अंधार-प्रकाशाच्या खेळाला लोकांनी धर्म आणि अधर्म, दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती यांचे प्रतीक बनवले. दुष्ट प्रवृत्तींचा पराजय होऊन सुष्ट, सात्त्विक प्रवृत्तींचा जय होतोच ही संकल्पना रुजवण्यासाठी त्यांनी प्रकाशाला विजयाचे, पावित्र्याचे आणि मांगल्याचे प्रतीक बनवले. म्हणूनच पृथ्वीतलावावरील देशोदेशी तेजाचा हा वैश्विक उत्सव उत्साहाने साजरा होतो. जगभरात कुठे कुठे आणि का साजरा केला जातो दीपोत्सव..
सूर्यचंद्राच्या दीप्तिमान प्रकाशाने उजळलेल्या पृथ्वीतलावावरील लोकांना या तेजाचे अप्रूप अतिप्राचीन आहे. खंड कोणताही असो, देश कोणत्याही खंडातील असो, त्या तेजाच्या प्रभेला त्यांनी उत्सवी रूप दिले आणि तेजाने तेजाची आरती करावी, तशी पणत्या, मेणबत्त्यांनी त्यांनी या तेजाला वंदन केले.
अंधार-प्रकाशाच्या या खेळाला त्यांनी धर्म आणि अधर्म, दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्ती यांचे प्रतीक बनवले. दुष्ट प्रवृत्तींचा पराजय होऊन सुष्ट, सात्त्विक प्रवृत्तींचा जय होतोच ही संकल्पना रुजवण्यासाठी त्यांनी प्रकाशाला विजयाचे, पावित्र्याचे आणि मांगल्याचे प्रतीक बनवले. म्हणूनच पृथ्वीतलावावरील देशोदेशी तेजाचा हा वैश्विक उत्सव उत्साहाने साजरा होतो. सभोवती दाटलेल्या भ्रष्ट, उत्पाती, काळोख्या रात्रीतून निश्चितपणे मुक्ती मिळेल हे समर्थपणे सांगणारी दिवाळीतली इवलीशी पणती असो की ख्रिसमसच्या गडद काळोख्या रात्री दारोदारी चमकणारा पंचकोनी कंदिलाचा तारा असो, तो इवल्याशा तेजाचा अंगही निराशेची काजळी झटकून आशेचा दिलासा देण्यास पुरेसा असतो.
म्हणूनच तेजाच्या त्या उत्सवाने जगभरात नावे कोणतीही धारण केली असली तरी देशोदेशीच्या जनमानसात रुजलेली मूळ संकल्पना मात्र सर्वत्र सारखीच दिसते हे विशेष! आणि तो आनंदोत्सवच असतो.
स्वीडनमध्ये १३ डिसेंबर हा ‘सेंट लुसिया’ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला ‘फेस्टिव्हल ऑफ लाइट’ असेही म्हणतात. स्वीडिश परंपरेप्रमाणे १३ डिसेंबरची रात्र ही सर्वात मोठी रात्र समजली जाते. स्वीडनमधील हा तेजाचा उत्सव १३ डिसेंबरला पहाटेच्या पहिल्या प्रहरात सुरू होतो. कुटुंबातील थोरल्या मुलीला ‘सेंट लुसिया’ म्हणून सन्मानित केले जाते. शुभ्र वस्त्र परिधान केलेली, लाल कंबरपट्टा व डोक्यात लिंगनबेरीच्या काटक्या आणि कागदी मेणबत्त्यांचा मुकुट ल्यायलेली ही तरुण मुलगी हातात केशरयुक्त सुवासिक बन आणि वाफाळलेल्या कॉफीचा कप घेऊन घरातील थोरामोठय़ांना उठवण्यासाठी भल्या पहाटे घरात प्रवेश करते. स्वीडिश घरात तिचा हा प्रवेश शुभसूचक मानला जातो. ती कुटुंबातील प्रत्येकाला ‘लस्कॅटर’ नावाचा खास ब्रेड देते. शाळकरी मुली १३ डिसेंबरला ‘सेंट लुसिया’ आणि मुलगे ‘स्टार बॉइज’च्या वेशात शाळेत जाऊन गाणी-बजावणी करतात. सेंट लुसियाची टोपी बनवणे ही एक कलात्मक कृती असते. एक कागदी गोलाकार बशी मधोमध अशा रीतीने कापली जाते की, सेंट लुसिया बनलेल्या मुलीच्या मस्तकावर ती बशी नेमकी बसेल. त्याला लिंगनबेरीच्या काटक्या आणि हिरवी पाने चढवून छान मुकुट बनवला जातो. त्यात सात कागदी मेणबत्त्या गोलाकार बसवल्या जातात. हा सुंदर मुकुट ल्यायलेली शुभ्र वलयांकित सेंट लुसिया तेजाचा संदेश घेऊन त्या दिवशी सर्वत्र फिरते.
