News Flash

ट्रॅजेडी क्वीन

मीनाकुमारीकडे रूपसौंदर्यही विपुल होतं.

|| अरुणा अन्तरकर

ती मीनाकुमारी, पण पडद्यावरची. त्या पडद्याला व्यापूनही दशांगुळे उरलेली माहजबीन मात्र फारच थोडय़ांना माहीत आहे. ती कळत जाते तिच्या शब्दांमधून. आयुष्यभर प्रेमाअभावी फक्त एकटेपणा वाटय़ाला आलेल्या या शायराचं सत्य, ‘ हर नए जख्म पे अब रूह बिलख उठती है, होंठ अगर हंस भी पडे, आँख छलक उठती है..’ हेच होतं. ‘तुम्ही हो मसीहा, तुम्ही मेरे कातिल..’ असं दु:खालाच  सांगत आयुष्यभर प्रेमाचा शोध घेत राहिलेलं हे मूर्तिमंत कारुण्यरूप ‘ छोड जाएंगे यह जहाँ तन्हा..’ म्हणत त्याच वाटेवरून अकाली निघूनही गेलं. त्याला ५० वर्ष होत आली तरी आजही तिच्या शब्दांतला दर्द हृदयात कळ उमटवून जातो.. त्या पडद्यामागच्या माहजबीनविषयी आणि पडद्यावरचे विविध संकेत, गृहितकं मोडत सुपरस्टार ठरलेल्या मीनाकुमारीविषयी.. ३१ मार्चच्या त्यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने..

 

‘तुम क्या करोगे सुनकर मुझ से मेरी कहानी

बे-लुफ्त जिंदगी के किस्से हैं फिके फिके’

(स्वैर अनुवाद – कसली माझी जीवनकहाणी घेऊन बसला आहात! फाटक्या गोधडीचे ते विटके तुकडे!) असा प्रतिप्रश्न तिनं उत्तरादाखल एका पत्रकाराला विचारला होता. ‘ती’ म्हणजे मीनाकुमारी. तिला आत्मचरित्र लिहिण्याचा तो आग्रह करत होता. ‘दुनिया करे सवाल, तो हम क्या जवाब दे’ या वर्गातले प्रश्न (पक्षी- नसत्या चौकशा) टाळण्याचं चातुर्य तिच्यापाशी होतं. त्या पत्रकारानं तिच्या नजरेला नजर देण्याची चूक केली असणार आणि त्या दोन डोळ्यांत तो घसरून पडला असणार, नाही तर त्यानंही तोडीस तोड जवाब देत म्हटलं असतं, ‘बडे शौक से सुन रहा था जमाना, तुम ही सो गये दास्तां कहते कहते..’ (स्वैर अनुवाद – मोठय़ा आवडीनं आम्ही तुझी गोष्ट ऐकत होतो गं! पण तुलाच सांगता सांगता झोप लागली.)

ही गोष्ट खरीच होती, की जमाना नेहमीच तिच्याबद्दलच्या गोष्टी आवडीनं ऐकत आला होता. ती होती तेव्हाही आणि तिला (काळ) झोप लागल्यानंतरसुद्धा! म्हणजे गेली जवळपास अव्याहत ५० वर्ष..

