शशिकांत सावंत – shashibooks@gmail.com

‘समकालीन कथनात्मक साहित्यातील महान लेखिका’ असं नोबेल पुरस्कार समितीनं ज्या लेखिकेबद्दल म्हटलं त्या अ‍ॅलिस मन्रो.. एक सर्वसामान्य, फारशा आकांक्षा नसलेली ही गृहिणी. एका मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी; परंतु त्याच वर्गाचे ताणेबाणे मांडून नोबेल पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळवणारी एक महत्त्वाची कथालेखिका ठरली. गेल्या सत्तर वर्षांत १४ कथासंग्रह प्रसिद्ध झालेल्या अ‍ॅलिस यांनी कथात्मक शैलीत अनेक प्रयोग के ले, अनेक रचना नव्यानं आणल्या आणि म्हणूनच त्यांचं साहित्य वेगळं ठरलं. या लेखिकेनं कालच (१० जुलै) नव्वदीत प्रवेश  केला आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या साहित्याविषयी..

‘‘ज्यांनी गणिताचा नीट अभ्यासच केलेला नसतो अशा अनेकांना अंकगणित म्हणजेच गणित असंच वाटत असतं आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी ते एक रुक्ष, कोरडं विज्ञान असतं. प्रत्यक्षात या विज्ञानासाठी कल्पनेची अफाट

भरारी लागते.’’      – सोफिया कोवेलेस्की

‘टू मच हॅपिनेस’ या अ‍ॅलिस  मन्रो यांच्या कथेच्या सुरुवातीला हे वाक्य येतं. कथा आणि कादंबरीत, कादंबरीचंच आव्हान मोठं, असं मानणाऱ्या आणि म्हणूनच अ‍ॅलिस  यांच्या कथेबद्दलही तसेच उद्गार काढणाऱ्यांबद्दल हेच म्हणता येईल. खरं तर असं म्हणणाऱ्यांसाठी, २०१३ मध्ये अ‍ॅलिस  यांना नोबेल पुरस्कार देताना ‘समकालीन कथनात्मक  साहित्यातील महान लेखिका’ असं नोबेल समितीनं म्हणणं हीच एक मोठी चपराक होती. त्या महान कथालेखिकेनं थोडीथोडकी नव्हे, तर सलग सत्तर वर्षं कथा लिहिल्या आणि त्यासाठी त्यांना साहित्य क्षेत्रातले सारे मानाचे पुरस्कार दिले गेले आहेत. या लेखिकेनं कालच (१० जुलै) नव्वदीत प्रवेश  केला आहे.

आज त्या मुलींसमवेत कॅनडामधील ओंटारिओ येथे राहत असल्या तरी त्यांचा जन्म झाला तो विंघ्ॉम या खेडय़ात. वडील रॉबर्ट लेड्लो यांचं फार्म हाऊस होतं, ज्यात ते मिंक, कोल्हे या प्राण्यांच्या कातडय़ाचा व्यवसाय करत. आई शिक्षिका होती. काळ मंदीचा असल्यानं वडिलांचा हा उद्योग फारसा चालला नाही. त्यांची आईच किरकोळ नोकऱ्या करत कुटुंब चालवत होती. स्वत: अ‍ॅलिसनंही तंबाखू खुडण्यापासून ते वेट्रेसपर्यंतच्या अनेक नोकऱ्या केल्या आणि स्वत:च्या कमाईवर विद्यापीठात प्रवेश घेतला. अ‍ॅलिस यांचं वयाच्या विशीतच लग्न झालं. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलंय, ‘‘मला काही वेगळं करायची महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. त्या काळात लग्न करणं हीच सगळ्या मुलींची महत्त्वाकांक्षा असायची, कारण लग्न केलं की तुम्ही समाजात स्वीकारले जाता.’’ गरीब घरात बालपण काढल्यानंतर मध्यमवर्गात आयुष्य घालवण्याचा एकमेव मार्ग अ‍ॅलिस यांना उपलब्ध होता तो म्हणजे लग्न करणं.  सुदैवानं अ‍ॅलिस यांच्या पतीला त्यांच्या लेखनआकांक्षेची जाणीव होती. त्यांनी त्यांना टाइपरायटरही आणून दिला होता. सुरुवातीच्या काळात आपल्या लहान मुलांना सांभाळत, मुलं झोपल्यावर वा सकाळी लवकर उठून अ‍ॅलिस यांनी साहित्यप्रेम जोपासलं.

