23 September 2020

News Flash

आव्हान पालकत्वाचे : समलैंगिकांचं पालकत्व

पौगंडावस्थेत असल्यापासूनच पवनला पुरुषांबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं

(संग्रहित छायाचित्र)

 

डॉ. राजन भोसले

पौगंडावस्थेत असल्यापासूनच पवनला पुरुषांबद्दल आकर्षण वाटू लागलं होतं. आपल्या समलिंगी असण्याबाबत पवनच्या मनात कसलंही द्वंद्व किंवा संशय नव्हता. असं असण्याला तो विकृतही मानत नव्हता. त्याच्या मनात स्वत:च्या समलिंगी असण्याबद्दलचा पूर्ण ‘स्वीकार’ होता. त्याला चिंता होती ती आईवडिलांची. त्यांनी न दुखावले जाता याचा स्वीकार करावा, ही त्याची इच्छा होती.

पवन आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. स्वभावाने शांत, नम्र व मृदुभाषी. अभ्यासात हुशार, वाचनाची खास आवड व पुस्तकांमध्ये रमणारा. समवयस्क मुलांपेक्षा वयाने मोठे असे निवडक एक-दोन मित्र. पवनच्या वडिलांचा विम्याचा छोटा व्यवसाय; पण त्यासाठी त्यांना बरंच फिरावं लागत असे. आई गृहिणी. पवनने खूपच चांगल्या गुणांनी दहावी व बारावी पूर्ण केली. मुंबईच्या एका नामांकित महाविद्यालयामधून त्याने प्रथम श्रेणीत आय.टी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी)मध्ये पदवीसुद्धा पूर्ण केली. तिथेच त्याची विशेष गुणवत्ता पाहून त्याच्या एका प्राध्यापकांनी त्याला लंडनला जाऊन आय.टी.मधली उच्च पदवी मिळवावी यासाठी प्रोत्साहित केलं व त्यासाठी लागणारी शिष्यवृत्तीही मिळवून दिली.

हे सर्व होत असताना फारसे शिक्षित नसणाऱ्या पवनच्या आई-वडिलांनी त्याला हवी तेव्हा यथाशक्ती साथ दिली. पवन लंडनला गेला. तिथेसुद्धा त्याने आंतरराष्ट्रीय मान्यतेची उच्च पदवी मिळवली. पवनची गुणवत्ता ओळखून ब्रिटनच्या एका उंची कंपनीमध्ये त्याला नोकरीची ‘ऑफर’ आली. लंडनमधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व नवीन नोकरीमध्ये रुजू होण्याआधी पवन एका महिन्यासाठी भारतात परतला. दोन वर्षांनी पवन घरी परत आल्याचा आई-वडिलांना आनंद होता. त्यांनी सहज पवनला ‘लग्न करण्याबाबत त्याचा काय मानस आहे’ याची विचारणा केली. त्यावर ‘आत्ता तर माझं शिक्षण पूर्ण होतंय. जरा मला नवीन नोकरीत रुळू द्या. मग पाहू या,’ असं जुजबी उत्तर पवनने दिलं. तो पुन्हा लंडनला रवाना झाला.

बढती, पगारवाढ, मधूनमधून आईवडिलांशी बोलणं यात अडीच वर्ष अशीच उलटली; पण पवनला भारतात येण्याचा योग काही आला नाही. ‘पवन आता तीस वर्षांचा होईल. त्याने लग्न करावं. आपल्याला सून, नातवंडं पाहायला मिळावी..’ असं पवनच्या आईवडिलांना तीव्रतेने वाटू लागलं. पवनला बोलावून घेण्याऐवजी आपणच लंडनला त्याच्याकडे जाऊन यावं असंही त्यांना वाटलं; पण हे बोलून दाखवताच पवनने ‘मीच सुटी काढून येतो,’ असं लगबगीने म्हटलं व पंधरा दिवसांची सुटी टाकून तो घरी आला. तेव्हा आईवडिलांनी स्थळं सांगायला सुरुवात केली. पण पवनने ‘मला लग्नच करायचं नाही,’ असं सांगून टाकताच दोघे अवाक् झाले.

