अंटाक्र्टिकासारख्या बर्फाळ प्रदेशात राहण्यासाठी कठीणातल्या कठीण प्रशिक्षणाच्या पायऱ्या ओलांडणाऱ्या डॉ. ममता लाला यांना मुळातच साहसी खेळांची आवड होती. वैद्यकीय क्षेत्रात एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी कार्य करतानाही त्यांनी आपली ही आवड वैविध्यपूर्ण काम निवडून पूर्ण केली. एकाच वेळी साहसी जीवन, कार्य आणि संशोधन, पुस्तक लिखाण हे सर्व लीलया पार पाडले.

अंटाक्र्टिकाच्या बर्फाळ प्रदेशातला एक उबदार, स्वच्छ सूर्याचा प्रसन्न दिवस! निळ्याशार पाण्यात पोहण्याचा कुणालाही मोह होणारच. विशेषत: बरेच दिवस खूप गुंतागुंतीचे प्रशिक्षण आणि बोटीचा प्रवास झाल्यावर!.. सोबतच्या फोटोत एक सुळसुळ पोहणारी तरुण नाजूक स्त्री दिसते आहे. अगदी स्वाभाविक असेच छायाचित्र! फक्त विशेष हे आहे की, पाण्याचे तापमान आहे उणे एक सेल्सिअस आणि ही हौशी तरुणी कुणी स्विमर किंवा टुरिस्ट नाही. ती आहे अंटाक्र्टिकाच्या प्रदेशात संशोधन मोहिमेवर गेलेल्या भारतीय शास्त्रज्ञांची काळजी घेणारी, त्या पथकातील एकमेव भारतीय स्त्री डॉ. ममता लाला.
डॉ. ममता फोटोत ज्या सहजपणे पोहताना दिसत आहेत तो त्या प्रदेशातला सगळ्यात उष्ण दिवस! तिथे सहा महिने सूर्य मावळत नाही हे खरे, पण प्रारंभी किमान तापमान उणे वीस अंशापर्यंत. वारे वाहू लागले तर भारती स्टेशनच्या कँप केबिनच्या बाहेर डोकावणेही अशक्य. अशा प्रदेशात काम करणाऱ्या विविध शास्त्रज्ञांच्या गटामध्ये डॉक्टर म्हणून सामील होण्याची संधी काही फार सहज मिळालेली नाही. त्यासाठी इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी दिलेल्या खडतर प्रशिक्षणातून पार जावे लागले. त्यात गिर्यारोहण, रॉक क्लायम्बिंग, आइस क्राफ्ट, स्नो क्राफ्ट, फायर फायटिंग, सी सर्फिग, एक ना अनेक.. शिवाय वातावरणाशी जुळवून घेताना प्रचंड शारीरिक श्रमांची कसोटी होतीच; पण या साऱ्या प्रशिक्षणामध्येही ‘सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी’ हा सन्मान प्राप्त केल्यामुळेच डॉ. ममतांचे या मोहिमेतले स्थान पक्केझाले होते, ही गोष्ट २०११ सालातली!
पण इथपर्यंतचा डॉ. ममता यांचा प्रवासही थक्क करणाराच आहे. एखादा व्यावसायिक गिर्यारोहक किंवा खेळाडू असावा इतके मानसन्मान त्यांनी मिळवले होते. स्काय डायव्हिंग, व्हाइट वॉटर रिव्हर राफ्टिंग, पॅरासेलिंग, ग्लायडिंग या सर्व साहसी खेळांमधे त्या प्रवीण होत्याच; पण रायफल शूटिंगमधले राष्ट्रीय सुवर्णपदकही त्यांनी पटकावले होते. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरी वाटा-वळणांमधून जाणाऱ्या रेड-द-हिमालयन कार रॅलीत २७०० किमी अंतर ७ दिवसांत पार करत त्या तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. या मोहिमेत त्यांचे पती डॉ. मुराद लाला त्यांचे सहकारी होते.
या साऱ्या वर्णनावरून वाटेल की, हे जोडपे साहसी खेळांच्याच क्षेत्रातले आहे. ते तर आहेच, पण ते दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. डॉ. ममता बालरोगतज्ज्ञ असून एचआयव्हीग्रस्त बालकांच्या आरोग्याबाबत त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.
