News Flash

स्मृती आख्यान : विस्मरणाचे रोजचे अनुभव

आपले प्रश्न काय आहेत हे समजलं तर त्यावर काही उपाययोजना करता येतात.

मंगला जोगळेकर mangal.joglekar@gmail.com

‘‘मागच्या लेखात आपण रोज घडणाऱ्या, साध्या स्वरूपाच्या विस्मरणाबद्दल बोललो होतो. याच विषयावर आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या गटात एक चर्चा घेतली. प्रत्येकाला विस्मरणाचे कोणकोणते अनुभव येतात ते प्रत्येकानं सांगायचं. हे अनुभव जर तुम्ही वाचलेत, तर तुमच्या असं लक्षात येईल, की तुम्हीही यातले अनेक अनुभव घेतले आहेत, रोज घेत असता. हे विस्मरण टाळण्यासाठी कोणी काय उपाय के ला, याविषयीही आम्ही बोललो. त्यातून हेच समोर आलं, की हे रोजच्या जगण्यात घडणारं विस्मरण टाळता येणं तुलनेनं सहज शक्य आहे. जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर तुम्हालाही नक्की जमेल.’’ 

गेल्या आठवडय़ात आमच्या वर्गात ‘रोज घडणारे विस्मरणाचे अनुभव’ या विषयावर चर्चा चालू होती. (रोजचं विस्मरण म्हणजे सर्वाना अनुभवाला येणारं, नियमित घडणारं असे सर्वसाधारण अनुभव.)

सुधाकरकाका म्हणाले, ‘‘मी डॉक्टरांकडे गेलो होतो. प्रिस्क्रिप्शन घेतलं, औषधंही घेऊन आलो. ती घ्यायला सुरुवात केली. प्रिस्क्रिप्शन फाइलला लावावं म्हणून बघायला गेलो, तर प्रिस्क्रिप्शन औषधांच्या बॅगेत नव्हतं. ते तिथेच असल्याची मला खात्री होती. थोडं बघितल्यावर नंतर प्रिस्क्रिप्शन मिळालं, पण माझ्या स्वत:च्या विश्वासावरचा टवका उडाला होता.’’ बँकेत जाताना पासबुक घरी विसरून गेल्यामुळे पुन्हा घरी परत यावं लागल्याचं सरिताताईंनी सांगितलं. अश्विनीताईंनी फ्रिज साफ करायला घेतला, तर भाजीच्या कप्प्यात अगदी पाठीमागे त्यांना सुकलेली भेंडी सापडली. भेंडी आणून दहा-बारा दिवस होऊन गेले होते, पण त्यांच्या स्मरणातून भेंडी गायब झाली होती. अनुराधाताईंनी डोशांचा बेत केला होता. सगळ्यांना खायला देऊन त्या जेवायला बसल्या. त्यांचं झाल्यावर ओटा आवरायला गेल्या, तेव्हा तव्याखालचा गॅस चालूच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अशोक सावंतांचा रोजचा प्रश्न होता तो म्हणजे औषध घेतलं की नाही याबद्दलची शंका.

नुकतेच अमेरिकेला जाऊन आलेले रमेश साधले यांनी या विषयावरच्या त्यांनी वाचलेल्या एका पुस्तकाबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलेले त्या पुस्तकातले किस्से असे- जॉन कॅम्पबेल हा लेखक पुस्तकाच्या दुकानात गेला. पुस्तकं चाळताना एक पुस्तक आवडून त्यानं ते विकत आणलं. घरी आणून बघतो तर काय, ते पुस्तक त्यानं स्वत:च लिहिलेलं होतं! अल्बर्ट आईन्स्टाईनना कुठून तरी एक मोठय़ा रकमेचा धनादेश आला. पुस्तक वाचताना त्यांनी तो खूण म्हणून वापरला आणि ते त्याबद्दल विसरूनही गेले. बघितलं तेव्हा त्याची मुदत केव्हाच संपून गेली होती. त्यांच्या कर्मचाऱ्यानं चेक देणाऱ्याला याबद्दल सांगितल्यावर दुसरा चेक पाठवला गेला, परंतु तो चेक आल्यानंतर ‘हा मला कशासाठी पाठविला गेला आहे,’ हे विचारण्यासाठी आईन्स्टाईननी त्यांना पत्र लिहिलं. काय म्हणावं या विसराळूपणाला?

