13 December 2019

News Flash

वेदनेचा उगम

कमल व विजयचा प्रेमविवाह झाला होता. महाविद्यालयात असल्यापासून सात वर्षे ते एकमेकांच्या प्रेमात होते.

|| डॉ. राजन भोसले

मासिक पाळीबाबत यथावकाश तिला हे कळलं, की आपण जे अनुभवलं ते संकट, आजार, जखम किंवा शिक्षा असं काहीही नसून ती एक अत्यंत निरोगी, नसíगक, अपेक्षित अशी स्त्रीसुलभ गोष्ट आहे. पण हे सर्व कळायच्या आधी कमलने ज्या भयावह भावना अनुभवल्या होत्या, जो मानसिक आघात तिला जाणवला होता त्याची ‘जखम’ तिच्या अंतर्मनात राहून गेली आणि त्याचा थेट परिणाम तिच्या वैवाहिक जीवनावर झाला म्हणूनच एखाद्या वेदनेचा उगम नेमका कशात आहे हे आधी शोधायला हवं.

कमल व विजयचा प्रेमविवाह झाला होता. महाविद्यालयात असल्यापासून सात वर्षे ते एकमेकांच्या प्रेमात होते. दोघंही उच्चशिक्षित, कर्तबगार, कमवते व आपापल्या क्षेत्रात निपुण. लग्नाला कुणाचाच विरोध नव्हता. थाटामाटात लग्न पार पडलं व दोघे मधुचंद्रासाठी स्वित्र्झलडला रवाना झाले. स्वित्र्झलडमधून परत आले खरे, पण कुठे तरी काही तरी बिनसलंय हे दोघांच्याही आईवडिलांच्या ध्यानात आलं; पण लगेच विचारणा नको म्हणून कुणीच यावर बोललं नाही. परत येताच दोघे कामावर रुजू झाले व कामाच्या धकाधकीत काही आठवडे असेच उलटून गेले. दोघांच्या वागण्या-बोलण्यात कुठे तरी काळजी, निराशा व निरुत्साह  होता. गप्प-गप्प राहणं, उदासवाणे चेहरे, एकमेकांशी फारसं न बोलणं हे स्पष्ट दिसत होतं. काही दिवस वाट पाहून कमलच्या आईने विजयकडे चौकशी केली. थोडे आढेवेढे घेऊन विजयने ‘तुमच्या मुलीलाच विचारा’ असं उत्तर सासूबाईंना दिलं. यावर कमलच्या आईने एकटी असताना कमलकडे विचारणा केली. त्यावर अचानक भावनावश होऊन कमल ढसाढसा रडू लागली.

थोडय़ा वेळाने स्वत:ला थोडं सावरून कमलने सांगितले, ‘‘तीन महिने झाले, पण अजूनही आमचे शारीरिक संबंध आलेले नाहीत. आम्ही प्रयत्न खूप वेळा केले, पण उपयोग झाला नाही. विजयचा यात काही दोष नाही. प्रॉब्लेम माझ्यात आहे. माझंच शरीर मला साथ देत नाही. काय होतंय तेच कळत नाही.’’ तिच्याकडून कारण कळताच कमलची आई तिला एका स्त्रीरोगतज्ज्ञांकडे घेऊन गेली. कमलची तक्रार ऐकल्यानंतर डॉक्टरांनी तिची पूर्ण तपासणी केली. त्या म्हटल्या, ‘‘योनिमार्गात तसा काही दोष वा अडथळा दिसत नाही. पण काही डायलेटर्स काही काळ वापरावे लागतील.’’ पण ते वापरूनही त्याचा काहीही फायदा झाला नाही तेव्हा डॉक्टरांनी यावर ‘तुमचं कारण मानसिक आहे,’ असं सांगून कमलला एका मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवलं. मानसोपचारतज्ज्ञांनी कमलशी जुजबी चौकशी करून तिला ‘पेन्रिटेशन फोबिया’ म्हणजेच ‘इंद्रियप्रवेशाचा भयगंड’ आहे असं निदान केलं व तिला ‘अँग्झायटी’वरची औषधं लिहून दिली. या औषधांमुळे कमल सतत झोपाळलेली व निरुत्साही राहू लागली. त्यचा त्रास होऊन तिने औषधं बंद केली.

