माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

विविध हेल्पलाइन्सच्या अंतरंगात उतरून त्यांचा नागरिकांना अडचणीच्या वेळी कसा उपयोग होईल, याची माहिती द्यायला या सदरातून सुरुवात झाली आणि काहीच आठवडय़ांत करोनाची चाहूल लागली. या काळात उपयोगी ठरणाऱ्या हेल्पलाइन्स शोधणं आणि त्यांची विश्वासार्हता तपासणं आव्हानात्मक होतं, कारण जवळपास सर्व यंत्रणा करोनाचा मुकाबला करण्यात व्यग्र होत्या. पण तशा स्थितीतही सरकारी अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं आणि हे सदर अधिकच माहितीपूर्ण होऊ शकलं.

टाळेबंदीच्या काळात काही हेल्पलाइन्सचं काम नव्यानं अधोरेखित झालं आणि टाळेबंदी शिथिल झाल्यावरही त्या हेल्पलाइन्स चालू राहिल्या. गर्भवतींना १३ आठवडे, २० आठवडे अशा अंतरानं सोनोग्राफी करणं अत्यंत गरजेचं असतं. तसंच रुग्णांच्या गंभीर आणि तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी सोनोग्राफी, मॅमोग्राफी अशा तपासण्या वेळेवर होणं अत्यावश्यक असतं. अशा रुग्णांना आपत्कालीन सेवा देता यावी यासाठी ठाणे अल्ट्रासाउंड सेंटरने करोनाच्या काळात एक हेल्पलाइन सुरू केली. त्यावर रुग्णांना डॉक्टरांशी थेट संपर्क साधता येत होता. या हेल्पलाइनविषयी ठाणे अल्ट्रासाउंड सेंटरच्या संचालिका डॉ. ज्योती चौबळ सांगतात, ‘‘आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून तपासणीसाठी रुग्ण येत असतात. टाळेबंदीच्या काळात आम्ही अनेक डॉक्टरांना हा हेल्पलाइन क्रमांक देऊन ठेवला होता. त्याचा दूरदूरच्या गर्भवतींना फायदा झाला. मला आठवतं, एका गर्भवतीचा एका सकाळीच या हेल्पलाइनवर फोन आला. तिची तक्रार ऐकून आम्ही तिला तातडीनं बोलावलं. तपासणीअंती कळलं की तिचा रक्तदाब खूप वाढल्याने तिच्या पोटात आणि छातीत पाणी झालं होतं. यकृताचा आकारही वाढला होता. बाळाला पुरेसा रक्तपुरवठा होत नव्हता. आम्ही तातडीनं तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञाशी फोनवर बोललो आणि त्यांना गुंतागुंत सांगितली. ती रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी तिच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची पूर्ण तयारी केली होती. सुदैवानं ती स्त्री आणि बाळ वाचलं. आमची हेल्पलाइनची सेवा सार्थकी लागली.’’

असंच आणखी एक प्रकरण त्या सांगतात. ‘‘प्रसूतीच्या तारखेपूर्वी दोन आठवडे त्या स्त्रीनं आमच्या हेल्पलाइनवर फोन करून तिची तक्रार सांगितली. आम्ही ताबडतोब तिला बोलावून घेतलं. तपासणीमध्ये तिच्या बाळाची प्रकृती इतकी गंभीर आढळली की चार तास उशीर झाला असता तर बाळ वाचलं नसतं. तिचं बाळ केवळ हेल्पलाइन सेवेमुळे वाचलं याचं खूप समाधान वाटलं. एका मध्यमवयीन स्त्रीशी हेल्पलाइनवर बोलत असतानाच तिच्या आजाराचं गांभीर्य आमच्या लक्षात आलं. तिची तातडीनं सोनोग्राफी केली तेव्हा तिला ओव्हरीजचा कर्क रोग असल्याचं लक्षात आलं. केवळ तपासणी उपलब्ध झाल्यानं त्या स्त्रीच्या व्याधीचं निदान वेळेवर झालं.’’ अशा अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांना त्या कठीण काळात केवळ हेल्पलाइनचा आधार होता.

