प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यामध्ये एक प्रकारचे सातत्य असल्याने प्रश्नांचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्न शोधणे तुलनेने सोपे असते. या आधारावर पुढीलप्रमाणे तयारी फायदेशीर ठरेल :

भौतिक शास्त्र

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले तर लक्षात येते की भौतिकशास्त्राच्या संकल्पनांचे उपयोजनावर आधारीत असेच प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे. गणिते सुद्धा विचारली जातात आणि त्यामुळे या घटकाची इतर शाखांच्य उमेदवारांना थोडी धास्तीच वाटते. पण अभ्यासक्रमाची नीट विभागणी करून तयारी केल्यास आत्मविश्वास येतो.

बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापन पद्धती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासाठी सोपे ठरतात. या घटकांच्या नोट्स ढोबळ मुद्यांच्या स्वरूपात पुरेशा ठरतात.

प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतिविषयक समीकरणे हे मोठे व महत्त्वाचे घटक आहेत. यांवर थिअरी, समीकरणे आणि उपयोजित असे सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या मुद्दय़ांच्या तयारीसाठी संज्ञा आणि संकल्पनांचे आकलन महत्त्वाचे आहे.

आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात. त्यांचा मोठय़ा घटकांचा अभ्यास करताना प्रत्येक वेळी उपयोग होतो.

प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती या घटकांवर गणिते विचारण्यात येतात. मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर ही गणिते कमी वेळात सोडविता येतात. सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविणे पुरेसे ठरते.

रसायन शास्त्र

विज्ञानाच्या इतर घटकांच्या तुलनेत या विषयामध्ये एक शिस्तबद्धता आहे. या विषयावर साधारणपणे ३ ते ६ प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कमी गुण असले तरी योग्य अ‍ॅप्रोचने अभ्यास केला तर ते सगळेच मिळविणे शक्य आहे.

द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, अणूंची संरचना व त्याविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत, अणूंची मांडणी करण्यासाठी बनविलेली आवर्तसारणी व तिच्यामध्ये होत गेलेले बदल, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, धातू, अधातू, धातू सदृश धातुके, संयुगे व त्यांची निर्मिती, कार्बनी व अकार्बनी संयुगे, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, मिश्रण व त्यांची निर्मिती या मुद्दय़ांचा त्याच क्रमाने अभ्यास करावा.

या मुद्दय़ांमध्ये असलेल्या परस्पर संबंधांमुळे विषय समजून घेणे आणि लक्षात राहणे सोपे होते. यासाठी राज्य पाठय़पुस्तक मंडळाची विज्ञान विषयाची जुनी-नवी पुस्तके जास्त उपयोगी ठरतील.

प्राथमिक स्वरूपाच्या अभिक्रिया विचारलेल्या असल्यामुळे हुकमी गुण मिळू शकतात. त्यामुळे अशा अभिक्रिया अभ्यासणे फायद्याचे आहे. 

वनस्पती व प्राणिशास्त्र

वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/ वनस्पती व त्यांची वैशिष्टय़े हा अभ्यास टेबलमध्ये करावा.

अवयव संस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्थेवर किमान १० प्रश्न स्वत: तयार करावेत.

विविध सूक्ष्मजीव, त्यांचे वर्गीकरण, महत्वाची वैशिष्टय़े, त्यांपासून होणारे फायदे-तोटे यांचा एक टेबल करावा.

आरोग्य व पोषण

यामध्ये पुढील मुद्दय़ांच्या आधारे तक्ता बनवून अभ्यास केल्यास सगळय़ा संबंधित गोष्टी लक्षात ठेवणे सोपे आणि सोयीचे होते.

रोगांचे प्रकार- जीवणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लैंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे, अनुवांशिक आजार.

वरील सर्व रोगांची लक्षणे, कारणीभूत घटक, स्त्रोत, प्रसाराचे माध्यम, बाधित होणारे अवयव, उपचार पद्धती.

स्थूल पोषणद्रव्ये : कबरेदके, प्रथिने, मेद या तिन्ही स्थूल पोषणद्रव्यांपासून मिळणारी ऊर्जा, त्यांचे महत्त्वाचे घटक, कमतरता व आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या इत्यादी मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.

सूक्ष्म पोषणद्रव्ये: जीवनसत्वे, खनिज व क्षार या पोषण द्रव्यांचा स्रोत, शरीरावरील त्यांचे परिणाम, कमतरता व आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, ठरावीक जीवनसत्वांचे इंग्रजी नाव व त्या जीवनसत्वाचा महत्त्वाचा घटक याची माहिती असायला हवी.

चालू घडामोडी

या घटकाच्या पुढील मुद्दय़ांबाबत अद्ययावत माहिती असायला हवी.

आरोग्य, पोषण, पर्यावरणाशी संबंधित शाश्वत विकास उद्दीष्टे आणि त्याबाबत भारतातील उपक्रम, याबाबतचे  हऌड व इतर संघटनांचे निर्देशांक

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेला रोग, त्याचे उगम स्थान, प्रसार, उपचारासाठीचे प्रयत्न

आरोग्य व पोषणाबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या महत्त्वाच्या तरतुदी

विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार

विज्ञान क्षेत्रातील नवे शोध व चर्चेतील संशोधने

विज्ञानमधील मूलभूत संकल्पना, त्यांचे निष्कर्ष सहजासहजी बदलत नाहीत म्हणून काही नवे संशोधन सोडल्यास अभ्यासक्रमामध्ये दिले गेलेल सैद्धांतिक विज्ञान योग्य रितीने समजून घेतले तर इतर विषयांपेक्षा जास्त आत्मविश्वास या घटकाबाबत येतो. म्हणूनच या घटकाची तयारी करताना पाठांतराऐवजी संकल्पना समजून घेण्यावर भर द्यायला हवा.