एखाद्या घटनेशी जोडलेल्या वस्तूंच्या आठवणी आपल्याला खूप काळ मनात जपून ठेवायला आवडतात. या वस्तूच ती घटना मनामध्ये ताजी ठेवतात. या वस्तूंकडे बघितलं,  की एखादी शाळेची जुनी वही उघडून बसावं तशा आठवणी मनात ताज्यातवान्या होत जातात. काही महिन्यांपूर्वी आमच्या घरातला हत्ती तुटला. घरातला तो हत्ती अनेक घटनांचा साक्षीदार होता..

हत्तींना खूप चांगली स्मरणशक्ती असते, माणसांसारखीच. एका मेंदूशास्त्रज्ञाने सांगितले आहे की ‘प्रत्येक अनुभव आपल्या मेंदूमध्ये त्याचा काही ना काही अंश सोडून जात असतो.’ मानवी मेंदूची एक मोठी समस्या आहे, जसजसा काळ पुढे सरकत जातो तसतसे या अनुभवांभोवती गुंफलेले धागे तुटत जातात आणि काही वर्षांपूर्वी असलेली आठवण नंतर फक्त घडून गेलेली एक गोष्ट म्हणून लक्षात राहते. ती गोष्टसुद्धा शिल्लक राहते ती विखुरलेल्या तुकडय़ांमध्ये..

एखाद्या घटनेशी जोडलेल्या वस्तूंच्या आठवणी आपल्याला खूप काळ मनात जपून ठेवायला आवडतात. या वस्तूच ती घटना मनामध्ये ताजी ठेवतात. या वस्तूंकडे बघितलं की एखादी शाळेची जुनी वही उघडून बसावं तशा आठवणी मनात ताज्यातवान्या होत जातात.

काही महिन्यांपूर्वी आमच्या घरातला हत्ती तुटला. घरातील शेकोटीशेजारी असलेल्या एका छोटय़ा लाकडी टेबलावर तो तुटून पडलाय. तो हत्ती कारागिरीचा एक उत्तम नमुना होता आणि अत्यल्प किंमत देऊन ‘अ‍ॅन्टिक शॉप’मधून विकत घेतला होता. कदाचित तसा हत्ती परत मिळणे दुर्मीळच. त्या मौल्यवान हत्तीने नि:शब्द राहून माझ्या घरात घडलेले काही आनंदाचे, काही दु:खाचे क्षण टिपून ठेवले होते..

हा पांढरा हत्ती आपली सोंड उंचावून कुठेतरी जाण्याच्या तयारीत असल्यासारखा दिमाखात उभा होता. त्याचे शरीर चकाकणाऱ्या छोटय़ा छोटय़ा आरशांनी सजवलेले होते. पण तो कोणी, कधी, कशापासून बनवलाय हे कुणालाच माहीत नव्हतं. कदाचित कृत्रिम पॉलिमरने बनवला असावा, पण मला वाटतं, तो हस्तिदंताचा होता. काहीही असो, एक मात्र जाणवत होतं, जशी हत्तींची स्मरणशक्ती चांगली असते, तशी याचीसुद्धा होती.

काही वर्षांपूर्वी हा हत्ती अचानक तुटला. माझी मुलं घरामध्ये पकडापकडी खेळत होती. त्यांचा धक्का लागून हत्ती टेबलावरून खाली पडला आणि तुटला. त्या काळी आमचं घर हसण्याखिदळण्याच्या आणि टीव्हीवरच्या कार्टूनच्या आवाजांनी आणि कुत्र्याच्या पावलांच्या आवाजानं भारलेलं असायचं. कसे मस्त होते ते दिवस! मुलांना क्लासला जायची घाई नसायची. अधूनमधून मागच्या अंगणात पाण्याचा पाइप घेऊन खेळायला वेळच वेळ असायचा. ते दिवसच असे होते की रोज चिखलांचे किंवा मजेशीर मिश्रणाच्या रंगीबेरंगी बाटल्यांमधील रंगांचे ठसे घरभर उमटलेले असायचे. घराच्या अंगणात स्लायमीचे रंगीत गोळे इकडेतिकडे विखुरलेले सापडायचे. वेगवेगळ्या आकारांचे दगड किंवा निरनिराळ्या रंगांचे दगड आणि शंख-शिंपले घरात अचानक प्रकट व्हायचे.