ठाणे अल्ट्रासाउंड सेंटरचे संचालक

डॉ. नितीन चौबळ सांगतात, टाळेबंदी शिथिल झाल्यावरही आम्ही ही हेल्पलाइन बायोप्सीरुग्णांसाठी सुरू ठेवली आहे. बायोप्सीतपासणी करण्यापूर्वी ही तपासणी नेमकी कशी आहे, त्यासाठी कोणती साधनसामग्री वापरली जाणार आहे, तपासणीतील संभाव्य गुंतागुंत, या सर्वाची तपशीलवार माहिती या हेल्पलाइनवरून रुग्णांना दिली जाते. रुग्णाच्या मनातल्या सर्व शंकांना थेट डॉक्टरांकडूनच वस्तुनिष्ठ उत्तरं मिळत असल्यानं रुग्णाला धीर येतो. दूरदूरच्या  ठिकाणांहून येण्याचे त्यांचे श्रम आणि वेळ वाचतो. आमच्याकडील वार्षिक तपासणी शिबिरांमध्ये नोंदणीसाठी या हेल्पलाइनचा रुग्णांना उत्तम उपयोग होतो. यासाठी आम्ही ही हेल्पलाइन कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’’

करोनाकाळात अन्न व औषध प्रशासनानं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याची माहिती देताना साहाय्यक आयुक्त दुष्यंत भामरे सांगतात, ‘‘आमच्या हेल्पलाइनवर सॅनिटायझर्सची मागणी करणारे फोन अखंड येत होते. आम्ही उत्पादकांना त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी तातडीनं परवाने दिले. तसंच सॅनिटायझर्सचं योग्य प्रकारे वितरण व्हावं यावर खास देखरेख ठेवली. प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपीसुरू करण्यात आली तेव्हा काही रक्तपेढय़ांना तातडीनं मंजुरी देण्यात आली. प्लाझ्मा वा रक्ताची टंचाई निर्माण होऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली.’’

हेच सूत्र पुढे नेत अन्न व औषध प्रशासनाच्या कोकण विभागाचे सहआयुक्त विराज पौनीकर सांगतात, ‘‘या काळात आमच्या हेल्पलाइनचा रुग्णालयं, रुग्ण, औषध विक्रेते आणि रक्तपेढय़ा यांना खूपच उपयोग झाला. आमच्या हेल्पलाइनवर करोनासाठी लागणारी खास औषधं, इंजेक्शन्स, मल्टीव्हिटॅमिन्स यांची तातडीनं गरज असल्याचे फोन येत. अनेक वेळा मध्यरात्रीसुद्धा मी स्वत: ती औषधं रुग्णांना उपलब्ध करून देत असे. आमच्या विभागात ऑक्सिजनचं उत्पादन अधिक प्रमाणात होतं. हेल्पलाइनवरून त्याची मागणी होताच वाहतूक पोलिसांशी समन्वय साधत ऑक्सिजन सिलेंडर्स रुग्णालयांमध्ये तातडीनं पाठवण्यात येत. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत मंत्री आणि आयुक्त सातत्यानं करत होते.’’

करोनाकाळात प्लाझ्मा आणि रक्ताची गरज निर्माण झाली त्या वेळी रक्तपेढय़ांनी खूप मोलाचं काम केलं, असं नवजीवन ब्लड बँकेचे डॉ. मुकेश उदानी आवर्जून सांगतात. अन्न व औषध विभागाचे निरीक्षक व्ही. आर. रवी यांनी सांगितलं, ‘‘रक्तपेढय़ांमध्ये रक्त उपलब्ध झालं नाही तर आपण तक्रार करतो. पण आपण स्वत: किती वेळा रक्तदान करतो? मी रक्तपेढय़ांमध्ये फक्त तपासणीसाठीच नव्हे तर दरवर्षी माझ्या वाढदिवसाला न चुकता रक्तदान करतो.’’

