29 May 2020

News Flash

एक लढा सासऱ्यांनी दिलेला…

तिची, स्नेहलची एक साधीशी इच्छा होती, लग्नानंतरही स्वत:च्या नावासोबत वडिलांचंच नाव असावं.

| March 29, 2014 01:01 am

तिची, स्नेहलची एक साधीशी इच्छा होती, लग्नानंतरही स्वत:च्या नावासोबत वडिलांचंच नाव असावं. सासरच्या मंडळींनाही त्याबद्दल आक्षेप नव्हता, पण आक्षेप घेतला तो सरकारी यंत्रणेने. असं होऊच शकत नाही. लग्नानंतर पतीचंच नाव लावलं पाहिजे, हा आग्रह धरत त्यांनी तिला शिधापत्रिका देण्यास नकार दिला. त्यांचे कार्यालयात खेटे सुरू झाले. विनंत्या, अर्ज सुरू झाले. शेवटी तिच्या सासऱ्यांनीच ही मोहीम हाती घेतली.. माझ्या सुनेला तिच्या वडिलांचं नाव लावायचं असेल तर आक्षेप घेणारे तुम्ही कोण, असा पवित्रा घेत त्यांनी आंदोलन सुरू केलं. आणि..
लग्नानंतर पतीचं नाव लावण्याऐवजी वडिलांचंच नाव लावणं हे आताच्या काळात तरी फारसं कुतूहलाचं राहिलेलं नाही. पण एका शेतकरी कु टुंबातल्या सासऱ्यांनी आपल्या सुनेच्या या विनंतीला मान देत तसं नाव कागदोपत्री यावं, यासाठी पाच दिवस आंदोलन करणं आणि त्याची अखेर सरकार दप्तरी नोंद होण्यात व्हावी, हे नक्कीच कौतुकास्पद आहेच, पण ही घटना समाजाची बदलती मानसिकता अधोरेखित करणारीही आहे..
तसं जळगाव हे बदलतं शहर. आधुनिक जीवनाचे, संपन्नतेचे वारे तिथेही वाहायला लागले आहेत. पण मुलींच्या विकासाबाबत, शिक्षणाबाबत आजही काही प्रमाणात अनास्था आहेच. अनेक कुटुंबांत आजही मुलींना, त्यांच्या शिक्षणाला दुय्यम स्थान मिळते आहे. पण त्याच शहरातली ही गोष्ट. बदल घडतो आहे हे सांगणारी, आशादायी चित्र रंगवणारी. तर घडलं हे असं..
धुळे जिल्हय़ातल्या िपपळनेरमधल्या हिरालाल पाटील यांच्या शेतकरी कुटुंबातली ती एक मुलगी, स्नेहल. गरिबीशी झगडा कायमचाच. पण वडिलांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. आपल्या तीनही मुलांना उच्चशिक्षण द्यायचंच हा चंग बांधलेल्या या शेतकरी दाम्पत्याने मग प्रयत्नांची पराकाष्ठाच केली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेकदा अर्धपोटी राहात, निसर्गाच्या दुष्टचक्राशी तडजोड करीत शेतात राबत राहिले. स्नेहलला आपल्या या मातापित्याचे कष्ट दिसत होते. तिनेही ठरवलंच, आता माघार नाही. अभ्यास करणं हे एकच जीवित कार्य असल्यासारखं तिने स्वत:ला त्यात बुडवून टाकलं आणि आईवडिलांना अभिमान वाटावा, असं यश तिला मिळालं. स्नेहल डॉक्टर झाली, तेव्हा डबडबत्या डोळ्यांनी तिच्या मातापित्यांनी तिला भरघोस आशीर्वाद दिले. त्या अश्रूंमध्ये होतं, समाधानाचं चीज. इतक्या वर्षांच्या कष्टांचा निचरा झाला होता. ते भरून पावले होते.. आता आणखी एक कार्य राहिलं, आपल्या या उच्चशिक्षित लेकीला तेवढय़ाच तोलामोलाचा मुलगा मिळवून देणं. त्यांना तसं मिळालं.. नव्हे कित्येक पट जास्त मोलाचं कुटुंब मिळालं. ज्या घरात त्यांच्या मुलीच्या आत्मसन्मानाचं चीज होणार होतं..
