News Flash

आव्हान पालकत्वाचे : शारीर वैगुण्याची भ्रामकता

एखादी गोष्ट कितीही सत्य असली तरी त्याची परीपूर्ण स्वीकृती होण्यासाठी त्याच्या मुळाशी असलेली बाधक धारणा विलीन होणं गरजेचं असतं.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. राजन भोसले

स्वत:च्या शरीरात काहीना काही वैगुण्य शोधत राहण्याचा एक आग्रही नादच माधुरीच्या मनाने लावून घेतला होता. यालाच मनोविकारशास्त्रात ‘बॉडी डिसमॉर्फिक् डिसॉर्डर’ असं म्हणतात. माधुरीच्या मनात स्वत:बद्दल असलेली वैगुण्यं किती भ्रामक होती हे तिला प्लास्टिक सर्जनने सांगितलंच होतं, पण एखादी गोष्ट कितीही सत्य असली तरी त्याची परीपूर्ण स्वीकृती होण्यासाठी त्याच्या मुळाशी असलेली बाधक धारणा विलीन होणं गरजेचं असतं.

माधुरी दोन बहिणींमध्ये मोठी. धाकटी बहीण उर्मिला माधुरीपेक्षा सात वर्षांनी लहान. आई पूर्णवेळ गृहिणी तर वडील वरच्या पदावर नोकरी करणारे. माधुरी व उर्मिला दोघींचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण झालं. उर्मिलाने एमबीए केलं तर माधुरीने फॅशन डिझाइिनगचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

माधुरी दिसायला अत्यंत आकर्षक. आईसारखा गोरा रंग, उठावदार सुंदर बांधा, चटकन डोळ्यात भरेल असं व्यक्तिमत्त्व. माधुरी तीस वर्षांची तर उर्मिला तेवीसची झाली. उर्मिला व यतीन दोघांचं शाळेत असल्यापासून प्रेम होतं. यतीनच्या आई-वडिलांना उर्मिला पसंत होती. मोठी मुलगी माधुरी अजून अविवाहित असताना लहान बहिणीचं लग्न करणं कितपत योग्य असा विचार उर्मिलाच्या आईवडिलांच्या मनात आला. पण माधुरीनेच पुढाकार घेऊन ‘उर्मिलाचं लग्न होऊन जाऊ दे,’ असं म्हटलं. लग्न थाटामाटात पार पडलं. उर्मिलाच्या लग्नानंतर काही काळाने आईने माधुरीपाशी तिच्या लग्नाचा विषय काढला. त्यावर चटकन एक तुटक प्रतिक्रिया देत माधुरी म्हणाली, ‘‘माझ्या लग्नाचं सोड. मी ठीक आहे.’’ आईला चटकन काय म्हणावं कळेना म्हणून ती गप्प राहिली. पुढे काही दिवस जाऊ दिले व एके दिवशी ठरवून आई-वडिलांनी एकत्रितपणे माधुरीकडे हा विषय काढला. विषय काढताच माधुरी बेचन झाली. तिच्या चेहऱ्यावर व हालचालीत ती अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट दिसू लागलं पण तिने एक वैतागलेली प्रतिक्रिया दिली. ‘‘तुम्ही कशासाठी माझी काळजी करताय? हा माझा प्रश्न आहे आणि मला या विषयावर काहीही बोलण्याची इच्छा नाही.’’ ती काही तरी लपवते आहे हे आई-वडिलांच्या ध्यानात आलं. माधुरीच्या आई-वडिलांनी पुन्हा काही दिवस जाऊ दिले. माधुरीचा एकतिसावा वाढदिवस होऊन गेला. ‘तिचं वय वाढत चाललं आहे. असं गप्प राहून कसं चालेल?’ असा विचार करून माधुरीच्या आई-वडिलांनी पुन्हा एकदा माधुरीकडे तो विषय काढला. या वेळी मात्र माधुरीच्या भावनांचा बांध फुटला व ती ओक्साबोक्शी रडू लागली. स्वत:ला थोडं सावरून माधुरी सांगू लागली, ‘‘बाहेरून दिसून येत नाही पण माझ्या शरीरात काही लक्षणीय वैगुण्यं आहेत. कपडय़ांमुळे ती लपवता येतात पण लग्न केल्यास ती लपवणं शक्य नाही. नवऱ्याच्या ती लक्षात येताच त्याला माझं आकर्षण वाटणार नाही. तो दूर जाईल. त्याला मी त्याची फसवणूक केली असं वाटेल. त्यामुळे आमचे संबंध बिघडतील.. तुटू पण शकतील. म्हणून मला लग्नच नको.’’

