सागर भस्मे

आजच्या या लेखामध्ये आपण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर, ही संकल्पना काय आहे हे सखोलपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.

unemployment in india, unemployment upsc
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : बेरोजगारी म्हणजे काय? बेरोजगारीचे प्रकार कोणते?
upsc mpsc what is National income and its Features
UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न आणि वैशिष्ट्ये
Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
मौद्रिक धोरण

आधुनिक अर्थशास्त्राच्या ‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ आणि ‘स्थूल अर्थशास्त्र’ या मुख्य दोन शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षावा भाग. ही संज्ञा ‘मायक्रोस’ या ग्रीक शब्दापासून आली आहे. स्थूल म्हणजे मोठा. ही संज्ञा ‘मॅक्रोस’ या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. या शब्दाचा वापर १९३३ मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला होता.

सूक्ष्म अर्थशास्त्र :

सूक्ष्म अर्थशास्त्राबाबत तज्ज्ञांनी आपली वेगवेगळी मते मांडलेली आहेत. मॉरिस डॉब यांच्या मते “अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय” तर “सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात, हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते,” अशी व्याख्या ए.पी .लर्नर यांनी केली आहे.

थोडं इतिहासात डोकावून बघितल्यास असे दिसते की, सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला दिसतो. यात ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे. एस. मिल इत्यादींचा समावेश होतो. अर्थशास्त्रज्ञ प्रा. मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले. प्रा. मार्शल यांचा ‘अर्थशास्त्राची मूलतत्त्वे’ हा ग्रंथ १८९० मध्ये प्रकाशित झाला इतर अर्थशास्त्रज्ञ जसे प्रा. पिगु, जे. आर. हिक्स, प्रा. सॅम्युल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. तसेच सीमांत तत्त्वाचा वापर केला जातो. याची व्याप्ती ही मर्यादित असते. तसेच आंशिक समतोल राखण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधनसामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. हीच सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत.

सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही. तसेच या शाखेत दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचाही अभ्यास केला जात नाही. आर्थिक वृद्धीचे सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत, मौद्रिक व राज्य वित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेबाहेर आहे.

स्थूल अर्थशास्त्र

सूक्ष्म अर्थशास्त्राच्या जशा आपण व्याख्या बघितल्या त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्रासंबंधीही विविध तज्ज्ञांची मते वेगवेगळी आहेत. प्रा. जे. एल. हॅन्सेन यांच्या मते ”स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की, ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो,” तर प्रा. कार्ल शापिरो यांच्या मते “स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे.”

स्थूल अर्थशास्त्राचा इतिहास बघितला असता, असे लक्षात येते की, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांतीअगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. तसेच शासनाला ज्या शिफारसी केल्यावर धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावरच होती. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्रा. ॲडम स्मिथ, प्रा. रिकार्डो, प्रा. जे. एस. मिल यांच्या सिद्धांतातही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. १९३० च्या जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांचे ‘पैसा व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत’ हे प्रसिद्ध पुस्तक १९३६ मध्ये प्रकाशित झाले. लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला. त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय हे लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, वीकसेल, वालरा, आयर्विंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान आहे.

स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेची विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. उदा. एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत, व्याजदर पातळी, व्यापारचक्रातील चढ-उतार, व्यवसायातील चढ-उतार इत्यादी स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते.
स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये बघितले असता, समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र हे धोरणाभिमुख शास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो, अशी अनेक वैशिष्ट्ये स्थूल अर्थशास्त्राची आहेत.