‘‘मला मुलींबद्दल जराही आकर्षण वाटत नाही, पुरुषांबद्दल वाटतं.’’ पवनचं हे विधान ऐकताच त्याचे आईवडील विलक्षण विचलित झाले. त्यांना डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं. आई तर दु:खाने बिथरलीच; पण एरवी शांत राहणारे वडीलही ढसाढसा रडू लागले. ‘‘हे काय रे म्हणतोयस? हे कसं शक्य आहे? एवढा गुणी मुलगा तू. असं विचित्र काय बोलतोयस?’’ अशा प्रकारे दोघांनीही पवनला विचारणा केली; पण ‘हे खरं आहे’ असं म्हणण्याव्यतिरिक्त त्याच्याकडे कसलंच स्पष्टीकरण नव्हतं. ‘आपण खात्रीने समलिंगी आहोत व त्यात आपल्याला काहीही संशय नाही,’ हे सांगण्याचा प्रयत्न पवनने यथाशक्ती केला; पण त्यावर विश्वास ठेवणं आईवडिलांना अजिबात जमेना. ‘स्त्रीबद्दल जराही आकर्षण नसल्याने लग्न करूनही आपण स्त्रीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकणार नाही,’ हेसुद्धा त्याने स्पष्टपणे सांगितलं; पण त्यांचं मन हे स्वीकारेना.

पवनने सुटी वाढवून घेतली. त्याच्या वडिलांना हा इतका अवघड व नाजूक विषय कुणापाशी काढावा, कुणाला विचारावं, कुणाचं मार्गदर्शन घ्यावं, हे सुचेना. तेव्हाच योगायोगाने वर्तमानपत्रातलं एका ज्येष्ठ लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉक्टरांनी लिहिलेलं एक सदर त्यांच्या वाचण्यात आलं. पवनला घेऊन ते त्यांच्याकडे पोहोचले. डॉक्टरांसमोर पवनच्या आईवडिलांनी सर्व बंधनं व संकोच झुगारून आपल्या सर्व भावना, विचार, तर्क, विकल्प, आक्रोश उघडपणे बोलून दाखवला. दोघेही निर्बंधपणे बोलत गेले व डॉक्टर त्यांचं सर्व बोलणं त्यांना जराही न थांबवता शांतपणे ऐकून घेत गेले. पवन गप्पच होता व खाली मान घालून शांतपणे सर्व ऐकत होता. त्यानंतर मात्र ‘पवनशी मला थोडं एकांतात बोलायचं आहे,’ असं डॉक्टरांनी सुचवलं व पवनच्या आईवडिलांना बाहेर बसायला सांगितलं.

इतका वेळ केविलवाणा चेहरा करून बसलेल्या पवनने आईवडील बाहेर जाताच स्वत:ला थोडं सावरलं. डॉक्टर स्वत:हूनच त्याला म्हणाले, ‘‘तुझी मन:स्थिती मला माहीत आहे. मी तुझी मदत करणार आहे. जे तुझ्या बाबतीत घडतंय ते मी यापूर्वी अनेक वेळा घडताना पाहिलं आहे.’’ डॉक्टरांचे शब्द ऐकून पवनला धीर आला. ‘‘काही गोष्टी मात्र मला स्पष्टपणे सांग. तू समलिंगी आहेस हे तुला प्रथम कधी समजलं? तुझे प्रत्यक्ष कुणाशी समलिंगी पद्धतीचे संबंध आले आहेत का? तुझा कुणी समलिंगी मित्र आहे का?’’ अशा प्रकारचे प्रश्न एक-एक करत डॉक्टर विचारत होते व पवनला पूर्ण वेळ देऊन त्याची उत्तरं ऐकत होते. पवन व त्याच्या आईवडिलांशी डॉक्टरांच्या चार वेगवेगळ्या भेटी झाल्या. या भेटींमधून जी माहिती पवनने दिली ती निर्णायक होती.

