21 November 2019

News Flash

नाण्याची दुसरी बाजू

विभासारखे अनेक जण आहेत किंबहुना तिच्या संपूर्ण पिढीची ही कथा-व्यथा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मेघना वर्तक

१५ डिसेंबर २०१८च्या ‘चतुरंग’च्याच अंकात ‘आईवडील – मालमत्ता आणि मुलं’ हा लेख प्रसिद्ध केला होता. त्यात परदेशी राहणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांच्या व्यथा-वेदनांना शब्दरूप मिळालं होतं. या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्याला उत्तर म्हणून परदेशी राहणाऱ्या मुलांनी आपल्या कथा-व्यथा व्यक्त केल्या. त्यांचीही बाजू लोकांसमोर मांडायला हवी या उद्देशाने परदेशांत राहणाऱ्या अनेक मित्रमैत्रिणींशी, कुटुंबीयांशी बोलल्यानंतर अनेक गोष्टी लक्षात आल्या, अनेक बारकावे लक्षात येत गेले. अनेक कहाण्या समोर आल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक कथा-व्यथा..

‘‘आजपासून तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. रात्री १२ वाजता फोन खणखणला. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ म्हणतात ना ते अगदी खरं आहे. आई-बाबांचं वय झालं होतं, त्यामुळे अलीकडे एक अनामिक भीती मनात सदैव घर करून होतीच. आणि आपण इतके लांब साता समुद्रापलीकडे आहोत, दोन्ही भावंडे तिथे, भारतात आहेत, पण आई-वडिलांसाठी माझंही काही कर्तव्य आहे ही जाणीव नेहमी जागृत होतीच. त्यामुळे घाबरतच फोन उचलला. मोठय़ा बहिणीने सांगितले, की वडिलांना पक्षाघाताचा झटका आला आहे आणि उजवी बाजू पूर्णपणे विकलांग झाली आहे. फारसा विचार न करता आम्ही ताबडतोब भारतात आलो..’’

‘‘बाबा १५ दिवस रुग्णालयात होते. नंतर त्यांना घरी पाठवलं गेलं. हाडामांसाचा एक जिवंत लोळागोळा घरी आणला. अनेक प्रश्नचिन्हं डोळ्यासमोर उभी होती, पाय जड झाले होते पण, मनाचा निर्धार केला. वडिलांच्या देखभालीसाठी नस्रेस कामाला ठेवल्या. खर्चासाठी पशांची व्यवस्था केली आणि मी परत माझ्या घरी आले, परदेशात! काळजी आणि एक अपराधीपणाची भावना घेऊन. या अवस्थेत वडिलांनी तीन वर्षे काढली. त्यांना सर्व दिसत होते, समजत होते पण, ते हलू-बोलू शकत नव्हते. त्यांच्या शारीरिक वेदनांपेक्षा त्यांना ज्या मानसिक वेदना होत होत्या त्या अधिक क्लेशकारक होत्या. त्या त्यांच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होत्या. आणि हेच दु:ख सर्वात जास्त होतं. या तीन वर्षांत संपूर्ण कुटुंबाने जे काही अनुभवलं, भोगलं ते वर्णनापलीकडचं आहे. तीन वर्षांत नाती ताणली गेली. अर्थातच यात दोष म्हणाल तर कोणाचाच नाही. ना भारतात राहणाऱ्या भावाबहिणींचा, ना त्यांच्या कुटुंबाचा किंवा परदेशात राहणाऱ्या माझा, ना लोळागोळा होऊन पडलेल्या वडिलांचा, दोष असेल तर परिस्थितीचा! या तीन वर्षांत बरेच अनुभव आले. मी मनातल्या मनात परिस्थितीची चिरफाड करत होते आणि एकेका प्रश्नाचे उत्तर शोधत होते. आणि लक्षात आलं, हा प्रश्न माझ्या एकटीच्या घरातला नव्हता. अनेक जण आजूबाजूला दिसत आहेत,’’  विभा सांगत होती.