रुपेरी नभांगणात दर शुक्रवारी नवे तारे उगवत असतात आणि काही मावळत असतात. लहान-थोर, राजा आणि रंक यांना एकाच पातळीवर आणणारा मृत्यू दोन चित्रपट कलावंतांची राज्यं खालसा करू शकला नाही. एक कुंदनलाल सैगल आणि दुसरी मीनाकुमारी! मीनाकुमारी या दर्जाची होती. श्रेष्ठ कलाकार होती, पण एकमेवाद्वितीय नव्हती. नर्गिस, गीताबाली, मधुबाला, निम्मी,  नूतन, वैजयंतीमाला, वहिदा रहमान  या सगळ्याच गुणसंपन्न होत्या. तुल्यबळ आणि प्रतिस्पर्धी होत्या; पण त्यापेक्षा मीनाकुमारी जास्त लोकप्रिय, जास्त यशस्वी ठरली.  तिच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण लाघव होतं.  चंद्रमुखी या नावाला (महाजबीन) साजेसा सुशांत प्रसन्न चेहरा होता. तिच्या आवाजात मंजुळ माधुर्य नव्हतं; पण तो स्वर आर्जवी भावनेनं ओथंबलेला होता आणि बोलण्याची पट्टी मध्यम होती. हृदयाच्या गाभ्यातून ती बोलायची.  एखाद्या वाक्याला नुसतं ‘रे’चं संबोधन लावून ती माया, कळकळ किंवा असहायता अचूक व्यक्त करायची. ‘साहब, बीबी और गुलाम’मध्ये भाबडय़ा भूतनाथशी बोलताना ती बहुतेकदा  ‘रे’ चा उच्चार करते, ‘मुझे लत नहीं लगी रे’. त्या एका अक्षरातून त्याच्याबद्दल वाटणारी ममता, काळजी, जवळीकता व्यक्त करते आणि कधी कधी तिला वाटणारी व्यसनाची लाज आणि मग कधी सारवासारव, तर कधी काकुळतीला येणं हे सगळं तो एक ‘रे’ सांगून जातो.

मीनाकुमारीकडे रूपसौंदर्यही विपुल होतं. सुरेख नाक होतं. समुद्राच्या लाटांसारखा कुरळा, दाट केशसंभार होता. त्यातून चुकारपणे तिच्या मोहक बटा चेहऱ्याला महिरप घालत आणि फुलासारखा सुंदर, मृदू चेहरा तोलून धरणारा मानेचा देठही तेवढाच डौलदार; पण या देहसौंदर्यापेक्षा भुरळ घालतो तो तिच्या चेहऱ्यावरचा आश्वासक भाव, जो तुमचं नातं तिच्याशी जोडून टाकतो. इतर कलाकारांना चाहते असतात, एकनिष्ठ, वेडे;  पण मीनाकुमारीवर जीव ओवाळून टाकणारे भक्त असतात, पडद्यावरचा सिनेमा संपला की ते तिचा निरोप घेत नाहीत. ती त्यांच्याबरोबरच असते, कारण हे नातं पडद्यावर दिसणाऱ्या तिच्या व्यक्तिरेखेशी नसतं, तर थेट तिच्याशीच असतं.  तिच्या पडद्यावरच्या दु:खाबरोबर तिचा प्रेक्षक तिच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या दु:खात सहभागी होतो, किंबहुना वाटेकरी होतो. कधी ती, ‘मैं सर से पांव तक अपने ही अश्को में नहायी हूं.. दिलसे तुम्हारे पास आयी हूं.’  म्हणत अश्रूंनी भिजलेले गाल घेऊन आकांतानं तुम्हाला बिलगते, तर कधी तुम्ही दु:खानं खचून खिन्न बसलेला असता तेव्हा, ‘कभी तो मिलेगी, कही तो मिलेगी, बहारों की मंजिल,’  म्हणत तुमचा हात हातात घेते किंवा मायेने खांदा थोपटते. हे करण्यासाठी तिला हातांची मदत लागत नाही. तिच्या नजरेतील स्निग्धता, भावनेनं ओलावलेला तिचा स्वर हे काम करून जातो. हाच  तिच्यातला आणि इतर जणांमधला फरक आहे. मधुबाला तिच्यापेक्षा नि:संशय, निर्विवाद अधिक सुंदर होती; पण म्हणूनच अप्राप्य! तसंही तिला मुद्दाम भेटावं असं वाटत नाही, तिचे फोटो बघूनसुद्धा समाधान होतं. मीनाकुमारीचं तसं नाही. तिला भेटण्याची ओढ लागते. खुद्द मधुबाला मीनाकुमारीच्या आवाजावर फिदा होती. मीनासारखा दुसरा आवाज इंडस्ट्रीत नाही, अशी जाहीर ‘कॉम्प्लिमेंट’ तिनं दिली होती, तर वहिदा रहमान म्हणते, मीनाकुमारीकडे ‘करिश्मा’ होता. ती एकदा का पडद्यावर आली की तुमची नजर बांधून ठेवते आणि तुम्हाला क्षणभरही ती काढून घेता येत नाही. (वहिदाच्या आवाजातलं दिलदार कौतुक लपत नाही आणि हेवादेखील.)