पवन पौगंडावस्थेत असल्यापासूनच त्याला पुरुषांबद्दल आकर्षण वाटू लागलं. मुलींबद्दल त्याच्या मनात कधीच थोडंही आकर्षण किंवा कामुक भावना आल्या नाहीत. तो अगदी अकरा वर्षांचा असल्यापासून त्याला हे जाणवू लागलं. सुरुवातीला ‘असं का होतंय? आपण विकृत आहोत का?’ असे विचार तीव्रतेने त्याच्या मनात येत. पुढे या प्रकाराबाबतची माहिती हळूहळू त्याने आपल्या वाचनातून मिळवली व याला ‘समलिंगी आकर्षण’ (होमोसेक्शुअ‍ॅलिटी) म्हणतात हे त्याला कळलं.

आपल्या समलिंगी असण्याबाबत पवनच्या मनात कसलंही द्वंद्व किंवा संशय नव्हता. असं असण्याला तो विकृतही मानत नव्हता. त्याच्या मनात स्वत:च्या समलिंगी असण्याबद्दलचा पूर्ण ‘स्वीकार’ होता. त्याला चिंता होती ती आईवडिलांची. त्यांनी न दुखावले जाता याचा स्वीकार करावा, ही त्याची इच्छा होती. बेजबाबदारपणे केवळ हौस म्हणून कुणाशीही समलिंगी संबंध ठेवणं त्याने प्रकर्षांने टाळलं होतं. असं करण्यातले संभाव्य धोके त्याला चांगले माहीत होते व म्हणूनच तो त्यापासून दूर राहिला होता. पवनने स्वत:च्या समलैंगिक असण्याबाबत बरंच चिंतन, मनन, अभ्यास, संशोधन व आत्मपरीक्षण अनेक वर्ष केलं होतं. त्याला हवा होता फक्त एक समंजस दुजोरा, एखाद्या सुज्ञ जाणकाराचा. डॉक्टरांशी झालेल्या वैयक्तिक भेटींमध्ये पवनने आपलं मन पूर्णपणे मोकळं केलंच, पण बऱ्याच नवीन गोष्टीही समजून घेतल्या.

एका बाजूला हे होत असतानाच, पवनने यातून बाहेर निघावं व रीतसर एखाद्या मुलीशी लग्न करून संसार थाटावा, अशी त्याच्या आईवडिलांची मनीषा होती. पंधरा दिवस वाढवून घेतलेली पवनची रजा संपत आली. डॉक्टरांनी पवनच्या आईवडिलांना ‘पवनला परत जाऊ दे. मी त्याचं समुपदेशन व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून चालू ठेवणार आहे,’ असं सांगून त्यांची समजूत घातली. पवनचं समुपदेशन डॉक्टरांनी व्हिडीओ कॉल्सवर चालू ठेवलंच, पण या प्रकरणामध्ये त्याच्या आईवडिलांचं समुपदेशन करण्याचीसुद्धा तेवढीच गरज होती. नेमकं तेच डॉक्टरांनी पुढे प्रभावीपणे केलं.

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पलू असतात. अनेक गुण-अवगुण, आवडीनिवडी, सवयी-लकबी, व्यंग-व्यासंग यांचं एक युनिक कॉम्बिनेशन (विशिष्ट संमिश्रण) प्रत्येक व्यक्तीमध्ये एकवटलेलं असतं. कुठल्याही व्यक्तीचं मूल्यमापन त्याच्या एखाद्या पलूवरून होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचे सर्व पलू आपल्या पसंतीत बसतीलच असंही नाही. आपला मुलगाही त्याला अपवाद नाही हेच पवनच्या आईवडिलांना दाखवून देणं गरजेचं होतं.

खरं तर पवनने लहानपणापासून आईवडिलांच्या सर्व अपेक्षा सार्थपणे पूर्ण केल्या होत्या. एक गुणी, मेहनती, शांत मुलगा व विद्यार्थी असाच लौकिक त्याने कमावला होता. आज पवनच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नवीन पलू समोर आला होता. या नवीन पलूबद्दलची माहिती व स्वीकृती या दोन्हीमध्ये खरं तर पालकच कमी पडले होते. ‘मुलाचं लग्न, सून, नातवंड’ ही त्यांनी पाहिलेली पारंपरिक स्वप्नं भंग पावणार होती.