७-८ देशांमधल्या या क्षेत्रातल्या संशोधनात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्या सध्या खासगी प्रॅक्टिस न करता सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात टेलिमेडिसिन विभागात बालरोगतज्ज्ञ आणि एचआयव्ही स्पेशालिस्ट सल्लागार म्हणून काम करतात. परळच्या वाडिया रुग्णालयासह इतर रुग्णालयांच्या आणि अनेक अनाथालयांच्या त्या मानद सल्लागार आहेत, तर डॉ. मुराद लाला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आँकोसर्जन आहेत.
क्षेत्र आवडीचे असो, छंदाचे असो किंवा अभ्यासाचे असो, डॉ. ममतांची कामगिरी कायम सर्वोत्तम. हे कसे काय? त्या सांगतात, ‘‘याचे कारण माझे बालपण.. ज्ञानमार्गी सुशिक्षित आईवडील.. म्हैसूरला मिळालेले उत्तम शिक्षण. वडील राजशेखरजी हे कर्नाटक राज्याच्या महिला बालकल्याण विभागाचे डेप्युटी डायरेक्टर होते. त्यामुळे लहानपणापासून ममताच्या मनात अनाथ मुलांसाठी काम करण्याची ओढ होती. आईने, लीलाताईंनी त्यांना सर्व साहसी खेळांमध्ये घातले. एनसीसीमुळे त्यांना या खेळांमध्ये प्रावीण्य मिळाले. मग ती एक जीवनशैलीच बनून गेली. अजिबात वेळ फुकट घालवायचा नाही हे आईचे संस्कार! जे
हाती घेऊ ते जिद्दीने, परिश्रमाने सर्वोत्तम करायचे,
ही एकदा सवय लागल्यावर तुम्हाला मागे वळून पाहावे लागतच नाही. आई-वडिलांनी जिद्द, कष्टांबरोबरच आत्मसन्मानाची जाणीव दिली. नम्रता हवी आणि आत्मसन्मानही जपायला हवा,
ही शिकवण डॉ. ममतांना देशा-परदेशातल्या कामात मोलाची वाटली.
मेडिकल कॉलेजमध्ये आणि गिर्यारोहणात डॉ. मुराद लाला यांची ओळख झाली. कानडी ब्राह्मण आणि पारसी या दोन घरांमधले सांस्कृतिक अंतर हे अडसर बनले नाही. वैद्यकीय क्षेत्रात आणि साहसी खेळात दोघांची प्रगती चालूच राहिली. डॉ. मुराद यांचे वडील निवृत्त एअर व्हाइस मार्शल ई. एस. लाला आणि आई कुमी लाला यांनी या साहसी सुनेचे स्वागत आनंदाने केले. लालासाहेब निवृत्तीनंतर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल म्हणून काम करतच राहिले. सासरीही सामाजिक कार्याची, साध्या राहणीची परंपरा होतीच. उदारमतवादी सासू-सासऱ्यांनी सूनबाईंच्या संशोधनाला नेहमीच मदत केली. दोन्ही घरांतून मदतीचा हात.. त्यामुळे देशा-परदेशात सतत काम करणे, सहा महिन्यांच्या मोहिमेत सहभागी होणे शक्य झाले. ‘‘मुळात सर्वाना सांभाळून राहण्याची प्रवृत्ती हेच आपल्या सांसारिक यशाचे गुपित आहे.’’ डॉ. ममता मोकळेपणाने सांगतात.
२०११ मध्ये डॉ. ममता अंटाक्र्टिका मोहिमेवर गेल्या तेव्हा डॉ. मुराद सर्जरीतून वेळ काढू शकले नाहीत; पण २०१३ मध्ये एव्हरेस्टवर जाणारे पहिले भारतीय डॉक्टर गिर्यारोहक म्हणून त्यांनी आपल्या नावाची नोंद केलीच. त्या वेळीही या मोहिमेत सामील होण्याचा मोह डॉ. ममतांना होणे स्वाभाविक होते; पण मुलगी मिनाइता हिचे दहावीचे वर्ष असल्याने त्यांनी हा मोह आवरला. नाही तर हा विक्रम भारतीय जोडप्याच्या नावावर नोंदला गेला असता. त्यांच्या मुलीने उत्तम गुण मिळवून त्यांचे चीज केले. मिनाइता (अर्थ- ज्ञानसंपन्न),
मुलगा मिन्नत (प्रार्थना) दोघेही अनेक खेळांमध्ये आणि संगीतामध्येही रस घेतात. सवरेत्कृष्टतेचा
ध्यास ही कुटुंबाची जीवनशैली म्हणून प्रत्ययाला येते ती अशी!