हा हत्ती अशा अनेक घटनांचा साक्षीदार होता.. प्लास्टर घातलेले मुलांचे छोटे छोटे हात आणि मुलांच्या आकाराच्या त्या छोटय़ाशा कुबडय़ांनी जेव्हा घरी धुमाकूळ घातला होता. लहान मुलेच ती दंगा मस्ती करणार. त्यांना शिस्त लावायची म्हणजे छोटय़ा मोठय़ा शिक्षा कराव्या लागणार किंवा अनेक समजूतदार घटनाही घडल्या होत्या, त्या सर्व या हत्तीने पाहिल्या, ऐकल्यादेखील. जमिनीवर पसरलेले खेळण्यांचे छोटे तुकडे जेव्हा माझ्या पायात घुसत, त्याहीपेक्षा लहान मुलांनी घातलेला वाद, बोललेले तीक्ष्ण शब्द जेव्हा माझ्या हृदयाला भेदून जात तेव्हासुद्धा हा हत्ती इथेच होता..  पण जेव्हा तो अचानक तुटला त्या वेळी मुलांनीच तो जुळवून दिला. मुलांनी त्यांचे काम इतके सफाईदार केले होते की तो कधी तुटला होता यावर कोणाचा विश्वास बसला नसता. त्याच वेळी ठरवलं की तो टेबलावर कायमचा चिकटवून ठेवायचा म्हणजे परत कधी तो पडणार नाही, अन् तुटणारही नाही. तो परत एकदा आपल्या जागी उभा राहिला, त्याचे काम करायला. मूकपणे घटनांचा साक्षीदार व्हायला..

हळूहळू काळ पुढे सरकत गेला. गोष्टी बदलल्या. मुले घरापेक्षा जास्त वेळ बाहेर राहू लागली. आता चिखलांचे ठसे घरात उमटत नव्हते. कुत्रा कंटाळून जाऊ लागला. मुलांना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांची धडपड चालू होती. नवीन गोष्टी शिकायच्या, नवीन ठिकाणी भेटी द्यायच्या. ‘टीव्ही’ही मूक झाला होता, कारण प्रत्येक जण आपल्या हातातील स्मार्टफोनवर खेळण्यात मग्न झाला होता. प्रत्येक जण आपापल्या आभासी जगात हरवला होता, घरापासून दूर गेला होता..

हत्ती मात्र तिथेच उभा होता. काहीतरी घटना घडण्याची वाट बघत..

आता घरात फक्त साफसफाई होत असे. मी त्या लाकडी टेबलाखालील कोळ्याचे जाळे साफसफाईच्या मशीनने काढायला गेले आणि पुन्हा एकदा तो हत्ती तुटला. तो हत्ती टेबलावर चिकटवलेला होता, पण टेबल एका बाजूला कलंडलं आणि तो हत्तीसुद्धा त्याच्याबरोबर जमिनीवर धाडकन आपटला. या वेळेस मात्र त्याचे छोटे छोटे तुकडे झाले. त्याला परत जोडणे शक्यच नव्हते. तो उभा राहू शकत नव्हता. तो आठवणी साठवू शकत नव्हता; कारण काही टिपून घ्यावं असं आता घरात घडत नाही. त्याला आता फेकून देण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर नाही. पण दुसरा हत्ती मिळेपर्यंत मी त्याला फेकून देऊ शकत नाही.

मी दुसऱ्या हत्तीच्या शोधात आहे. मला हवा आहे तो दुसरा हत्ती. हुबेहूब या विखुरलेल्या हत्तीसारखाच. जो माझ्या मुलांच्या बालपणीच्या आठवणींना एकवटत त्यांना उजाळा देईल.

मूळ इंग्रजी लेख : द ब्रोकन एलिफंट

लेखिका  : श्वेता कात्रे

अनुवादक : वीणा रारावीकर

var1303@gmail.com

chaturang@expressindia.com