विभासारखे अनेक जण आहेत किंबहुना तिच्या संपूर्ण पिढीची ही कथा-व्यथा आहे. मुलं परदेशात गेलेली असोत किंवा देशातच वेगळ्या प्रांतात, की एका शहरात असूनही वेगळ्या घरात राहत असोत, त्या पिढीची ही व्यथा होती.. १५ डिसेंबर २०१८ च्या ‘चतुरंग’च्याच अंकात आपण ‘ आईवडील – मालमत्ता आणि मुलं’ हा लेख प्रसिद्ध केला होता. त्यात परदेशी राहणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांच्या व्यथा वेदनांना शब्दरूप मिळालं होतं. या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्याला उत्तर म्हणून परदेशी मुलांनी आपल्या कथा-व्यथा व्यक्त केल्या. त्यांचीही बाजू लोकांसमोर मांडायला हवी या उद्देशाने मग परदेशांत राहणाऱ्या विभासारख्या माझ्या अनेक मित्रमैत्रिणींशी, कुटुंबीयांशी बोलले तेव्हा त्यांच्याही कहाण्या काही प्रमाणात अशाच आहेत हे लक्षात आलं. अनेक बारकावे लक्षात येत गेले. अनेक मुद्दे समोर आहे, अनेक कहाण्या समोर आल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक.

सुधा तिची वेदना सांगत होती, ‘‘खरंच नुसती पशांची मदत केली की कर्तव्य संपलं का? नक्कीच नाही. हे मला कळत नव्हतं असं नाही पण, ते करणं भाग होतं. मी जेव्हा वडिलांच्या खर्चासाठी पैसे पाठवू लागले तेव्हा साहजिकच अनेक टोमणे मिळू लागले. ‘नुसते पैसे पाठवले की झालं का? इथे करणार कोण? नस्रेसचा माज सांभाळायचा कसा. वेळप्रसंगी बिनपगारी रजा घ्यावी लागते. एवढय़ाशा पशांनी काही होत नाही म्हणावं.’ आम्हा परदेशात राहणाऱ्या सर्व मुलांना हे मान्य आहे की पशाने खरंच सर्व गोष्टी होणार नाहीत. पण त्याचबरोबर दुसरी बाजू हीसुद्धा आहे की पशांशिवाय काही मिळणार नाही. आज हॉस्पिटल, नस्रेस यांचा खर्च कसा काय परवडणार? चार दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर येणारी बिलं पाहून डोळे पांढरे होतात. त्यामुळे आम्ही पैसे देऊन मोकळे होतो, असे आरोप करणं चुकीचं नाही का? आम्ही इथे, परदेशात दिवसरात्र मेहनत करूनच पैसे मिळवतो ना. घरबसल्या तर नाही ना मिळत काही आम्हाला?’’

गीता म्हणाली, ‘‘आम्ही आमचा परदेशातील व्याप तसंच मुलांच्या शाळा आदी गोष्टी सांभाळून थोडे दिवस भारतात राहून आई-वडिलांची सेवा करायला तयार असलो तरी त्यांना तेही नको असतं. त्यांना ती अडगळ वाटते. आम्हाला मान्य आहे की भारतात पुण्या-मुंबईसारख्या शहरातूनही जागेची खूप मोठी अडचण आहे. त्यात एका खोलीत आजारी व्यक्ती, त्यांना सांभाळणारी नर्स आणि उरलेल्या एका खोलीत उरलेला पूर्ण संसार! त्यातही लहान मुलं, त्यांची छोटीमोठी आजारपणं, मोठी मुलं, त्यांच्या परीक्षा, अभ्यासाला बसावयास जागा नाही म्हणून त्यांची चिडचिड, शिवाय त्या आजारी माणसाला बघायला येणारी मित्रमंडळी येतातच. त्यामुळे आमचं तिथे राहणं स्वागतार्ह नसतं, पण घरात कुणी आजारी असताना मनुष्यबळ लागतंच, हॉस्पिटलच्या खेपा घालायच्या दहा वेळा, सर्वाची ऊठबस करायची, रात्रीची जागरणं असतातच त्यासाठीच येतो ना आम्ही? आम्हालाही आमच्या आई-वडिलांची सेवा करायची असतेच. त्यामुळे आम्हाला कळवळा नाही, असे आरोप करणं चुकीचं आहे.’’

