योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

‘‘सगळेच लोक ‘पॅनिक’ झालेले असताना तुमच्यातल्या अवांतर कौशल्याचा खरा कस लागतो. गेल्या दहा दिवसांपासून तू ज्या पद्धतीनं वागतो आहेस, त्यात हे सगळं आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी, इतरांची वाट न बघता तू धान्य आदी गोष्टी सिक्युरिटी गार्डला देऊन आलास, घराबाहेर पडताना आजूबाजूच्या वयस्कर लोकांना काही हवंय का, हे विचारून तू बाहेर पडतोस ही छोटी वाटत असली तरी मोठी गोष्ट आहे. व्यवहारचातुर्य, परिस्थितीचं आकलन, संवेदनशीलता अशा अनेक गोष्टी फक्त वर्गात बसून शिकता येत नाहीत. ज्या ‘अवांतर’ म्हणून हिणवल्या गेलेल्या गोष्टी तू करत राहिलास या गोष्टीतून असं शिक्षण मिळू शकतं हे कधी लक्षातच आलं नाही.’’ काका त्याला म्हणाले.

शहरातल्या लॉकडाऊनचा तो दहावा दिवस होता. सूर्यास्त झालेला असला तरी अजून आकाशात केशरी रंगाच्या विविध छटा पसरलेल्या होत्या. तो नेहमीसारखाच आपल्या बाल्कनीत उभा होता. एरवी कधीही कानावर न पडणारा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत तो उभा असायचा. लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनचा हा त्याचा नवीन छंद होता.

आज गॅलरीत आल्यावर त्याला जाणवलं की शेजारचे काका त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीत उभे होते. मग काकांना हाक मारत तो म्हणाला, ‘‘काका..आताच त्या पलीकडच्या  दुकानदाराचा फोन येऊन गेला. तुमच्या वाणसामानातल्या ज्या दोन गोष्टी राहिल्यात त्या उद्या मिळतील. उद्या मी दूध घेण्यासाठी बाहेर पडणारच आहे, तेव्हा मी त्या घेऊन येईन. बाकी तुम्हाला वेळ झाला की मात्र दुपारी काकूंना जी औषधं आणून दिली होती ती एकदा बघा. तुमच्या नेहमीच्या कंपन्यांची औषधं नव्हती म्हणून केमिस्टनं दुसऱ्या कंपन्यांची औषधं दिली आहेत. पण त्याच्या मते ती चालायला हरकत नाही.’’ त्यावर काहीही न बोलता काकांनी फक्त मान हलवली. तेवढय़ात पुन्हा काहीतरी आठवून तो म्हणाला, ‘‘..आणि माझं आपल्या भागातल्या कॉर्पोरेटरशी आणि पोलिसांशी बोलणं झालं. परवा सकाळी आपल्या सोसायटीत भाजीचा टेम्पो येणार आहे.  सगळ्यांचा निदान भाजीचा प्रश्न तरी सुटेल. आपल्या सोसायटीच्या ग्रुपवरही मी सगळ्यांना कळवलं आहे.’’

‘‘चालेल..’’, काका त्याला होकार देत म्हणाले, ‘‘पण परवा मी खाली येऊन भाजी घेईन. आता उगाच आणखी तुझी कामं वाढवणार नाही. लिफ्ट नसणाऱ्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरवर दुखरे पाय घेऊन आम्ही राहतो, या सबबीखाली तुझ्याकडून आम्ही बरंच काम करवून घेतलेलं आहे.. तुला जास्त त्रास देण्यात काही अर्थ नाही.’’ काकांचं बोलणं अध्र्यातच तोडत तो म्हणाला, ‘‘अहो, त्यात त्रास कसला? तुमच्या घरी ज्या गोष्टी लागतात, त्याच आमच्याकडेही लागतात. तेव्हा त्यासाठी दोघांनी बाहेर पडण्यापेक्षा कोणीतरी एकाने बाहेर पडणं कधीही चांगलंच नाही का? आणि हो..दुपारी विचारायचं राहिलं, अमेरिकेत काय खबरबात?’’ ‘‘तिथेही तेच. तुझ्यासारखंच आमचे चिरंजीवही ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. एकच चांगली गोष्ट म्हणजे तो जिथे आहे तिकडे गोष्टी नियंत्रणात आहेत. पण शेवटी काळजी तर घ्यायलाच हवी. किती दिवस हे सगळं असं चालणार आहे  माहिती नाही.. ’’, काका हताशपणे म्हणाले.