हौतात्म्य पत्करून संतपदाला पोहोचलेल्या सहाव्या शतकातील सेंट लुसियाविषयी स्वीडनमध्ये दोन दंतकथा प्रचलित आहेत. ते कडक हिवाळ्याचे दिवस होते. स्वीडनमध्ये भयानक दुष्काळ पडला होता. अशा वेळी एका काळोख्या रात्री एक बोट ‘लेक व्हेनर्न’मधून संथगतीने येताना दिसली. बोटीच्या सुकाणूजवळ एक शुभ्र वस्त्रांतील सुंदरी बसलेली होती. तिच्या मस्तकाभोवती तेजाचे वलय होते. ती सेंट लुसिया होती आणि तिची बोट धान्याने भरलेली होती. अशीच घटना ‘सिरॅकस’ इथेही घडली. देशात भयानक दुष्काळ पडला होता. सेंट लुसियाद्वारे देवाला हा भयानक दुष्काळ दूर करण्याची विनवणी करण्यासाठी एकदा सिरॅकसमधील जनता कॅथ्रेडलमध्ये जमा झाली. त्यांची प्रार्थना चालू असतानाच गव्हाने भरलेली एक बोट बंदराला लागली. तेव्हापासून सेंट लुसियाच्या या उत्सव पर्वात गव्हापासून बनवलेले विविध चविष्ट पदार्थ मित्रमैत्रिणी व कुटुंबीयांना खिलवण्याची प्रथा युरोप व स्कँडेनेव्हियात प्रचलित झाली.
आजही स्वीडनमधले नागरिक सेंट लुसियाला सत्य, पावित्र्य आणि येशूच्या दीप्तिमान प्रकाशाचे प्रतीक मानतात. म्हणून ती नेहमी शुभ्रवस्त्रांकित असते. आजही तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वीडनमधील तरुणी १३ डिसेंबरला मेणबत्त्या व रंगीत दिवे हातात घेऊन घरोघरी फिरतात. त्यांना चविष्ट बनचा प्रसाद देतात आणि प्रभातकाळी आपापल्या घरी परततात.
आता त्यांच्या मुकुटावर पारंपरिक मेणबत्त्यांऐवजी विजेचे छोटे छोटे दिवे लटकत असले तरीसुद्धा सेंट लुसिया ही आजही भ्रष्ट आणि प्रलोभनांनी भरलेल्या जगातली निष्कलंक चारित्र्य आणि पावित्र्याची मूर्तिमंत प्रतिमा म्हणून गौरविली जाते व तिच्या सन्मानासाठी हा प्रकाशाचा सण साजरा केला जातो.
६ डिसेंबरचा ख्रिसमस

फ्रान्समध्ये ख्रिसमस हा सण प्रकाशाचा सण म्हणून साजरा होतो खरा, पण हा ख्रिसमसचा उत्सव मात्र प्रांताप्रांतात वेगवेगळ्या वेळी साजरा केला जातो. सोयीसाठी तो २५ डिसेंबरला साजरा होत असला तरी, फ्रान्सच्या पूर्व व उत्तर प्रांतात ख्रिसमसची सुरुवात ही ६ डिसेंबरला होते, तर काही ठिकाणी ती ६ जानेवारीला होते. ‘लायोन’ शहरवासी ८ डिसेंबरला मेरीच्या गौरवार्थ घराच्या खिडक्या खिडक्यांमध्ये मेणबत्त्या प्रज्वलित करून संपूर्ण शहर उजळून टाकतात. फ्रेंच मुले फायर प्लेसजवळ नेहमीप्रमाणे शूज ठेवतात या आशेने की रात्री ‘पेरे नोएल’ अर्थात सांताक्लॉज येईल आणि आपल्या शूजमध्ये फळे, कँडीज, खेळणी आणि गिफ्ट्स ठेवून जाईल.
