उमा बापट

umaajitbapat@gmail.com

sodyachi khichdi recipe in marathi
जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी खास “सोड्याची खिचडी” झटपट होईल तयार
Famous Odissi Dancer Jhelum Paranjape article on International Dance Day
नृत्याविष्कार!
contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीचा अनुभव आपल्याला रोजच्या जगण्यात येत असतो. खरं तर प्रत्येकाचं वेगळेपण हे मनुष्याचं सौंदर्य असतं; पण तरीही कधी-कधी ते विसरून फक्त भिन्नताच अधोरेखित केली जाते आणि मतांतरं हे अनेकदा नात्यांमधल्या ताणाचं कारण ठरतं. पण वेगवेगळ्या लोकांना आपलंसं करता आलं आणि अनपेक्षित परिस्थितीशी जुळवून घेता आलं, तर काही समस्या मुळातच उद्भवणार नाहीत. मुलांचं वेगळेपण असंच समजून घ्यायला हवं, त्यांनाही अपरिचित वातावरण अनुभवायला मिळायला हवं!

‘‘माझ्या मुलीला ‘माझा आवडता पक्षी’ यावर चित्र काढायला सांगितल्यावर तिनं गिधाडाचं चित्र काढलं. मी थक्क झालो!’’ एक बाबा सांगत होता. नंतर तिनं त्या चित्राला खूप सजवलं, कारण तो ‘राजा गिधाड’ आहे, असं तिनं ठरवलं. शाळेतल्या बाईंना हे अपेक्षित नव्हतं; पण त्यांना ते चित्र आवडलं. त्यांनी ते वर्गातल्या फलकावर लावलं. लहानपणी आपण काढलेल्या गिधाडाच्या चित्राचं स्वागत झालेली मुलगी त्यातून आजही  वेगळा अनुभव घेत असते. कुणालाही कोणताही पक्षी आवडू शकतो, त्यात चूक-बरोबर किंवा श्रेष्ठ- कनिष्ठ नाही हे तिचं बाळकडू होतं. त्याउलट कुणी झाडाचं पान लाल रंगवल्यावर आक्षेप घेतला गेला असेल तर हा अनुभवसुद्धा एखाद्याच्या स्मरणपोतडीत जमा होऊ शकतो. लहानसहान प्रसंगांतूनही दृष्टिकोन घडत जातात. पूर्वग्रह तयार होताना पूर्वअनुभव कसा आहे याचा परिणाम होत जातो.

एका घरातली दोन भावंडं काही वेळेला अगदी वेगळ्या आवडीनिवडी असलेली, भिन्न मनोवृत्तींची असतात. जन्मदाते आणि घरातलं वातावरण सारखं असलं तरी वातावरणाबरोबर प्रत्येक व्यक्ती वेगळ्या तऱ्हेनं देवाणघेवाण करत जाते. प्रत्येक व्यक्ती आनुवंशिकतेबरोबरच ज्या-त्या व्यक्तीची म्हणून खास, एकमेवाद्वितीय अशी शिदोरी बरोबर घेऊन येते. जसं शारीरिक रंगरूप, ठेवण, प्रकृती, हे व्यक्तीगणिक वेगळं, तसंच अनेक सवयी, गरजा, क्षमता, कमजोरी हेही निरनिराळं. व्यक्तिभिन्नता आणि तरीही माणसाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये सर्वाना जोडणाऱ्या काही समान सूत्रांचे धागे हा मानसशास्त्राचा गाभा आहे. तरतमभाव न ठेवता याची प्रत्येकासाठी सकारात्मक सोबत होऊ शकते. एखादं मूल ठरावीक वयात चालायला, बोलायला लागलं नाही, की लगेच तुलना व्हायला लागते. यापलीकडे जाऊन न चालण्यामागे किंवा उशिरा बोलण्यामागे काही अडचण आहे का, योग्य वेळी योग्य मदतीची गरज आहे का, हे शोधता येतं. वेळीच केलेल्या उपायांचे अनेक फायदे दिसून येतात. दुसऱ्या टोकाला ज्या वयात मुलं सर्वसाधारणपणे पूर्ण वाक्य बोलू शकतात, त्याआधीच एखादं मूल जर स्वत:चं स्वत: वाक्य तयार करताना दिसलं तर त्या मुलाची चुणूक जाणवते. प्रत्येकाचं मोठं होत राहणं हे निकोप समाजाचं चित्र आहे. ज्याला एखादी गोष्ट जमत नाही त्याला तर मदत करायची आहेच; पण जो एखादी गोष्ट पटकन शिकू शकतो त्यालाही चालना देणं गरजेचं आहे. कुणाला बिचारी सहानुभूती आणि कुणाबद्दल  फुशारकी, बढाई मिरवणं ही दोन टोकं झाली. ही टोकं न गाठता ‘निरनिराळे आम्ही सारे आमच्या गरजांना सामावून घेऊ रे,’ असा सर्वसमावेशक आणि विविधतेला आपलेपणानं कवेत घेणारा समाज हवा. याची सुरुवात निरनिराळ्या सर्वाचं स्वागत असलेल्या घरटय़ातून होते. यापूर्वी ‘निवांत रमणं’ (१५ फेब्रुवारी) या लेखात आपण पाहिलं होतं की, घरातली प्रत्येक व्यक्ती कशात रमते ते आपल्याला ठाऊक असणं आणि एकमेकांनी परस्पर रुचींचा आदर करणं आवश्यक आहे.