गरीब घरातून मध्यमवर्गात गेलेल्या या  लेखिकेचं विश्व त्या परिघापुरतंच मर्यादित होतं. त्यामुळे त्यांच्या साहित्यकृतीतून येणारं विश्वही फक्त याच मध्यमवर्गीयांचं आहे. या एकाच वर्गाचं चित्रण करत अ‍ॅलिस यांनी कथालेखिका म्हणून एवढं मोठं नाव कसं मिळवलं हे म्हणूनच जाणून घेण्यासारखं आहे. ‘कथा’ हा प्रकार कादंबरी किंवा दीर्घ लेखनाच्या मानानं प्रतिष्ठित मानला जात नाही. आजपर्यंत पुलीत्झरपासून नोबेल पुरस्कारांपर्यंत विविध पुरस्कार पटकवणाऱ्या लेखकांच्या नावांकडे पाहिलं असता लक्षात येतं की, कथाकारांचा विचार कादंबरीकारांइतका क्वचित झालेला आहे.

अ‍ॅलिस यांनी आयुष्यभर प्रामुख्यानं कथा लिहूनही त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त होणं म्हणूनच महत्त्वाचं आहे. मात्र त्यांच्या एकूण कथांचा आढावा घेतला असता त्यांच्या जवळपास बहुतेक कथांमध्ये कादंबरीप्रमाणेच, विविध घटना, विविध मनोव्यापारांचं चित्रण दिसतं. कादंबरीसारख्या दीर्घ कथालेखनाचं सूत्र त्या त्यांच्या कथांतून उलगडतात.

अ‍ॅलिस यांनी कादंबरी लिहिली नाही असं नाही. त्यांनी  एके ठिकाणी लिहिलं आहे, की मला कथा लिहायच्या नव्हत्या. सुरुवातीला काही कथा लिहून नंतर मला कादंबरीकार व्हायचं होतं. ‘लाइफ ऑफ गर्ल्स अँड विमेन’ नावाची एकमेव कादंबरी त्यांनी लिहिली आहे- खरं तर ती अनेक कथांचीच एकमेकांत गुंफलेली मालिका आहे. कादंबरी म्हणून ती फारशी चांगली नाही, असं समीक्षकांचं मत पडलं. त्यामुळे की काय माहीत नाही, पण त्यानंतर मात्र अ‍ॅलिस यांनी कधीही कादंबरी लिहिली नाही. उलट गेली सत्तर र्वष प्रामुख्यानं लिहिल्या त्या कथाच! आणि वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या कथांचे विषयही प्रामुख्यानं मध्यमवर्गीय जाणिवा असणारेच आहेत. मध्यमवर्गीय माणसं, त्यांचं जग, मुलं,

आई-वडील, नाती जमणं, नाती तुटणं, पती-पत्नी यांचं नातं, त्यांच्यामधील बेबनाव हेच विषय आहेत. हे विषय खरं तर अनेकांच्या कथांमध्ये सापडतात. तरीही अ‍ॅलिस मन्रो यांच्या कथा गेली सत्तर वर्षं लोकांना का महत्त्वाच्या वाटतात, त्यात काय वेगळं आहे, या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या कथांमध्येच सापडतात.