बालरोगतज्ज्ञ म्हणून पदवी मिळाल्यानंतर अनाथालयांच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर, एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी काम करायची गरज डॉ. ममतांनी ओळखली. जगभरातल्या अनेक नामवंत संस्थांची रिसर्च फेलोशिप त्यांना लागोपाठ मिळाली. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ, जॉन्स हॉपकिन युनिव्हर्सिटी, मेरिलँड युनिव्हर्सिटी, नेल्सन मंडेला स्कूल ऑफ दरबान..ही काही नावं. युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेच्या अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये डॉ. ममतांनी मोलाचा सहभाग नोंदवला. एचआयव्हीग्रस्त आईकडून बाळाला रोग संक्रमित होण्यावर सारं संशोधन होतं. त्यामुळे आज हे संक्रमण रोखण्यात मोठं यश मिळालं आहे. पुरेशा काळजी अभावी ही बाधा झालीच तर त्याला आळा घालून मुलाला सामान्य जीवन देता येतं. मात्र त्यासाठी खूप निगराणी लागते. याबाबतचं अनुभवसिद्ध काम डॉ. ममतांनी अनेक शोध निबंधातून जगासमोर मांडलं. त्यांनी हा प्रश्न फक्त वैद्यकीय कधीच मानला नाही. त्याचे मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि कायदेशीर प्रश्न आणि दृष्टिकोन, त्यावरचे उपाय याबाबतही त्या फार जागरुक आहेत. त्यांच्या १५ वर्षांच्या अनुभवात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांसाठी ‘प्रिन्सिपल्स ऑफ पेरिनॅटल अ‍ॅन्ड पेडिअ‍ॅट्रिक एचआयव्ही/एड्स हे पुस्तक लिहिलं जे संदर्भ पुस्तक म्हणून मोलाचं मानलं जातं.
वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक पदव्या घेतल्यानंतर डॉ. ममता लाला यांनी अनाथ मुलांसाठी जे काम केलं त्याबाबत सामाजिक क्षेत्रातल्या ‘मानद डॉक्टरेट’नं त्यांना गौरवण्यात आलं आहे.
त्यांना मुलांसोबत बघणं हा एक हेलावून टाकणारा अनुभव होता. एरवी डॉक्टरला घाबरणारी मुलं दिदी..दिदी म्हणून आपल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी सांगण्यासाठी, दिदीकडून शाबासकी मिळवण्यासाठी त्यांच्याभोवती गोळा झाली होती.
ch06दोन्ही क्षेत्रांमधले आव्हानात्मक अनुभव काय विचारल्यावर डॉ. ममता नम्रतेने आणखी गप्प होतात. माझ्या डोळ्यासमोर त्यांच्या उत्कृष्ट फोटोग्राफीचा स्लाइड शो तरळतो. ‘डिस्कव्हरी’ चॅनेल बघावे अशा सहजतेने त्या पोलर सूट घालून पेंग्विन पक्ष्यांच्या आजूबाजूने वावरताना दिसतात.
दक्षिण ध्रुवावरच्या इतर देशांच्या तळांवरच्या सोबत्यांना एकत्र करून जेवू घालताना दिसतात. तिथेही त्यांनी क्रॉस कंट्री स्पर्धा घेतली. १५० पैकी फक्त २१ जणांनी या क्रॉस कंट्रीत भाग घेतला आणि ५ कि.मी.चे अंतर फक्त ६ जणांनीच पूर्ण केले. त्यात डॉ. ममता सहाव्या आल्या. त्या हसून म्हणाल्या, ‘‘स्त्रीच्या कर्तृत्वाचा झेंडा- त्याचा मी सन्मान राखला.’’
किती खरंय हे! सहा महिन्यांत एकाही शास्त्रज्ञाला आजारी पडून परत पाठवावे लागले नाही ही कामगिरीही डॉ. ममतांच्या दृष्टीने मोलाचीच. त्यावर कळस म्हणजे ‘मोहिमेतला उत्कृष्ट सहभाग’ या किताबानेही त्यांचा गौरव झाला. जेव्हा अंटाक्र्टिकावर भारतीय तिरंगा फडकवण्याचा मान मिळाला तेव्हा त्यांना साऱ्या कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटले.