रिचानं तर वेगळीच खंत व्यक्त केली. ती म्हणाली, ‘‘आपण प्रेम म्हणून जात असतो भारतात तर भेटायला येणारे लोकही आम्हालाच ऐकवतात, ‘तुम्ही लांब आहात त्यामुळे तुमची मदत नाही होत. या तुझ्या भावंडांवरच सर्व जबाबदारी पडते आहे. त्यांनाही त्यांचं जीवन आहे, संसार आहे. तुम्ही काय चार दिवस येणार आणि वडिलांचं कौतुक करणार पण यांना हे दररोज करावं लागतं’ खरं तर आम्हाला असं ऐकवणाऱ्यांचा घराशी काहीही संबंध नसतो पण सवय असतं दुसऱ्यांच्या संसारात डोकावण्याची तिंवा भांडणं लावण्याची. त्यामुळे घरातल्यांना अनेकदा जे वाटत नाही ते अशा लोकांमुळे मनात पेरलं जातं.’’

मधुकर म्हणाला, ‘‘समजा सगळं मनाआड करून तिथे गेलो तरी आई-वडिलांचं ‘हे असं नका करू’, किंवा ‘त्यांना हे खायला द्या’ असं म्हणण्याची सोय नसते. लागलीच ऐकू येतं, ‘तुमचं बराय हो, चार दिवस यायचं, कौतुक करायचं. नेहमी इथे राहून करून दाखवा, म्हणजे कळेल आम्ही कसे दिवस काढत आहोत ते.’ काही वेळा तर अगदी टोकाचं ऐकवलं जातं. ‘इतकं प्रेम जर उतू जात असेल तर तुमच्याबरोबर आई-वडिलांना घेऊन जा की परदेशातच. तिथे तुमची घरं मोठी असतात, वैद्यकीय सुविधापण चांगल्या असतात आणि आम्ही नीट करत नाही लक्ष देत नाही असंही नको व्हायला. शेवटी तुमचे पण ते आई-वडील आहेत ना? तुम्हीपण अर्धी जबाबदारी घ्यायला हवी. बाकी हक्क सांगताच ना सगळ्यात अर्धा-अर्धा?’ यावर काय बोलणार? व्हिसा, मेडिकल इन्श्युरन्स, एवढं सोपं असतं का या अवस्थेत एखाद्या रुग्णाला परदेशात नेणं? आणि ठीक आहे आम्ही नेतो परदेशात, पण त्यासाठी लागणारा खर्च तुम्ही करायचा, मग उरलेली पुढची जबाबदारी आमची, असं जर यांना सांगितलं तर करू  शकतील का एवढा खर्च? नक्कीच नाही. त्या वेळी मग उत्तर मिळेल की कशासाठी करायचा एवढा खर्च? कोणी हेही ऐकवतं, ‘आता वडिलांची ऐंशी उलटून गेली, आता किती दिवस अपेक्षा ठेवायची?’ खरोखर माणुसकी सोडून जे बोललं जातं ते ऐकून हृदयाला घरं पडतात. पण मन घट्ट करून सर्व ऐकून घ्यावं लागतं. आम्ही ऐकून घेतो ते आई-वडिलांसाठी. कारण आम्ही परदेशी परत आल्यावर त्यांनाच तिथं बोलणी ऐकावी लागतात.’’ विश्राम म्हणाला, ‘‘आम्ही यावर उपाय सांगितला होता, की ठीक आहे, तुम्हाला खर्च करायचा नाही ना. आपण दोघंही नको करू या खर्च खिशातून. पण आई-बाबांनी जे साठवून ठेवले आहेत त्यातून करू या सर्व खर्च. पण त्यालाही तयारी नाही. कारण मग वाटण्यांत कमी मिळतील ना!’’