आजवर त्यांनी चौदा  कथासंग्रह लिहिले आहेत. म्हणजे सुमारे दीडशे कथा लिहिल्या आहेत. प्रत्येक कथा साधारण पंचवीस ते पन्नास पानांची. त्यांनी आपल्या प्रत्येक कथेवर ती मनासारखी होईपर्यंत मेहनत घेतली. ‘होम’ या सारख्या अनेक कथा त्यांनी पुन्हा पुन्हा लिहिल्या. ‘होम’ या कथेचं तर त्यांनी आठ वेळा पुनर्लेखन केलं. म्हणूनच ‘द मून्स ऑफ ज्युपिटर’ किंवा ‘ज्युलेएटा’, ‘बिअर कम्स टू माऊंटन’, ‘प्रोग्रेस ऑफ लव्ह’, ‘टू मच हॅपिनेस’, ‘बेगर मेड’ आणि ‘होम’ यांसारख्या अनेक कथा वाचणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतात. त्यांच्या लेखनशैलीचं वैशिष्टय़ हे आहे, की एकदा त्यांची एखादी कथा वाचायला घेतली, की आपण थेट  त्यांच्या विश्वात पोहोचतो.  उदाहरणार्थ, ‘होम’ ही कथा. या कथेतली, म्हाताऱ्या वडिलांपासून शंभर किलोमीटर दूर राहणारी कथानायिका इर्मा, तीन गाडय़ा बदलत आपल्या वडिलांना भेटायला येते. वडिलांना भेटण्याइतकीच तिला जुन्या घराची ओढही आहे. तिची आई काही वर्षांंपूर्वी मरण पावली असून तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आहे. सकृतदर्शनी इर्मा आणि तिच्या सावत्र आईमध्ये कोणताही तणाव जाणवत नाही. मात्र कथा उलगडत जाताना लेखिका काही तिरकस वाक्यांचा असा काही वापर करते, की वाचकांसमोर तो ताणही हळूहळू उलगडत जातो. इर्माचे एके काळी गरिबीत असलेले वडील आता सुस्थितीत आहेत. त्यांच्या निवृत्तिवेतनावरच त्यांचा उदरनिर्वाह होत आहे. मात्र घरही आता म्हातारं होऊ लागलंय. अनेक र्वष शाबूत राहिलेल्या घराच्या भिंती खिळखिळ्या झाल्यात. मात्र सावत्र आईमुळे थोडाफार बदल त्या घरानंही पाहिला आहे. घरातल्या जुन्या लाकडी फर्निचरला मोडीत काढत त्याची जागा नव्या प्लॅस्टिक फर्निचरनं घेतलेली आहे. घरातलं  पुस्तकांचं कपाट मात्र दुर्लक्षितच आहे. या साध्या वर्णनात तपशील भरताना लेखिकेनं मानवी वृत्तीचं चित्रण कसं केलंय ते महत्त्वाचं. कथानायिकेला एकीकडे या बदलाबद्दल नाराजी असली तरी नव्या प्लॅस्टिकच्या खुच्र्या अधिक सुखदायी आहेत, असंही ती कबूल करते. एका बाजूला तिच्या आईनं ‘बुक ऑफ द मंथ’मधून घेतलेल्या जुन्या कादंबऱ्या, ‘एव्हरीमन लायब्ररी’तून आणलेली पुस्तकं घरात पाहायला मिळतात, मात्र तरीही आईला त्यात रस नसल्याचं सुचवताना ती सहज व्यक्त होते ते या शब्दांत, ‘‘तिचं म्हणणं फार तर काय असेल, की वाचायचं कशाला? पुरुषांनी पत्ते खेळावेत, स्त्रियांनी गोधडय़ा विणाव्यात, जगात करायला तर भरपूर आहे.’’ अशा छोटय़ा छोटय़ा वाक्यांतून तिची आईबद्दलची अढी व्यक्त होत राहते. सावत्र आईचं वर्णन करताना लेखिका ऊर्फ इर्मा म्हणते, ‘‘ती नेहमीच पाठीमागं हात करून डोकं पुढं करून बघायची, सतत वाटायचं, की एक तर ही खळाळून फुटून हसणार वा फाट्कन तिच्या रागाचा स्फोट होणार, या साऱ्या स्वभावाचं सगळं श्रेय ती आपल्या आयरिश असण्याला द्यायची. शिवाय रेल्वेत जन्म झाल्यानं ती म्हणायची, ‘मी पक्की आयरिश आहे बरं का!  घोडागाडीनं ओढणाऱ्या ट्रेनमध्ये माझा जन्म झाला आहे.’  ऐकलंय तुम्ही कधी हे असलं?’’