एखाद्याचा वाढदिवस होऊन गेल्यावर फोन करायची आठवण येणं, भाजी-आमटीमध्ये तिखट-मीठ घातलं की नाही ते लक्षात नसणं, आपण फ्रिजपाशी किंवा खोलीत कशासाठी आलो होतो ते न आठवणं, एकापाठोपाठ एक अनुभव आमच्या सत्रात शेअर केले जात होते. एकीकडे ते फळ्यावर लिहिणं चालू होतं. गटाची मिळून जवळजवळ तीस-पस्तीस अनुभवांची यादीच झाली. सर्व प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात अधूनमधून घडत असल्यासारखे दिसत होते. त्यामुळे आपण एकटेच नाही, हा दिलासाही सभासदांसाठी महत्त्वाचा होता.

आपले प्रश्न काय आहेत हे समजलं तर त्यावर काही उपाययोजना करता येतात. खरं तर प्रत्येक जणच रोजचे अनुभव आटोक्यात असावेत यासाठी धडपड करताना दिसत होते. अनुभवांपाठीमागचं कारण आणि त्यावर काय उपाय करता येतील, यावर चर्चा पुढे सरकली. या वर्गात बहुतेक करून ज्येष्ठ मंडळीच असल्यानं प्रथम महत्त्वाचा औषधांचा मुद्दा चर्चेसाठी घेतला गेला. औषध घेतलं की नाही या शंकेच्या पाठीमागे अनेक कारणं दिसली. ती रोजची क्रिया असल्यानं त्याकडे लक्ष दिलं जात नाही, दुसरं म्हणजे काम करता करता नाश्ता केला जातो, त्यानंतर औषधं घेतली जातात ती कुठे तरी दुसरीकडे ध्यान असताना. औषध वेळेवर घेतलं जावं यासाठी बरेच उपाय केले जाताना दिसत होते. औषधं मेडिसिन बॉक्समध्ये काढून ठेवणं, वाटीत घालून डायनिंग टेबलवर ठेवणं, औषधांच्या वेळेला अलार्म लावणं, नाश्त्याबरोबर पाणी प्यायला घेतलं की औषधं घेऊन टाकणं, एकमेकांना ‘औषध घेतलं का?’ म्हणून आठवण करणं, नवरा किंवा बायको एकानं औषधं देण्याची जबाबदारी घेणं वगैरे, वगैरे. इतके खात्रीलायक उपाय असूनही कित्येकदा औषध घेतलं की नाही, ही शंका छळते, असंही अनेक जण म्हणाले. विशेषत: घाईगडबडीच्या वेळी, बाहेरगावी गेलं तर असं वाटतंच. आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे जेव्हा तब्येत बरी नसते, काही दुखणं झालेलं असतं, तेव्हा औषध घेणं अजिबात विसरत नाही, पण दुखण्यातून बाहेर यायला लागलो की औषधांची वेळ इकडे तिकडे होते किंवा विसरून जाणं होतं. हॉस्पिटलमध्ये असताना नर्स औषधं दिल्यावर चार्टवर लिहून ठेवते याची नोंद बहुतेकांनी घेतलेली होती. आपणही तसं करायला हवं का, असाही प्रश्न अनेकांना पडला होता.