कुटुंबातल्या वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्ती एकत्र राहताना निरनिराळ्या प्रकारे जुळवून घ्यावं लागतं. स्नेहा वहिनींना आजूबाजूच्या बायकांना एकत्रित  करून पुस्तक वाचन करायची आवड, तर त्यांच्या यजमानांना शांतपणे स्वत:चं स्वत: वाचन करायची सवय. दोघंही आपापल्या आवडी जोपासतात आणि एकमेकांच्या आड येत नाहीत. आरोहीनं नृत्यातलं पुढील शिक्षण घ्यायचं पक्कं केलं. घरी या कलेची कुणालाही फारशी पार्श्वभूमी नाही. घरचा व्यवसाय असूनही तो पर्याय न निवडता तिनं वेगळं क्षेत्र निवडलं. तिच्या निर्णयाला घरून विरोध झाला नाही. अबोल बाबाचा बडबडा अर्णव. बाबाहून अगदी वेगळा वाटायचा. त्याची बडबड ऐकूनही बाबा थकून जायचा. तरीही अबोल आणि बडबडय़ा बाबा-मुलाची जोडी मात्र छान जमायची. सतत काही तरी सांगू पाहणाऱ्या अर्णवला नि:शंक श्रोता मिळायचा. एका घरात नवीन सून आली. तिला कुत्रा पाळायची हौस. तिची हौस साऱ्या घरानं पूर्ण केली. ज्या घरात कधी पाळीव प्राणी आला नव्हता, तिथे नव्या सुनेबरोबर कुटुंबात नव्या सदस्याची भर पडली. आपल्यापेक्षा भिन्न  वृत्तीच्या आड न येणं, विरोध न करणं, भिन्न आवडीलाही साथ करणं आणि सक्रिय सहभागी होणं, अशा विविध पद्धती या उदाहरणांमधून जाणवल्या असतील. आपल्यापैकी अनेकांनी नाना तऱ्हा जुळवून घ्यायच्या काही पद्धती अनुभवातून साकारल्या असतील. अशा आपल्या पद्धती एकमेकांना जरूर सांगू या.

आपल्या घरात वेगवेगळे नातेवाईक, मित्रमंडळी किंवा परिचितांचं येणं होतं का, यावरही निरनिराळे अनुभव मिळणं अवलंबून असतं. प्रणवच्या लहानपणापासून अनेक माणसं घरात येतात-जातात हे त्यानं सहज अनुभवलं. माळीकाकांबरोबर आजोबांच्या चाललेल्या गप्पांमध्ये लुडबुड केली. बाबाच्या कामासंबंधातले वेगवेगळ्या ठिकाणचे लोक घरी जेवायला आलेले बघितलं, त्यांच्या खाण्याच्या लकबींचं हळूच निरीक्षण केलं. मैत्रिणींना जेव्हा काही काम असेल तेव्हा तुमच्या लहान मुलांना सांभाळायला माझ्याकडे सोडा, असं प्रणवची आई सांगायची. प्रणवला आपल्यापेक्षा छोटय़ा मुलांना बघायला मजा वाटायची. दूरच्या नात्यातली एक पणजी ‘फिरायला आले होते इकडे,’ असं म्हणून अचानक प्रणवच्या घरी आली की, ‘अशा काय कधी पण येतात या,’ असंही त्याला वाटायचं; पण तरी त्याच्या घरी त्यांचं स्वागत असायचं हे तो नकळत टिपत गेला. वेगवेगळ्या वयांच्या आणि नानाविध प्रकारच्या लोकांचं त्याच्या घरात सामावून जाणं त्यानं कधी आत्मसात केलं, त्यालाही कळलं नाही. त्यामुळेच कुठेही गेला तरी तो पटकन कुणाशीही बोलून संबंध जोडू शकायचा.