विराज पौनीकर यांनी सांगितलं, की जगात रक्ताचा कारखाना नाही, त्यामुळे मानवी शरीर हेच रक्तपुरवठय़ाचं एकमेव साधन आहे. म्हणूनच रक्तपुरवठा, औषधांची उपलब्धता आणि त्याविषयीच्या नागरिकांच्या तक्रारी वा निवेदनं यासाठी आमची हेल्पलाइन सदैव कार्यरत आहे.’’

हेल्पलाइन क्रमांक

ठाणे अल्ट्रासाउंड सेंटर- ८८५०१९२५४६

अन्न व औषध प्रशासन- १८००२२२३६५

करोना संकटातली हेल्पलाइन

हेल्पलाइनच्या अंतरंगातहे सदर सुरू झालं तेव्हा  सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त ठरतील अशा माहितीपूर्ण हेल्पलाइन्सवर लेखन अपेक्षित होतं. त्या दृष्टीनं सरकारी आस्थापना आणि सेवाभावी संस्थांच्या हेल्पलाइन्सचा सुरुवातीला विचार करण्यात आला. दरम्यान मार्च महिना उजाडला, तो करोनाचं सावट घेऊन. त्या साथीच्या संकटकाळाची काळी छाया सर्वदूर पसरत गेली, तसं हेल्पलाइन्सचे विषय, स्वरूप, प्राधान्यक्रम सर्वच बदलत गेलं. समाजातील सर्वच घटकांना वेगवेगळ्या समस्या भेडसावू लागल्या. तरुण, ज्येष्ठ, विद्यार्थी, स्त्रिया, श्रमिक, प्रत्येक जण या साथीच्या संकटात भरडला जाऊ लागला. सरकारी आस्थापनांच्या कामाचं स्वरूप आमूलाग्र बदललं. सामान्यजनांना करोनाच्या अज्ञात भयानं झपाटलं. अशा वेळी या सर्वाच्या समस्यांचा साकल्यानं वेध घेणाऱ्या हेल्पलाइन्सना प्राधान्य देणं गरजेचं झालं.

एप्रिल महिन्यात सर्वप्रथम १९१६ या हेल्पलाइनसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला. विशेष म्हणजे त्या काळात ते अत्यंत व्यग्र असूनही रात्री उशिरा त्यांनी मुलाखत दिली आणि शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली. त्या काळात मुळात करोना संकटाशी संबंधित हेल्पलाइन्स मिळवण्याचं शोधकार्य आव्हानात्मक होतं. वृत्तपत्रांचं साधन हाताशी नव्हतं. थेट भेटी शक्य नव्हत्या. अशा वेळी टीव्हीवरील बातम्यांच्या खालील सरकपट्टय़ा, समाजमाध्यमं, व्यक्तिगत ओळखी यातून हेल्पलाइन्सची माहिती मिळत गेली. त्यांची विश्वासार्हता तपासणं टाळेबंदीच्या काळात अशक्य वाटणारं काम होतं. शिवाय सर्वच सरकारी यंत्रणांमधील पदाधिकारी करोनाशी मुकाबला करण्यात अडकलेले होते. तरीही सर्व विभागांतील उच्चपदस्थांनी या सदरासाठी पुरेसा वेळ दिला, आवश्यक ती माहिती दिली.

या काळात मला ठळकपणे जाणवलेली बाब म्हणजे या सदरासाठी मुलाखत देणारे सर्व जण अत्यंत संवेदनशील, कामाप्रति कमालीची निष्ठा बाळगणारे, आपल्या कार्यालयीन कामातून नागरिकांना मदत देण्यास कटिबद्ध असणारे होते. या अभूतपूर्व संकटात रूढ चौकटीपलीकडे जाऊन, वेळ आणि श्रमांची तमा न बाळगता झोकून देऊन काम करणारे होते. म्हणूनच या संकटानं माणसामाणसांतली नाती दृढ केली. वानगीदाखल ही काही उदाहरणं द्यावीशी वाटतात. रेल्वेच्या हेल्पलाइनविषयीची प्राथमिक माहिती विचारण्यासाठी मी जेव्हा जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांना दूरध्वनी के ला, तेव्हा मुसळधार पावसामुळे त्यांच्या घरात पाणी भरलं होतं. तशाही परिस्थितीत त्यांनी प्रदीर्घ मुलाखत दिली आणि नंतरच घरातील वस्तू हलवण्यास सुरुवात केली. पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त

