योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

तुम्ही कितीही कष्ट करून आणि काहीही मिळवलंत, तरी ‘हे तर काहीच नाही’ असं तुम्हाला वाटत राहतं का?.. दुसऱ्यांनी काय मिळवलंय याच्याशी सारखी तुलना करावीशी वाटते का?.. अशी तुलना आपण दुसऱ्यांच्या वाईट गोष्टींबद्दल करतो का हो?.. नाही ना?.. मग जेव्हा यशाची तुलना करतो तेव्हा आपणच आपल्या यशाची, आपल्या कष्टांची किंमत कमी करत नसतो का?..

child girls perform amazing dance on dhol tasha
ढोल ताशाच्या गजरात चिमुकल्या मुलींनी केला अप्रतिम डान्स, ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल फॅन
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून तो बाहेर पडला.  इमारतीमधल्या घरांची रचना चांगली होती, व्यवहार पारदर्शक होता. अर्थात असं असलं तरी मुख्य प्रश्न हाच होता, की नेहमी आपल्याला आवडलेली गोष्ट आणि आपलं ‘बजेट’ यात कमालीची तफावत का असते?

पडणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर त्याच्या मनातलं गणित क्लिष्ट होत होतं. याच विचारात आपल्या कारचं दार उघडून तो आत बसणार तेवढय़ात त्याच्या पाठीवर जोरदार थाप बसली आणि आवाज ऐकू आला, ‘‘काय स्कॉलर?..’’ त्यानं चमकून मागे पाहिलं, तर एक गलेलठ्ठ आणि आकडेबाज मिशा असणारा माणूस, भलामोठा गॉगल घालून उभा होता. त्याची कोणतीही ओळख पटत नव्हती. मात्र पाठीवर मारलेली त्याची जोरदार थाप याला थेट भूतकाळात घेऊन गेली आणि त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, ‘‘बॅकबेंचर?’’ त्यावर तो गलेलठ्ठ माणूस मोठय़ा समाधानानं हसला.

शाळेत असताना आपल्या सर्वाच्याच वर्गात कमी गुण मिळवणारी आणि शेवटच्या बाकावर बसणारी काही मुलं असतात, ज्यांच्यापासून लांब राहण्याची ताकीद आपल्याला घरातल्यांनी दिलेली असते.  हा ‘बॅकबेंचर’ही तसाच होता. आपल्या वयाच्या मानानं तो चांगला आडदांड असल्यामुळे आणि कोणी वाकडय़ात गेला तर त्याला बिनधास्त बुक्के मारत असल्यानं पोरंही त्याला टरकून असायची; पण असं असलं, तरी वर्गाच्या कबड्डी टीममधला तो महत्त्वाचा खेळाडू होता आणि गोळाफेकमध्ये तर त्याचं बक्षीस ठरलेलं असायचं. तेव्हा वार्षिक क्रीडा सप्ताहात, त्याला बक्षीस मिळाल्यावर ‘स्कॉलर’ पोरंही त्याला ‘शेकहँड’ करून त्याचं अभिनंदन करायची तेव्हा तो अक्षरश: आनंदानं मोहरून जायचा आणि वर्गातल्या मुलींनी त्याचं अभिनंदन केलं की लाजायचा. तेव्हा कबड्डीच्या अंतिम सामन्यापेक्षा त्याचं लाजणं बघायला वर्गातल्या मुलामुलींची जास्त गर्दी व्हायची. खरं तर ‘बॅकबेंचर’चे आणि ‘स्कॉलर’चे वडील एकाच कंपनीत काम करायचे. फरक इतकाच होता, की ‘स्कॉलर’चे वडील कंपनीच्या मोजक्या अधिकाऱ्यांपैकी एक होते, तर ‘बॅकबेंचर’चे वडील अनेक कामगारांपैकी एक.

आज इतक्या वर्षांनी भेटल्यावरही, खऱ्या नावानं हाक न मारता आपण ‘बॅकबेंचर’ म्हणालो, हे लक्षात येऊन तो ओशाळत म्हणाला, ‘‘सॉरी, तुझं शाळेतलं नावच तोंडावर आलं..’’ त्यावर तो हसून म्हणाला, ‘‘स्कॉलर.. आता जे आहे ते आहे. तेव्हापासूनच तू ‘स्कॉलर’ होतास म्हणून आज मस्त कारमधून फिरतो आहेस.’’ त्यावर तो लगेच म्हणाला,‘‘अरे, ही कार तर काहीच नाही. आपल्या वर्गातला टॉपर अमेरिकेत असतो. त्याच्या गाडीचे फोटो इन्स्टाग्रामवर आहेत.. एक नंबर कार ! आणि मी कसला ‘स्कॉलर’? दहावीपर्यंत मार्क बरे पडले. मग नंतर घसरगुंडी. जे खरे ‘स्कॉलर’ होते ते आज परदेशात आहेत. इथे जे राहिलेत, त्यातले बहुतेक लोक घरातले व्यवसाय बघतात. नोकरी करणारे माझ्यासारखे नमुने फार कमी आहेत.’’

