|| सुमित्रा भावे

चित्रपटांच्या सुरुवातीला ‘या चित्रपटात कुठलाही प्राणी अथवा पक्षी यास कुठलीही इजा होऊ नये याची काळजी घेतलेली आहे’ असं वचन देण्याचा कायदा आहे. पण माझ्या लेखी केवळ कायदा आहे म्हणून ही नोंद घ्यायची असते, असं नाही. तर खरोखरच चित्रपटाच्या दरम्यान तुमच्या बरोबर जे प्राणी काम करतात ते शॉटची वाट बघतात – शॉटच्या दरम्यान खाणं-पिणं असेल, इकडून तिकडे जाणं असेल, अगदी आंघोळ करणं, झोपणं असेल, वेळेला नेमकेपणे तोंडातून आवाज काढणं असेल – हे सगळं करण्यात चित्रपटातल्या अभिनेत्यांइतकाच ते भाग घेतात आणि त्या काळात त्यांचा लळा लागतो. चित्रपटातील अशाच काही प्राण्यांविषयी..

चित्रपटाचं कुठलंही कथानक लिहिताना त्यातलं प्रत्येक पात्र मला खूप महत्त्वाचं वाटत असतं. बाजूची, काही काळ विशिष्ट संदर्भानं येणारी पात्रं, जेमतेम म्हणून आलेली असतात. पण ती खरीखरी आणि विशिष्ट माणसं म्हणून दाखवायची असतील तर छोटय़ा भूमिकांसाठीसुद्धा कुणीही चालेल, असं नसतं. चित्रपटात सर्वच तपशील ‘कृत्रिम नैसर्गिक’ मांडायचे असतात. म्हणून प्रत्येक तपशिलाला सारखंच महत्त्व असतं. वस्तूंची, माणसांची तशीच प्राण्यांची निवड चोखंदळपणे करावी लागते आणि सर्वानाच चित्रपटनिर्मितीच्या काळात खूप जपावं लागतं. म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य जपावं लागतं.

चित्रपटांच्या सुरुवातीला ‘या चित्रपटात कुठलाही प्राणी अथवा पक्षी यास कुठलीही इजा होऊ नये याची काळजी घेतलेली आहे’ असं वचन देण्याचा कायदा आहे. पण माझ्या लेखी केवळ कायदा आहे म्हणून ही नोंद घ्यायची असते, असं नाही. तर खरोखरच चित्रपटाच्या दरम्यान तुमच्या बरोबर जे प्राणी काम करतात ते शॉटची वाट बघतात – शॉटच्या दरम्यान खाणं-पिणं असेल, इकडून तिकडे जाणं असेल, अगदी आंघोळ करणं, झोपणं असेल, वेळेला नेमकेपणे तोंडातून आवाज काढणं असेल – हे सगळं करण्यात चित्रपटातल्या अभिनेत्यांइतकाच ते भाग घेतात आणि त्या काळात त्यांचा लळा लागतो. ते नुसते ‘क्ष’ प्राणी उरत नाहीत तर त्यांना नाव येतं. ते त्यांच्या आणि आपल्या परिचयाचं होतं. त्या नावानं हाक मारल्यावर ते तुमच्याकडे वळून पाहायला लागतात आणि मला तर वाटतं की तयार झालेला चित्रपट ते टीमबरोबर बघत नाहीत खरं; पण शूटिंगचा शेवटचा शॉट झाल्यावर ते बाकी टीम मेंबर्ससारखेच समाधानाचा सुस्कारा सोडत असतील.

