इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी, कोलकाता

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे असलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी या संशोधन संस्थेची स्थापना १९३५ साली झाली. आयआयसीबी या नावाने सर्वश्रुत असलेल्या या संस्थेमध्ये जीवशास्त्र व रसायनशास्त्र या दोन विषयांच्या संयोगाने बनलेल्या बायोकेमिस्ट्री या विषयामध्ये मूलभूत व उपयोजित संशोधन केले जाते. आयआयसीबी ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे.

संशोधन संस्थेविषयी 

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी म्हणजेच भारतीय रासायनिक जैवविज्ञान संस्था ही जैविक रसायनशास्त्रामध्ये संशोधन करणारी सीएसआयआरची देशातील एक प्रमुख संशोधन संस्था व देशातल्या मोठय़ा प्रयोगशाळांपैकी एक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापना झालेल्या या संस्थेचे तेव्हाचे नाव Indian Institute of Experimental Medicine (IIEM) असे होते. नंतर मग १९५६ साली ही संस्था सीएसआयआरशी संलग्न झाली. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर १९८२ मध्ये या संशोधन संस्थेचे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी’ असे नामकरण करण्यात आले. प्रचंड भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशामधील रोगांमध्येही वेगवेगळ्या प्रदेशानुसार तेवढीच विविधता आहे. या रोगांच्या समूळ नायनाटासाठी त्यांच्या गुणधर्माचे पृथ:करण होणे आवश्यक आहे. देशहिताचा नेमका हाच विचार करून या संस्थेने देशभरातील विविध आजार आणि जागतिक स्तरावरील काही जैववैज्ञानिक समस्या या दोन्ही विषयांवर विस्तृत संशोधन सुरू केलेले आहे. नेमक्या याच बाबीमुळे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी ही संस्था खऱ्या अर्थाने  संशोधन आणि विकास सल्लागार संस्था म्हणून काम करताना दिसते.

संशोधनातील योगदान

या संस्थेमध्ये अनेकविध आजारांवर प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन होत असते. युरोपमधील अनेक खासगी उद्योगांनी या संस्थेवर आपल्या संशोधनाची जबाबदारी टाकली आहे. आयआयसीबीने केलेल्या संशोधनातून अशीच काही इनोव्हेटिव्ह उत्पादने तयार झालेली आहेत. अगदी जागतिक स्तरावर वाखाणण्याजोगे असे आयआयसीबीचे संशोधन म्हणजे लेश्मॅनियासिसच्या तपासणीसाठी तयार केले गेलेले डीपस्टिक तंत्रज्ञान, अल्सरचा प्रतिबंध करण्यासाठी असलेला सेगा (SEGA) या लहान रेणूचा घेतलेला शोध असेल वा विविध कर्करोगांच्या प्रतिबंधकतेसाठी खाद्य वनस्पतींच्या पानापासून तयार केलेला अर्क किंवा अस्थमा या रोगावर मात करण्यासाठी तयार केलेला कृत्रिम रेणू तसेच हृदयरोगाच्या निदानासाठी निर्माण केलेले डायग्नोस्टिक किट. ही सर्व पेटंट्स म्हणजे आयआयसीबीच्या शिरपेचामध्ये खोवलेला मानाचा तुराच आहेत.

आयआयसीबी ही आंतरविद्याशाखीय संशोधन संस्था असून इथे प्रमुख सहा संशोधन विभाग वा शाखा आहेत. वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवाशास्त्राची सांगड घालणारे हे विभाग म्हणजे कॅन्सर बायोलॉजी अ‍ॅण्ड इन्फ्लेमेटरी डीसऑर्डर, सेल बायोलॉजी अ‍ॅण्ड फिजिओलॉजी, केमिस्ट्री, इन्फेक्शियस डिसिजेस अ‍ॅण्ड इम्युनॉलॉजी, मॉलीक्युलर अ‍ॅण्ड ह्य़ुमन जेनेटिक्स, स्ट्रक्चरल बायोलॉजी अ‍ॅण्ड बायो इन्फॉर्मेटिक्स. या संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) नेहमीच चालना दिलेली आहे. अलीकडे म्हणूनच २००७ पासून सीएसआयआर- आयआयसीबीकडून दरवर्षी साधारणत: दहापेक्षाही अधिक पेटंट्स व शंभरपेक्षाही जास्त शोधनिबंध प्रकाशित केले जातात. याशिवाय देश-परदेशातील विविध विद्यापीठांबरोबर आयआयसीबी भागीदारीमध्ये अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे.

विद्यार्थ्यांसाठी संधी

सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार भारतातील इतर सर्व संशोधन संस्थांसारखे या संशोधन संस्थेमध्येही विद्यार्थ्यांना Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम करता येतात. तसेच, आयआयसीबी फ्रान्स, जर्मनी व इंग्लंडमधील अनेक औद्योगिक-जैविक- रासायनिक  खासगी उद्योगांबरोबर जैविक रसायनशास्त्रातील व इतर आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम-संशोधनासाठी संलग्न आहे. त्यामुळेच दरवर्षी अनेक गुणवंत विद्यार्थी आयआयसीबीमध्ये त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. किंवा तत्सम स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन किंवा विद्यापीठीय संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठीसुद्धा संस्थेच्या वतीने संधी देण्यात येते.

संपर्क

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी, ४, राजा एस. सी. मुळीक मार्ग, जादवपूर, कोलकाता-७०००३२.

दूरध्वनी: +९१ ३३ २४७३५३६८ , २४१३ ११५७.

ई-मेल director@iicb.res.in , samit@iicb.res.in

संकेतस्थळ  http://iicb.res.in/

itsprathamesh@gmail.com