मीनाकुमारीला देश तसा वेश करणं उत्तम जमायचं. ‘छोटी बहू’ बंगाली सरंजामी घराण्यातली , तर ‘यहुदी’ची हन्ना ही एका ज्यू धर्मीय सराफाची मुलगी. दोन्ही रूपं तिनं सहज सुंदरपणे स्वत:मध्ये उतरवली. हे तिचं असाधारण वैशिष्टय़ होतं. ती मिस मेरी बनायची तेव्हा अँग्लो इंडियन दिसायची. शारदा बनायची तेव्हा दक्षिण भारतीय वाटायची. मुख्य म्हणजे कोणत्याही रूपात लोभसवाणी दिसायची. ज्या सहजतेनं ती त्या त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव स्वत:मध्ये भिनवायची, त्याच प्रकारे तिचा चेहराही पांघरायची. ‘यहुदी’मध्ये नायक (दिलीपकुमार) तिला पहिल्यांदा भेटतो तेव्हा अपघातग्रस्त असतो. तो घोडय़ावरून पडतो. ही पाणी घेऊन त्याच्या मदतीला धावते. तो डोळे उघडतो आणि तिचं अपरंपार लावण्य बघून दिपून जातो; पण नायकाच्या जन्मजात चहाटळपणे विचारतो, ‘मी कुठे आहे. जमिनीवर की स्वर्गात?’ याचं उत्तर तिलाही ठाऊक असतं आणि आपल्यालाही. इतका सुंदर चहाटळपणा पडद्यावर आधी कधी पाहायला मिळाला नव्हता. ती सुंदर पोशाखात आणि दागिन्यांमध्ये सुरेख दिसायचीच; पण ते नसले तरी तिच्या सौंदर्यात उणीव पडत नसे. तिच्या सामाजिक, कौटुंबिक चित्रपटांची संख्या जास्त आहे आणि अशा चित्रपटांमध्ये तिच्या वाटय़ाला कायम पांढरी साडी आली, पांढरी फटक! तिला काठपदरसुद्धा नसायचा. वैयक्तिक आयुष्यातही बॉलीवूडची ही ‘हायेस्ट पेड स्टार’ अशा साडीमध्ये वावरायची. पाठीवर मोकळे सोडलेले, वेळप्रसंगी वाऱ्यावर भुरुभुरु उडणारे केस हाच तिचा साजशृंगार.