माधुरीचं म्हणणं ऐकताच तिच्या आई-वडील दोघांना आश्चर्य वाटलं. माधुरीच्या शरीरातल्या वैगुण्यांबद्दल आपल्याला कसं काहीच माहिती नाही हेच त्यांना कळेना. अशी काय वैगुण्यं असू शकतील याचा विचार करूनही त्यांना त्याचा अंदाज येईना. आईने एकांतात तिला विचारणा केली पण माधुरी काहीच बोलेना. ‘आपण एखाद्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाऊ या.’ असं आईने सुचवलं पण त्यालाही ती नको म्हणाली. त्याच सुमारास एका स्त्री-प्लास्टिक सर्जनची मुलाखत माधुरी व तिच्या आई-वडिलांनी एका वाहिनीवर पाहिली. शरीरातली विविध वैगुण्यं कशी आधुनिक प्लास्टिक सर्जरीच्या मदतीने दूर करता येऊ शकतात यावर झालेली चर्चा ऐकून माधुरी स्वत:हून त्या सर्जनकडे गेली. डॉक्टरांकडे गेल्यावरही माधुरीने आईसमोर त्या डॉक्टरांशी बोलायला नकार दिला. आई बाहेर जाऊन बसताच संकोचत माधुरीने तिची समस्या बोलून दाखवली, ‘‘माझे दोन्ही स्तन विभिन्न आकाराचे आहेत. दोन्ही स्तनाग्रं विरुद्ध दिशांना वळलेली दिसतात. त्यामुळे माझे स्तन अनाकर्षक व विचित्र दिसतात.’’ त्यावर तिची रीतसर तपासणी करून डॉक्टर म्हणाल्या, ‘‘तुला शस्त्रक्रियेची अजिबात गरज नाही. तुझ्या स्तनांच्या आकारातली विभिन्नता लक्षातही येणार नाही इतकी नगण्य आहे. स्तनाग्रांची ठेवण ही अशी असू शकते. स्तनाग्रांचा रंगही अनेक मुलींमध्ये गडद दिसून येतो. या गोष्टींसाठी प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता नाही.’’

डॉक्टरांच्या या मताने तिचे अजिबातच समाधान झाले नाही. ती डॉक्टरांना म्हणाली, ‘‘मला तुमच्याकडून खूप अपेक्षा होती. तुम्ही मदत कराल असं वाटलं होतं. पण आता तीही आशा संपली.’’ तिचा रडवेला चेहरा बघून आधीच काळजी करत बसलेली तिची आई अधिकच अस्वस्थ झाली. त्यांनाही आश्वस्त करत डॉक्टर म्हणाल्या, ‘‘तुमच्या मुलीला कसल्याही शस्त्रक्रियेची गरज नाही. तिला स्वत:त जे वैगुण्य आहे असं वाटतं त्यात फारसं तथ्य नाही. तिच्या भ्रामक व अवास्तव कल्पनांमुळे तिने तो समज करून घेतला आहे. तिला तुम्ही समुपदेशनासाठी घेऊन जा. तिला शस्त्रक्रिया नव्हे तर समुपदेशनाची गरज आहे.’’ असं सांगून एका ज्येष्ठ समुपदेशन तज्ज्ञाचं नाव त्यांना सुचवलं. सुरुवातीला समुपदेशनाला जाण्यासाठी माधुरीने स्पष्ट नकार दिला. मात्र आई-वडील दोघांनीही आग्रह करून तिला त्यासाठी तयार केलं. समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरांकडे जाताच त्यांच्या स्वागतगृहात वाचनासाठी ठेवलेली डॉक्टरांनी लिहिलेली पुस्तकं माधुरीच्या पाहण्यात आली आणि त्यावर असलेलं डॉक्टरांचं छायाचित्र पाहताच तिला आठवलं, की हेच डॉक्टर तिच्या शाळेत ती चौथीत असताना लैंगिक शिक्षणाचे वर्ग घेण्यासाठी आले होते. त्यांच्या शिकवण्याचा खूपच फायदा तिला व तिच्या मत्रिणींना त्या वेळी झाला होता. मनातले अनेक गैरसमज, भ्रामक समजुती डॉक्टरांनी किती सहजपणे त्या वयात दूर केल्या होत्या याची आठवण माधुरीला झाली व नकळत तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.