मग काही वेळ कोणीच एकमेकांशी बोललं नाही. ती शांतता दोघांनाही इतकी अपरिचित होती, की कधी कधी त्यांना आपण कोणत्यातरी वेगळ्या शहरात आलो आहोत असं वाटून जात होतं. अचानक काका त्याच्याकडे बघून म्हणाले, ‘‘खरंतर बऱ्याच वर्षांपूर्वीच हे म्हणायला पाहिजे होतं. पण आज म्हणतोय..‘सॉरी’!’’,  काकांच्या बोलण्याचा त्याला काहीच संदर्भ समजेना. ‘‘खरंतर हे परवा माझ्या लक्षात आलं. पण मनाचा हिय्या करून तुझ्यापर्यंत पोचायला दोन दिवस लागले. काकांनी अजून नीट खुलासा न केल्यामुळे आता त्याच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं.

काका म्हणाले, ‘‘लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा तू जास्त अ‍ॅक्टिव्ह होतास. साचेबद्ध अभ्यासात तू कधीच अडकला नाहीस. उलट ‘एक्स्ट्रॉ करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज्’मध्ये सर्वांच्या पुढे होतास. एनसीसीमध्ये तर तू होतासच. पण घरी न सांगता वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेणं आणि बऱ्याचदा बक्षीस जिंकणं हे तुझं वैशिष्टय़ होतं. दरवर्षी खेळ, वक्तृत्व, नाटक यांसारख्या गोष्टीत चार-पाच बक्षिसं तर तुला मिळायचीच.’’, भूतकाळात रमत काका म्हणाले. त्यावर  ‘‘हं’’, असं अस्पष्टपणे तो पुटपुटला. पण अजूनही काकांना नेमकं काय म्हणायचं आहे हे त्याला समजत नव्हतं.

‘‘फक्त सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होता, की आम्ही सगळे, म्हणजे शेजारीपाजारी राहणारे, माझ्या ओळखीचे तुझे काही नातेवाईक तुझ्या या उद्योगांना ‘अवांतर’ म्हणायचो. तू कधी पहिल्या दहात आला नाहीस. पण तुझे गुणइतकेही कधी वाईट नसायचे. पण माझ्यासारख्या अनेकांना शांत बसवायचं नाही. चारचौघात तुझे गुण विचारण्याची आणि तुझ्या आईबाबांना टेन्शन देण्याची एकही संधी आम्ही सोडायचो नाही. शिवाय त्याच्या जोडीला तुला आणि तुझ्या आईबाबांना देण्यासाठी फुकटचे असंख्य सल्लेही आमच्याकडे होते. आमच्या मुलांना तुझ्या नादी न लागण्याची सूचनाही आम्ही करायचो. तुला मिळालेल्या बक्षिसाचा आनंद कमी कसा होईल, नवीन स्पर्धेत भाग घेण्यामध्ये खोडा कसा घालता येईल, याच्यासाठीच आम्ही प्रयत्न केला..!’’ त्यावर हसून तो म्हणाला, ‘‘मला आठवतं आहे, दहावीत असताना आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या आधी अशीच कोणीतरी जोरदार काडी केली होती, आणि मला आई-बाबांनी स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, असं ठणकावून सांगितलं होतं. तरीही मी भाग घेतला. बक्षीस मिळवलं आणि घरी आल्यावर बेदम मारही खाल्ला. तो प्रकार माझ्या इतक्या जिव्हारी लागला, की मी ज्या तीन-चार गोष्टी दहावीमुळे करणार नव्हतो, त्या मुद्दामहून केल्या.. पण अचानक त्या गोष्टींची आठवण तुम्हाला आज कशी काय झाली?’’