कमल, विजय व दोन्हीकडचे पालक या सर्वानाच ही नवीन समस्या आता भेडसावू लागली होती. तेव्हाच दूरचित्रवाणीवर सुरू असलेल्या लंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉक्टरांची मुलाखत विजयच्या आईने पाहिली. त्या कार्यक्रमामध्ये याही समस्येवर चर्चा झाली. लगेचच कमलसाठी त्या डॉक्टरांची भेट ठरवली गेली. त्या डॉक्टरांनी ‘पती-पत्नी दोघांना एकत्र यावं लागेल,’ असं आवर्जून सांगितलं. यापूर्वीच्या दोन्ही डॉक्टरांकडे कमल एकटीच आईबरोबर जात असे. कमल व विजय एकत्र डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तपशीलवारपणे दोघांनाही अनेक प्रश्न विचारत विचारत समस्या समजून घेतली. याआधीच्या मानसोपचारतज्ज्ञांनी ‘इंद्रियप्रवेशाचा भयगंड’ असं निदान केलं होतं. याचा उल्लेख कमलने डॉक्टरांपाशी केला. त्यावर डॉक्टरांनी ते निदान अयोग्य असल्याचं कमलला सांगितलं. इंद्रियप्रवेश किंवा संभोगाचा भयगंड असलेल्या मुली सहसा प्रेमात पडायचं टाळतात. शारीरिक संबंधांबाबत त्यांच्या मनात असलेल्या भीतीमुळे त्या कधीही प्रणयात रमू शकत नाहीत. कसल्याही प्रकारची शारीरिक जवळीक करणं त्या प्रकर्षांने टाळतात.  शारीरिक जवळीक केलीच तरी प्रतिकारच जास्त असतो. पण यापकी एकही लक्षण कमलमध्ये नव्हतं. ती सात वर्षे विजयच्या प्रेमात होती. लग्नाआधीही त्यांची अनेक वेळा शारीरिक जवळीक होत असे. काही मर्यादा पाळाव्यात म्हणून ‘लग्नाआधी समागम मात्र नको,’ असा दोघांचाही निर्णय होता. त्यांच्याशी बोलल्यानंतरच्या या सर्व लक्षणांवरून स्पष्ट होत होतं की कमलला भयगंड वा फोबिया अजिबात नव्हता. कमलचा प्रकार अगदी वेगळा होता. संभोग होऊ शकेल अशी वेळ येताच तिचा योनिमार्ग अनच्छिकरीत्या आकुंचन पावत असे. उत्तेजनेच्या शिखरावर असताना तिच्या नकळत हे होत असे. याला लैंगिक विज्ञानाच्या क्षेत्रात ‘व्हजायनिस्मस’ म्हणजेच ‘योनी आकर्ष’ असं संबोधलं जातं. असं प्रोग्रॅमिंग निर्माण होण्याची जी काही कारणं आज विज्ञानाला माहिती झाली आहेत त्यातलं एक सर्वात महत्त्वाचं व प्रचलित कारणच कमलच्या बाबतीत घडलं होतं.

मुली पौगंडावस्थेत येतात व संप्रेरकांचा एक नवसंचार त्यांच्या शरीरात सुरू होतो तेव्हा त्यांच्या शरीर व मनात अनेक नवीन बदल झपाटय़ाने घडू लागतात. हे बदल लैंगिकतेशी निगडित असतात. हे बदल घडणं ही एक नसíगक व सामान्य प्रक्रिया आहे. यासाठी मुलींची आधीच तयारी करून घेणं महत्त्वाचं असतं. या बदलांमधला एक महत्त्वाचा बदल म्हणजे मुलींना ‘मासिक पाळी’ येणं. प्रथम मासिक पाळी येण्याआधीच त्याबद्दलची माहिती मुलींना देणं ही पालकांची एक महत्त्वाची जबाबदारी आहे. असं न केल्यास अनेकदा एक विचित्र परिस्थिती मुलीच्या जीवनात निर्माण होऊ शकते व त्याचे परिणाम दूरगामी ठरू शकतात. कमलच्या बाबतीत असाच क्लेशदायक प्रकार घडला होता व तोच तिच्या समस्येच्या मुळाशी होता.

