28 February 2021

News Flash

जोतिबांचे लेक : ..आता ‘गाली’ बंद!

उत्तर प्रदेशच्या मनीष कुमार यांना मात्र शिव्यांचा असा सर्रास होणारा वापर स्त्रियांचा अवमान करणारा आणि चिंताजनक वाटला

मनीष कुमार

हरीश सदानी – saharsh267@gmail.com

आई-बहिणीवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या हा आता अनेकांसाठी बोलीभाषेचाच भाग झाल्यासारखा ऐकायला मिळतो आहे. स्त्री देहाचा थेट उल्लेख असणाऱ्या या अत्यंत अपमानकारक शिव्यांचा अर्थ माहीत असूनही ते ‘कूल’ ठरवणारी तरुणाई आजूबाजूला दिसते आहे. उत्तर प्रदेशच्या मनीष कुमार यांना मात्र शिव्यांचा असा सर्रास होणारा वापर स्त्रियांचा अवमान करणारा आणि चिंताजनक वाटला, तोही १७ वर्षांपूर्वी. लहानपणापासून अशा शिव्या ऐकत मोठी होणारी आणि पुढे शिव्या द्यायला लागणारी मुलांची साखळी बंद व्हावी यासाठी त्यांनी मुलांना सोबत घेऊन ‘गाली बंद’ हे आगळंवेगळं अभियान सुरू केलं ते उत्तर प्रदेशातील १८ जिल्ह्य़ांमध्ये. आजही ते  स्त्री सक्षमीकरणासाठी सातत्यानं पुढाकार घेतच आहेत. त्या मनीष कु मार या जोतिबांच्या लेकाच्या या उपक्रमांविषयी..

स्त्रियांवरील गैरवर्तनाचा विषय निघाल्यावर साधारणत: आणि विशेषत: अलीकडे चर्चा होताना दिसते ती बलात्कार, विनयभंग,  छेडछाड यांची, पण शहर असो वा गाव, कोणत्याही आर्थिक, शैक्षणिक स्तरातील, जाती, वर्गातील लोकांमध्ये सर्रासपणे आढळणारा आणखी एक गैरप्रकार म्हणजे शिवीगाळ, त्यातही अवमानकारक  स्त्रीवाचक शिव्या.

एक गाजलेलं उदाहरण म्हणजे २००७-०८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान क्रिकेटपटू हरभजन सिंगनं खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू सायमन्ड्सशी केलेलं गैरवर्तन तुम्हाला आठवतंय? त्या वेळी वांशिक शिवी दिल्याचा आरोप हरभजनवर झाला होता, पण त्यानं ‘मंकी’ (माकड) या शब्दाऐवजी ‘तेरी माँ की..’ असं हिंदीत म्हटलं होतं, असं न्यायाधीशांपुढे साक्ष देताना सचिन तेंडुलकरनं म्हटलं होतं. हरभजननं वांशिक शिवी देण्यासारखा गंभीर गुन्हा केलेला नसून संताप आल्यावर तो व्यक्त करताना पुरुषांकडून जे शब्द साधारणपणे वापरले जातात तेच हरभजननं म्हटल्याचा उल्लेख अगदी तेंडुलकरच्या आत्मचरित्रातही या प्रकरणाबद्दल लिहिताना के लेला आहे. तर मुद्दा असा, की सर्वत्र आढळणारी आया-बहिणींच्या नावे

के लेली शिवीगाळ ही तशी ‘गंभीर’ बाब म्हणून पाहिली गेलेली नसून ती थांबवली वा प्रतिबंधित केली पाहिजे, याबद्दल सहसा किं वा सातत्यानं कुणी बोलताना दिसत नाही; पण नेमक्या याच विषयावर सुमारे १७ वर्षांपूर्वी गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील मनीष कुमार यानं नुसती वाचा फोडली नाही, तर शाळाशाळांत ‘गाली बंद’ वर्ग सुरू करून त्याविषयी राज्यातील १८ जिल्ह्य़ांमध्ये एक लोकचळवळ उभी केली. त्याच मनीषची ही कहाणी.