बऱ्याच चित्रपटांत गरीब, लग्नाळू मुलगी किंवा विधवा अशा भूमिका तिच्या वाटय़ाला यायच्या आणि हे कमी होतं म्हणून की काय,  देव आनंद, राज कपूरसारखे जोडीदार तिला लाभत नसत. त्या काळातले दुसऱ्या फळीतले राजकुमार, राजेंद्रकुमार, बलराज सहानी हे तिचे हिरो असायचे. राज-राजेंद्र-सुनील दत्त हे प्रथम श्रेणीत नसलेलेच तिचे नायक होते. नाही म्हणायला प्रथम श्रेणीतल्या चित्रपटात अशोककुमार, प्रदीपकुमार, किशोरकुमार हे जुने नट तिचे नायक असायचे. खासगी जीवनात तिच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठा असलेला जोडीदार तिच्या नशिबी आला होता आणि पडद्यावरही त्या चित्रात फरक पडत नव्हता. म्हणूनच बहुधा तिच्या मागे ‘ट्रॅजेडी क्वीन’ हे विशेषण लागलं.  मीनाकुमारीचं मीनाकुमारीपण या अशा मंडळींना घेऊन यश मिळवण्यात होतं. ‘मिस मेरी’ या चित्रपटात तिचा नायक होता हेमंतकुमार –  संगीतकार हेमंतकुमार! त्या विनोदी चित्रपटात मीनाकुमारी आणि गाणी यांच्याखेरीज कुणीच नाव घेण्याजोगं नव्हतं. जेमिनी गणेश (रेखाचे पिता) या दक्षिण भारतीय नायकाला हिंदीत आणण्यासाठी ‘मिस मेरी’ची योजना करण्यात आली होती. तसा किशोरकुमारही या चित्रपटात होता; पण त्याच्या भूमिकेत दम नव्हता आणि तसाही किशोरकुमार ज्या दर्जाचा गायक होता, त्या दर्जाचा नायक नव्हता; पण मीनाकुमारीनं हाही चित्रपट रौप्य महोत्सवाला नेला. ‘चिराग कहाँ रोशनी कहाँ’ चित्रपटावेळी राजेंद्रकु मार कुणीही नव्हता. तिथे चिमुरडय़ा हनी इराणीच्या साथीनं मीनाकुमारीनं आपल्या कर्तृत्वाचा चिराग लावला. (तिच्या उच्चारानुसार ‘चराग’. तिच्यासाठी गाताना लतादीदीदेखील न चुकता चिरागचा उच्चार वेलांटी वगळून करायच्या.) मीनाकुमारीची प्रेक्षकांच्या मनावर हुकमत होती तशी गल्लापेटीवरही! तिनं करारावर सही करताच चित्रपट विकले जायचे. या अर्थी ती दिलीप – राज – देव यांच्याहीपेक्षा मोठी सुपरस्टार होती. त्या तिघांचे चित्रपट मोठय़ा बजेटचे असायचे. त्यांना हवी ती नायिका आणि हवा तो संगीतकार मिळायचा. कथेत बदल करण्याची त्यांना मुभा होती. यांपैकी कोणत्याच गोष्टीची साथ नसताना स्वत:च्या बळावर अनेक चित्रपट यशस्वी करण्याचं कर्तृत्व तिनं दाखवलं.

वैयक्तिक जीवनात नियतीनं तिला सावत्र मुलीसारखं वागवलं, पण कलाजीवनात मात्र तिच्यावर वरदहस्त ठेवला.  नियतीच्या एका लहरीनुसार मीनाकुमारी ऊर्फ माहजबीन बानू  जन्मत:च अनाथाश्रमाच्या दारात फेकली गेली. दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेल्या तिच्या आईवडिलांना लागोपाठ दुसरी मुलगी नको होती. त्यांनी तिला तिथे सोडलं; पण कसं कोण जाणे  आकान्तानं रडणाऱ्या त्या चिमुकल्या जीवाला बापानं पुन्हा उचलून घेतलं, तेव्हा त्याचं पाषाण हृदयही कळवळलं. मात्र त्या लहानग्या बाळाच्या पाठीला लाल मुंग्या चिकटल्या होत्या! जगात आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच माहजबीन बानूची वेदनांशी अशी ओळख झाली. मीनाकुमारी बनताना तिनं वेदनांशी जन्मभराचं नातं जोडलं. वयाच्या चौथ्या वर्षांपासून ती चित्रपटांमध्ये काम करू लागली आणि आईबापांची पोशिंदी बनली.

