कनक रेळे
एक कलाकार म्हणून मी माझ्या प्रेक्षकांना नृत्यानंद देण्याचं देणं लागते.. ब्रह्मानंद सहोदरा..म्हणजे मला ज्या ब्रह्मानंदाची अनुभूती होते ती अनुभूती माझ्या सहोदरांना, रसिक प्रेक्षकांना देणं, हेच माझ्या कलेचं यश आहे. पण त्यासाठी वेगळं काही करावं लागतच नाही. एकदा का तालावर पाय पडू लागले की माझी मी उरतच नाही. कधी मी शूर्पणखा असते, कधी यशोधरा, कधी कुब्जा तर कधी रामसुद्धा असते.. त्यांच्या रूपातून तो आनंद रसिकांपर्यंत सहज पोहोचतो, सांगताहेत सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि नालंदा नृत्यविद्यालयाच्या संस्थापिका कनक रेळे.
अ गदी नकळत्या वयापासून माझं नृत्याशी नातं जडलंय. त्याचबरोबर त्याचे संस्कारही खूप खोलवर भिनले आहेत माझ्यात. माझी आई सांगायची, मी जेमतेम सहा महिन्यांची असेन त्यावेळी. घरात ग्रामोफोनवर ‘नाचूंगी म तो नाचूंगी, गिरधर हे आगे नाचूंगी. ’ हे गाणं लागलं होतं आणि त्या गाण्याच्या तालावर माझे वाळे घातलेले पाय हलत होते. ते बघून त्यावेळीच माझे वडील म्हणाले होते की, ही मोठेपणी उत्तम नृत्यांगना होणार आहे.
 हे माझं नाचाचं वेड पुढे वाढतच गेलं. घरात ग्रामोफोनवर गाणं लागलं की मी देहभान विसरून त्या तालावर नाचत असे. अर्थात ते वयच असं होतं की ते नृत्य फक्त स्वांतसुखाय होतं. मला त्यात खूपच, अपरिमित आनंद मिळत होता इतकं नक्की आठवतंय. पण त्याच वेळी, वयाच्या सहाव्या वर्र्षी एका जाहीर कार्यक्रमात माझ्या नृत्याला इतकी दाद मिळाली की त्या टाळ्याही आज लख्ख आठवतायत आणि त्याचं महत्त्वही आज समजतंय. त्या टाळ्या होत्या ‘दादी माँ नी डिकरी’ या मी सादर केलेल्या पहिल्या नृत्यनाटिकेसाठी. या अनुभवानंतर तर मी अधिकच नृत्यमय झाले होते. इतकी की प्रत्यक्ष पंडित उदयशंकर यांनी मला उचलून घेऊन आशीर्वाद दिला होता. तेव्हा माझं वय होतं फक्त आठ वर्षांचं. ती माझ्या नृत्यांगना होण्याच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासातली पहिली पावलं होती..
    माझं वय जरी लहान असलं तरी अगदी पाच-सहा वर्षांची असल्यापासून मला इतकं नक्की माहिती होतं की मी काही झालं तरी नृत्य शिकणारच. पाच वर्षांची असल्यापासून मी गुरू करुणाकर पाणिकर यांच्याकडे ‘कथकली’ शिकू लागले. पुढे ‘मोहिनी अट्टम’ या नृत्यप्रकारानं माझ्यावर मोहिनी घातली इतकी की आजही कायम आहेच. त्यात मी पारंगतच झाले. गंमत म्हणजे सुरुवातीच्या काळात मी नृत्य शिकण्याच्याबाबत जरा जास्तच पझेसिव्ह होते, असं म्हणायला हवं. कारण कोणीही जरा जरी नृत्य शिकण्याच्या विरोधी सूर काढला की मी अक्षरश: घर डोक्यावर घ्यायची. वेडच होतं मला त्याचं, पण एक नक्की की घरची शिस्त म्हणा किंवा संस्कार म्हणा शालेय शिक्षणाकडे मी कधीच दुर्लक्ष केलं नाही. जितकं यश नृत्यात मिळवलं तितकंच शालेय शिक्षणातही. पुढे मी जेव्हा नालंदा नृत्य अकादमी सुरू करण्यासाठी आकाश-पाताळ एक केलं तेव्हा किंवा त्यानंतर जेव्हा नृत्य शिकवू लागले तेव्हा मला माझ्या शालेय शिक्षणाचं महत्त्व प्रकर्षांने जाणवलं. शालेय शिक्षणामुळेच मी जे करते आहे ते बरोबरच आहे याचा आत्मविश्वास माझ्यात आला किंवा शिकवताना विद्यार्थ्यांना समजावून देण्याचं आणि समजून घेण्याचं भानही मला शिक्षणानेच दिलं. मी विद्यार्थ्यांना शिकवते तेव्हा किंवा सादरीकरणासाठी म्हणून जेव्हा एखादी नृत्य रचना बसवते तेव्हा तंत्र आणि कला यांचा समतोल राखणं किती गरजेचं आहे हे शिक्षणामुळेच तर कळतं. कोणतीही रचना सादर करण्यापूर्वी ती असते अचूकतेसाठी घेतलेली मेहनत आणि सादरीकरणानंतर तो असतो प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवल्याचा आनंद.