चर्चेत मांडला गेलेला पुढील प्रश्न होता तो पदार्थाची चव बिघडण्याचा. नारायण राव म्हणाले, की दर दोन-तीन दिवसांतून एकदा तरी पदार्थाची चव बिघडलेली असते. रावकाकूंनी ते मान्य केलं. त्या म्हणाल्या, ‘‘खरंच होतं असं. मी काही मुद्दामहून करत नाही, पण जाते खरं विसरून.’’ रावकाकूंच्या मदतीला गटातील इतर भगिनी धावून आल्या ते सांगायला नकोच. भाजी-आमटीत तिखट-मीठ घालताना फोन वाजला तरी लक्ष द्यायचं नाही, कोणाशी बोलत असताना हे काम करायचं नाही, ताटलीमध्ये सगळं काढून ठेवायचं, फ्रिजमधलं वाटण ओटय़ावर काढून ते समोर ठेवायचं, चव बघायची, अशा सगळ्या सूचना झाल्या. तुम्हालाही आणखी काही सुचतीलच. असे काही उपाय केले तरी स्वयंपाक करताना कधी बेल वाजते, कधी कामाची बाई काही तरी विचारायला येते, असं काही तरी घडतच असतं. वैशालीताई म्हणाल्या, ‘‘एक सांगू, आपलं मन शांत नसतं, हाच मुख्य मुद्दा आहे. माझी आई म्हणायची, ‘स्वयंपाक करताना तिखट-मिठाबरोबर थोडा आपला जीवही घालावा लागतो.’ ते काही आपल्याला जमत नाही.  मन आपलं धावतच असतं त्यामुळे हे असं होत राहातं.’’ कधी आमटीला उकळी येऊन ती उतू जाते, कधी दूध उतू जातं, कधी चहा आटून जातो, कधी पाहिजे तो पदार्थ संपलेला असतो, असे अनेक स्वयंपाकघरातील प्रसंग सांगितले जात होते. काही वादविवाद न होता ही चर्चा चालली होती, उपायांची देवाणघेवाण होत होती आणि मुख्य म्हणजे सगळ्यांनाच असे अनुभव येत असल्यानं प्रत्येक जण त्यात सहभाग घेत होता. नलिनीताई म्हणाल्या, ‘‘पहिल्यांदाच अशा रोजच्या विस्मरणाच्या प्रश्नांवर आणि ते सोडवण्यासाठी आम्ही विचार करतो आहोत.’’

आपण आपल्या प्रश्नांमधून काही धडा घेतो का, असा प्रश्न विचारला गेल्यावर किशोर शहाणे म्हणाले, ‘‘पुन:पुन्हा तोच प्रश्न, तसाच प्रसंग घडला आणि त्याबद्दल घरातल्यांनी, मित्रमंडळींनी नाराजी दाखवली, तर काही तरी करायला पाहिजे हे लक्षात येतं. त्या-त्या वेळेपुरतं ते केलंही जातं, परंतु बऱ्याचदा तो प्रयत्न अल्पजीवी ठरतो. काही वेळेला मात्र आयुष्यभरासाठी आपण सुधारतो.’’ त्यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, ‘‘माझ्या जवळच्या मित्राला मी बऱ्याच दिवसांपासून एक पुस्तक वाचायला देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते त्याला खूप दिवसांपासून वाचायचं होतं आणि माझ्याकडे ते होतं. मीच त्याला म्हटलं होतं की, ‘तू विकत आणू नको, मी देतो तुला.’ आठवडय़ातून दोन-तीन वेळा तरी आम्ही भेटत असू, पण एक महिना झाला तरी पुस्तक द्यायचं माझ्या लक्षात येत नव्हतं. तो मला मधूनमधून ‘आणलं का पुस्तक?’ असं विचारायचा. मी सांगायचो, ‘देतो रे! काय एवढी घाई लागली आहे तुला? माझ्या लक्षात आहे, पण ते कपाटातून काढणं होईना बघ.’ असं करता करता दोन-तीन महिने होऊन गेले. मित्रानं पुस्तकाचा विषय काढणं बंद केलं आणि माझ्याही डोक्यातून ते निघून गेलं. नंतर एकदा कपाटात इतर पुस्तकं  बघताना ते पुस्तक दिसलं आणि मी दुसऱ्या दिवशी भेटल्यावर ते मित्राला दिलं. मित्र म्हणाला, ‘मला वाटलं तुला ते द्यायचं नव्हतं. मग मी विकत आणून वाचलं.’ माझ्या मनाला ते फार लागलं. तेव्हापासून मी शक्यतो लक्षात ठेवून वस्तू वेळेवर देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दुसऱ्याची नाराजी आणि गैरसमज आपण टाळू शकतो.’’