बाल कलाकार पुढे स्टार होत नाहीत हा समज मीनाकुमारीनं खोटा पाडला. पौराणिक चित्रपटाच्या नायक-नायिकांना सामाजिक चित्रपट आणि पहिल्या श्रेणीत स्थान मिळत नाही, हा अंधविश्वासही तिच्या कर्तृत्वानं निकालात निघाला. विवाहित नटीची कारकीर्द लग्नाबरोबर संपते, हे गृहीतक ही तिच्यामुळे दूर झालं. तिशी पार केलेल्या नायिकेला सक्तीची निवृत्ती पत्करावी लागते, हा इतिहास तिनं बदलला. तिच्याबाबत तर फक्त वयाचा नाही, तर सतत वाढणाऱ्या वजनाचा प्रश्न होता; पण तिथेही मीनाकुमारी जिंकली! तिच्याकरिता ‘अभिलाषा’, ‘बहारों की मंजिल’ अशा चित्रपटांची निर्मिती के ली गेली. तिचा या पुढचा मोठा विजय म्हणजे बदलत्या परिस्थितीनुसार तिलाही चरित्र भूमिकांकडे वळावं लागलं; पण तिथेही ती आई – माई – ताई छापाची, कोपऱ्यातल्या केरसुणीच्या मोलाची,           खालमानेनं वावरणारी गरजू नटी नव्हती. ‘दुश्मन’ आणि ‘मेरे अपने’मध्ये तिला प्रौढ भूमिका होत्या, पण तरीही तीच नायिका होती. चरित्र नायिका हा  सन्माननीय वर्ग तिनं अभिनेत्रीसाठी निर्माण केला.  ‘दुश्मन’मध्ये राजेश खन्नाची नायिका ती होती, मुमताज नाही. ‘दुश्मन’च्या श्रेयनामावलीत मीनाकुमारीचं नाव राजेश खन्नाच्या वर होतं.  या चित्रपटात काम करताना तिची प्रकृती अर्धी झाली होती. चेहरा खंगला होता; पण नजरेतलं सामर्थ्य कायम होतं. ‘दुश्मन’नंतर पुन्हा एकदा तिच्यावर प्रशंसेचा वर्षांव झाला. ‘मेरे अपने’च्या भूमिकेचं स्वागत झालं.

साठीचं दशक हे हिंदी चित्रपटाचं सुवर्णयुग होतं. बिमल रॉय, व्ही. शांताराम, राज कपूर, मेहबूब, गुरू दत्त यांचे संस्मरणीय चित्रपट याच काळातले. याच काळात कौटुंबिक चित्रपटांचा आणि त्यांच्यातल्या भूमिकांचा साचा ठरलेला होता. त्याला छेद देणारे ‘आरती’, ‘दिल अपना प्रीत परायी’, ‘शारदा’, दिल एक मंदिर’ यांच्यासारखे चित्रपट तिनं केले. फेमिनिझम हा शब्द तेव्हा प्रचलित झाला नव्हता. मात्र ‘आरती’सारख्या चित्रपटातून पुरोगामी स्त्रीचं चित्र दिसलं आणि मीनाकु मारीनं त्या भूमिकेचं सोनं केलं. यात ती आदर्श कन्या, आदर्श पत्नी आणि डॉक्टर आहे, पण फणी  मजुमदार या गुणी दिग्दर्शकामुळे ‘आरती’मधला तिचा त्याग भावुक, बटबटीत झाला नाही. आरती ही नैसर्गिक आपत्तींच्या वेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णसेवेचं कर्तव्य बजावणारी डॉक्टर आहे. तिला आवडलेल्या पुरुषाशी लग्न करण्याकरिता पुढाकार घेते. प्रियकर बेकार असल्यामुळे हॉटेलचं बिल तीच भरते. लग्नाच्या बदल्यात उच्च शिक्षणासाठी पैसा मागणाऱ्या डॉक्टरला, या  वराला नाकारण्याचं धैर्य तिच्यात आहे. पतीला अपघात होतो तेव्हा याच डॉक्टरकडे ऑपरेशनसाठी येण्याचा खंबीर आत्मविश्वास ती दाखवते. व्यावसायिक चित्रपटाच्या मर्यादेत राहूनही ‘आरती’नं आत्मभान, अस्मिता असलेली आधुनिक स्त्री विश्वासार्ह पद्धतीनं या चित्रपटातून उभी केली. मीनाकुमारी ही भूमिका जगली आहे. यातले प्रसंग तिनं केवळ डोळ्यांनी बोलून उंचीवर नेले आहेत. एक सांगायचा तर, डॉक्टरकी म्हणजे पैसा मिळवण्याचं साधन मानणारा आणि आरतीशी लग्न करू इच्छिणारा डॉक्टर प्रकाश तिला, ‘लग्न झाल्यावर गरिबांच्या वस्तीत डॉक्टरकी तू कर;  पैसा मिळवण्याची डॉक्टरकी मी करीन,’ असा निलाजरा प्रस्ताव  देतो तेव्हा तिच्या डोळ्यांतून अंगार बरसत असतो. त्या वेळी ज्या वेगाने तिच्या डोळ्यांची हालचाल होते, तो क्षण डोळ्यांचं निरांजन करून पाहण्यासारखा आहे. याच चित्रपटातलं ‘बार बार तोहे क्या समझाए’ या सुंदर गाण्यात पोक्त गृहिणीपदाचा आणि डॉक्टरी पेशाचा आव राखून ती पायांनी नाजूकसा ठेका धरते. मग चांदणं घेत, पाण्यातून चालताना एक लाट उंच उसळून तिच्या अंगावर येते, तेव्हा अंगावर आलेला गोड शहारा ती ज्या नजाकतीत दाखवते आणि नंतर धुंद नजरेनं पतीकडे बघते, तो प्रसंग कितीही वेळा पाहावा. असे बारीकसारीक क्षण सजीव करण्यासाठी ती देहबोली ज्या सामर्थ्यांनं वापरते, त्याला तोड नाही आणि उपमा नाही. ‘पिया ऐसे जिया मे समाई गयो रे’ मधला साजशृंगार करताना ती डोळ्यांत काजळ घालते तेव्हा होणारी पापण्यांच्या फुलपाखरांची फडफड.. ‘कोहिनूर’मध्ये ‘दो सितारों का मीलन’ या गाण्याच्या शेवटी होणारी तिची सलज्ज लगबग बघण्यासारखी.