चित्रीकरण. ‘पर्यावरण आणि जीवनशैली याबाबतीत स्त्री-पुरुषांचा वेगळा दृष्टिकोन’ हा लघुपटाचा विषय. पुरुषांना गावाच्या गायरानातसुद्धा नगदी पिकं घेऊन सुबत्ता वाढवावी असं वाटत असतं, तर गावच्या स्त्रियांना पारंपरिक दुभत्याचाच व्यवसाय करावा म्हणजे पोरांच्याही तोंडाला दुभतं लागतं असं वाटत असतं. त्यातल्या गाईचं नाव होतं ‘तानुबाई’, एका म्हशीचं नाव होतं ‘सायकल’ आणि गाढवाचं नाव होतं ‘पोपट’. म्हणजे ही आम्ही ठेवलेली नावं नव्हती, त्यांच्या मालकाने ठेवलेली नावं होती.

गावात एका बाजूला युनिटचा स्वयंपाक करायला एक छोटा तंबू टाकला होता. त्याच्या पाठीमागे ही मंडळी राहायची. आमचा स्वयंपाकी तक्रार करत माझ्याकडे आला, ‘सायकल आणि पोपट एकमेकांशी खूप भांडतात. रात्री मला नीट झोप येत नाही.’ मला पहिल्यांदा हे वाक्यच कळलं नाही. जाऊन बघते तर खरंच ती म्हैस आणि ते गाढव यांची भांडणं चाललेली. त्यांची नेहमीची जागा बदललेली. स्वयंपाकाच्या तंबूतून येणारे वास, तिथली बडबड याने ते अस्वस्थ होत असणार. मग हळूहळू आम्ही सगळ्यांनी, त्यांच्या मालकाच्या मदतीनं, त्यांच्याशी ओळख करून घेतली. मग  ते शांत झाले. नाहीतर तोपर्यंत पोपटराव शॉटमध्ये हव्या त्या घरासमोर उभे राहायलाच तयार होत नव्हते.

माझे नेहमीचे सहकारी अनेकदा माझी चेष्टा करतात. आता या चित्रपटात कुठलं जनावर असणार हो मावशी?आत्तापर्यंतच्या चित्रपटांमध्ये म्हैस, शेळ्या-मेंढय़ा, कुत्री-मांजरं, पोपट, गाय इतकंच काय नाग, घोडे, उंट, हत्ती, कासव यांनीही काम केलेलं आहे. ‘संहिता’ चित्रपटातला पोपट फारच भारी होता. तो आमच्या एका सहकाऱ्यानं आणला होता. पुण्याहून कोल्हापूरला. तो त्याच्या शेजाऱ्यांनी पाळलेला पोपट. पोपटाचा मालकही शूटिंगला बरोबर आलेला होता. त्याची गम्मत अशी होती की त्याला पिंजऱ्यात राहण्याची सवय नव्हती. तो निर्भयपणे सगळीकडे मोकळा हिंडत असे. त्याच्या आवडीचे पदार्थ रोज सकाळी ‘प्रॉडक्शन डिपार्टमेंट’ लक्षात ठेवून आणत असे. त्यामुळे तो खुशीतही असे. इकडे तिकडे हिंडताना तो मधेच पायात यायचा. भीती वाटायची चुकून पाय वगैरे पडला तर! पण तो निर्भय. शॉट पुरतं त्याला पिंजऱ्यात घालायचो, बाकी तो स्वतंत्र असायचा. चित्रपटातला छोटा कलाकार ‘ध्रुव’ याची या मिठूशी चांगली दोस्ती झाली. असाच दुसरा अंगाखांद्यावर खेळणारा पोपट आमच्या ‘मोर देखने जंगल में’मध्ये आहे. मदन देवधर हा एक फार गुणी नट या चित्रपटात एक आदिवासी मुलगा आहे. या चित्रपटाचं शूटिंग गुजरातच्या आदिवासी भागात झालं. तिथेही आम्हाला असाच पिंजऱ्यात न राहणारा, भोवतालच्या माणसांशी मत्री करणारा पोपट भेटला. मदनने त्याच्याशी दोस्ती केली आणि मग शॉट्स मध्येही तो त्याच्या खांद्यावर निवांत बसून राहायला लागला.