आपल्याप्रमाणे मुलानं इंजिनीअर व्हावं, ही मनीषच्या वडिलांची इच्छा होती. ‘बी.एस्सी.’ (रसायनशास्त्र) झालेल्या मनीषला मात्र त्यात रस नव्हता. वास्तुकलेची ओढ म्हणून त्यानं दिल्ली गाठली. दिल्लीतील लाल किल्ला, नॅशनल अर्काइव्हज, म्युझियम, इथली वास्तुकला पाहून मनीषनं नॅशनल अर्काइव्हजमध्ये ‘क्युरेटर’चा अभ्यासक्रम सुरू केला. त्यादरम्यान इंडिया गेट येथे, तसंच ‘जेएनयू’ कॅम्पसमध्ये नर्मदा धरणाच्या उंचीविरोधात आंदोलन करणाऱ्या मेधा पाटकर, संदीप पांडे यांच्या भाषणांनी मनीष भारावून गेला. मेधाताईंनी विकासाशी संबंधित उपस्थित केलेल्या मुद्दय़ांनी अस्वस्थ झालेल्या मनीषचा पुढे लखनौतील कृती सांस्कृतिक केंद्र या सामाजिक संस्थेशी परिचय झाला. कुतूहल म्हणून संस्थेच्या लिंगभेद, स्त्री-प्रजनन आरोग्य, याविषयी आयोजित १३ दिवसांच्या निवासी शिबिराला तो गेला. स्त्रियांबाबत होणाऱ्या लिंगभेदाला पुरुषांची वर्चस्ववादी मानसिकता कशी जबाबदार आहे, यावर तो चिंतन करू लागला. या शिबिरात त्याची गोरखपूर येथील बाबा रामकरणदास ग्रामीण विकास समितीच्या अवधेश या कार्यकर्त्यांशी भेट झाली. घरापासून दोन कि.मी. अंतरावर अवधेशच्या संस्थेचं कार्यालय होतं. तिथे मनीष ये-जा करू लागला.  अशातच गोरखपूर शहरातील स्प्रिंगर बालस्थली (माध्यमिक) शाळेसोबत दीर्घ काम सुरू करण्याच्या उद्देशानं मनीष तेथे गेला. अवधेशबरोबर त्यानं इयत्ता चौथी ते आठवीतील विद्यार्थ्यांकरिता एक चित्रकला स्पर्धा घेतली. दैनंदिन जीवनात दुखावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर उत्स्फूर्तपणे चित्रं काढण्याची ती स्पर्धा होती. स्पर्धेमध्ये मुलांनी व्यक्त केलेल्या बाबींमध्ये स्त्रियांवरील शारीरिक हिंसा, घराबाहेर पडण्याची मनाई, स्वातंत्र्याचा अभाव हे विषय आले  होते. अधिकाधिक मुलांनी सर्वात जास्त दुखावणारी गोष्ट म्हणून चित्रित केली होती, ती म्हणजे स्त्रीवाचक शिवीगाळ!

मुलांच्या या प्रतिक्रियेमुळे विचारात पडलेल्या मनीषनं अवधेश, तसंच आशीष आणि सज्जन या स्वयंसेवकांबरोबर शाळेतील मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली. गप्पाटप्पांच्या स्वरूपात मुलांसमोर काही प्रश्न उपस्थित करून त्यांना विचारप्रवृत्त करू लागला. तुम्हाला माहीत असलेल्या शिव्या कुठल्या? त्या सर्वप्रथम कोणाच्या तोंडी तुम्ही ऐकल्या? त्या शिव्या ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटलं? त्या शिव्यांचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? शिव्या अधिक स्त्रीवाचक का आहेत? पुरुषांवरून शिव्या का नाहीत? राग, संताप, असहमती व्यक्त करण्यासाठी पर्यायी, विधायक पद्धती कोणत्या असू शकतात? आपलं म्हणणं मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी आश्वासक, सुरक्षित अवकाश मिळाल्यावर शाळेतील मुलंमुली मनीष आणि त्याच्या साथीदारांपाशी हळूहळू व्यक्त होऊ लागली. आपल्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती कोण, असं विचारल्यावर आई आणि त्यापाठोपाठ बहीण असं सर्व विद्यार्थ्यांनी एकमतानं सांगितलं. समोरच्या व्यक्तीचा संताप आल्यावर त्याच्या आया-बहिणीवरून शिव्या देणं हा त्याच्या प्रिय व्यक्तीचा आणि एकंदर समस्त स्त्रियांचा अवमान आहे, हे मनीषनं हिरिरीनं मांडलं. जवळजवळ सर्व मुलांनी या अपशब्दांचा अर्थ माहीत नाही असं म्हटल्यावर हे शब्द स्त्रियांच्या शारीरिक आणि लैंगिक अवयवांशी संबंधित आहेत हे स्पष्ट केलं. स्त्रीवाचक शिव्यांव्यतिरिक्त जातीवाचक, व्यंगावर आधारित, तृतीयपंथी व्यक्तींवर, प्राण्यांवर आधारित शिव्या, यावरही त्यांच्याशी संवाद केला.