‘‘तू इथंच जवळपास जॉब करतोस का?’’ ‘बॅकबेंचर’नं विचारलं.

‘‘हो. त्या पलीकडच्या आयटी पार्कमधली पहिली पांढऱ्या घुमटाची इमारत.. तिथेच माझं ऑफिस आहे,’’ त्यानं माहिती दिली. ‘‘अरे, ती झकास बिल्डिंग आहे. मी गेलो होतो.. तिथे एकदम सगळं सॉलिड टिपटॉप आहे,’’ ‘बॅकबेंचर’ उत्साहानं म्हणाला. पण त्यावर तो म्हणाला, ‘‘हे आमचं ऑफिस तर काहीच नाही. आमच्या हैदराबादच्या ऑफिसचे फोटो गूगल करून बघ. ते तर फाइव्ह स्टार हॉटेलसारखं आहे. बरं ते सोड, तुझं काय चालू आहे सध्या?’’ त्यावर आपल्या डोळ्यांवरचा गॉगल काढून खिशात ठेवत ‘बॅकबेंचर’ पुटपुटला.. ‘‘ती समोरची कन्स्ट्रक्शन स्कीम सुरू आहे ना, ती माझीच.’’

‘‘तुझीच.. म्हणजे?’’ त्याच्या या छोटय़ाशा प्रश्नात आश्चर्य, अविश्वास आणि असूया अशा सगळ्या भावना ठासून भरलेल्या होत्या. त्याच्या बोलण्याचा रोख समजून ‘बॅकबेंचर’ म्हणाला, ‘‘माझीच म्हणजे या साइटला, सगळं ‘रॉ मटेरियल’ पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे.’’ ते ऐकून का कोण जाणे, पण त्याला जरा बरं वाटलं. ‘बॅकबेंचर’ म्हणाला, ‘‘गेली काही र्वष बऱ्याच ठिकाणी बांधकामासाठी रॉ मटेरियल पुरवण्याचं काम मी करतो.’’ ते ऐकून स्कॉलर म्हणाला, ‘‘अरे, तुमच्या धंद्यात फक्त रॉ मटेरियल पुरवणं म्हणजे काहीच नाही. तू खरं तर आता प्लॉट विकत घेऊन कन्स्ट्रक्शन सुरू करायला हवंस.’’ त्याच्या या बोलण्यावर विषय बदलत ‘बॅकबेंचर’नं विचारलं, ‘‘तुला आवडला का इथला फ्लॅट?’’

‘‘हो, उत्तम आहे, पण कदाचित बजेटमुळे बेत रद्द करावा लागेल.’’ त्याचं बोलणं अर्धवट तोडत ‘बॅकबेंचर’ म्हणाला, ‘‘तेवढं सोडून बोल. गेली तीन-चार र्वष या भागातले भाव वाढतच आहेत. पुढच्या वर्षी, या भागात टाऊनशिप झाली, की भाव इतके वाढतील की आपण कल्पनाही करू शकणार नाही.’’

त्यावर त्यानं आपली बाजू मांडली, ‘‘तू म्हणतोस ते बरोबर आहे. तसं आम्हाला पुरेल एवढं मोठं घर बजेटमध्ये आताही बसेल.. पण मला आणखी मोठं घर घ्यायचं आहे. म्हणजे नात्यात, मित्रमंडळींत, लोकांना असा शॉक बसला पाहिजे, की यानं असं घर कसं घेतलं?’’ त्यावर क्षणभर विचार करत ‘बॅकबेंचर’ म्हणाला, ‘‘तुझ्या या नातेवाईकांचा, मित्रांचा चांगल्या अर्थानं होणारा अपेक्षाभंग हा एकदाच होणार आहे, पण तुझ्या अपेक्षा आणि सर्वाच्या गरजा हे घर कायम पूर्ण करणार आहे. तेव्हा पुन्हा विचार कर.. शेवटी निर्णय तुझा आहे. तसंही काही वर्षांनी बढती मिळून मोठय़ा हुद्दय़ावर गेलास, की तुला हवं तसं मोठं घर घेता येईलच.’’

त्यावर वैतागून तो म्हणाला, ‘‘अरे इथल्या बढतीत काहीच दम नसतो. सगळी मलई आमच्या परदेशातल्या ऑफिसमधले लोक खातात, मग उरलंसुरलं इकडे पाठवतात. सगळा नुसता आकडय़ांचा आणि ओळखीचा खेळ..’’

‘‘मग तू का नाही गेलास परदेशात? तुलाही तितके मार्क मिळालेच असणार.. हो ना?’’ ‘बॅकबेंचर’नं थेट विचारलं. त्यावर सुस्कारा सोडत तो म्हणाला, ‘‘परदेशात जायचं म्हणजे फक्त मार्क मिळून भागत नाही. मार्क मलाही होते, स्कॉलरशिपही मिळत होती; पण ताईचं शिक्षणही बाकी होतं. सगळा खर्च पाहिल्यावर, घरातल्यांच्या गळ्याला नख लावण्यात काही अर्थ नव्हता. तेव्हा जे राहिलं ते राहिलंच.’’