‘बेवक्त बारीश’ हा चित्रपट राजस्थानच्या खेडय़ांमध्ये शूट केला. सगळीकडे उंटांच्या गाडय़ा. चित्रपटात आमचा कलाकार ओंकार गोवर्धन याचीही एक गाडी असते. उंटाची गाडी चालवायला शिकणं सोपं नव्हतं. ओंकारने ते काम शिकून घेतलं. ज्या गाडीवर तो काम शिकला त्या उंटाचं नाव होतं ‘सुंदर’. मालकानं प्रेमानं ठेवलेलं नाव. खरं तर उंटाची मान, पाय, डोळे, ओठ, शेपूट या सगळ्याकडे बघताना, कुठल्या अर्थाने त्याला ‘सुंदर’ म्हणायचं ते समजत नाही. पण ‘सुंदर’च्या चेहेऱ्यावर खरंच एक गंभीर आणि गोड असा भाव असायचा. गाडीवानांनी त्यांच्या उंटांच्या अंगावरचे केस कलात्मकरीत्या कापून त्यांच्या पाठीवर वेगवेगळी डिझाईन्स तयार केली होती. एक दिवस ओंकारचं शिक्षण झालं. त्याने ‘सुंदर’शी थोडीशी दोस्तीही केली. दुसऱ्या दिवशी त्याच्या सरावासाठी पुन्हा ती गाडी बोलावली. ओंकारनं त्याला ‘चल सुंदर’ अशी हाक मारल्यावर काल त्याच्याकडे वळून बघणारा, त्याचं ऐकणारा ‘सुंदर’ आज त्याच्याकडे बघेचना. मालकाला विचारलं, ‘‘अरे, हा कालचाच ‘सुंदर’ आहे ना?’’ तो म्हणाला, ‘‘हो’’. ओंकार म्हणाला, ‘‘नाही, सुंदर नक्कीच बदलला आहे.’’ आता उंटांची चेहरेपट्टी लक्षात ठेवून आपला उंट नेमका ओळखणं तिथल्या उंटांच्या गर्दीत ओंकारला जमणं कठीणच होतं. पण त्याच्या पाठीवरच्या केसांच्या डिझाईनमुळे, त्याला हा कालचा उंट नाही हे ओळखता आलं. मग शूटिंगच्या काळात जे २-३ वेगवेगळे उंट आले त्या सर्वाशीच ओंकारने दोस्ती केली आणि तो उंटांची गाडी चालवण्यात पटाईत झाला. पहिला ‘सुंदर’ सोडून दुसऱ्या दोन उंटांनीसुद्धा ‘सुंदर’ नाव आवडून घेतलं. ‘सुंदर’ म्हणून ओंकार त्यांच्याशी बोलायला लागला की त्याचं बोलणं आपल्याला कळतंय असा अभिनय ते करू लागले.