अंजलीताई म्हणाल्या, ‘‘माझ्या पुतणीकडे पाहुणे येणार होते, म्हणून ती माझ्याकडून एकदा एक काचेचा सेट घेऊन गेली. तिचं नवीन लग्न झालं होतं म्हणून मीही तो लगेच दिला.         चार-पाचदा आठवण करूनही तिनं तो आणून दिला नाही. आज त्याला दोन वर्ष झाली.’’ अशा घटना सांगायला एकदम सहा-सात जणांनी हात वर के ले. अनेक जणांना हे अनुभव जिव्हारी लागल्याचं दिसत होतं. कोणाची साडी, कोणाचा स्वेटर, डबे, भांडी, गॅजेट्स, किती तरी गोष्टी परत आल्याच नव्हत्या. लोकांना आपण वस्तू परत दिली नाही याबद्दल काही वाटतही नाही, याची खंत जास्त होती. चर्चा थोडी गंभीर व्हायला लागल्यावर मग त्यावर आपण काय करू शकू इकडे तिचा रोख वळवला. सुधाताई म्हणाल्या, ‘‘कोणाची वस्तू माझ्याकडे आली, की मी ती लगेच बाजूला, नजरेसमोर काढून ठेवते किं वा मला कधी कुठे जायचं असेल तर काय काय घेऊन जायचंय याची आधीच तयारी करून ठेवते.’’

डॉ. विनोद यांनी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले, ‘‘तुमची तब्येत कशी आहे यावरही तुमची स्मरणशक्ती अवलंबून असते. तुमची तब्येत बिघडलेली असेल, तुम्ही काही औषधं घेत असाल, जीवनसत्त्वांची कमतरता असेल, कामाचा ताण असेल, झोप पुरेशी होत नसेल, तर त्यामुळेही असे विस्मरणाचे प्रसंग वाढताना दिसू शकतात.’’

या चर्चेतून हे लक्षात आलं, की रोजच्या विस्मरणाचे प्रश्न कमी व्हावेत म्हणून आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. प्रत्येकाचा उपाय वेगळा असतो. एकाचं उत्तर दुसऱ्याला चपखल वाटेल असं नसतं. याशिवाय असं लक्षात आलं, की कितीही उपाय केले तरी नवनवीन विस्मरणाचे अनुभव येतच राहणार आहेत. त्यामुळे ते आटोक्यात राहावेत असा प्रयत्न सातत्यानं करावा लागणार आहे.

गेल्या लेखामध्ये मी तुमच्या  स्मरण-प्रश्नांचा आढावा घ्यायला सांगितलं होतं, त्यावरील उपायांचा विचार करायला सांगितलं होतं. तुम्ही ते केलं असेल, तर आजचा लेख खचितच तुमच्या अनुभवांची दखल घेणारा होता नाही का? तुम्ही ‘होमवर्क’ केला नसेल, तर तुम्ही आताही तो करू शकता. प्रश्न, त्यामागील कारणं आणि सुचणारे उपाय, अशा सगळ्याचीच नोंद घ्या. हे प्रश्न सोडवणं, त्यांचं प्रमाण कमी करणं अवघड नाही. त्यासाठी थोडी इच्छाशक्ती मात्र हवी. तुमच्या मित्रमंडळींमध्ये प्रश्न कमी व्हावेत या इच्छेनं सगळ्यांनी मिळून चर्चा केलीत तर छानच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 12:05 am

Web Title: daily experience of forgetfulness zws 70
Next Stories
1 आई नावाची बाई
2 करोनाविरुद्धची लढाई; ‘आशा’झाल्या माता
3 ज्येष्ठांचे लिव्ह इन :  निखळ मैत्री  ते सहजीवन
Just Now!
X