‘एव्हरीमन लायब्ररी’नं काढलेल्या अ‍ॅलिस यांच्या निवडक कथासंग्रहाला प्रसिद्ध लेखिका नोबेलविजेत्या मार्गारेट अटवूड  यांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत त्या लिहितात, की अ‍ॅलिस मन्रो ही अशी लेखिका आहे जिला बहुतेक पुरस्कार मिळालेले आहेत, तिचं बरंच कौतुक झालं आहे, तरी ते पुरेसं नाही. ती यापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. एवढं बोलून मार्गारेट अटवूड थांबल्या नाहीत तर त्यांनी मन्रोंच्या कारकीर्दीचा लेखकीय दृष्टीनं आढावा घेतला तो असा, ‘‘१९३१ मध्ये जन्म झालेली अ‍ॅलिस मन्रो, कॅनडा जेव्हा युद्धात उतरला तेव्हा दहा वर्षांंची होती. अ‍ॅलिसनं  कथा लिहायला सुरुवात केली तेव्हा ती जेमतेम वीस वर्षांची होती. कथा प्रसिद्ध करणारी साहित्यिक नियतकालिकं आजूबाजूला फारशी नसताना  रेडिओवर एक कार्यक्रम प्रसारित केला जात असे. त्या कार्यक्रमाचे संचालक विवर यांनीच अ‍ॅलिसला अनेकदा  लिहिण्याचा आग्रह करून, तिच्या लेखनाची धग जिवंत ठेवली होती. १९६८ मध्ये हिप्पी चळवळ जेव्हा जोरात आली होती तेव्हा अ‍ॅलिसचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं होतं.’’

अ‍ॅलिस ज्या खेडय़ात मोठय़ा झाल्या त्याचं वर्णन त्यांच्या बहुतेक कथांमध्ये आलं आहे. त्यातील एका वर्णनात त्यांनी शहरातल्या वेगवेगळ्या वर्गाच्या लोकांचं वर्णन करताना म्हटलं होतं, ‘‘तिथं जसे डॉक्टर आणि वकील होते तसेच बूटलेगर्स  आणि अपयशी चोरही होते.’’ या वाक्यामुळं खूप खळबळ माजली. त्याविषयी कॅनेडीयन वर्तमानपत्रात पत्रेही प्रसिद्ध झाली. या सगळ्या प्रकारानं त्रस्त होऊनच बहुतेक ‘लाइफ ऑफ गर्ल्स अँड विमेन’ या तिच्या कादंबरीत ती सुरुवातीलाच लिहिते, ‘‘हे लेखन प्रथमपुरुषी एकवचनात असलं तरीही ते लेखकाचं आत्मचरित्रपर लेखन नव्हे.’’ अशी ओळ कादंबरीत लिहिणारी मन्रो ही बहुतेक पहिलीच लेखिका असावी.

