कुंडीतील बाग फुलवण्यासाठी उपलब्ध जागा व वस्तू कोणत्या तर आपण राहतो त्या ठिकाणी जी जागा उपलब्ध असेल ती. उदा गच्ची, बाल्कनी, खिडकी, इमारतीतीलमधील जिना, फ्लॅटच्या दाराबाहेरील छोटासा कोपरा किंवा घर-बंगला-अपार्टमेंट, शाळा, कंपनीच्या परिसरातील कोणतीही उपलब्ध जागा.
आता उपलब्ध वस्तू म्हणजे काय तर बाजारात प्लॅस्टिक, माती, सिमेंटच्या विविध आकाराच्या, रंगीबेरंगी कुंडय़ा व प्लॅस्टिकच्या बॅगाही उपलब्ध असतात. प्रथम आपल्याला कुठे बाग फुलवायची याचे नीट नियोजन करावे.. जागेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल याचा विचार करावा.. व त्याप्रमाणे कुंडय़ाचे प्रकार, त्यातील सहज हाताळता येतील, अशा कुंडय़ाची किंवा पिशव्याची निवड करावी. हा झाला एक सरळधोपट पण खर्चीक मार्ग.. आपल्याला आत्ताच यावर खर्च नाही करायचा, असे ठरवले असेल तर तसेही अनेक वस्तूंत बाग उत्तमरीत्या फुलवता येते.. दुधाची पिशवी, वेताचे करंडे, टोपल्या, तुटलेले टब, गळक्या बादल्या, माठ, प्लॅस्टिकचे उभे आडवे काप केलेले ड्रम, सिमेंटच्या गोण्या, विटांचे वाफे किंवा टाकाऊ बॅनर.. अगदी तुटलेल्या बेसिनपासून ते बुटापर्यंत व पाण्याच्या बाटलीपासून तर पाणी शुद्ध करणाऱ्या एखाद्या निकामी प्युरिफायपर्यंत.. कापडाच्या पिशवीपासून तर तेलाच्या डब्यापर्यंत.. अगदी केळीच्या कापलेल्या खांबापासून तर प्लॅस्टिकच्या तीन इंच पाइपापर्यंत.. व लाकडाच्या खोक्यापासून तर पृष्ठय़ापर्यंत.. म्हणूनच उपलब्ध जे जे.. ते ते आपले.