18 September 2020

News Flash

धनेश संरक्षणाचे आव्हान

माणूस आणि निसर्ग यामधल्या बिघडलेल्या नात्याच्या अनेक बळींपैकी एक म्हणजे हॉर्नबिल वा धनेश पक्षी. या नात्याची घडी नीट बसवण्याचा प्रयत्न पुण्यातली अमृता राणे करते आहे.

| July 25, 2015 01:01 am

ch12माणूस आणि निसर्ग यामधल्या बिघडलेल्या नात्याच्या अनेक बळींपैकी एक म्हणजे हॉर्नबिल वा धनेश पक्षी. या नात्याची घडी नीट बसवण्याचा प्रयत्न पुण्यातली अमृता राणे करते आहे. थेट अरुणाचलच्या जंगलांमध्ये जाऊन केलेल्या अमृताच्या या प्रयत्नांना आता चांगलंच यश येऊ लागलंय.
आपली आवड हाच आपला व्यवसाय बनवा, असं कायम म्हटलं जातं; पण हे खूपच थोडय़ा माणसांबद्दल खरं ठरतं. अमृता राणे ही अशाच काही मोजक्या लोकांमधली एक! लहानपणापासून निसर्गाबद्दल वाटणारं आकर्षण आणि तरुणपणातली जंगलांच्या आणि खास करून ईशान्य भारतामधली जंगलांच्या संवर्धनाविषयी वाटत असलेली आस्था. या आस्थेचं रूपांतर आज अमृताच्या व्यवसायात झालं आहे.
अरुणाचल प्रदेशातील पाक्केच्या अभयारण्यात रमणारी अमृता सध्या ४ महिन्यांसाठी पुण्याला आली आहे. तिच्या या कामाविषयी बोलताना ती या कामाशी किती एकरूप झाली आहे हे सहज लक्षात येतं. आपलं सुरक्षित, आरामदायी शहरी आयुष्य सोडून, जंगलातल्या अनिश्चिततेच्या वातावरणात राहायला जाणं हे किती अवघड आहे, हे तिचे अनुभव ऐकताना सहज लक्षात येतं.
अमृता मूळची पुण्याची. फग्र्युसन महाविद्यालयामधून वनस्पतीशास्त्र या विषयात तिने पदवी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ब्रिटनच्या ईस्ट अँजेलिया विद्यापीठामधून तिने एम.एस्सी. केलं. २००९ मध्ये पदव्युत्तर शिक्षण संपवून आणि त्यानंतर दोन र्वष मॉरिशसमध्ये काम करून ती भारतात परतली. १९९७ पासून ‘नेचर कन्झव्र्हेशन फाऊंडेशन’तर्फे पाक्केच्या जंगलातलं हॉर्नबिल पक्ष्याच्या संवर्धनाच्या कामाबद्दल तिला माहिती मिळाली. निसर्ग, जंगलांबद्दलची ओढ, त्यात ईशान्येकडच्या जंगलांबद्दलच्या विशेष आकर्षणामुळे अमृताने या कामी सहभागी होण्याचं ठरवलं आणि आता या सगळ्या कामासाठी अमृता वर्षांतले ७ ते ८ महिने पाक्केच्या जंगलामध्येच राहते.
प्रत्यक्षात तिथे गेल्यावर तिथल्या कामाचा आवाका तिच्या लक्षात आला. पक्षी संवधर्नाचे हे काम आव्हानात्मकच नाही, तर प्रसंगी संयमाची परीक्षा पाहणारे असते, असे ती म्हणते. हॉर्नबिलला आपण मराठीत ‘धनेश’ या नावाने ओळखतो. याला ‘जंगलाचा शेतकरी’ असं म्हटलं जातं, कारण हे पक्षी बिया अनेक ठिकाणी पसरवायला मदत करतात. त्यामुळे सदाहरित वनांच्या निर्मितीत आणि तेथील जैवविविधता टिकवण्यासाठी धनेश पक्ष्याचा खूपच उपयोग होतो. धनेश पक्षी फळं खाऊन आपल्या घशामधल्या एका कप्प्यात जमा करून ठेवतात. फळांचा रस गिळून नंतर बिया थुंकून देतात. त्यामुळे बियांचा फैलाव दूरवर होतो.
हॉर्नबिलसंबंधी शास्त्रशुद्ध माहिती, त्यांचं जीवनचक्र, विणीचा काळ याची जुजबी माहिती होती; परंतु त्यांच्या संवर्धनासाठी नेमका कृती आराखडा ठरवण्यासाठी काही ठोस माहिती लागणार होती. यासाठी तिचा सहकारी रोहित नानिवडेकर याने राबवलेल्या टेलीमेट्री प्रकल्पामुळे धनेश पक्षांचा फिरण्याचा परिघ किमान ८ ते कमाल ५७ किलोमीटरचा असतो, असं लक्षात आलं. त्याचा पुढील योजना ठरवताना खूप उपयोग झाला. अमृताने सांगितल्याप्रमाणे, हे पक्षी केवळ जगातल्या काही भागांमध्येच सापडतात. आफ्रिकेतला काही भाग आणि दक्षिण-पूर्व आशियातील काही भागांत त्यांचे वास्तव्य आढळून येते. मात्र भारतात त्यांच्या एकूण ६१ प्रजातींपैकी ९ प्रजाती सापडतात. पाक्केच्या जंगलात एकाच ठिकाणी ४ प्रजाती बघायला मिळतात. ग्रेट हॉर्नबिल आपल्याला महाराष्ट्रातही बघायला मिळतो; पण रीथ आणि रुफस या जाती केवळ ईशान्येकडील जंगलांमध्येच आढळतात. त्यांची दिवसेंदिवस घटणारी संख्या म्हणूनच काळजीचा विषय आहे.