खरी गम्मत आली ती ‘अस्तु’ चित्रपटाच्या वेळी. त्यात तर ‘लक्षुंबाई’नावाची हत्तीण होती. पहिल्या दिवशी लक्षुंबाईच्या शेजारी उभं राहिल्यावर तिच्या प्रचंड देहाची जाणीव झाली आणि भीतीच वाटली. अमृता सुभाष आणि नचिकेत पूर्णपात्रे या दोघांना लक्षुंबाईबरोबर काम करायचं होतं. चित्रपटात लक्षुंबाईला अमृतानं आंघोळ घालायची होती आणि नंतर अमृता तिच्या तान्ह्य़ा बाळासाठी अंगाई गीत गाते ते ऐकत लक्षुंबाईला झोपायचं होतं. तिच्या पोटाला टेकून अमृताची छोटी मुलगी (आर्ट डायरेक्शनमधला माझा सहकारी संतोष सखंद – त्याची मुलगी संघर्षां) आणि आप्पा (डॉ. मोहन आगाशे) हे दोघंही ती अंगाई ऐकत लक्षुंबाईच्या पोटाला टेकून झोपतात असा सीन होता. लक्षुंबाईची आंघोळ, हे आडवं झोपणं आणि माहुताचं (नचिकेतचं) चढून जाऊन तिच्या गंडस्थळावर बसणं, या कृती अवघडच होत्या. लक्षुंबाई हे सगळं परक्याकडून करून घेईल की नाही याबद्दल लक्षुंबाईचा माहूत साशंक होता. पण शूटिंगच्या आधी लक्षुंबाईकडे गप्पा मारायला जाऊन, तिला ताजा ऊस खायला घालून अमृता आणि नचिकेत यांनी तिच्याशी जी दोस्ती केली होती त्यातून त्यांनाच माहुतापेक्षा लक्षुंबाईच्या सहकार्याची खात्री वाटत होती. लक्षुंबाई तिच्या चालीनं लोकेशनवर येणार म्हणजे वेळाची अनिश्चिती. नट मंडळी दिलेल्या वेळेपेक्षा उशिरा आली तर वाट बघण्याची अनिश्चित अस्वस्थता अनुभवावी लागते. मी अभिमानाने सांगते की आमच्या सेटवर वेळा नीट पाळल्या जातात. त्यामुळे लक्षुंबाईनं शिफ्ट सुरू होताना हजर असावं हेच योग्य. म्हणून स्वतंत्र ट्रकची व्यवस्था केली. लक्षुंबाई ट्रकमधून स्वत:च्या उसाच्या भाऱ्यासह सेटवर यायची. रोज सकाळी सेटवर शूटिंग सुरू होताना अभिनेते, तंत्रज्ञ यांना भेटून हॅलो करावं तसं मी लक्षुंबाईलाही हॅलो करत असे. तिच्या बारीक डोळ्यांत ओळख आणि नुसती ओळख नाही तर प्रेम आणि विचार दोन्ही दिसायचं. अमृताने कमालच केली होती. नदीच्या भर पत्रात उभं राहून लक्षुंबाईचं ते सावळं रूप घसघसून घासून तिला न्हाऊ घातलं होतं. तिच्या भाळावर रंगीत चित्र रेखून तिला नटवल्यावर तिच्या सोंडेला मिठी मारली होती. अमृताच्या पोटात, स्पर्शात खरं प्रेम जाणवलं नसतं तर लक्षुंबाईनं तिला सहन केलं नसतं. डॉ. आगाशे अंगाई गीत ऐकत तिच्या पोटावर रेलून झोपले असताना मधेच लक्षुंबाई छोटीशी हालचाल करायची. मग डॉ. आगाशे, तिचे आजोबा असल्यासारखे ‘‘लक्षुंबाईऽऽ’’ म्हणून तिला दटावायचे आणि ती शांत व्हायची. लक्षुंबाईच्या सोंडेचा जिना करत, गंडस्थळावर पोचलेला नचिकेत, चढण्यापूर्वी आणि गंडस्थळावर पोचल्यावर लक्षुंबाईला मोठय़ा आदरानं नमस्कार करायचा. ‘कुणाही प्राण्याला या चित्रपटात दुखापत झालेली नाही’ या अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्डाच्या आदेशापेक्षा या प्राणी कलाकारांशी आमचं घट्ट नातं तयार होतं. आणि ‘अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड’चे फॉर्म भरणं, नंतर त्यांच्या (काहीवेळा) निर्थक प्रश्नांना उत्तरं देणं हे सोपस्कार त्रासदायक ठरतात.

