News Flash

आम्हाला दुवा कोण देणार?

ये शेठाणी हर हप्ते बेटे की नजर उतारती है। सौ रुपया देती है। दिल बडा खुष होता है। मन से दुवा देती मै उसको. जे

| April 18, 2015 01:02 am

ch19ये शेठाणी हर हप्ते बेटे की नजर उतारती है। सौ रुपया देती है। दिल बडा खुष होता है। मन से दुवा देती मै उसको. जे प्रेम आईबापाने नाय दिलं ते अजनबी शेठ लोग देतात. घरातल्या आईबाबाच्या फोटोला मी रोज एक सवाल करते. ‘‘ही तकलीफची जिंदगी माझ्याच वाटय़ाला का? आम्हाला कोण देणार चांगल्या आयुष्याचा दुवा?’’

‘‘ए ऽ शेठ दस रुपया दे दे! अम्माऽऽ पैसा दे! तेरा भला होगा अम्माऽ बालबच्चा सुखी रहेगा अम्माऽ ए शेठ पैसा देऽ’’
‘‘एऽ हाथ मत लगा! माथेपे हाथ क्यु रखती है? चलऽ हट् दूर हो जाऽ! सुबह सुबह परेशान करते है ये लोग!’’
‘एऽ शेठ पैसा देऽरेऽ’
‘क्यु पिछे पडी है रे! एकदा सांगितलं तरी कळत नाय? चांगली धडधाकट दिसतेस. तर भीक कशाला मागतेस? कष्ट कर आणि पैसा कमव ना!’
‘‘काय रेऽ शेठ तुझ्या घरी कामाला ठेवतोस? मी भांडी घासेन. तुझा संडास धुवीन. दोन वेळचे पोटाला घाल. पहनने को कपडा दे. बस्स!’’
‘‘छे! छे! आमची काय इज्जत राहील तुला कामाला ठेवलं तर, असंच म्हणणार तुम्ही आमाला काय म्हाईत नाही? अरे एऽ काम देण्याची हिंमत नाय तर बोलतोस कशाला फुकट? आँऽऽ’’
मी टाळी वाजवली. बोटं मोडत माझ्या भाषेत त्याला शिव्या घातल्या. त्याला काय कळलं नाय. रागाने माझ्याकडे बघत बघत गेला निघून! आज शुक्रवार. सकाळपासून पन्नास रुपये पण नाय भेटले. एकतर धूप एवढी जाळते! वरून अंगावर अंगार. जमिनीतून अंगार! थंडीत बरं असतं उन्हाळा नको बाप्पा! ऊन लय भाजतं. पण उन्हाळय़ात पैसे कमवून ठेवले नाय तर बारीशमध्ये खाणार काय? बारीशमध्ये शेठ लोक गाडीची काच उघडत नाय. मग पैसे कसे मिळणार?
एक मोठ्ठी गाडी सिग्नलला थांबली. धावत गेले. काचेवर टकटक केलं. भपकन गाडीची गरम वाफ अंगावर आली. भाजून गेले तरी परत हात पसरले. शेठने काच उघडून पन्नासची नोट अंगावर फेकली. खाली वाकून उचलली. तेवढय़ात आणखी दोघीजणी धावल्या ती नोट घ्यायला! दिलं दोघींना ढकलून आणि नोट ब्लाऊजमध्ये कोंबली. शेठला दुवा दिला आणि वडापावच्या गाडीवर गेले. मघाची जोडीदारीण जवळ आली. तिला वडापाव दिला, मी खाल्ला. लिंबू शरबत प्याले आणि परत सिग्नलला उभी राहिले.
संध्याकाळपर्यंत शे-तीनशे मिळायला पायजे. वस्तीवर सांजच्याला गेलं की गुरूकडे पैसे जमा करावे लागतात पोटापाण्याचे! माझी गुरू शोभा. मी तिचा चेला. चेल्याला गुरूला सांभाळावंच लागतं. आज शोभाची तब्येत बिघडलेय. ती नाय आली नाक्यावर! तिला दवापाणी करायचंय. छेडा डॉक्टर ओळखतो आम्हाला. दवापाणी देतो. कधी लागलं तर घरीपण येतो. पयल्या टायमाला डॉक्टर दवा बी नाय द्यायचे. आमी असंच मरून जायचो.