कमल तेव्हा नऊ वर्षांची होती. पाळी येणाऱ्या प्रकाराबद्दलची काहीही माहिती तिला कुणीही कधीही दिली नव्हती. पाळी येणं असा काही प्रकार असतो याची साधी कल्पनाही तिला नव्हती. एकदा शाळेत असताना अनपेक्षितपणे पहिली पाळी आली. आपल्या योनिमार्गातून रक्तस्राव होतोय हे तिच्या ध्यानात आलं व ती हादरली. असं का घडतंय याची जराही कल्पना नसल्याने तिला या प्रकाराने धक्काच बसला. साधारणपणे रक्त पाहिलं की आपल्याला जखम तरी झाली असेल किंवा काही आजार झाला असेल असा विचार चटकन मनात येतो. कमलसुद्धा खूप घाबरली. त्यात रक्त अशा ठिकाणातून येतंय ज्याबद्दल नेहमी गोपनीयता बाळगली जाते. त्यामुळे याची वाच्यता कुणापाशी करणंही तिला जमेना. मनात भीती, काळजी, धक्का असे नकारात्मक भाव दाटून येऊ लागले. कपडय़ांवर पडलेले रक्ताचे डाग तिला अधिकच कासावीस करत होते. ‘आपण अचानक एका विचित्र व लाजिरवाण्या संकटात सापडलोय,’ असा विचार तिला भेडसावू लागला.

ज्या संप्रेरकांच्या संचारण्याने कमलला पाळी आली होती, तेच संप्रेरक याआधी काही दिवसांपासून तिच्या मनात काही नवीन भावना व विचारही आणू लागले होते. या नवीन भावनांनाच ‘लैंगिक भावना’ किंवा ‘कामवासना’ म्हणतात याची जाण अजून कमलमधे परिपक्व  झाली नव्हती. पण कुठेतरी त्याचा एक नवीन आनंद ती काही दिवसांपासून अनुभवू लागली होती. कधी चित्रपटातलं एखादं प्रेमगीत ऐकताना किंवा एखादं रोमँटिक दृश्य पाहताना तिने काही सुखदायक संवेदनाही आपल्या योनिमार्गाच्या जवळपास अनुभवल्या होत्या व कळत-नकळत त्याचा आनंद तिने तिच्या एकांतात घेतला होता. पाळीमुळे योनीतून होणारा रक्तस्राव पाहताच आपण केलेल्या त्या ‘घाणेरडय़ा’ विचारांमुळे आता आपल्यावर हे ‘संकट’ आलं आहे, असा विचार तिला भेडसावू लागला. त्या लैंगिक भावनांचा आनंद घेतल्याबद्दल आपल्याला मिळालेली ही ‘शिक्षा’ आहे असं तिला वाटू लागलं. एका बाजूला योनिमार्गातून होणाऱ्या रक्तस्रावामुळे निर्माण झालेली अवघड परिस्थिती तर दुसरीकडे नकोनको त्या भीतीदायक विचारांचं एक थमान तिला घायाळ करून गेलं. ‘आपण ज्या विचारांचा व संवेदनांचा आनंद घेतला त्याचाच हा ‘दुष्परिणाम’ आहे. आपण ती चूक करायला नको होती..’ हे व या प्रकारचे पश्चात्तापाने माखलेले असंख्य विचार कमलच्या मनावर आघात करत गेले. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत ती घरी पोहोचली.

पुढे यथावकाश तिला हे कळलं, की आपण जे अनुभवलं ते संकट, आजार, जखम किंवा शिक्षा असं काहीही नसून ती एक अत्यंत निरोगी, नसíगक, अपेक्षित अशी स्त्रीसुलभ गोष्ट आहे. घातक व अपायकारक तर नव्हेच उलट स्त्रीच्या निकोप स्त्रीत्वाची ती एक स्वाभाविक अशी अभिव्यक्ती आहे. पण हे सर्व कळायच्या आधी कमलने ज्या भयावह भावना अनुभवल्या होत्या, जे क्लेशकारक विचार तिला सतावून गेले होते व जो मानसिक आघात तिला जाणवला होता त्याची ‘जखम’ तिच्या अंतर्मनात राहून गेली होती.

लग्नानंतर विजयशी शारीरिक संबंध ठेवताना पुन्हा त्याच कामुक भावना, शरीराच्या त्याच भागांत जाणवणाऱ्या त्याच सुखद संवेदना व त्यानंतर अनुभवलेली पश्चात्तापाची ती तीव्र भावना.’ हे दुष्टचक्र अनच्छिकरीत्या कमलमध्ये कार्यान्वित होत असे व ऐन वेळेला ती ऑटो रिस्ट्रिक्टिव (आत्मप्रतिरोधक) अशा अवस्थेत जात असे. या अवस्थेत जाताच तिचा योनिमार्ग आकुंचन पावत असे व समागम करणं अशक्य होऊन जाई.