बऱ्याच वर्षांपूर्वी वीस-पंचवीस शहरी मुलांना एका खेडय़ात निवासी सहलीला मी घेऊन गेले, तेव्हा काही मुलांनी वीज नसणं, मेणबत्त्यांच्या प्रकाशात वावरणं हा अनुभव पहिल्यांदा घेतला, असं ती स्वत:च  सांगत होती. उलट छोटय़ा खेडय़ात राहणारा एक मुलगा एका काकूंकडे शहरात आला होता. हात, पाय धुवायला गेला, तर त्याला कुठे पाणीच दिसलं नाही. मग त्याच्या बोलण्यातून उलगडलं की, त्यानं यापूर्वी कधी नळ पाहिलाच नव्हता. तो ज्या गावात राहात होता तिथे अजूनही घरात पाण्याच्या नळाची सोय नव्हती.

मुलांनी आणि मोठय़ांनीही भिन्न अनुभव घेतलेले असतील तर कोणत्याही प्रकारच्या व्यक्ती आणि परिस्थिती समोर आली तर  नापसंती दर्शवण्याच्या  शक्यता कमी होतात. खुलेपणानं जगण्यासाठी शक्य असेल तर प्रवास करणं, प्रेक्षणीय स्थळांबरोबरच तिथली संस्कृती आणि सामान्य जनमानस समजून घेत तो करणं, याची मदत होते. पु. ल. देशपांडे यांनी वर्णिलेलं

‘ते चौकोनी कुटुंब’ याची आधुनिक काळातली आवृत्ती कधीकधी आजूबाजूला बघायला मिळते. ठरावीक चौकटीच्या बाहेरच्या जगाविषयी काही मंडळी अनभिज्ञ राहतात. सध्याच्या काही लहान मुलांना सार्वजनिक वाहनानं प्रवासही परिचयाचा नसतो. हल्ली तरुण मुलांना काही पारंपरिक खाद्यपदार्थ माहितीच नसतात. सगळ्यांना सगळं आवडू शकत नाही; पण कधी बघितलंच नसेल तर आवडनिवड स्वानुभवातून निर्माण कशी होणार? पालकांनी, शिक्षणसंस्थांनी वेगवेगळे अनुभव मुलांना देत राहणं, हे तरी त्यांच्या हातात आहे.

एका अनाथाश्रमातल्या मुलांबरोबर मी एकदा खेळत होते. अशा ठिकाणी मुलांचे काय उपक्रम घ्यायचे याबरोबर ते कोणत्या मानसिकतेनं घ्यायचे याचा जास्त विचार करावा लागतो. ‘निरनिराळे सारे’ आपले वाटायला लागल्याशिवाय त्यात रममाण होता येत नाही. या मुलांना गोष्ट सांगताना त्यात ‘घर’, ‘आई ’ असे काही शब्द येणार आहेत का, याचा आधी विचार करून तिथे वावरायला हवं. वाटलं तर आवश्यक तो बदल करता यायला हवा. एरवी साधे वाटणारे शब्द हळुवार, नाजूक भावनांना चेतवणारे शब्द ठरू शकतात याविषयी संवेदनशील असायला हवं.

बालपणीच्या काही कविता आणि गोष्टी किती अनमोल असतात ते मोठं झाल्यावर नव्यानं उमगतं. उदा. सगळे रंग, भाज्या आपापलं महत्त्व सांगतायत, मीच कसा सगळ्यांच्या उपयोगी पडतो, मी कसा साऱ्यांच्या आवडीचा आणि श्रेष्ठ, असं वर्णन असलेल्या कविता आणि गोष्टी आपण सर्वानी वाचलेल्या असतात; पण वास्तवात प्रत्येक रंग त्याच्या परीनं सुंदर दिसतो, वेगवेगळ्या भाज्यांचे स्वत:चे भिन्न उपयोग असतात, हा त्यातला मथितार्थ. ‘विविधता में एकता’ हा संदेश शाळांच्या निबंधलेखनाच्या पलीकडे नेणारा.

समाजजीवन सुरळीत राहण्यासाठी ‘निरनिराळे सारे’ ही मूलभूत बैठक आहे. बारा आणि त्यात भर पडलेल्या अजून किती तरी बलुतेदारांशिवाय आपले रोजचे व्यवहार

होऊच शकत नाहीत. त्याला उच्च-नीचतेचा स्पर्श न होऊ देता ते परस्परावलंबन आहे, हे भान जागृत ठेवू या. एकाच जंगलात वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेली, वनस्पती, कीटक, प्राणी, पक्षी असतात. जैवविविधता सांभाळणं ही मुळात आपली परंपरा आहे. हे नैसर्गिक जगणं आहे. वृक्षवल्ली आणि व्यक्ती-वल्ली या दोन्हीतलं वैविध्य जपणारं आणि जोपासणारं आपलं घरटं असेल तर ते निरामय अवस्थेकडे नेणारं होईल.