मीनाकुमारीच्या सगळ्याच हालचालींमध्ये नैसर्गिक मोहकता, डौल आणि गोडवा आहे. ऐट, तोरा, रुबाब यांना तिथे थारा नाही. ‘दिल एक मंदिर’मध्ये ती हाताचे अंगठे जुळवून आणि बाकीची बोटं कपाळाला टेकवून डॉक्टरच्या आईला नमस्कार करते तो बघावा. नम्रता, आदर या शब्दांचे अर्थ समजतात. चित्रपटाच्या शेवटी डॉक्टरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी ती त्याच्या आईला हात  धरून घेऊन जाते, किती हळुवारपणे, किती अदबीनं! किती हृद्य  क्षण आहे तो!  तिच्या वाचनाच्या प्रेमानं तिला ही जाण संस्कार, शिकवण दिली असावी.

खरं तर शाळेचं तोंड तिला पाहायला मिळालं नाही. (तिच्या घरी शिकवणी ठेवून ती उर्दू, हिंदी भाषा आणि इंग्रजी शिकली.) भाषा  तिला सहज अवगत व्हायच्या. याबाबत दिलीपकुमारनं त्याच्या पुस्तकात सांगितलेला किस्सा मुद्दाम वाचण्यासारखा आहे. ‘आजाद’ या चित्रपटाचं मद्रासमध्ये (आताच चेन्नई) चित्रीकरण चालू होते. त्याचे दिग्दर्शक जे मूळचे शिक्षक होते सवयीनुसार ते सगळ्यांना तमिळ भाषा शिकवायला बघायचे. दिलीपकुमारसह सगळे जण पळ काढायचे. एकटी मीनाकुमारी त्यांच्या शिकवणीला बसायची. पंधरा दिवसांत ती ‘आजाद’च्या तमिळ कर्मचाऱ्यांशी त्यांच्या भाषेत बोलू लागली. मीनाकुमारीचं आणखी कौतुक करत दिलीपकुमार सांगतो, ‘‘जिच्याशी तासन्तास गप्पा माराव्यात अशी बॉलीवूडमधली ती एकमेव स्त्री होती.  तिचं वाचन ‘अपटुडेट’ होतं. हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषांतल्या उत्तमोत्तम पुस्तकांचं वाचन ती करायची. रोजचं वृत्तपत्रसुद्धा वाचायची. तिच्या बोलण्यात कधीही गॉसिप, घरच्या कटकटी नसायच्या. ती फक्त पुस्तकं आणि कविता यांच्याच गोष्टी करायची.’’ तिला शिळं, चुरगळलेलं वर्तमानपत्र चालत नसे. तिच्या घरी प्रत्येक वृत्तपत्राच्या दोन प्रती यायच्या. त्यातली एक प्रत इतरांसाठी आणि दुसरी तिच्यासाठी. त्या प्रतीला हात लावायला इतरांना मनाई होती. सकाळच्या ताज्या चहाबरोबर पेपरही ताजा, घडी न उलगडलेला! शूटिंगहून परतल्यावर तिच्या खोलीतल्या नक्षीदार शमादानामध्ये मेणबत्त्या तेवू लागायच्या. स्टुडिओतल्या प्रखर दिव्यांच्या भगभगाटानं त्रासलेल्या डोळ्यांसाठी ही सुंदर व्यवस्था होती. या प्रकाशात कविता वाचायला तिला आवडायचं. सोबतीला असत मोठय़ा तबकात बर्फगार पाण्यात पहुडलेल्या गुलाबांच्या पाकळ्या! तिचं अवघं व्यक्तिमत्त्व हा एक सौंदर्यबोध होता. आयुष्यातल्या वेदना, व्यथा, उणिवा तिनं कवितेच्या शेल्याखाली झाकून ठेवल्या होत्या.