कथा ही एका वेळी एकच गोष्ट सांगत असते, तर कादंबरी ही संबंधित सगळ्या गोष्टी सांगत असते, अशी कथेची एक साधी व्याख्या विलियम मॅक्सवेल या संपादकानं केली आहे.  जे. डी. सालिंजर ते जॉन ओ हारापर्यंत अनेक लेखकांचं साहित्य त्यांनी संपादित केलं आहे. ते स्वत: चांगले कथालेखक होते. याशिवाय कथेबाबत फार पूर्वी जेम्स जॉयसींनी ‘एपीफनी’ हा शब्द वापरला आहे.  रोजच्या जीवनात दिसणाऱ्या, पण पटकन शब्दांत पकडता न येणाऱ्या गोष्टी कथेमध्ये असायला हव्यात, हा तेव्हापासूनचा एक अलिखित नियम. त्याचमुळे अनेकदा अगदी हेमिंग्वेच्या, जॉन अपडाईक किंवा जॉन शिवरसारख्यांच्या चांगल्या कथांमध्येही हे सूत्र दिसतं. उदाहरणच द्यायचं झालं तर जॉन यांच्या एका कथेतला नायक इतरांच्या संसारातही आपल्यासारखेच वादविवाद आहेत हे कळल्यावर म्हणतो की, हे सगळं पार्टीत पाहिलेल्या सफरचंदाच्या लालसर पडलेल्या गाभ्यासारखं वाटू लागतं. ‘सफरचंदाचा लालसर पडणारा गाभा’ ही  त्यांच्या कुजत चाललेल्या संसाराची प्रतिमा आहे. अशा पद्धतीची ‘एपीफनी’ अ‍ॅलीस मन्रो यांच्या लेखनात अनेकदा दिसून येते. एका कथेत तिची कवयित्री असणारी नायिका म्हणते, ‘‘एकटा पुरुष जेवेल, खाईल, सगळं नीट करेल; पण तो घर सजवणार नाही.’’ किंवा दुसऱ्या एका कथेत एक हुशार, सुंदर मुलगी शहरात फिरत असताना एक माणूस म्हणतो, ‘‘बाई, अशी सतत सगळ्यांकडे बघत हसत फिरू नकोस. लोक याचा वेगळा अर्थ लावतील. पुरुष जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा सगळं मागे ठेवून जातो, पण बाई बाहेर पडताना सारंच बरोबर घेऊन जाते . तिची कशापासूनही सुटका नाही.’’

या आणि अशा किती तरी गोष्टींतून मानवी वागण्याचे अचूक बारकावे अ‍ॅलिस अगदी बरोबर पकडतात. त्यांच्या कथा प्रामुख्यानं नायिकाप्रधान आहेतच, पण पुरुषप्रधान संस्कृतीमुळे होणारी स्त्रीची घुसमट, त्यातले छोटेमोठे पेच हेच मुख्यत्वे त्यात येतं. एखाद्या मध्यमवर्गीय आणि सर्व काही आलबेल असणाऱ्या गृहिणीनं एखादं धाडसी पाऊल- मग ते लैंगिकतेबाबत का असेना उचलणं, यासारखी संकल्पना त्यांच्या कथानकात अनेकदा आढळते.  दुसरा कथाविषय म्हणजे लैंगिक तणावाचा!  तो अगदी लैंगिकतेच्या गाभ्याशी भिडणारा नसेल; पण शब्दाशब्दांतून व्यक्त होणारा ताणतणाव हे त्यांच्या कथेतील नाटय़ वाढवत नेतात. अनेकदा तर संपूर्ण कथाच एक तणावनाटय़ असतं. अ‍ॅलिस यांनी लिहिलेली ‘मेनेसेटंग’ ही कथा, ज्यात इतिहासाचा समावेश होतो, पण तो नंतरच्या टप्प्यात. अ‍ॅलिस यांनी सुरुवातीला स्वत:चं घर, परिसर, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्या आयुष्याविषयी लिहिलं आणि नंतर हळूहळू त्यांना आपले पूर्वज काय करीत याचं कुतूहल वाटू लागलं. त्यातून त्यांनी १८ व्या शतकातील आपल्या नातेवाईकांचा शोध घेतला आणि जे काही निष्पन्न झालं त्यातून ही कथा कागदावर उतरली.