स्प्रिंगर शाळेबरोबरच ‘बाबा रामकरणदास ग्रामीण विकास समिती संचालित बालिका (प्राथमिक) शाळा’ येथील विद्यार्थ्यांबरोबर दर शनिवारी एक तास मनीष ‘गाली बंद क्लास’ घेऊ लागला. गटचर्चेच्या दरम्यान अनेक मुलांनी शिव्या सर्वप्रथम घरातल्या/ शेजारच्या पुरुषमंडळींकडून तसंच काही शिक्षकांच्या तोंडी ऐकल्याची कबुली दिली. मग शाळेत शिवीमुक्त वातावरण बनवण्यासाठी मनीषच्या चमूनं सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापक, संचालक आणि इतर कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग मिळवला. त्यांच्यातील प्रतिनिधींची एक समिती तयार करून प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्यांना या उपक्रमात नेतृत्व करण्यासाठी नेमलं. शिव्या न देणाऱ्या, तसंच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या मूल्यांची रुजुवात करणाऱ्या शिक्षकाची निवड दरमहा विद्यार्थीच करायचे आणि त्या शिक्षकाचा सत्कार व्हायचा. ‘गाली बंद’ क्लासचे विषय मग घराघरांत सुरू झाले. मुलांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर खूप वादविवाद, संघर्ष घरात होऊ लागले. पालक-शिक्षक बैठकीत एक विषय अजेंडय़ामध्ये हमखास असायचा- शिवीबंदी.

दोन शाळांपासून सुरू झालेला हा उपक्रम २००३ ते २००८ पर्यंत सलग सहा र्वष सहा ग्रामीण आणि तीन शहरी- खासगी तसंच सरकारी शाळांमध्ये चालला आणि पुढे शाळांपासून ऑटोरिक्षांपर्यंत आला. विकास नगर ते धर्मशाला आणि विद्यापीठ ऑटो स्टँड येथे ये-जा करणाऱ्या रिक्षाचालकांमध्ये शिवीमुक्त जगण्यासाठी प्रबोधन के लं गेलं. कुठल्याही रिक्षाचालकानं शिवी दिली की, त्याच्या रिक्षातून प्रवाशानं बाहेर पडावं, असा प्रसार मनीष आणि त्याच्या साथीदारांनी सुरू केला. गोरखपूर विद्यापीठाच्या फाइन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांबरोबर कार्यशाळा घेऊन त्यांनी तयार केलेली लक्षणीय पोस्टर्स जागोजागी लावण्यात आली.

२००५-२००६ दरम्यान ‘महिला हिंसाविरोधी पंधरवडय़ा’त (२५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर) ‘अब तो जागो’, ‘चुप्पी तोडो’ हे अभियान गावागावांत समविचारी संघटनांसोबत आयोजित केले गेले. या सर्व मोहिमांमध्ये शिवीबंदीबरोबरच मनीषनं आणखी एका गोष्टीत पुढाकार घेतला. ‘तू कुणाचा मुलगा/ मुलगी आहेस?’ असा प्रश्न विचारल्यावर सर्व जण साधारणत: वडिलांचे नाव घ्यायचे. ही परंपरा मोडत प्रत्येक मुलामुलीनं ‘मी अमूक आईचाही मुलगा/ मुलगी आहे’ हे अभिमानानं सांगण्यास सुरुवात केली.

‘शिवी बंद’ अभियान मनीषनं २००३ ला सुरू केलं तेव्हा तो उत्तर प्रदेशच्या ‘महिला समाख्या’ या उपक्रमाशीही जोडला गेला. राजस्थानमध्ये पूर्वी ‘महिला विकास कार्यक्रम’, ‘शिक्षाकर्मी’ यांसारखे अभिनव उपक्रम राबवणारे पद्मभूषण अनिल बोरडिया तेव्हा केंद्रात शिक्षण सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पुढाकारानं आणि स्त्रीवादी संघटनांच्या सक्रिय सहभागानं ‘महिला समाख्या’ (स्त्री-पुरुष समानतेसाठी आख्या/ शिक्षण या अर्थी) हा ग्रामीण स्त्री सक्षमीकरणाचा कार्यक्रम १९८९ मध्ये सुरू झाला होता. ‘लक्ष्य-  के ंद्रित’ कामं करण्याच्या सरकारी योजनांमधील शिरस्त्यापेक्षा वेगळा असलेला आणि गावातील सर्वसामान्य स्त्रियांनी एकत्र येऊन नियोजित केलेल्या उपक्रमांना त्यांच्या ‘बजेट’सह मंजुरी देणारा ‘महिला समाख्या’ हा वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रम होता. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेला हा कार्यक्रम पुढे सहा इतर राज्यांतही कार्यान्वित झाला. सुरुवातीला शाळेतल्या मुलींची गळती, स्त्रियांवरील हिंसाचाराचे आकडे आणि स्वरूप समजण्यासाठीच्या सर्वेक्षणात मनीष काम करू लागला. हळूहळू ‘महिला समाख्या’च्या साहरनपूर, मुझफ्फरनगर, वाराणसी, अलाहाबाद आणि इतर जिल्ह्य़ांत स्वयंसाहाय्य गटांतील स्त्रियांना लिंगभाव आणि संबंधित मुद्दय़ांवर तो प्रशिक्षण देऊ लागला. प्रशिक्षण पद्धतीमध्ये जे नवे बदल त्यानं आणले, त्यात स्त्रियांबरोबरच पुरुष प्रशिक्षणार्थी असण्याविषयीची भूमिका ही होय. मुझफ्फरनगर येथे पहिल्यांदा महिला संघाच्या कार्यकर्त्यांचे पती, भाऊ, मुलगे एका चारदिवसीय निवासी प्रशिक्षणाच्या उपक्रमात सहभागी झाले, ते ऐतिहासिकच पाऊल ठरले.