‘‘मी चौथीत असताना तुम्ही आमच्या शाळेत आला होतात.’’ ही आठवण माधुरीनेच उत्साहाने डॉक्टरांना भेटताच क्षणी सांगितली. डॉक्टरांबरोबर समुपदेशनासाठी झालेल्या अनेक भेटी तीन महिने चालल्या. त्या प्रक्रियेत माधुरीव्यतिरिक्त तिचे आई-वडील व तिची लहान बहीण यांनाही डॉक्टरांनी सहभागी करून घेतलं. अशा समस्यांची मुळं बालपणात, घरातल्या वातावरणात, आई-वडिलांकडून झालेले संस्कार व मिळालेल्या विभिन्न प्रतिक्रिया या सर्वात लपलेली असतात. या सर्वाशी बोलताना माधुरीचा जो इतिहास समोर आला तो असा होता, माधुरीचा जन्म झाला तेव्हा तिच्या आईला जुळ्या मुली झाल्या होत्या. जुळ्या असल्या तरी दोघींमध्ये बरीच भिन्नता होती. माधुरीच्या मानाने तिची जुळी बहीण आकाराने थोडी मोठी व रंगाने थोडी उजळ होती. जुळ्या बहिणीच्या मानाने माधुरी वजनाने कमी, शरीराने कृश व चेहऱ्यावर सूज असलेल्या अवस्थेत जन्मली होती. जन्मानंतर काही काळ दोघींना आईपासून दूर अतिदक्षता कक्षात ठेवावं लागलं होतं. त्या काळात माधुरीची अवस्था अधिक नाजूक होती. त्यामानाने तिची बहीण त्यातून लवकर बाहेर आली. दोघींच्या जन्मानंतर आठ महिन्यांनी एका आजारपणात माधुरीच्या बहिणीचा अचानक मृत्यू झाला. या आठ महिन्यांत खरं तर माधुरीच्या बहिणीची तब्येत, आहार, भूक, वाढ अशी सर्वागीण प्रगती माधुरीच्या मानाने खूपच चांगली होती. आठ महिने होता-होता दोघींच्या रंगरूपातील फरकही अधिकच स्पष्ट होत चालला होता. माधुरीची बहीण माधुरीच्या मानाने सर्वप्रकारे अधिक सुदृढ व सुस्वरूप होती. दोघींमधला फरक कुणालाही स्पष्ट जाणवेल असा होता. पण ती अचानकच वारली.

तो काळ माधुरीच्या आई-वडिलांसाठी दु:खद होता. एका बाजूला एक मुलगी गेल्याचं दु:ख तर दुसरीकडे नाजूक तब्येत असलेल्या माधुरीची काळजी. त्या काळात माधुरीच्या आईलाही ‘पोस्ट पार्टम डिप्रेशन’ची ट्रीटमेंट दिली गेली होती. माधुरीच्या आईला मानसिकदृष्टय़ा सावरायला खूप वेळ गेला. तिच्या स्वभावात बराच फरक पडला होता. सतत काळजी करत राहाणं, लहान-सहान आजारपणांतही घाबरून जाणं, असं होऊ लागलं होतं. पुढे वाढीच्या वयात माधुरीच्या बाबतीत तर ती वाजवीपेक्षा जास्तच दक्षता घेऊ लागली. डोळ्यात तेल घालून सतत माधुरीची शारीरिक वाढ बरोबर होते आहे की नाही याचं पुन्हा-पुन्हा निरीक्षण व पाहणी करत राहाणं, त्याची चर्चा व काळजी उघडपणे तिच्यादेखतच करत राहणं, माधुरीच्या शरीर आणि तब्येतीबाबत लहान-सहान शंकाकुशंका घेऊन वारंवार तिला बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणं, असे प्रकार माधुरीची आई करत असे. या वागण्यामुळे आणि हे सर्व होत असताना माधुरीच्या मनात स्वत:च्या शरीराबद्दल एकप्रकारची अस्वस्थता, अनिश्चितता व कमीपणाची भावना मूळ धरू लागली. नाहक काळजी करण्याची आईची सवय माधुरीमध्येही प्रतिध्वनीत होऊ लागली. माधुरीची जुळी बहीण कशी होती व ती गेल्याने झालेलं अपार दु:ख याचा उल्लेखही आईने माधुरीदेखत काहीवेळा केलेला माधुरीला आठवत होतं.