‘व्हजायनिस्मस’ (योनिआकर्ष)ची अनेक प्रकरणांच्या अनेक केसेसमध्ये त्याचं हेच मूळ कारण असतं – संस्कारक्षम वयात आलेले असे तीव्र व तीक्ष्ण अनुभव, की ज्याचा थेट संबंध लैंगिक सुख, संभोग क्रिया किंवा योनिमार्ग यांच्याशी जोडलेला असतो. त्या वयात अशा प्रसंगी घेतलेला व अंतर्मनात खोल जाऊन बसलेला एक आत्मसंरक्षणात्मक निर्णयच (प्रोग्रॅमिंग) ऐन वेळी शरीराला आतमधून आज्ञा देऊ लागतो. या अंतर्मनातून आपोआप उपजणाऱ्या आज्ञेचं पालन करण्याचा परिणाम योनिमार्ग आकुंचन पावण्यात होतो व समागम करणं अशक्य होऊन बसतं.

कमलच्या आईने कमलला ‘मासिक पाळी’ या प्रकाराबाबत काहीही माहिती कधीही दिली नव्हती. अनेक पालक ही चूक करतात. ‘जेव्हा येईल तेव्हा बघू, इतक्यात येईल असं वाटत नाही, आधी सांगितलं तर ती घाबरेल.’ ही विचार करण्याची पद्धत धादांत चुकीची व घातक आहे. पहिली पाळी ही स्त्रीच्या जीवनातली एक महत्त्वाची घटना आहे. तो एक असा टप्पा आहे, की ज्यानंतर तिच्या जीवनातली अनेक समीकरणं बदलून जातात. एका मुलीचं रूपांतर एका ‘स्त्री’मध्ये होतं. या रूपांतराचं आनंदाने स्वागत व्हायला हवं. याउलट त्याची माहिती आधी न दिल्याने मुली घाबरतात, भेदरतात, नको ते समज करून घेतात, ‘काही तरी चुकीचं घडतंय.’ अशी धारणा करून घेतात व त्याचे पडसाद तिच्या भावी व्यक्तिमत्त्व व कामजीवनावर पडतात.

प्रत्येक पालकांचं हे कर्तव्य आहे की मुलगी ‘आठ’ वर्षांची होताच तिला पाळी येणं, त्याची कारणं, त्यापाठची धारणा व त्याची काळजी घेण्याची पद्धत, या गोष्टी समजावून सांगायला हव्यात. तिच्यात हा बदल आता कधीही होऊ शकतो याची जाण स्वत: ठेवणं व तिची यासाठीची पूर्वतयारी करून घेणं ही पालकांचीच जबाबदारी आहे. शाळेच्या दप्तरात एक सॅनिटरी पॅड सतत ठेवलेलं असावं, जेणेकरून असा प्रसंग येताच आपण स्वत: त्याची काळजी घेऊ शकू हे दाखवून द्यावं लागतं. सॅनिटरी पॅडचा उपयोग नेमका कसा करायचा हे आधीच शिकवून ठेवणं योग्य, जेणेकरून ऐन वेळी त्यात चूक किंवा दिरंगाई होऊ नये. याबरोबरच ‘पाळी येणं ही एक योग्य आणि अपेक्षित अशी घटना आहे, आपल्या शरीरस्वास्थ्याचं घडय़ाळ सुयोग्य प्रकारे काम करतंय याचं ते लक्षण आहे.’ असा सकारात्मक भाव मनात असणंही गरजेचं आहे.

सिग्मंड फ्रॉइड यांच्या ‘सायकोअ‍ॅनॅलिसिस’ या शास्त्राच्या तत्त्वांनुसार आज होत असलेल्या एखाद्या मानसिक त्रासांचा नेमका ‘उगम’ कुठे झाला हे शोधून काढणं फार महत्त्वाचं असतं. ‘उगम शोधून काढताच आज होणाऱ्या त्रासाची आंतरमनावरची पकड कमी होते व व्यक्ती सामान्य जीवन जगू शकते.’ असं अनेक प्रयोग करून सिग्मंड फ्रॉइडने जगासमोर प्रथम मांडलं व तिथेच समुपदेशनशास्त्राचा जन्म झाला.

कमललासुद्धा तिच्या त्रासांचा उगम समुपदेशनाच्या मदतीने लवकरच गवसला व ती तिच्या समस्येतून पूर्णपणे बाहेर आली. आज कमलला एक दीड वर्षांची मुलगी आहे. पालकांनी आपल्या तमाम जबाबदाऱ्या जाणून त्या पार पाडणं हे किती महत्त्वाचं असतं व तसं न केल्यास त्याचे परिणाम मुलांच्या भवितव्यावर कसे व किती पडू शकतात हेच कमलच्या या केसच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न.

(हा लेख सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेसाठी नावे व तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on August 10, 2019 12:06 am

Web Title: how to solve periods problem mpg 94
Just Now!
X