धनेश पक्ष्यांचा आणि त्यांच्या राहण्याच्या जागेचा अभ्यास करताना अनेक महत्त्वाच्या नोंदी व निरीक्षणं अमृता व तिच्या सहकाऱ्यांना करता आल्या. अरुणाचल प्रदेश म्हणजे संपूर्ण जंगलांचा भाग. इथे प्रामुख्याने निशी आदिवासींची लोकवस्ती. धनेश पक्ष्याच्या डोक्यावर असलेला फुगवटा त्याच्या दुसऱ्या चोचीसारखा दिसतो. हा पक्षी मारून हा फुगवटा आपल्या डोक्यावर भूषवणं इथल्या आदिवासींमध्ये प्रतिष्ठेचं समजलं जातं. यामुळे या पक्ष्यांना मारणं ही इथली परंपराच. मात्र पूर्वी, एक माणूस आयुष्यात एकदाच, एक पक्षी मारायचा; पण आता या चोचींचा व्यापार होऊ लागल्यानं धनेश पक्ष्यांची संख्या घटू लागली. हा विषय लक्षात घेऊन तिकडच्या वन विभागाने तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली होती. म्हणजे आदिवासींना या चोचींच्या बदल्यात, हुबेहूब खऱ्या चोचीसारख्या दिसणाऱ्या फायबरच्या चोची त्यांनी उपलब्ध करून दिल्या, पण तितके प्रयत्न पुरेसे नव्हते.
‘नेचर फाऊंडेशन’तर्फे २००९ सालापासून धनेश पक्ष्याच्या अभ्यासाबरोबरच संरक्षणाचं कामही हाती घेण्यात आलं. त्यासाठी अनेक कल्पक योजना फाऊंडेशनच्या वतीने राबवण्यात आल्या. धनेशच्या प्रजाती वाचवण्याचे काम स्थानिकांना बरोबर घेतल्याशिवाय जवळपास अशक्य होते. त्यामुळे ‘नेस्ट अॅडॉप्शन प्रोग्राम’ अर्थात धनेशच्या ढोलीला दत्तक घेण्याची नामी कल्पना मांडली गेली. थायलंडच्या पिल्लई पोन्सवड यांच्या कार्यक्रमावर ती आधारित होती. यात धनेशच्या प्रत्येक ढोलीसाठी त्याच गावातल्या एका माणसाला ‘पालनकर्ता’ म्हणून नेमायचे. या कामासाठी त्याला पक्षी मारून जेवढे पैसे मिळतात, साधारण तेवढे पैसे त्याला पगार म्हणून द्यायचे. याने पक्षीही वाचतील आणि स्थानिकांना शिकारीला पर्यायही मिळेल असा तोडगा शोधण्यात आला. एवढंच नाही तर शहरात राहणारे, जंगल वाचावं, पक्षी वाचावे अशी इच्छा असलेले लोकही एक ढोली दत्तक घेऊ शकतात. म्हणजे त्या ढोलीसाठी लागणारा खर्च ते उचलू शकतात व संवर्धनाच्या कार्यात आपला सहभाग नोंदवू शकतात. या उपक्रमाला उत्तम यश मिळालं. जे लोक अशा आर्थिक मदतीत सहभागी होतात, त्यांनी पाक्केच्या जंगलातलं काम बघायला यावं, यांच्या वार्षिक अहवालामध्ये भर घालावी, अशीही अपेक्षा असते. नुकत्याच अशाच एका पालकाने, या सगळ्या कार्यक्रमाबद्दल एक लघुपट बनवण्यासाठी तिथे एक महिना राहून काम केलं आहे.
अमृता म्हणते, पक्षी संरक्षण व संवर्धनाच्या कामासाठी काही आंतरराष्ट्रीय संस्थांकडून निधी मिळू शकतो, पण या निधीबरोबरच त्यांनी घालून दिलेली मानके पाळायला लागतात. त्यापेक्षा इथलीच माणसं जंगलाशी जोडली गेली तर काय हरकत आहे? त्यामुळे इथल्या स्थानिकांच्या सहभागामधून आणि बाहेरच्या काही लोकांच्या मदतीमुळे हा ‘नेस्ट अॅडॉप्शन प्रोग्रॅम’ यशस्वी होताना दिसतो आहे. नेहमी वन विभागाच्या नाकर्तेपणाला नावं ठेवणाऱ्या लोकांना यामुळे खऱ्या परिस्थितीची जाणीव व्हायला मदत होते आहे. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही असं वाटणाऱ्या लोकांनाही आज पाक्केचं जंगल आपलं वाटू लागलं आहे, असा तिचा अनुभव आहे. अमृता म्हणते, नागरिकांचा आमच्या कामातला सहभाग वाढवणे, त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येणे हे आजच्या घडीला फार महत्त्वाचे आहे.