अनेकदा त्यांच्या सरळ रेषेत जाणाऱ्या कथा अचानक दुसरंच वळण घेतात. एखाद्या सिनेमा हॉलमध्ये आपण चुकून दुसऱ्या दारातून शिरतो आणि पहातो तर भलताच सिनेमा सुरू असतो तसं. ‘वेनलॉक एज’ ही कथा सुरू होते एका विद्यार्थिनीच्या, कथानायिके च्या कहाणीपासून. (जिला नाव नाही) नंतर  एक दिवस तिच्या रूमवर राहायला नीना नावाची तरुणी येते.  नीना मिस्टर पार्विस नावाच्या एका प्रौढ पुरुषाबरोबर राहतेय. शिकायची इच्छा व्यक्त केल्यावर तो तिला परवानगी देतो, पण तिच्यावर पाळतही ठेवतो. एक दिवस कथानायिका आपल्या आईच्या चुलतभावाची नीनाशी ओळख करून देते. एकदा या कथानायिके लाच पर्विस घरी बोलवतात. पर्विस  तिला सगळे कपडे काढायला सांगतात. शरमून गेलेली नायिका लिहिते, ‘‘त्यांच्या या विचित्र मागणीनंतर मला परत जाण्याची, नाकारण्याची संधी होती, पण मी तसं केलं नाही.’’ कुठलीही शारीरिक जबरदस्ती न करता पर्विस तिच्याबरोबर जेवतात आणि नंतर तिला हाऊसमन या कवीची कविता वाचायला सांगतात. कविता वाचल्यावर कपडे करून ती थेट घरी परतते. तिथे एक वेगळंच नाटय़ उभं असतं. नीना तिच्या आईच्या भावाबरोबर पळून गेलेली असते, परंतु सहा दिवसांनी, पर्विस एकटे आहेत, त्यांना एकटय़ाला मी सोडू शकत नाही, असं सांगत नीना परतते. दरम्यान बरंच काही घडतं. कथानायिके चा संताप होतो. त्याच भरात सूड उगवावा म्हणून ती  एक दिवस आईच्या त्या भावाचा पत्ता पर्विस  यांच्या पत्त्यावर पाठवून देते. त्या सहा दिवसांत ती कु ठे होती हे त्यांना कळावं म्हणून. ती लायब्ररीत बसलेली आहे, उद्विग्न आहे. म्हणते, ‘‘मी केवळ हेच करू शकते, अभ्यास करणं, उत्तम मार्क मिळवणं, शिष्यवृत्त्या मिळवणं. जगभरची महाविद्यालये, विद्यापीठे फक्त माझ्यासाठीच आहेत.’’  या आणि अशा अनेक कथांत फार काही घडत नाही;  पण माणसामाणसांतील नात्यांचे पदर उलगडत जातात.

‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकानं सत्तरच्या दशकात अ‍ॅलिस मन्रो यांच्या कथा छापायला सुरुवात केली.  चार्ल्स मॅगरथ तेव्हा संपादक होते, लिटररी एडिटर.  विलियम शॉन संपादक होते. त्यांना अ‍ॅलिस मन्रोंच्या कथा ‘रफ’ वाटत किंवा त्यातली काहीशी शिवराळ भाषा त्यांना पसंत नव्हती.  मॅगरथ सांगतात, की अनेकदा विलियम शॉनचा रोष पत्करून मी अ‍ॅलिस मन्रोंच्या कथा छापत असे.  एके दिवशी जेव्हा अ‍ॅलिस ‘न्यू यॉर्कर’च्या कार्यालयात आल्या तेव्हा त्यांची आणि शॉनची भेट मी घडवून आणली. त्यांना भेटल्यावर, बोलल्यावर शॉन म्हणाला, ‘‘माझ्या कल्पनेतली बाई ही नव्हे. मी काही तरी वेगळीच कल्पना केली होती.’’ मन्रोंच्या कथेतील भाषेमुळे आणि घटनांच्या ‘खरखरीतपणा’मुळे असेल, पण ती अशी सौजन्यपूर्ण, शांत स्मितहास्य करणारी बाई असेल असं शॉन यांना वाटलं नव्हतं.

सत्तरच्या दशकापासून कार्पोवबरोबर बुद्धिबळ खेळणारा गॅरी कास्पारोव एकदा म्हणाला होता, कार्पोव कसा विचार करतो हे मला चांगलं माहीत आहे. चांगला लेखकदेखील मनात हेच म्हणत असतो आणि वाचक मात्र म्हणतो, ‘याला आपल्याबद्दल इतकं कसं माहीत?..’ अ‍ॅलिस मन्रो यांच्या कथा आपल्याला हेच म्हणायला भाग पाडतात..

मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार

नोबेल पुरस्कार २०१३  मॅन बुकर पुरस्कार २००९

गीलर पुरस्कार १९९८, २००४

कॅनडाचा गव्हर्नर जनरल पुरस्कार १९६८, १९७८, १९८६