‘महिला समाख्या’च्या माध्यमातून ‘कस्तुरबा गांधी बालिका विद्यालया’तील मुलींसाठी आणि नऊ जिल्ह्य़ांतील शाळांच्या शिक्षकांकरिता मनीषनं अनेक कार्यशाळा घेतल्या. लोकशाही प्रणालीतला राज्यकारभार, लैंगिकता, हिंसा, जातीय ताणेबाणे, या सर्व विषयांवर मनीषनं उत्तर प्रदेशच्या १९ जिल्ह्य़ांत सातत्यानं जाणीव जागृतीचे कार्यक्रम घेतले, लोकसंघटन केलं. अनेक विषयांमध्ये ‘शिवीबंदी’ हा विषयदेखील तो आवर्जून घ्यायचा. भूमिकानाटय़, खेळ, गाणी, कला जथा’ , सार्वजनिक ठिकाणी गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसाठी आयोजित के ली जाणारी सामूहिक चर्चा- ‘चौपाल’आणि  नवसाक्षर स्त्रियांसाठी स्वत:विषयीच्या बातम्या स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हानिहाय मासिक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी  मनीषनं कष्ट घेतले.

अतिशय गरीब, दलित आणि इतर मागासवर्गीय स्त्रिया सक्षम झाल्या. ‘घँूघट’ घातलेल्या स्त्रिया गावकऱ्यांसमोर माइकवर ठामपणे बोलू लागल्या, गावातील मुख्य रस्त्यावरून ताठ मानेनं चालू लागल्या.

दोन दशकं नेटानं चालणाऱ्या ‘महिला समाख्या’ कार्यक्रमावर २०१९ अखेरीस राज्य सरकारनं बंदी आणल्यानं मनीष खिन्न झाला, पण त्यानं एका पाठय़वृत्तीद्वारे स्त्रियांमध्ये कायद्याविषयी साक्षरता निर्माण करणं, कौटुंबिक कलहाच्या मुद्दय़ावर गरजू स्त्री-पुरुषांना समुपदेशन, ‘ब्लॉग’द्वारा लेखन हे चालू ठेवलं.

व्यक्तिगत जीवनात ठाम भूमिका घेतल्यानंही मनीषचं आगळेपण दिसून येतं. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला मनीष आपलं आडनाव लावत नाही.  जोडीदार म्हणून निवडलेल्या मुलीला ऐकण्यात अडचण आहे, हे समजल्यानंतर त्यानं घरातल्यांना विश्वासात घेऊन तिच्याशी लग्न केलं. पदव्युत्तर शिक्षणासाठी तो तिला प्रोत्साहित करत आहे.

‘चूप रहना हिंसा की शुरुआत हैं, कातिलों में गिने जाने की बात हैं, तय करो किस ओर हो तुम..’ या नाटय़कर्मी सफदर हाशमींच्या ओळींनी प्रेरित झालेल्या मनीषनं केलेला प्रवास हा थक्क करणारा आहे. ‘शिवीमुक्त’ वातावरणाकरिता स्वत:पासून प्रत्येक जण एक पाऊल टाकू  शकेल..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2021 1:07 am

Web Title: manish kumar gali band jyotibanchi lek dd70
Next Stories
1 गद्धेपंचविशी : शहाणिवेची पंचविशी!
2 पडसाद : ज्येष्ठांचे लिव्ह इन- प्रमाण वाढावे
3 दशकथा २०१०-२०२० : दशकाचा सामाजिक लेखाजोखा
Just Now!
X