‘पाकीजा’ हा कमल अमरोहींनी मीनाकुमारीला भेट दिलेला ‘ताजमहाल’ आहे, असं म्हटलं जातं. मला नाही तसं वाटत. तो ‘वेल मेड’ चित्रपट आहे. ते इंटीरिअर डेकोरेशन वाटतं. मीनाकुमारीसाठी ताजमहाल म्हणून ‘शारदा’, ‘साहब बीवी..’, ‘यहुदी’, ‘दिल अपना प्रीत परायी’, ‘आरती’, ‘दिल एक मंदिर’, ‘दुश्मन’ यांच्यापैकी एखाद्याची निवड योग्य होईल. एक मात्र नक्की, अमरोही आणि मीनाचा संसार मोडायच्या दुर्घटनेला एकटे अमरोही जबाबदार नाहीत. दिग्दर्शक म्हणून अभिनेत्री मीनाकुमारीचा त्यांनी पूर्ण आदर केला. ‘दिल अपना प्रीत परायी’ हा चित्रपट करण्याची इच्छा नसूनही मीनाकुमारीच्या आग्रहाखातर त्यांनी त्याची निर्मिती केली. त्यातलं शेवटचं दृश्य मान्य नसताना तेही तिच्या आग्रहासाठी त्यांनी केलं. दोन स्त्रिया एका पुरुषासाठी उघडपणे संघर्ष करू शकणार नाहीत, असं त्यांचं म्हणणं होतं. मीनाकुमारीनं शांतपणे, पण ठामपणे म्हटलं, ‘करू शकत नाहीत नव्हे, केला पाहिजे! करावाच लागेल!’ हा आग्रह योग्यच होता. त्या दृश्यात डॉक्टरची पत्नी तिला त्याला विसरून जा म्हणून सांगते, तेव्हा ही नायिका शांतपणे म्हणते, ‘मी त्याला भेटणार नाही, हे मी मान्य करते, पण त्याला विसरून जाण्याचा शब्द मी देणार नाही. त्याच्यावर प्रेम करणार नाही, असं वचन देणार नाही!’ यावर ती डॉक्टर पत्नी (नादिरा) गाडी मरणाच्या वेगाने भरधाव हाकते, तेव्हा मीनाकुमारी शांतपणे स्मित करते;  जीवघेणं, गोठवून टाकणारं! हे दृश्य विलक्षण, अद्भुत, अपूर्व आहे. आजतागायत एवढा खरा, एवढा धीट प्रसंग हिंदी सिनेमात बघायला मिळालेला नाही. असो.