बदलत्या जीवनशैलीनुसार ख्रिसमसच्या रात्री, मध्यरात्रीच्या माससाठी जाण्याचा प्रघात कमी होत असला तरी त्या मासनंतरच्या ‘ले रेव्हिलॉन’चा अर्थात ‘जेवणाच्या जल्लोषाचा’ समारंभ मात्र धूमधडाक्यात साजरा होतो. हा बिगूल वाजवण्याचा प्रघात येशूच्या जन्माशी निगडित असला तरी त्या रात्री घरात, हॉटेल अथवा रात्रभर उघडय़ा असणाऱ्या कॅफेमध्ये जेवणाचा जल्लोष साजरा केला जातो. फ्रान्समधील रस्त्यांवर बांधलेल्या कॅफेमध्ये प्रांताप्रांतानुसार वेगवेगळ्या चविष्ट खाद्यपदार्थाची लयलूट असते आणि आपल्या कुटुंबीयांना व मित्रमैत्रिणींना आग्रह करून वाइन आणि खाद्यपदार्थ पोट तुडुंब भरून खिलवले जातात, अगदी पार सूर्योदयापर्यंत. त्यामागची धारणा अशी की, तुम्ही जितकेजास्त खानपान करता तेवढे अधिक संपन्न होत जाता. खानपानाच्या या जल्लोषाबरोबरच ‘व्हर्जिन मेरी’ जर आपल्या घरावरून जात असेल तर तिच्या स्वागतासाठी घरे मेणबत्त्यांनी उजळून टाकण्याचाही प्रघात आहे. मेरीच्या आशीर्वादाने आपले घरही संपन्नतेने उजळून जावे हाच यामागचा आंतरिक हेतू असतो.
हनुक्का
‘हनुक्का’ हा ज्यूंचा तेजाचा उत्सव आहे, जो ८ दिवस व ८ रात्र सर्व जगभरातील ज्यू उत्साहाने साजरा करतात. त्यामागील कथा ही मनोरंजकच नव्हे तर उद्बोधकही आहे. ख्रिस्तपूर्व १६८ मध्ये सीरियन आणि ग्रीक सैनिकांनी जेरुसलेममधील पवित्र मंदिर ताब्यात घेतले आणि तिथे ‘झायस’ची पूजाअर्चा सुरू केली. ज्यू जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या, पण भीतीने ते मूग गिळून बसले. दरम्यान, सीरियन-ग्रीक बादशहा अँटीओकसने ज्यू धर्माचे पालन करणाऱ्यास मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यास सुरुवात केली. त्याने ग्रीक देवतांची पूजा सक्तीची केली. ग्रीक सैनिकांनी ज्यू गावकऱ्यांना एकत्र करून त्यांना मूर्तिपूजेची व डुक्कर खाण्याची सक्ती केली. त्या दोन्ही गोष्टी ज्यू धर्मात निषिद्ध आहेत. तिथल्या सर्वोच्च ज्यू धर्मगुरू मथायसला ग्रीक ऑफिसरने त्यांच्या मागण्या मान्य करण्याची आज्ञा केली, पण मथायसने त्या धुडकावल्या. जेव्हा दुसऱ्या गावकऱ्यांनी त्या मान्य करण्याचे ठरवले तेव्हा मथायस रागाने लाल झाला. त्याने तलवार उपसून त्या गावकऱ्यांना आणि त्या ग्रीक ऑफिसरलाही ठार मारले. त्यानंतर मथायसने कुटुंबासह तिथून पलायन केले व डोंगरदऱ्यांमध्ये आश्रय घेतला. त्या ठिकाणी ग्रीकांविरुद्ध लढण्यासाठी त्याला आणखी काही ज्यू मिळाले. सरतेशेवटी ग्रीकांवर विजय मिळवून आपली भूमी परत मिळवली. विजयश्री मिळवून ते जेरुसलेमच्या देवळात परतले. त्या वेळी परदेशी देवांच्या मूर्ती आणि डुकरां-च्या हत्येने अपवित्र झालेले हे मंदिर पुनश्च पवित्र करायचे असे त्यांनी ठरवले. त्यासाठी तिथे आठ दिवस तेलाचे दिवे उजळवायचे असे ठरवले, पण दुर्दैवाने तिथे फक्त एक दिवस दिवा उजळवण्यापुरतेच तेल शिल्लक होते. आश्चर्य म्हणजे त्या थोडय़ाशा तेलात देवळातील दिवे आठ दिवस तेवत राहिले. या घटनेची स्मृती म्हणून ज्यू लोक आपल्या घरात ‘हनुक्का’ सणाला दर दिवशी एक मेणबत्ती पेटवतात व क्रमाने ती वाढवत जातात. असे करीत आठव्या दिवशी आठ मेणबत्त्या पेटवल्या जातात. हा तेलाचा चमत्कार असल्याने ‘हनुक्का’च्या सणात आवर्जून तळलेले पदार्थ करून खाल्ले जातात. दुष्ट प्रवृत्तींवर सुष्टांचा विजय व त्याला देवाची यथायोग्य साथ हा संदेश ‘हनुक्का’ हा सण देत असतो.