माधुरीचे काका वर्षांतून एक-दोन वेळा आपल्या पत्नी व दोन मुलांसह माधुरीच्या घरी सुट्टीसाठी म्हणून राहायला येत. काकांची दोन्ही मुलं साधारण माधुरीच्याच वयाची होती. त्या दोन्ही चुलतभावांशी माधुरीची तुलना करण्याची चूकही आईने अनेकवेळा केलेली माधुरीला आठवते. ‘तो बघ कसा उंच. तो बघ किती स्मार्ट. तो बघ कसा उभा राहतो. तो बघ किती अ‍ॅक्टिव्ह’ अशा अनेक प्रकारे आईने केलेली तुलना आजही माधुरीच्या स्मरणात होती. सात वर्षांनी माधुरीला बहीण झाली. त्यानंतर काही गोष्टी बदलल्या पण स्वत:बद्दल कमीपणाची, संशयग्रस्त भावना मात्र माधुरीच्या विचारसरणीमध्ये तोपर्यंत खोलवर भिनली होती. वाढत्या वयाबरोबर माधुरी उर्मिलाच्या मानाने उजळ व आकर्षक होत गेली, पण स्वत:च्या शरीरात काहीना काही वैगुण्य शोधत राहण्याचा एक आग्रही नादच तिच्या मनाने लावून घेतला होता. यालाच मनोविकारशास्त्रात ‘बॉडी डिसमॉर्फिक् डिसॉर्डर’ असं म्हणतात. या समस्येतून व्यक्तीला बाहेर काढणं जिकिरीचं असतं. त्यासाठी आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावून चिकाटीने समुपदेशन करण्यात डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

माधुरीच्या मनात स्वत:बद्दल असलेली वैगुण्यं किती भ्रामक होती हे तिला प्लास्टिक सर्जनने यापूर्वीही सांगितलंच होतं, पण एखादी गोष्ट कितीही सत्य असली तरी त्याची परिपूर्ण स्वीकृती होण्यासाठी त्याच्या मुळाशी असलेली बाधक धारणा विलीन होणं गरजेचं असतं. नेमकं तेच या समुपदेशनातून डॉक्टरांनी साधलं.

माधुरी तिच्या मानसिक भोवऱ्यातून पूर्ण बाहेर यायला सहा महिने गेले. चार वर्ष तिच्यावर प्रेम करणाऱ्या दीपकला माधुरीने सतत ‘नको’ म्हणत थोपवून धरलं होतं. दीपक कर्तबगार मुलगा होता. मानसिक गुंत्यातून पूर्ण बाहेर आल्यावर तिने दीपकशी लग्न केलं. आज माधुरीला एक दोन वर्षांची मुलगी आहे. माधुरीच्या आईनेही समुपदेशन करणाऱ्या त्या डॉक्टरच्याच केंद्रात समुपदेशनाचं अधिकृत प्रशिक्षण घेऊन याच क्षेत्रात पुढे काम करण्याचा चंग बाधला आहे.

(हा लेख पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे, पण गोपनीयतेच्या उद्देशाने नाव व काही तपशील बदलला आहे.)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 5:05 am

Web Title: llusion of physical suffering dr rajan bhosle abn 97
Next Stories
1 वेध भवतालाचा : अंतराळातून शोध प्राचीन संस्कृतीचा..
2 नात्यांची उकल : नाते स्वत:चे स्वत:शी..
3 आभाळमाया : अमीट ठसा
Just Now!
X