ते ऐकून ‘बॅकबेंचर’ लगेच म्हणाला, ‘‘हे तर काहीच नाही. आपल्या वर्गातला तो मधल्या ओळीत बसणारा चष्मेवाला आठवतोय का तुला? त्याचा तर घरचा धंदा तो बारावीत असताना बुडाला; पण दागिने गहाण टाकून, कर्ज काढून त्याच्या घरातल्यांनी त्याला पाठवलं. त्यांची तीन-चार र्वष फार कटकटीची गेली; पण तिकडे राहून त्यानं सगळा ‘बॅकलॉग’ भरून काढला.’’

‘बॅकबेंचर’चं हे बोलणं ऐकून तो चिडून म्हणाला, ‘‘कोणाच्या घरातली परिस्थिती जास्त वाईट होती हा काय तुलना करण्याचा विषय आहे का?.. आज दोघंही जण आपापल्या जागी सुखी आहेत हे कमी आहे का?..’’ त्यावर टाळीसाठी हात पुढे करत ‘बॅकबेंचर’ म्हणाला, ‘‘दे टाळी! मला हेच म्हणायचं आहे. जर आपण वाईट गोष्टींची तुलना ‘हे तर काहीच नाही’ अशा वृत्तीनं करत नाही, तर मग चांगल्या गोष्टींची अशी तुलना का करतो?.. विशेषत: अशा गोष्टींची, की ज्या तुम्ही तुमच्या कष्टानं मिळवलेल्या असतात. असं करून आपण जे यश मिळवलं त्याची किंमत आपणच कमी करतो.. नाही का? घाम गाळून गोष्ट मिळवायची आणि मग दुसऱ्यांनी काय मिळवलं हे बघून आपल्याला मिळालेलं काहीच नाही, असं म्हणायचं म्हणजे आपणच आपलं यश अपयशात बदलण्यासारखं आहे, असं नाही वाटत तुला?’’

‘बॅकबेंचर’च्या इतक्या थेट प्रश्नांनी तो गडबडला, पण पुन्हा आपलाच मुद्दा रेटत म्हणाला, ‘‘पण नेहमीच उद्दिष्ट मोठं ठेवायला हवं ना?..’’ त्यावर ‘बॅकबेंचर’ म्हणाला, ‘‘ ‘लो एम इज क्राइम’ वगैरे फंडे देऊ नकोस. मी विचारलेला प्रश्न अतिशय सोपा आणि थेट आहे. तुमचं स्कॉलर लोकांचं मी लहानपणापासून बघितलं आहे. गणिताच्या पेपरात अठ्ठय़ाणव मार्क जरी मिळाले, तरी दोन मार्क गेले म्हणून रडायचं. तसं वाईट वाटणं किती स्वाभाविक आहे, हे माझ्यासारख्या चाळीस मार्क पडणाऱ्यालाही समजतं; पण तुमचं दोन मार्क गेल्याचं दु:ख हे नेहमीच अठ्ठय़ाणव मार्क मिळाल्याच्या आनंदापेक्षा जास्त होतं. त्यात अजून वाईट म्हणजे, अठ्ठय़ाणव मार्क काय आपल्याला मिळतातच, अशा समजुतीत तुम्ही असायचात. तेव्हा ते मार्क मिळवल्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकला नाहीत. दोन मार्क कमी पडल्यावर काय होतं, हे ज्याला तेहतीस मार्क मिळाले, त्याला विचारून बघ. त्याचं दोन मार्क कमी पडण्याचं दु:ख हे खरं तर जास्त मोठं आहे. नाही का?..’’ यावर काय बोलावं हे न सुचून तो गप्प बसला.

तेव्हा ‘बॅकबेंचर’च म्हणाला, ‘‘कोणतंही उद्दिष्टच ठेवू नकोस, असं मी अर्थातच म्हणणार नाही. फक्त तुझ्याकडे जे आहे, त्याला ‘हे तर काहीच नाही’ असं म्हणून स्वत:ला अपयशी ठरवू नकोस. बाकी तू स्कॉलर आहेसच. मी तुला काय शिकवणार!’’ ‘बॅकबेंचर’चं बोलणं ऐकून तो हसला आणि म्हणाला, ‘‘तू टोमणे चांगले मारतोस, हे मान्य करायलाच पाहिजे; पण मला तुझा मुद्दा मान्य आहे. कदाचित कायम दुसऱ्यानं मिळवलेली गोष्ट म्हणजेच यश आहे, असं समजण्याचा माझा स्वभाव बदलायला हवा. तू जे काही म्हणालास, त्यावर मी नक्की विचार करीन आणि घर बुक केलं, तर पहिला पेढा तुला देईन.’’

त्यावर ‘बॅकबेंचर’ म्हणाला, ‘‘तेव्हा मला बेसनाचा लाडू दे. तोच- जो तुझी आई भारी बनवते.. आणि एकदा त्याचा तुकडा मी तुझ्या डब्यातनं न विचारता खाल्ला म्हणून तू घरून चिठ्ठी आणली होतीस.’’

त्यावर ‘‘नक्की!’’ असं म्हणत त्यानं ‘बॅकबेंचर’ला कोपरापासून नमस्कार केला.