अर्थात सगळ्यांच्या घरी असा अनुभव नसेलही. पण आज हे एवढं स्पष्ट लिहिण्याचं कारण एकच, परदेशात गेलेल्या सर्वावर होणारे आरोप. तुम्ही जशी बाकीची जबाबदारी उचलता तशी आम्ही पशांची उचलतो. ज्याला जे शक्य आहे ते त्याने केलं, सर्वानीच गोष्टी सामंजस्याने घेतल्या तर परिस्थितीशी सगळे मिळून सामना करू शकू नाही का? आज कुठंही पाहिलं तरी जो उठतो तो आपला परदेशात गेलेल्या मुलांना बेजबाबदार ठरवतो. विविध माध्यमं, दूरचित्रवाणीवरील मालिका बहुतांशी सर्वातून हेच चित्र दाखवतात की, मुलं परदेशात ऐषोआराम करत आहेत आणि वृद्ध आई-वडील भारतात एकटेच परिस्थितीशी झुंज देत आहेत. किंवा  त्यांच्या जवळ असलेल्या मुलांवर सर्व भार पडत आहे. कोणी खोलवर जाऊन आमच्या परिस्थितीचा विचारच करत नाही. आजूबाजूचे लोक बोलतातच पण, कुटुंबीयही समजून घेत नाहीत याचं अधिक वाईट वाटतं. कधी तरी हेही जाणवतं की परदेशात आम्ही कमवत असलेल्या पशांमुळे त्यांच्या मनात जी असूया निर्माण होते ती यामुळे बाहेर पडते. त्यातली वाईट गोष्ट ही की, हे सर्व म्हाताऱ्या आई-वडिलांनाही ऐकून घ्यावं लागतं.

समीधा आपली व्यथा सांगत म्हणाली, ‘‘कधी आई-बाबांपैकी कोणी तरी रागावून म्हणा किंवा सर्व असह्य़ होऊन म्हणतात, ‘अगं, तुझे पैसे नकोत, तू इथे ये!’ त्यांची ती अगतिकता पहिली की, असं वाटतं की, आपण त्यांचे अनंत अपराधी आहोत. ज्या बोटांनी लहानपणी आपल्याला आधार दिला, चालायला शिकवलं तीच बोटं आज आपला आधार मागत आहेत. आपण मात्र मुलाबाळांची कर्तव्यं पूर्ण करत बसलो आहोत. एकदा बाबांना सूप भरवायला गेले तर त्यांनी मान फिरवली आणि दुसऱ्या क्षणी नर्सकडून सूप प्यायले. मला राग नाही आला पण, असं वाटलं की, बाबांची चार बोटं गालावर उमटली असती तर बरं झालं असतं. त्यांना आता त्या विकतच्या आधाराची सवय झाली होती, किंबहुना त्यांची खात्री झाली होती की शेवटी परकं नातं श्रेष्ठ आहे, कारण तेच उपयोगी पडणार आहे. रक्ताची नाती स्वत:ची कर्तव्यं पूर्ण करण्यात दंग आहेत. त्यामुळे आम्ही वेगळ्याच कात्रीत सापडलो आहोत. आई-वडिलांप्रति असलेलं कर्तव्य पूर्ण करायचं की मुलांप्रतिचं कर्तव्य? आमचेही ते आई-वडील आहेत, पण आम्हीही आमच्या मुलांचे आई-वडील झालो आहोत. त्यामुळे मुलांबद्दलचं प्रेम काय असतं याची आम्हालाही जाणीव आहे.

त्यामुळे ‘परदेशात गेलेली मुलं बेजबाबदार आहेत, ती आई-वडिलांना विसरली आहेत.’ हे बोलणं आम्हाला अस्वस्थ करतं.

समीर म्हणाला, ‘‘परदेशात जाऊन त्या वयात एकटं रहाणं, शिक्षण पूर्ण करणं एवढं सोपं असतं का? नक्कीच नाही. कित्येक वेळा आईवडिलांचंच ते स्वप्न असतं.. वेळप्रसंगी कर्ज काढून आईबाप मुलांना परदेशी पाठवतात, तर कधी मुलांचं स्वत:चेही हे स्वप्न असते. तेथील शिक्षण पद्धती, पार्टनर्स, खाणेपिणे, कर्जाचा ताण अशा अनेक गोष्टी हाताळाव्या लागतात. आईवडिलांच्या कष्टाचा प्रत्येक क्षण मनावर ठसलेला असतो, त्यांना सुखात ठेवणं हेच स्वप्न होतं आणि म्हणून त्यांना काय किंवा इतर भावंडांनाही आम्ही आमच्या अडचणी, समस्या काहीही कळवत नाही. याचा अर्थ त्यातून आम्हाला जावं लागत नाही का? म्हणूनच जेव्हा कुणी आमच्याबद्दल ‘बेजबाबदार’ हा शब्द वापरतात तेव्हा हृदयाला घरे पडतात.’’