त्यावर काका म्हणाले, ‘‘युद्धाच्या वेळी ‘ब्लॅक आऊट’चा अनुभव घेतलेली आमची पिढी आहे. तेव्हा हा लॉकडाऊन जाहीर झाल्यावर असं वाटलं की आपण हे अगदी सहज निभावून नेऊ. पण लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी लक्षात आलं, की आता गोष्टी तितक्या सोप्या राहिलेल्या नाहीत. आमची तब्येत हे कदाचित तसं वाटण्याचं मुख्य कारण असेल.’’

‘‘अगदीच असू शकेल.’’, त्याला काकांचं म्हणणं पटलं. काका म्हणाले, ‘‘मात्र हेही खरं आहे, की आज लोकसंख्येच्या तुलनेत यंत्रणांवर कमालीचा ताण आहे. अशी टोकाची स्थिती तेही पहिल्यांदाच अनुभवत असल्याने अनेक गोष्टी काम करताना शिकण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यात आपले लोक बेशिस्तीची नवनवीन उदाहरणं दाखवत आहेत. अशा परिस्थितीत भान ठेवून जबाबदारीनं वागणं सर्वात जास्त निर्णायक असतं. सगळेच लोक ‘पॅनिक’ झालेले असताना तुमच्या संवाद कौशल्याचाही खरा कस लागतो. प्रसंगी दोन पावलं मागे येण्याचीही तयारी ठेवावी लागते. त्याच्या जोडीला आपल्याबरोबर जे इतर लोक राहतात त्यांना काय हवं, काय नको, याचाही विचार तुम्ही करत असाल तर ते जाणीव समृद्ध असल्याचं लक्षण असतं. गेल्या दहा दिवसांपासून ज्या पद्धतीने तू वागतो आहेस, त्यात हे सगळं आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी, बिल्डिंगमधल्या लोकांच्या निर्णयाची वाट न बघता तू धान्य आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी सिक्युरिटी गार्डला देऊन आलास, दोन महिन्यांचा आगाऊ पगार देऊन तुमच्या मोलकरणीला तू सुट्टी दिलीस, हे पुरेसं बोलकं आहे. स्वत: बाहेर पडताना इतरांना काही हवंय का, हे वयस्कर लोकांना विचारून तू बाहेर पडतोस ही छोटी वाटत असली तरी खरंच मोठी गोष्ट आहे. स्पष्टच सांगायचं झालं तर आमच्या चिरंजीवांनी असं काहीही केलं नसतं याची मला पूर्ण कल्पना आहे.’’, काका स्पष्टपणे म्हणाले.

ते ऐकून तो म्हणाला, ‘‘असं काही नाही. तो माझ्याजागी असता तर त्यानंही हेच केलं असतं.’’ त्यावर काका म्हणाले, ‘‘तो जिथे आहे तिथेही परिस्थिती हीच आहे. पण कितीतरी गोष्टी त्याला सुचतच नाहीत ही वस्तुस्थिती आहे. स्वत:ची नेमकी काळजी कशी घ्यावी, हेही काही वेळा त्याला झेपत नाही. व्यवहारचातुर्य, परिस्थितीचं आकलन, संवेदनशीलता अशा अनेक गोष्टी फक्त वर्गात बसून शिकता येत नाहीत. ज्या ‘अवांतर’ म्हणून हिणवल्या गेलेल्या गोष्टी तू करत राहिलास, त्यातूनच कोणत्या परिस्थितीत कसं वागायचं, माणसांशी व्यवहार कसा करायचा, भावनांचं संतुलन कसं साधायचं, याचं उत्तम शिक्षण तुला मिळालं. आम्ही ते समजू शकलो नाही.. मुळात या गोष्टीतून असं शिक्षण मिळू शकतं हे कधी लक्षातच आलं नाही. आम्ही आमच्या क्षणिक आनंदासाठी तुझ्यासाठी तेव्हा अडथळे निर्माण करत राहिलो, त्याबद्दल मला तुला सॉरी म्हणायचं होतं.’’