खरं तर अकरा वर्षांच्या त्यांच्या सहजीवनात त्यांनी मीनाकुमारींना घेऊन आणखी चित्रपट का काढले नाहीत, हा असा प्रश्न पडतो. ‘मुगले आजम’च्या या संवादलेखकाने दुसऱ्यांसाठी चित्रपट का लिहिले नाहीत, असाही प्रश्न शिल्लक राहतोच. एक कडूजहर उत्तर म्हणजे या काळात ते कमालिस्तान स्टुडिओ उभारून आर्थिक सुरक्षितता मिळवायच्या मागे लागले, हे असावं का?  हा स्टुडिओ मीनाकुमारीच्या कमाईवर उभा राहिला होता.  मात्र आज  कोटय़वधीची मालमत्ता ठरलेल्या या स्टुडिओच्या ऑफिसमध्ये मीनाकुमारीचा साधा फोटो नाही, याचं सखेदाश्चर्य वाटतं. राजेंद्रकुमारच्या घरात त्याच्या आईवडिलांखेरीज फक्त एका व्यक्तीचा फोटो आहे – मीनाकुमारी! आपलं करिअर तिनं उभं केलं, तिनं आपल्याला मानानं वागवलं याची ती कृतज्ञ पावती आहे. मग स्वत:च्या घरी मीनाकुमारी नेहमीच का डावलली जाते?..

हासुद्धा नियतीचा अनाकलनीय डाव असावा. मीनाकुमारीला बापाच्या आणि पतीच्या घरी काही मिळालं नाही याची उणीव तिच्या चित्रपट संसारात भरून निघाली. तिला जीवनात जे मिळालं नाही ते मृत्यूमध्ये मिळालं. तिच्या मरणात ‘ग्लॅमर’ होतं. ३१ मार्चला तिनं अखेरचा श्वास घेतला त्या दिवशी संध्याकाळी चित्रपटांचे खेळ थांबवून तिच्या मृत्यूची बातमी पडद्यावर झळकवली गेली. दुसऱ्या दिवशी झाडून साऱ्या वृत्तपत्रांनी तिच्या मृत्यूच्या बातमीची ‘हेडलाइन’ केली. तोवर बॉलीवूडमधल्या कोणत्याही व्यक्तीला, अगदी मोठय़ातल्या मोठय़ा व्यक्तीला हा मान बहुधा मिळाला नव्हता. अगदी चित्रपट या विषयाचं वावडं असलेल्या साहित्य आणि अर्थकारण यांचं स्पेशलायझेशन असलेल्या वृत्तपत्र आणि नियतकालिकांनीही  मीनाकुमारीवर अग्रलेख लिहिले. ‘दूरदर्शन’वर मीनाकुमारीच्या मृत्यूची बातमी ठळकपणे दिसली. कुण्या चलाख कंपनीनं मीनाकुमारीच्या ७० एमएम अंत्ययात्रेचा व्हिडीओ बनवला आणि ‘मोम की गुडिया’ नावाच्या फालतू चित्रपटाबरोबर प्रकाशित केला. मीनाभक्तांनी ‘पाकीजा’प्रमाणे याही चित्रपटाला तुडुंब गर्दी करून या चित्रपटाला ११ महिन्यांची  ‘लीज’ दिली! मीनाकुमारीला बालकलाकार म्हणून सर्वप्रथम दिग्दर्शित करणाऱ्या सोहराब मोदींनी ‘मीनाकुमारी की अमर कहानी’ हा चित्रपट काढला, अगदीच बाळबोध! पण कोणत्याही बॉलीवूड स्टारवर निघालेला पहिला बायोपिक वा चरित्रपट म्हणून त्याला ऐतिहासिक मोल आलं! यापाठोपाठ मीनाकुमारीवर धडाधड पुस्तकं लिहिली गेली.

तिचं उणंपुरं ३९ वर्षांचं आयुष्य जे करू शकत नाही, ते मरणानं केलं – मीनाकुमारीची घरासाठीची वणवण त्यानं थांबवली! जिथे स्वार्थी माणसांचा वेढा नसेल आणि जिथून कधी हलावं लागणार नाही अशा एका हिरव्यागार वृक्षाखाली तिला चिरविश्रांती मिळाली. तरीही, आवंढा आलेल्या घशाला एक प्रश्न गिळता येत नाही,

तिच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का?

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:07 am

Web Title: about meena kumari who became a superstar tragedy queen akp 94
Next Stories
1 छोड जाएंगे  यह जहाँ तन्हा..
2 ज्येष्ठांचे लिव्ह इन : ढाई आखर प्रेम के !
3 व्यर्थ चिंता नको रे : शोध सुखाच्या रसायनांचा!
Just Now!
X