आता अरुणाचलमधला निसर्गरक्षकांचा गट वाढतो आहे. जनजागृती आणि प्रत्यक्ष संवाद यावर भर दिल्याने स्थानिकांनाही कामाचे महत्त्व पटते आहे. बैठकांमध्येही ते सहभागी होत आहेत. सुरुवातीला केवळ २ ढोली सुरक्षित ठेवण्यापासून आता ३१ ढोलींच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक उचलत आहेत. सुरुवातीला वणव्यांमुळे काही झाडं जाळत होती, काही तोडली जात होती, पण गेल्या दोन वर्षांत एकही झाड तोडलं गेलं नाहीये. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होताना दिसतो आहे.
जंगलाची, भटकंतीची आवड अमृताला आई-बाबांमुळे लागली. शाळेत असताना ती महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघात होती. १२ वीत चांगले गुण मिळाल्यामुळे मेडिकललाही जाता आलं असतं; पण त्यामुळे तिच्या खेळाला आणि त्याबरोबरच अनेक आवडीनिवडींना तिला बाजूला ठेवावं लागलं असतं. म्हणून तिने फर्गुसनमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजला असताना तिला हेमा साने नावाच्या शिक्षिका भेटल्या. त्यांच्याबरोबरही अमृताने खूप भटकंती केली. त्यांच्यामुळे तिला हा विषय अधिकच आवडीचा वाटू लागला. त्यामुळे याच विषयात पुढचं शिक्षण घेणं ओघानेच आलं. एम.एस्सी. पूर्ण झाल्यावर ‘मॉरिशिअन वाइल्ड लाइफ फाऊंडेशन’च्या वतीने ‘पिंक पीजन’ या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी तिने काम केले. या कामाचा तिला आत्ताच्या कामामध्ये खूपच फायदा झाला.
आता दीड वर्षांची असलेली तिची मुलगी, सातव्या-आठव्या महिन्यातच तिच्याबरोबर आली होती. इवल्याशा लेकीनेही अमृताला चांगली साथ दिली. एवढय़ा लहान मुलीला इतके दिवस घेऊन, एवढय़ा वेगळ्या परिस्थितीमध्ये राहणं खरं तर फार अवघड, पण अमृताशी बोलताना तिने हे सगळं सहज पेललं असं वाटतं. वेगळा प्रदेश, वेगळी माणसं, अनोळखी भाषा अशा अनेक प्रश्नांवर अमृताने तिच्या परीने उत्तरे शोधली आहेत. इथल्या लोकांनीही तिला चांगली साथ दिल्याचं जाणवतं. अर्थात घरच्यांचा, सासरच्यांचा पाठिंबा, विशेषत पतीचा आणि भावाचे प्रोत्साहन यामुळे हा प्रवास करता आला असं ती सांगते.
धनेशच्या संरक्षणाच्या निमित्ताने इथले अनेक स्थानिक प्रश्न समोर येत आहेत. धनेश पक्ष्यांचं संरक्षण हा जरी कळीचा मुद्दा असला तरीही एकूणच माणूस आणि जंगल यामधला संबंध कसा असावा, जंगलावर हक्क नक्की कोणाचा, गावातल्या माणसांना आत्मनिर्भर कसं करायचं, त्यांचं जंगलावरचं अवलंबित्व कसं कमी करायचं, त्यांच्या रोजगाराचं काय? असे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. प्रश्नांचं स्वरूप गुंतागुंतीचं असल्यामुळे कोणत्याही एकाचं उत्तर शोधताना या संपूर्ण भागाचा, इथल्या राजकारणाचा, निसर्गाचा, समाजाचा एकत्रितपणे विचार होणं गरजेचं आहे, असं मत अमृता व्यक्त करते. या सगळ्यावर उत्तरं शोधण्यासाठी अमृता आणि तिचे सहकारी काम करत राहणारच आहेत; पण अमृताचा वेगळ्या वाटेवरचा हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे.
प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2015 1:01 am

Web Title: amruta rane
Next Stories
1 मॅगी.. तुम होती तो..
2 चिंतेचा आजार
3 हर शख्स परेशान-सा क्यूँ है
Just Now!
X