शिक्षणासाठी अनेकदा परदेशी आलेली मुले पुढे शिक्षण संपले की झालेला खर्च भरून काढायचा म्हणून एक-दोन वर्षे नोकरी करायची ठरवतात आणि एक-दोन वर्षांची दहा-बारा वर्षे कशी होतात ते समजतच नाही. आणखी थोडे पैसे साठवायचे. घर घ्यायचे मुंबई-पुण्यात, आईवडिलांना सुखात ठेवायचे हे त्यांचे स्वप्न असते. या सर्व चक्रात लग्नकार्य, मुलेबाळे, पुन्हा त्यांचं शिक्षण, त्यांचं भविष्य हे चक्र चालू होतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र सापडत नाही. काही जण ती वाटही शोधतात. मायदेशी परत जातात, पण ज्या जीवनाची त्यांना एवढी वर्षे सवय झाली होती ते जीवन अचानक बदलल्याने ते तिथेही सुखी होत नाहीत. त्यांची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी होते. ज्याप्रमाणे शहरात आलेल्या मागच्या पिढीला परत कोकणात जाऊन राहणे त्रासदायक असते तसेच परदेशातील मुलांना परत भारतात जाऊन राहणे कठीण आहे.

मधुरा आणखी एक मुद्दा उपस्थित करत म्हणाली, ‘‘आज असंही बोललं जातं, की बाळंतपणाच्या वेळी आईला-सासूला परदेशात बोलावलं जातं आणि एखाद्या कामवालीप्रमाणे राबवलं जातं. मान्य आहे आम्ही आईला किंवा सासूला आमच्या बाळंतपणाच्या वेळी बोलावतो, पण ‘कामवाली’ ही भावना कधीच नसते, तर तिथे असतो प्रेमळ हक्क! केवळ आई-सासूमुळेच आमचं बाळंतपण सुखरूप पार पडतं हे सत्य आहे. त्या वेळी शारीरिकतेपेक्षा भावनिक गरज जास्त असते, निदान पहिलटकरणीला तरी. आज भारतात लेकीसुनेच्या बाळंतपणात घरातील मुख्य बाईची काय वेगळी अवस्था असते? फरक असतो तो भारतात ती स्वत:च्या घरात असते. परदेशात ती मुलांच्या घरात असते इतकंच आणि कोणती मुलं आपल्या आईला ‘कामवाली’सारखं वागवेल? आमच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार आम्ही विसरणार आहोत का?’’

कौमुदी म्हणाली, ‘‘खरं तर आम्हीही भारतात, आपल्या कुटुंबात आपल्या लोकांमध्ये नसल्याने आयुष्यातील अनेक अनमोल क्षणांचा आनंद गमावला आहे. सख्ख्या बहीणभावांच्या लग्नकार्यालाही, त्यांच्या मुलांच्या बारशाला उपस्थित राहू शकत नाही. प्रथम सुरुवातीला सर्व जण चौकशी करायचे, ‘तुम्ही सर्व जण येणार ना?’ पण जसजसा काळ उलटू लागला तसं गृहीत धरलं गेलं की, आम्ही येणार नाहीच. त्यामुळे फक्त आम्हाला सांगण्यात येऊ लागलं, ‘तुम्ही येणार नसालच. तुमच्यासाठी काही  थांबायला नको. फार बिझी असता तुम्ही सगळे. आम्ही उरकून घेतो सगळं. तुम्हाला वेळ असेल तेव्हा या.’ अर्थात असे उद्गार भावाबहिणींचे किंवा इतर कुटुंबीयांचे. त्यात कुचंबणा होते ती फक्त आईबाबांची. ते बिचारे आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून गप्प बसतात. त्यांच्यासाठी जीव तुटतो.’’