या मोहिमेतच त्यांनी एचआयव्हीवरच्या आपल्या वैद्यकीय संशोधनाचे पुस्तक पूर्ण केले, तेही एक आव्हानच म्हणायचे की. त्यांच्या या कामासाठी त्यांना मानद डॉक्टरेटही मिळाली आहे. साहसी खेळासोबत मानव जातीलाच आव्हान देणाऱ्या एड्सशीही लढण्याची मोहीम हे जणू निरंतर आव्हान असणार. डॉ. ममतांसाठी त्यामुळे जितके शब्दात बोलू जावे तितक्या त्या अंतर्मुख होताना मला जाणवत होते.
एकीकडे रौद्र, भीषण पण सुंदर निसर्गासोबतचे आव्हानात्मक जगणे आणि दुसरीकडे नाजूक बालकांचे भविष्य काळवंडून टाकणाऱ्या एचआयव्हीशी लढण्याचे आव्हान स्वीकारणे. या दोन्हीतून माणसाच्या मर्यादा आणि नियतीचा खेळ जाणवून हताश व्हायला नसेल का होत? हेच कारण असेल की, दोन क्षेत्रांत सर्वोच्च स्थानी पोहोचूनही हे डॉक्टर जोडपे अतिशय मृदू, नम्र, साधे राहिले.
लहानपणापासून खूप बक्षिसे मिळवल्यामुळे असेल, पण मानसन्मानांनी डॉ. ममता खूश झाल्या नाहीत. उलट अजून करण्यासारखे खूप आहे असेच डाचत राहाते. एचआयव्हीग्रस्त मुलांना सामान्य जीवन जगणे हल्ली शक्य झाले आहे, पण शिक्षण, भविष्य हे प्रश्न आहेतच. त्यासाठीच तर ‘‘मी खासगी प्रॅक्टिस न करता अनाथालयांना जास्त वेळ देते.’’ डॉ ममता सांगतात.
हिमालयात कोणत्या क्षणी वादळाला, हिमप्रतापाला तोंड द्यावे लागेल याचा भरवसा नसतो. आपणाला सदैव सज्ज राहावे लागते. तीच ऊर्जा, तेवढीच शक्ती आणि तेवढाच भक्तिभाव प्रत्येक कामात ओतला तर यश मिळतेच आणि एक टप्पा पूर्ण केला की, पुढचे आव्हान दृष्टिपथात येते.. प्रवास चालूच राहतो.. हेच डॉ. ममतांच्या प्रवासाचे सूत्र वाटते. त्यांची मुलगी मिनाइता हिनेही एका एनजीओच्या कामाशी जोडून घेतले हा क्षण डॉ. ममतांसाठी मोलाचा असतो, तेवढाच एखादे एचआयव्हीग्रस्त मूल तब्येत सुधारून जवळच्या नॉर्मल मुलांच्या शाळेत आनंदाने जाते, तो क्षण आनंद देतो.
आजच्या कर्तृत्वसंपन्न स्त्रीला काय संदेश द्याल, असे विचारल्यावर एका क्षणात त्या सांगतात, करिअर हेच सर्वस्व नाही. करिअर, कुटुंब आणि आपली आवड- आपला आनंद हे तीनही सारखेच महत्त्वाचे! आव्हान पेलणे जेवढे, तेवढेच महत्त्वाचे नातेसंबंध राखणे, असे मला वाटते.’’
संस्कृत आणि संगीत दोन्हीला म्हैसूरच्या संस्कृतीत स्थान आहेच. डॉ. ममतांनाही संस्कृतचे खूप प्रेम. एकूणच भाषा आणि अर्थ याबाबत त्या जागरूक. ज्ञानसंपन्न घरातल्या या श्रद्धाळू स्त्रीने ‘मिनाइता’ आणि ‘मिन्नत’ ही मुलांची नावे ठेवली. स्वत:च्या मनात ‘ममते’चा सागर घेऊन ‘मुराद’चा (होप, आशा) हात धरला. निसर्गाच्या
लयीशी सांगड घालत अनाथांच्या जगण्याला आनंदाच्या सुरात बांधण्याचा ध्यास घेतला. सर्वोच्चपदीही नम्र राहून सुरेल संगीत गुणगुणणाऱ्या या कर्तृत्वाला सलाम!
वासंती वर्तक -vasantivartak@gmail.com