समोरच्या टॉवरमधली शेठाणी मला शोधतेय वाटतं. ‘‘बोल दिदी बेटे की नजर उतारनी है? चल मैं आयी तेरे साथ.’’ ये शठाणी हर हप्ते बेटे की नजर उतारती है। सौ रुपया देती है। मेरा दिल बडा खुष होता है। मन से दुवा देती मै उसको। ऐसा कोई इज्जत देगा, प्यार से दो बाते करेगा तो रोना आता है। जे प्रेम आईबापाने नाय दिलं ते अजनबी शेठ लोग देतात. तरी बी मी माज्या पत्र्याच्या झोपडीत आईबाबाचा फोटो लावलाय. रोज त्या फोटोला मी एक सवाल करते. ‘‘का मी अशी जन्माला आले? माझी भावंडं गावाला मजेत जगतायत. मग ही तकलीफची जिंदगी माझ्याच वाटय़ाला का? आम्हाला चांगल्या आयुष्याचा दुवा कोण देणार?’’ आईबाबा जबाब देत नाय. आमच्या मोठय़ा पत्र्याच्या खोलीत यल्लमाँ देवी माँचे मंदिर आहे. आम्ही सहा सोबतिणी तिला हाच प्रश्न विचारतो. ‘हम पैदा हुअे तबसे अजतक हमें कभी सुकून नही मिला। हमें उपरवालेने ऐसा पैदा किया। क्या ये हमारी गलती है?’’ देवी माँ पण उत्तर देत नाय. दिवसभर लोक आम्हाला हडतुड करतात. हात नाय पसरला तर पोट कसं जाळायचं आम्ही? आम्हाला आईबाप नाय. भावंड नाय. रिश्तेदार नाय.काम पण देत नाही कोणी. कोण पोसणार आम्हाला? असंच जगणार. बस अकेले आए है! अकेले जाऐंगे!
.. अजून तो दिवस आठवतो. घरात कुणी नव्हतं. मी हळूच दरवाजा लोटून घेतला. ट्राऊजर काढली. शर्ट काढला. बहिणीचा ड्रेस घातला. तिचे झुमके, हार, बांगडय़ा चढवल्या. छान पावडर, लिपस्टिक, टिकली लावली. आरशात बघत मुरडत राहिले. तेवढय़ात धाडकन दार उघडून बाबा घरात आले. त्यांनी मला असं पाहिलं आणि बांबूचा फोक उचलून मारमार मारलं. मारून मारून थकले तसे माझ्या नाकातोंडात हिरव्या मिरचीची चटणी कोंबली. मी तडफडले. अंगाचा जाळ झाला. मी खूप खूप रडले. पण खरं सांगते, मलाच कळत नव्हतं मी अशी का वागते? आईबाबा रोज समजवत होते. ‘‘तू नीट चाल. अशी कंबर लचकवत, हात हेलकावत चालू नको. असं मुलींसारखं लाडिक बोलू नकोस. तू मुलगा आहेस.’’ लहान होते तोपर्यंत काही कळलं नाय. पण हळूहळू वयात येऊ लागले. तसं वेगळंच वाटू लागलं. शरीर मुलाचं पण मन मुलीचं. मुलींसारखं नटायला लागले. लचकत-मुरडत चालायला लागले. दोन तळवे एकमेकांवर आपटून टाळय़ा वाजवायला लागले. पुढे पुढे तर अंगात कपडे मुलाचे. पण डोळय़ांत काजळ, टिक्का, लिपस्टिक लावून बसायची. नंतर तर सरळ साडीच नेसायला लागले. झुमका, हार, बांगडय़ा घालू लागले. मुलींसारखे केस वाढवून जुडा, त्यावर गजरा, तोंडाला हळद लावणं, हातांवर मेंदी रेखणं, पायांत पैंजण घालून मुद्दाम छमछम् करत लोकांसमोरनं जाणं असं सुरू झालं. तसे लोक बोलायला लागले. पण मी काही हे सगळं मुद्दाम करत नव्हते. ते आपोआप होत होतं.
एकदा गावात मोठ्ठी मारामारी झाली. माझे भाऊ गेले भांडायला. मी घरांत दडी मारून बसले. वडिलांना म्हटलं, ‘‘मी आदमी थोडी आहे झगडा करायला? मला पुरुषांच्या मारामारीची भीती वाटते!’’ बाबांनी डोक्यावर हात मारून घेतला. मी शाळेत जात होते. माझा वर्गात कायम पहिला नंबर असायचा. पण माझं लचकणं, मुरडणं बघून शाळेतली टारगट पोरं माझा पिछा करायची. मला दगड मारायची. चिडवायची. तामिळनाडूतलं एवढंसं गाव ते! तिथे मी विचित्र फेमस झाले. दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट आलं. मला दहावीची बोर्डाची परीक्षा द्यायची होती. पण परीक्षा होती दुसऱ्या गावात. तिथपर्यंत जाणार कसं? मला तर गाववाल्यांनी घराबाहेर पडणं मुश्किल केलं होतं. सतत टिंगलटवाळी, कुचेष्टा. मी रागाने हॉल तिकीट फाडून टाकलं आणि रडरड रडले. मलाही शिकायचं होतं. कॉलेजमध्ये जायचं होतं. मलाही आई-बाबांचं प्रेम हवं होतं. पण लोकं त्यांना बोचून खायचे. म्हणायचे, ‘‘हा शाप आहे तुमच्या घराण्याला! म्हणून तुमचा मुलगा असा सारखा चालतो. बोलतो!’’ असं काही ऐकलं की आईबाबा घरी येऊन मला बेदम मारायचे. मी कंटाळून गेले. त्याचवेळी मुंबईहून काही हिजडे आमच्या गावात आले होते. मी चोरून त्यांना भेटले. माझ्या भावाकडे कोणीतरी कागाळी केली. झालं! घरी येऊन त्याने मला बेदम मारलं आणि घरातून हाकलून दिलं. मी पुन्हा त्यांना भेटले. त्यांनी मला पोटाशी घेतलं म्हणाले, ‘‘बेटा आमची जिंदगी बेकार असते. तू येऊ नको आमच्यात घर सोडून’’ मी हट्टच धरला. म्हटलं, ‘‘इथे लाथा खात जगण्यापेक्षा मी तुमच्याबरोबर राहीन!’’ मी त्यांच्याबरोबर मुंबईला आले. मला फक्त मायची याद येत होती. काही वर्षांनी कळलं, माझ्या काळजीने हाय खाऊन माय लवकरच मरून गेली.
मी मुंबईत आले. त्यांनी प्रथम मला भायखळय़ाला नेलं. तिथे आमचे सात बुजुर्ग, पिढीजात नायक आहेत. त्यांनी विचारलं, ‘तुला यांच्यातलं कोण आवडतं?’ मी शोभाचं नाव सांगितलं. मग आकाश आणि भुमादेवी (भूमाता) यांना साक्ष ठेवून देवीसमोर मला शपथ दिली गेली. शोभा माझी गुरू झाली आणि मी तिचा चेला. आमच्यात लिखापढी झाली. एकमेकींना सांभाळण्याची सौगंध आम्ही दोघींनी घेतली. मग देवीसमोर पूजापाठ झाला आणि मला साडीचोळी नेसवली गेली. आता ही साडीचोळी मला मरेपर्यंत उतरवता येणार नाही. हिजडा परिवारात असा रीतसर प्रवेश दिल्यावर मला पूजापाठ करणं, दुवा देणं, नजर उतरवणं सगळं रिवाज शिकवले गेले. त्या दिवसापासून माझी गुरू शोभा आणि सहा हिजडय़ांसोबत मी राहायला लागले. आमची चूल एक. आमच्यात दुश्मनी नाही. कोणाचा खूप मोठा झगडा झाला तर सात नायकांची पंचायत बसते. न्यायनिवाडा होतो. आमच्या परिवारात वकील, डॉक्टर, पायलट आहेत. ते कितीही श्रीमंत, शिकलेले असले तरी परिवारात आले की, त्यांना पण इथले नियम लागू! मग कर गुरूची सेवा! धुणी धू, रोटी पकव.
तामिळनाडूत आमचं मोठं मंदिर आहे. ‘आरवान’ हा आमचा देव! नुकताच तिथे उत्सव झाला. दरवर्षी देशपरदेशातून लाखो तृतीयपंथीय तिथे उत्सवाला येतात. या मंदिरात आरवानशी आमचं लग्न लावलं जातं. आम्हाला शृंगार केला जातो. आम्ही रात्रभर आनंदाने जल्लोष करतो. नाचतो. गातो. खेळतो. दुसऱ्या दिवशी आरवान युद्धावर जातो. युद्धात त्याची मुंडी छाटली जाते. आरवानची विधवा पत्नी म्हणून आम्ही ऊर बडवून खूप रडतो. दु:ख करतो. बांगडय़ा फोडतो. कुंकू पुसतो. पांढरी साडी घालतो. सुतक पाळतो. मुंबईत येतो नि नाक्यावर हात पसरून उभ्या राहतो.
गेली २५ वर्षे हीच आमची जिंदगी! इथे आले तेव्हा मजजवळ काहीच नव्हतं. आता सरकारने रेशनकार्ड, आधारकार्ड दिलंय. व्होटिंग कार्ड दिलंय. मुंबईत रोजीरोटी मिळते. पण.. हमें इज्जत की रोटी कमानी है। हम इस जिंदगी से शरमिंदा है। परेशान है। आम्ही असे असलो म्हणून काय झालं? आम्ही पण माणूस आहोत. आम्हालाही मन आहे. भावना आहेत. देवाने तर आमच्यावर अन्याय केलाच आहे. समाजही आम्हाला ठोकरतोय. रास्ते के पत्थर जैसा जीना हमारेही नसिब में लिखा है.. क्यू?
माधुरी ताम्हणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:02 am

Web Title: good wishesh for good life
टॅग : Life
Next Stories
1 पत्रव्यवहारातून विचारमंथन
2 छद्माच्या अंगारातून…
3 स्त्री-सक्षमीकरणातून कंपनीच्या सक्षमतेकडे
Just Now!
X