त्यावर काहीतरी विचार करून तो काकांना म्हणाला,‘‘तुम्हाला काय म्हणायचं आहे, ते आता माझ्या लक्षात आलं. खरं सांगायचं तर मला कायम या ‘अवांतर’ वाटणाऱ्या गोष्टीही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विषयांइतक्याच महत्त्वाच्या वाटल्या. कारण दरवेळी त्यातून काहीतरी वेगळा अनुभव मिळायचा. म्हणजे त्या वयात अनुभव म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं नाही. पण भारी वाटायचं.. स्पर्धा जाहीर झाली किंवा एनसीसीचा कॅम्प जाहीर झाला की अंगावर रोमांच उभे राहायचे. अनोळखी लोकांशी कसं वागायचं, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नसतील तरी चित्त स्थिर कसं ठेवायचं, अनपेक्षित गोष्टी घडल्या, तर त्यासाठी कायम तयार कसं राहायचं, हे सगळं त्या अवांतर  गोष्टींतून मला मिळालं. अर्थात भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत मी यशस्वी झालो असं नाही. काही ठिकाणी तर मी तोंडावर पडलो, काही ठिकाणी माझा अतिआत्मविश्वास नडला, काही ठिकाणी आता आपल्याला सगळंच माहिती आहे, असं म्हणत भरपूर मातीही खाल्ली. पण गोष्टी करत राहिलो, आणि तेच निर्णायक ठरलं.’’ काकांनी त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.

तो  म्हणाला, ‘‘एक मात्र होतं. मी जे काही करतो ते लोकांना कायम चुकीचंच का वाटतं, या प्रश्नानं मला अस्वस्थ केलं. आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी इतरांना महत्त्वाच्या वाटत नाहीत हे आपलं अपयश आहे, असं कित्येक वर्ष मी समजत होतो. पण एक दिवस लक्षात आलं, की आपल्याकडे लोक काय करू नकोस हेच कायम सांगत असतात. काय करावं, हे विचारलं तर ठरावीक उत्तरांच्या पलीकडचं जग बहुतेकांच्या गावीही नसतं. तेव्हा मी विचार केला, आपल्याला ज्यातून मजा येते असे वेगवेगळे अनुभव घेत राहायचे आणि तेच आताही करतो. फायदा-तोटा यांच्या गणितात फार अडकत नाही. नोकरी लागल्यावरही गेली तीन-चार वर्षं मे महिन्यात जो मी आंब्यांचा व्यवसाय करतो तो त्यासाठीच. ओळखी वाढतात.. चार नवीन गोष्टी समजतात.. आई-बाबाही उत्साहानं मला मदत करतात.. आता मजा बघा, आपल्या बिल्डिंगमध्ये जो भाजीवाला येणार आहे, त्याचा नंबर मला माझ्या आंब्यांच्या डीलरकडून मिळाला. मी फोन केल्यावर त्याच्याकडून मला टेम्पो मागवण्याची सगळी पद्धत समजली.’’ ‘‘वा!  मस्तच’’, काकांनी त्याला दाद दिली.

‘‘तेव्हा काका, ज्या गोष्टी घडून गेल्या त्या गेल्या. उगाच तुम्ही त्याचं दडपण घेऊन नका. ते टोमणे मी कधीच विसरलो आहे. मला तेव्हाही काही सिद्ध करायचं नव्हतं. आजही करायचं नाही. कारण काही सिद्ध करून इतर कोणाच्याही मान्यतेची मला गरज नाही. हो. पण एक गोष्ट शक्य झाली आणि मनापासून पटली तर नक्की करा. पुन्हा कोणी माझ्यासारखा ‘अवांतर’ गोष्टींत रमणारा तुम्हाला भेटला, तर किमान त्याला मोडता तरी घालू नका. बाकी त्याला जे शोधायचं असेल, मिळवायचं असेल ते तो बघेलच. चला, मी आत जातो.. दूरचित्रवाणीवर आणखी एक जुनी मालिका सुरू होणार आहे ती मला पहायची आहे. उद्या त्या राहिलेल्या गोष्टी मिळाल्या की देईनच.’’ असं म्हणून तो घरात निघून गेला.