महाराष्ट्र संत साहित्याने संपन्न आहे, पण महाराष्ट्राला नृत्याची परंपरा नाही. या दोन्ही गोष्टी एकत्र आणून मी संतांच्या रचनांवरचा कार्यक्रम बसवला. याची जी संपूर्ण प्रक्रिया होती अगदी संत साहित्याचा अभ्यास करण्यापासून ते प्रत्यक्ष सादरीकरण करण्यापर्यंतची, ती मला खूप काही शिकवून गेली. मराठी साहित्यातलं एक अतिशय संपन्न दालनच त्या निमित्ताने माझ्यापुढे खुलं झालं. ते जेव्हा प्रेक्षकांनी स्वीकारलं तेव्हा त्या यशाने मिळालेलं समाधान शब्दात नाही सांगता येणार! ती अनुभूती वेगळीच.
त्याचप्रमाणे शिक्षणानेच मला चांगल्या-वाईटात भेद करण्याचं भान दिलं. मी कधी वाहावत गेले नाही. मी जेव्हा स्टेजवर उभी असते तेव्हा मी कलाकार असते. त्यावेळी मी चांगली दिसलेच पाहिजे हा माझा अट्टहास असतो. कारण ती माझ्या कलेची गरज असते. दागिने चांगले हवेत, मेकअप चांगला हवा याकडे मीच काय माझी आईही कटाक्षाने लक्ष देत असे. माझ्या डोळ्यातलं काजळ रेसभर जरी बाहेर आलेलं दिसलं तरी ती मला ओरडायची. त्याचबरोबर एकदा का माझा कार्यक्रम संपला की मी लगेच ती सगळी झूल उतरवून टाकत असे. नृत्याच्या पेहरावामध्ये कार्यक्रमानंतर मी प्रेक्षकांसमोर कधीही रेंगाळत राहिलेली मलाच आठवत नाही.
‘एक मात्र नक्की की, एक कलाकार म्हणून मी माझ्या प्रेक्षकांना नृत्यानंद देण्याचं देणं लागते.. ब्रह्मानंद सहोदरा.. म्हणजेच मला ज्या ब्रह्मानंदाची अनुभूती होते ती अनुभूती माझ्या सहोदरांना, रसिक प्रेक्षकांना देणं हेच माझ्या कलेचं यश आहे. पण त्यासाठी वेगळं काही करावं लागतच नाही. एकदा का तालावर पाय पडू लागले की मी आत्ममग्न होऊन जाते. कलेशी एकरूप होऊन जाते. माझी मीही उरत नाही. कधी शूर्पणखा असते, कधी यशोधरा, कधी कुब्जा तर कधी रामसुद्धा. त्यांच्या रूपातूनच तो आनंद रसिकांपर्यंत सहज पोहोचतो..
माझ्या नृत्यांतून प्रेक्षकांना अपेक्षित असणारा जो रसास्वाद मी देते त्यात माझं दिसणं आणि नृत्य या दोन्हींचा सहभाग असतो. मोहिनी अट्टम म्हणजे विष्णूचं मोहिनी रूप. त्यामुळे त्यात स्त्रीच्या नजाकतीचं महत्त्व खूप आहे. मात्र ते स्त्री-शक्तीचंदेखील रूप असल्याने तितकंच कणखरही आहे. ही दोन्ही रूपं मी नेहमीच माझ्या नृत्यातून दाखवलेली आहेत. या रूपांतून जे लावण्य साकारतं ते बघायला प्रेक्षक येतात आणि त्यांच्यापर्यंत ते लावण्य, तो रसास्वाद पोहचवणं ही माझी जबाबदारी असते. मग मी कधी बुद्धाच्या शोकात मग्न असणारी यशोधरा दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू उभे करते तर कधी कंसाने केलेल्या बलात्काराने पीडित कुब्जा दाखवून प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा करते. मात्र त्यावेळी मला याचंही भान असतं की प्रेक्षकांना या सगळ्या रसांच्या स्वादाचा आनंद देत मला परत मूळ स्थितीपर्यंत आणून पोहोचवायचं आहे.