सेंट मार्टिन्स डे
हॉलंडमधील तेजाचा उत्सव हा ११ नोव्हेंबरला ‘सेंट मार्टिन्स दिवस’ म्हणून सुरू होतो. त्या दिवशी सेंट मार्टिनच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुले कंदील घेऊन घरोघरी गाणी म्हणत फिरतात. लोक त्यांना कॅण्डी भेटवस्तू देतात. मार्टिन हा संत होता. तो साधे व शांत आयुष्य जगत होता. एकदा तो हिमवादळात सापडला. अचानक त्याला एक गरीब माणूस थंडीत कुडकुडताना दिसला. त्याने आपल्या अंगावरील उबदार ब्लँकेट त्या गरीब माणसाच्या अंगावर घातले. त्या रात्री येशूने त्याला स्वप्नात दर्शन दिले तेव्हा त्याच्या अंगावर मार्टिनने दिलेले ब्लँकेट होते. असे म्हणतात की, येशूच त्या गरीब माणसाच्या रूपाने मार्टिनकडे आला होता. मार्टिनची कीर्ती त्याच्या दयाळू स्वभावामुळे सर्वदूर पसरली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ‘मार्टिन्स डे’च्या उत्सवाला सुरुवात झाली. त्याने माणुसकीची ज्योत लोकांच्या मनात उजळली. त्यासाठी त्या दिवशी असंख्य दिव्यांच्या ज्योती हॉलंडमध्ये उजळवल्या जातात. हॉलंडच नव्हे तर, जर्मनी, नेदरलँड व बेल्जियममध्येही हा तेजाचा उत्सव माणुसकी, जीवदया आणि सत्त्वशीलतेचा गौरव म्हणून उत्साहाने साजरा केला जातो.
‘लॉय क्रथाँग’
थायलंडमधील ‘लॉय क्रथाँग’ सण हा दीपदानाची महती सांगणारा एक आगळावेगळा दीपोत्सव! गंगेतील दीपदानाशी साधम्र्य सांगणारा हा थायलंडमधील प्रख्यात उत्सव! थाई जनता या सणाला केळीच्या पानांना कमळाचा आकार देऊन त्यावर एक मेणबत्ती, उदबत्ती, मिठाई, फुले आणि नाणी ठेवतात. पौर्णिमेच्या रात्री मेणबत्त्या पेटवून मनोभावे जलदेवतेची प्रार्थना करतात व एखाद्या नदीत किंवा कालव्यात हे दिवे सोडले जातात. पाण्यावर हजारोंच्या संख्येने तरंगणारे हे दिवे जणू आकाशातील नक्षत्रच पाण्यावर तरंगतायत असा भास निर्माण करतात. पंचमहाभुतांतील जलदेवतेची तेजाने पूजा करण्याचा हा अनुपम सोहळा असतो.
या दीपज्योती पाण्यात सोडणे म्हणजे एक प्रकारे स्वत:मधील अहंकार, राग, द्वेष याचेच विसर्जन करून आयुष्य पुनश्च नव्या उमेदीने सुरू करण्याचे द्योतक असते. काही लोक नखे किंवा केस क्रथाँगवर ठेवून स्वत:मधील वाईट प्रवृत्तीचे सांकेतिक समर्पण करतात. क्रॅथाँग पाण्यात सोडण्याने आपले भाग्य उजळेल असा थाई लोकांना विश्वास वाटतो. एक प्रकारे आपल्या स्वत:मधील दुर्गुणांचा स्वीकार करून, आपल्यातील अपप्रवृत्तींचे समर्पण केल्यानेच स्वत:चा उद्धार होणे शक्य आहे हे पटवून देणारा हा थायलंडमधील ‘क्रथॉँग’चा सण किती अर्थपूर्ण आहे!