‘दिठी’ चित्रपटात किशोर कदमला गाईचं बाळंतपण करायचं होतं. शशांक शेंडे आणि अमृता सुभाष हे दोघं गाईचे मालक. किशोरनं शूटिंगच्या आधी या गायीशी- सगुणा तिचं नाव- तिच्या पाठीवरून पोटावरून हात फिरवून मायेचं नातं जोडलं होतं. तो त्याच्या कवीच्या मृदू आवाजात तिच्याशी बोलत असे. शशांक तर ज्या सहजतेनं तिच्याशी बोलायचा ते ऐकताना डोळ्यात पाणीच यायचं. ‘दिठी’मधल्या गायवाल्यांच्या घरात एक कोंबडासुद्धा होता. आमचं काय चाललंय याचं त्याला सारखं कुतूहल. उगीच इकडून तिकडे मधेमधे नाचत असायचा. गाईच्या पोटातल्या कळा तिला सोसेनाशा झाल्यावर कोंबडा अस्वस्थ झाला आहे आणि तिला सोडवण्यासाठी लोक काय करतायत यावर लक्ष ठेवून आहे, असं मला दाखवायचं होतं. पण तो शूटिंगच्या मधेमधे येतोय म्हटल्यावर त्याला एका टोपलीत ठेवण्यात आलं. तिथून मान वर करून लुकलुकत्या डोळ्यांनी तो बाहेरच्या गोंधळाकडे बघत होता. मला सारखी भीती की ए.डी. (असिस्टंट डायरेक्टर) त्याला विसरणार आणि तसंच झालं. एव्हाना तो टोपलीतून उडी मारून बाहेर पळून गेला होता. मी अस्वस्थ. मग सगळ्यांची पळापळ. आमचा एक ए.डी. चिन्मय दामले – त्यानं बाहेर पावसात पळापळ करून करून त्या कोंबडय़ाला पकडून आणलं. किशोरनं तर जाहीरही केलं की, ज्याला ज्याला वजन कमी करायचं असेल त्याने रोज येऊन या कोंबडय़ाला पकडून टोपलीत ठेवावं. पण या आमच्या ए.डी.ला नुसता कोंबडाच नाही तर एक कुत्राही पकडून आणायचा होता. त्या कुत्र्याने घरात शिरून, भाकरी खाऊन, दारात आलेल्या डॉ. आगाशांवर भुंकून बाहेर जायचं होतं. या कुत्र्याची भूमिका कशी वाटली हे चिन्मयच्या तोंडून ऐकणं हा सगळ्या युनिटचा किस्सा झाला. यावरून आठवलं ‘बाधा’ चित्रपटातही मला एक काळा आणि गरीब, प्रेमळ कुत्रा हवा होता. पण ज्या गावात शूटिंग चाललं होतं तिथे काही असा कुत्रा मिळेना. सगळे म्हणाले की दुसऱ्या कोणत्याही रंगाचा असला तर काय बिघडलं? पण मी म्हणाले,‘‘नाही, तो काळाच पाहिजे.’’ मग आमचा एक सहकारी म्हणाला, ‘आमच्या गावी असा एक कुत्रा आहे.’ मी म्हटलं, ‘घेऊन ये.’ तो गेला आणि टेंपोतून कुत्र्याला घेऊन आला. त्या काळ्या कुत्र्यामुळे दोन सीन्स किती छान रंगले हे चित्रपटाच्या पहिल्या शोला सगळ्या सहकाऱ्यांना पटलं!

म्हशीच्या डोळ्यांत, म्हणजे आमच्या ‘सरशी’ मधल्या ‘सायकल’च्या डोळ्यात किंचित, ‘आम्हाला का उगीच त्रास’ अशी नाराजी असायची. पोपटाच्या डोळ्यात ‘कशी गम्मत चाललीये’ असा भाव. उंटांच्या डोळ्यात ‘चालू देत तुम्हा पोरापोरांचं’ असा प्रौढ संयम. लक्षुंबाईच्या नजरेत ‘दोस्ती आणि समजल्याचा भाव’ आणि सगुणाच्या नजरेत ‘अपरंपार माया’. हे अनुभव पुसता येत नाहीत.

हिऱ्याची छोटी चमकी एकदम चेहऱ्याला श्रीमंती आणि सौंदर्य देऊन जावी तसे हे कलाकार चित्रपट करणाऱ्याला आणि बघणाऱ्याला जगण्याची विशेष अनुभूती देतात.

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com