आणखी एक मायेचा विषय काढत उदय म्हणाला, ‘‘लहानपणी आम्ही आईबाबा किंवा कोणी ओरडले की आजीच्या पाठी जाऊन लपायचो. ती आमच्यासाठी खात्रीची जागा असायची. तिला तक्रारी सांगायचो. तिच्या मांडीवर बसून गोष्टी ऐकायचो. आजी ताक करायची तेव्हा छोटासा लोण्याचा गोळा आमच्या तोंडात जायचा. आजीचा सहवास आमच्यासाठी उबदार रजईसारखा असायचा. साध्या, सुंदर, प्रेमाने ओथंबलेल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी.. पण आमचं बालपण समृद्ध करून जायच्या. आज या अनमोल क्षणांना आमची मुले पारखी झाली आहेत. नातवंडांना आजीआजोबांचे प्रेम मिळत नाही. मुलांना आजोळ फारसं माहितीच नाही. आमच्या मुलांचे सोबती कोण? तर टीव्हीवरची खोटी, मुखवटे घेतलेली माणसं. अर्थात त्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही, कारण हा परदेशाचा मार्ग आम्हीच स्वीकारला आहे; पण अनेकदा असाही अनुभव येतो की, आम्ही भारतात येतो, ८-१५ दिवसच असतो, पण त्या वेळीही आईबाबांना नातवंडांचं मोकळेपणानं कौतुक करायचं असतं, काही जण करतातही, पण त्यांना दुसऱ्या मुलांच्या मुलांना काय वाटेल किंवा आपल्या इतर मुलांना काय वाटेल याचा विचार आधी करावा लागतो. काही वेळा तर त्यावरूनही त्यांना बोलणी खावी लागतात. दुसरा भाग आमच्या मुलांचा ‘अ‍ॅडजस्ट’ होण्याचा. आम्ही भारतातच वाढल्याने या जीवनशैलीची आम्हाला सवय असते किंवा निदान ती परिचयाची तरी असते, पण आमची परदेशातच जन्मलेल्या मुलांना भारतातली छोटी घरे, स्वच्छता, खाण्यापिण्याच्या सवयींशी जुळवून घ्यायला काही वेळा शक्य होत नाही. मग काही तरी तुलनात्मक बोललं जातं. त्याचा इतरांना राग येतो. त्यातून नातेसंबंध ताणले जातात. कित्येक घरांत आज हेच चित्र दिसते. अर्थात याला कारणंही आहेच. सर्वामध्ये असलेले भौगोलिक अंतर.. कालांतराने होणाऱ्या भेटीगाठी. वरचेवर भेटी होत असतील तर सहवासाने छोटीमोठी वादळे मिटली जातात, गैरसमज दूर होतात. अन्यथा मनातील अढी वाढत जाते आणि संबंध दुरावतात. अर्थातच या सर्वाची झळ आईवडिलांना बसते, कारण त्यांची सगळीकडून कोंडी होते. त्यावर एक उपाय म्हणजे आई-बाबांना कायमचं परदेशी घेऊन जाणं, त्यामुळे आम्हालाही त्यांचा सहवास लाभेल. आमच्या दृष्टीसमोर असतील तर सध्या चालू असलेली मनाची रस्सीखेचही थांबेल; पण त्यांना भारतातील जीवनाची सवय झालेली असते. नव्याची नवलाई संपली, की ते अस्वस्थ व्हायला लागतात. अनेकदा अनेक देशांतलं हवामान त्यांना न सोसवणारं असतं. त्यांच्या मनाचा विचार करून आम्ही त्यांना परदेशात राहायची जबरदस्ती करू नाही.’’

‘‘परदेशातील मुलांवर असेही आक्षेप घेतले जातात, की मुलांना आईवडिलांची मालमत्ता हवी असते, पण त्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर कारवाया करायला येण्यासाठी त्यांना वेळ नसतो. आयते सर्व मिळाले तर हवे असते. आज आपल्याकडच्या सरकारी कार्यालयातून कामकाज कोणत्या पद्धतीने चालते हे लहान-थोर सर्वानाच माहीत आहे. हजारो खेटा घातल्याशिवाय, पैसे चारल्याशिवाय कागद पुढे सरकत नाहीत. एक महिना रजा घेऊन राहिलो तरी काम पूर्ण होत नाही. प्रत्यक्ष त्या वाटेवर जाऊन अनुभव घेतल्याशिवाय नाही समजणार. आम्हाला आमच्या आईवडिलांची आठवण जपून ठेवायला कशी नकोशी असेल? पण आपल्या इथला सरकारी कारभार तसे करू देतो का? नोकरीधंदा सोडून तर राहू शकत नाही ना! अजूनही आईच्या जुन्या साडय़ा चौघडी म्हणून आम्ही कुशीत घेऊन झोपतो आणि तिच्या प्रेमाची ऊब अनुभवतो. इतकेच काय, आमच्या मुलांनाही आजीची चौघडी झोपताना लागते..’’ सुधाकर सांगतो