कंदिलांचा उत्सव
चीनमधील दिवाळी म्हणजे कंदिलांचा उत्सव! हा उत्सव हॅन राजघराण्याने जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी सुरू केला. हा सण ‘स्वर्गातील अधिपती’चा वाढदिवस समजला जातो. हा अधिपती माणसाला सुदैवी बनवतो म्हणून पौर्णिमेला चीनमध्ये या ‘हेवन ऑफिसर’ची पूजा केली जाते. त्या दिवशी चिनी लोकांची घरे चहूकडून कंदिलाच्या प्रकाशाने उजळून निघतात. मुले कागदाचे कंदील बनवून रात्रीच्या काळोखात रस्त्यावर उतरतात. त्यामुळे रस्ते कंदिलाच्या प्रकाशाने झगमगून उठतात. बदलत्या काळानुसार या कंदील उत्सवामध्ये अनेक उपक्रम आखले जातात. देवळांमधून कंदील महोत्सव व स्पर्धा भरवल्या जातात. पारंपरिक कंदील जरी कागदाचे असले तरी आज विद्युतयंत्रणेवर चालणाऱ्या अत्यंत सुंदर कंदिलांच्या रोषणाईने संपूर्ण देश झळाळून उठतो. विशेष म्हणजे या कंदिलांवर चीन राशिचक्रातील प्राणी, ऐतिहासिक वास्तू व वस्तू अथवा व्यक्ती चितारल्या जातात. हल्ली तर लेझर लाइटचाही वापर करून कंदील कलात्मकतेने बनवले जातात.
तैवानमधील स्काय लँटर्नस्

तैवानमधील लोक या कागदी कंदिलांवर आपल्या मनातील इच्छा लिहितात आणि ते कंदील आकाशात पतंगांप्रमाणे उडवतात. पूर्वीच्या काळी लोकांची अशी ठाम श्रद्धा होती की, हे कंदील उडत उडत स्वर्गातील देवतेपर्यंत पोहोचतात व आपली इच्छा तिच्यापर्यंत पोहोचवतात आणि स्वर्गातील देवता आपल्याला आशीर्वाद देतात.
तैवानमधील त्या उडत्या कंदिलांमागे एक वेगळी आख्यायिकाही आहे. एकदा एका गावावर शत्रूने हल्ला केला. गावकऱ्यांनी घाबरून जवळच्या डोंगरदऱ्यांचा आश्रय घेतला. जेव्हा शत्रूच्या सैन्याचा पराभव झाला व ते माघारी गेले तेव्हा कोणी तरी या डोंगरात लपलेल्या लोकांना घरी परतणे सुरक्षित आहे हे कळवावे म्हणून पहिल्यांदा आकाशात हे ‘स्काय लँटर्नस्’ उडवले. या विजयाची स्मृती म्हणून आजही आगामी वर्ष शांततापूर्ण व सुरक्षित जावे या सद्हेतूने पौर्णिमेच्या रात्री हे स्काय लँटर्नस्’ आकाशात उडवले जातात.
इजिप्तमधील ख्रिसमसवर मुस्लिमांच्या ईदचा खूपच प्रभाव आहे. इजिप्शियन कॅलेंडरप्रमाणे ख्रिसमस हा ७ जानेवारीला साजरा केला जातो. त्या दिवशी चर्चेस दिव्यांच्या रोषणाईने झगमगतात. येशूच्या जन्माच्या वेळी जोसेफने मेणबत्त्या उजळवून मेरीचे त्या रात्री थंडीपासून रक्षण केले याच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वदूर आवर्जून मेणबत्त्या उजळवल्या जातात. फिलिपाइन्समध्ये मात्र ख्रिसमसच्या काळात सर्व घरे व इमारतींवर सुंदर स्टार्सच्या आकारातले कंदील लावले जातात, ज्याला ‘पॅरोल’ म्हणतात. पाश्चात्त्यांना जितके महत्त्व ख्रिसमस ट्रीचे तितकेच महत्त्व फिलिपिनोंना या पॅरोलचे!
देशोदेशींच्या या उत्सवांप्रमाणे दशाननाचा संहार करून राम अयोध्येला परतला व रामराज्याचा शुभारंभ झाला हे सुचवणारी व त्यासाठी जल्लोषात साजरी होणारी भारतातील दिवाळीची संकल्पना ही तेजाच्या, संपन्नतेच्या शुभारंभाची ग्वाहीच देते नाही का?