जर मी माझ्याच नृत्याबरोबर वाहावत गेले तर माझ्या प्रेक्षकांना हा आनंद कसा देणार? मुळात सगळ्या भावनांचा अनुभव मी घेतलेला नसतो तरी मी ते अनुभवतेय हे प्रेक्षकांना पटवून द्यावं लागतं. इथेच तर कलेचा कस लागतो. कंस कुब्जेवर बलात्कार करतो हे दाखवताना मी माझ्या उजव्या हाताने डावं मनगट पकडते. त्या एका कृतीने मला जो परिणाम साधायचा असतो तो साधता येतो. किंवा यशोधरा जेव्हा बुद्धासाठी शोक करताना अश्रू ढाळत असते तेव्हा माझ्या डोळ्यात जे वाहात ते थंड पाणी असतं, कढत अश्रू नसतात. मी जर खरंच अश्रू ढाळू लागले तर मी त्या भावनेतून बाहेर पडून दुसऱ्या दृश्यात दुसऱ्या भावनेचा आनंद कसा देणार? पाण्यात राहून स्वत: न भिजता काठावरच्यांना भिजवणं ही मला वाटतं कोणाही कलाकाराला मिळणारी दैवी अनुभूती असते. जी मी दुसऱ्या कलाकारांच्या कलेचा अनुभव घेताना अनुभवते.
मला आठवतंय, पंडित रविशंकर यांना नालंदाच्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं त्यावेळी आम्हाला काय ऐकायचंय ते त्यांना सांगण्याची आमची प्रज्ञाच नव्हती.. तुम्हाला काय ऐकवायचंय ते आम्ही ऐकू असं म्हटलं आणि त्यांनी ‘चंद्रकौस’ छेडला! त्या पहिल्या सुरानेच माझ्या अंगावर जो काटा उभा केला ना तो मी आजतागायत विसरलेली नाही. खूप मोठय़ा कलाकारांना अगदी जवळून बघण्याचं भाग्य मला लाभलंय. बिरजू महाराजांनी सादर केलेल्या ‘कौन गली गयो श्याम..’ मधली आर्तता कधीच न विसरण्यासाठी. एकदा एकाच्या घरी केलुचरण महापात्रा आले होते. त्यांचा छोटासा खासगी कार्यक्रम करायचं त्या यजमानांनी ठरवलं आणि त्या कार्यक्रमासाठी मला बोलावलं. तेव्हा गुरुजींनी जी ‘राधा’ साकार केली होती.. ती केवळ लाजवाब! राधेचा नखरा दाखवताना त्यांनी केलेली डोळ्यांची, भुवयांची हालचाल कदाचित इतर कोणा कलाकारांनी केली असती तरी ती अश्लील वाटू शकली असती. पण गुरुजींचा राधेचा नखरा बघताना वाटलं की कृष्णाला रिझविण्यासाठी विभ्रम करणारी राधाच प्रत्यक्षात समोर आहे. याला म्हणतात, कलेला सर्वस्व समर्पण करणं..
नृत्य सादर करताना किंवा केल्यावर एकीकडे परिपूर्तीचा आनंद मिळतो तर काही वेळा गमतीशीर अनुभवही येतात.. एके ठिकाणी मी कार्यक्रम करत होते. समोरचा प्रेक्षकवर्ग फिल्मी गाण्याच्या ऑर्केस्ट्राला असतो तसा! यांच्यासमोर काय सादर करू? हा विचार क्षणमात्र माझ्या मनात तरळून गेला. पण लगेच तो झटकून टाकून मी सादरीकरणाला सुरुवात केली. रामायणातल्या काही कथांवरच सादरीकरण होतं ते.  नृत्य करत असताना राम म्हणजे त्याच्या भूमिकेतील मी प्रेक्षकांकडे बघून हाताने या या अशा खुणा करते. तेव्हा प्रेक्षकांत बसलेली पाच-दहा मुलं उठली आणि थेट स्टेजवरच आली. हे बघून क्षणभर मी इतकी गोंधळून गेले की काय करावं हा प्रश्न पडला.. पण दुसऱ्याच क्षणी मी त्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्या मुलांना खाली पाठवून दिलं. गुजरातमध्ये मोढेराला एका महोत्सवात अशाच सर्वसामान्यांसमोर मी शूर्पणखा सादर केली होती. त्यावेळी मला आश्चर्यकारक प्रतिसाद तर मिळालाच. पण कार्यक्रम संपल्यावर त्या प्रेक्षकातल्या स्त्रियांना जेव्हा समजलं ती मी आहे तेव्हा त्या सगळ्यांना सांगत सुटल्या…‘आ डिकरी तो रोटला बनवानु पण जाणे छे! ’ हाही माझ्यातल्या कलाकाराचाच सन्मान होता!