‘आपल्या मुलांनी आपल्या सर्व अपेक्षा, सर्व स्वप्नं जशीच्या तशी पूर्ण करावीत’ ही अपेक्षाच खरं तर गैरवाजवी आहे. मुलांना त्यांचं जीवन त्यांच्या पद्धतीने जगू द्यावं. आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादू नये. उलट त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यात आपली यथाशक्ती मदत व्हावी, हे विचार काही नवीन नाहीत; पण पालकांकडून हीच चूक पुन:पुन्हा होताना दिसते. डॉक्टरांनी याच गोष्टी पवनच्या पालकांना हळुवारपणे दाखवून दिल्या. आपला मुलगा एक प्रगत व समृद्ध जीवन जगतोय. तो ज्ञानी, विचारी व कष्टाळू आहे. त्याचं आपल्यावर प्रेम आहे. या गोष्टींमध्ये समाधान बाळगणं अजिबात अवघड नाही. तो स्वत:च्या जीवनात सुखी आहे याचा आनंद बाळगणं अधिक महत्त्वाचं आहे. तो समलिंगी असल्यामुळे आपल्यापासून दुरावलाय असं नाही; उलट आपल्या अस्वीकृतीमुळे मात्र तो दुरावला जाऊ शकतो, याची जाण महत्त्वाची आहे.

समुपदेशनाचा दुसरा भाग म्हणजे समलैंगिकतेबद्दल पवनच्या आई-वडिलांना काही माहिती देणं. समाजातल्या सुमारे २ ते ३ टक्के व्यक्तींमध्ये समलिंगी आकर्षण आढळतं. समलिंगी असणं त्यांनी जाणूनबुजून, समजून-उमजून निवडलेलं नसतं. परिस्थितीजन्य घडामोडी व अजाणतेपणांतून आलेल्या काही अनपेक्षित अनुभवांतून घडलेला तो एक अपघात असतो. त्याचा उगम कधी व कशामुळे झाला हे शोधून काढणं अनेकदा शक्य होत नाही; पण यात त्यांचा दोष मात्र नक्कीच नसतो. व्यक्ती समलिंगी असली तरी इतर सर्व बाबींमध्ये ती इतरांप्रमाणेच गुणी, ज्ञानी, समंजस, प्रेमळ व प्रतिभाशाली असू शकते.

हे खरं आहे, की काही समलिंगी व्यक्ती बेजबाबदार लैंगिक वर्तन करतात. हौस म्हणून एकापाठोपाठ एक अनेकांशी शरीरसंबंध ठेवणं (प्रॉमिस्क्युअस बिहेव्हिअर), कधी बळजबरीने, तर कधी असुरक्षित पद्धतीने संबंध ठेवणं (अनसेफ सेक्स), आपल्या समलैंगिक असण्याचा सतत ऊहापोह करत राहाणं, समलैंगिक लोकांच्या संघटित संस्थेमध्ये सहभागी होऊन, तिथे सतत कार्यरत राहून, जीवनाचे इतर पलू, कर्तव्यं, जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं, वगैरे वगैरे; पण पवनने यातलं काहीच केलं नव्हतं.

सहा महिने लागले; पण अखेरीस पवनच्या आईवडिलांनी मर्म जाणलं. आपले आग्रह सोडले. पवनला त्यांनी सर्वार्थाने स्वीकारलं. त्यांच्यामधला आदर व प्रेमाचा प्रवाह पुन्हा वाहू लागला.

(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे; पण गोपनीयतेच्या उद्देशाने नावे व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:22 am

Web Title: guardian of homosexuality avahan palkatvache article dr rajan bhosale abn 97
Next Stories
1 वेध भवतालाचा : पर्यावरण राजदूत
2 नात्यांची उकल : दोघांत ‘तिसरी’
3 आभाळमाया : आचार्याणां शतं पिता!
Just Now!
X