के . व्यंकटेशम, रुग्णवाहिका सेवेची प्राथमिक माहिती देणारे डॉ. प्रवीण साधले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्त नीलम वाव्हळ यांनी त्या त्या लेखांना दिलेली दाद केवळ अविस्मरणीय. या सर्वानी अथक परिश्रम केले आणि कर्तव्यपूर्तीचं समाधान त्यांना लाभलं. महेश नार्वेकर यांनी सांगितलं, ‘‘या काळात माझ्या मोबाइलवर २५,००० फोन आले. त्या काळात अहोरात्र काम केलं खरं, पण त्यामुळे आम्ही मुंबईला वाचवू शकलो हे समाधान मोठं आहे.’’

या सदरानं व्यक्तिश: मला काय दिलं? तर हेल्पलाइन्सच्या माहितीच्या रूपानं समाजाला संकटकाळात मदतीचा हात देऊ शकले याचं असीम समाधान. मात्र याचं श्रेय लोकसत्ताचे संपादक, साक्षेपी वाचक आणि हितचिंतक यांनाच आहे. वन विभागाचे ज्येष्ठ अधिकारी सुनील लिमये, ‘हेल्पेज इंडियाचे प्रकाश बोरगावकर, ‘सिल्व्हर इनिंग्जचे अध्यक्ष शैलेश मिश्र, १०८ रुग्णवाहिका सेवेचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर शेळके, ‘वुई आर फॉर यूसंस्थेचे संचालक किरण नाकती यांनी मोलाचं सहकार्य केलं. विद्यार्थी विकास योजनेचे प्रमुख रवींद्र कर्वे यांना विद्यार्थी विकास योजनेच्या हेल्पलाइनवर गरीब विद्यार्थ्यांसाठी जी भरीव मदत प्राप्त झाली ती पाहून मन आनंदानं भरून आलं.  गृहनिर्माण संस्थेच्या हेल्पलाइनवरील लेखावरही मोठय़ा संख्येनं प्रतिक्रिया आल्या. त्यातील बहुसंख्य प्रतिक्रिया तक्रारींच्या होत्या. त्यांची दखल घेताना निबंधक विशाल जाधवर यांनी सांगितलं, ‘‘ गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न वास्तविक स्थानिक पातळीवर सोडवायला हवेत. फक्त गंभीर स्वरूपाचे प्रश्न निबंधक कार्यालयात यायला हवेत. हे जाणवल्यामुळे आम्ही आता अधिकारी, कर्मचारी, सोसायटीतील पदाधिकारी आणि सभासद यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवत आहोत.’’

हेल्पलाइनच्या अंतरंगातया सदरातून सामाजिक प्रश्नांविषयीच्या जाणीव-जागृतीचं काम झालं. या सदराचे साक्षेपी वाचक ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं, ‘‘वाचकांना वाचनीय व उपयुक्त माहिती विविध सदरांतून देण्याची लोकसत्ताची परंपरा आहे. लोकशाहीत नागरिकांच्या हक्कांची जाणीव आणि सुविधांची माहिती या सदरानं योग्य वेळी करून दिली. त्याचा उपयोग अडचणीच्या काळात लोकांना अवश्य करता येईल.’’ ‘लोकसत्ताच्या नियमित वाचक रश्मी मुल्हेरकर दिघे म्हणतात, ‘‘या सदरातील मजकूर माहितीपूर्ण असूनही रुक्ष न होता वाचनीय आणि परिणामकारक होता. या सर्व हेल्पलाइन्स संकलित स्वरूपात मिळाल्यास वाचकांचा फायदा होईल.’’ कोल्हापूर येथील प्राध्यापिका तेजस्विनी देसाई नमूद करतात, की आमच्यासारख्या सुशिक्षित नागरिकांनाही अशा हेल्पलाइन्स असतात याची माहिती नव्हती. ती विस्तृत माहिती या सदरानं आम्हाला दिली यासाठी लोकसत्ताचे आभार.

(सदर समाप्त)