अशा अनेक गोष्टी असतात, की ज्यामुळे या मुलांचे भारतात येणेही हळूहळू कमी होते. मुले मोठी होतात, त्यांच्या शाळा-महाविद्यालये सुरू होतात, मग मुलांच्या दृष्टिकोनातून विचार सुरू होतो. भारतातील प्रदूषण, गर्दी, शिक्षण पद्धती, शैक्षणिक स्पर्धा पाहिली की वाटतं, इथे बरं चाललंय. मग आमच्यातील आईबाप जागे होतात आणि मग पाय तिथेच स्थिरावतात. मागची पिढी पुढच्या पिढीचा विचार करते, चक्र चालूच राहते.. आमचे आईबाबा नोकरीसाठी कोकणातून, पश्चिम महाराष्ट्रातून शहरात आलेच की तसे आम्ही शहरातून परदेशात..!

आज परदेशात राहणारी मुले एका विचित्र तणावाखाली जगतात. दररोजच्या व्यवहारात जगतानासुद्धा छोटय़ा-मोठय़ा घटनांतून आईवडिलांना त्याचा काय त्रास होईल याचाच विचार करतात. कदाचित घरापासून, आपल्या माणसांपासून लांब रहात असल्यामुळे असेल, पण त्यांना नात्यांचा अर्थ खोलवर उमगला आहे, असं त्यांना वाटतं म्हणूनच पावलोपावली नाती जपायचा प्रयत्न करतात. असं असताना आई-मुलाचं नातं कसं जपणार नाही? कोणतेच संस्कारी मूल आईवडिलांचे ऋण विसरू शकत नाही आणि म्हणूनच गेली कित्येक वर्षे ही मुलंही अनेकदा अपराधीपणाची भावना घेऊन जगत असतात. आयुष्यातील कित्येक तास भारत की परदेश, ‘टू बी ऑर नॉट टू बी’ या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात त्यांनीही घालवले असतात. अर्थात काहींना परदेश मनापासून आवडतो आणि त्यात गैर काहीच नाही. खरं तर तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणाला आपले मानूून राहिलात तरच सुखी होऊ शकता; पण असा वर्ग छोटासा आहे. अनेक जण तिथे नाही रमू शकत. त्यांची मुळे इथे नाही रुजू शकत, कारण त्यांची आनंदाची व्याख्या वेगळी आहे. सर्व कुटुंब, आपली माणसं, सणवार एकत्रित साजरे करणं यात आम्हाला आनंद वाटतो. क्लब पार्टीज् यात नाही. त्यामुळे इथे मन रमत नाही, पण आमच्याही परतीचा मार्ग बंद झालाय.

काहीही असलं तरी आम्हाला आमच्या जन्मभूमीचा आणि कर्मभूमीचा अभिमान आहे. जन्मभूमीनं संस्कारांचा वारसा दिला. त्याला आईवडिलांनी खतपाणी घालून जोपासलं आणि तो घेऊन आम्ही परदेशात पाऊल टाकलं. परदेशानं उच्च शिक्षण दिलं, पसा दिला, वैभव दिलं म्हणून आम्ही त्यांचेही ऋणी आहोत. आईवडिलांच्या संस्कारांची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत, की कोणाचेही ऋण आम्ही कधीच विसरू शकत नाही.

नाण्याची ही आहे दुसरी बाजू! अव्यक्त, कोणाला न दिसलेली, कोणी न समजून घेतलेली. ती पूर्ण गुळगुळीत नाही. ती मधेच खडबडीत आहे. कोण कुठे रहातो यामुळे नात्यांमध्ये फार पडत नाही, फरक पडतो ते त्या नात्यांना आपल्या मनात काय स्थान आहे त्यावरून. मुलं परदेशात असोत वा देशात, प्रेम असेल तर सगळं काही सांभाळून घेता येतं. परदेशातल्या मुलांचं हेच म्हणणं आहे, आम्ही परदेशात रहातो, पण अनेकदा शरीराने.. मनाने तिथंच असतो.. आईवडिलांजवळ..

meghana.sahitya@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on June 8, 2019 12:11 am

Web Title: lokrang article by meghna vartak
Just Now!
X