स्नेहलला पती मिळाला तोही डॉक्टरच, डॉ. समीर शिवराम पवार (ते आपलं नाव पवार लावतात.). दोघंही आज जळगावमध्ये ‘अनुभूती’ या शाळेत डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. स्नेहलला माहीत होतं, आपल्या आईवडिलांनी जे कष्ट केलेत त्याला मोल नाही. ते ऋण फेडणं अशक्यच होतं. पण आपल्या वडिलांची आठवण सतत आपल्या सोबत राहावी यासाठी तिने लग्नाआधीच डॉ. समीर यांना सांगितलं होतं की, मला माझं नाव लग्नानंतर बदलायचं नाही. आधुनिक विचारांच्या समीरनीही त्याला पाठिंबाच दिला, नव्हे त्याचं समर्थन केलं. शिवाय त्यांना त्यांच्या घरच्यांची मानसिकताही माहीत होती, आपले पुढारलेल्या विचारांचे वडील, शिवराम पाटील आपल्या या मताचा आदरच करतील याची त्यांनाही खात्री होती. आणि त्याचा प्रत्यय स्नेहलला लग्नानंतर सातत्याने मिळत होता. त्यांचं आणि धाकटय़ा दिराचं लग्न काही दिवसांच्या अंतराने झालं होतं. धाकटी सूनही डॉक्टरच. लग्नानंतर जवळच्या नातेवाईकांनी त्यांना जेवायला बोलावलं होतं. नवीन सुना असल्याने दोघींनीही लगेच स्वयंपाकाला हातभार लावला. पण जेव्हा त्या दोघींना घरातले कपडे आणि भांडीही घासायला लावली गेली तसे सासरे उखडले. ‘माझ्या सुना काय इथे असली कामं करायला आल्या आहेत का?’ असा जाबही त्यांनी सगळ्यांसमोर विचारला. इतकंच नाही तर नवीन लग्न झालेली जोडपी म्हटल्यावर कुणीही समोर आलं की पायावर डोकं ठेवून नमस्कार करायची पद्धत. सासऱ्यांना तेही आवडलं नाही. ते म्हणाले, ‘माझ्या सुना इतकं शिकल्यात त्या काय असं ज्याच्या त्याच्या पायावर डोकं ठेवायला नाहीत.’
सुनांचा आत्मसन्मान जपणाऱ्या या सासऱ्यांनी पुढे तर कमालच केली. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना वाघानगरमध्ये घरं घेऊन दिली. समीर आणि स्नेहल जेव्हा त्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की, घरावर दोन पाटय़ा लागल्या आहेत, एक पाटी- समीर पवार आणि दुसरी- स्नेहल पाटील यांच्या नावांची. स्नेहलसाठी तो अतिआनंदाचा दिवस होता. सगळं काही भरून पावल्याचा. त्यांच्या सासूबाईही आधुनिक विचारांच्याच आहेत. पूर्वी नंदुरबारमध्ये राहात असताना त्या महिला संघटनेच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे त्यांनीही स्नेहलच्या मताचा आदरच केला. स्नेहल आणि समीर यांना एकच मुलगी, समीक्षा. आणि तिच्यावरच थांबण्याचा या दोघांचा निर्णय आहे. जिने आम्हाला आई-बाबा बनवलं तीच आमच्यासाठी पुरेशी आहे, असं त्यांचं म्हणणं. आपल्या एकुलत्या एक मुलीला शिकवून स्वत:च्या पायावर उभं करणं हे त्यांच्यासमोरचं ध्येय आहे. कारण मुली जर स्वत:च्या पायावर उभ्या असल्या तर त्यांच्यावर कुणावर अवलंबून राहायची वेळ येत नाही असं त्यांना वाटतं. अर्थात हे झालं कौटुंबिक स्तरावरच. पण, समाजाच्या मानसिकतेचा परिचय अजून त्यांना यायचा होता.
स्नेहल जिथे काम करीत होती तिथून तिला दर महिन्याला पगाराचा चेक मिळायचा. लग्न झाल्यानंतर लगेचच तिला पगाराचा चेक काढताना नाव लिहून घेतलं गेलं, स्नेहल समीर पवार. अर्थात ती दुरुस्ती करून घ्यावी लागली. पुढे असंच एका बँकेत जॉइंट अकाऊंट काढायला गेले. तेव्हा नवरा-बायको असून दोन वेगळी नावे पाहिल्यावर त्या कर्मचाऱ्यानेही आक्षेप घेतला. तेव्हा डॉ. समीर यांनी सांगितलं, ‘अहो, दोन मित्रांचं वेगवेगळ्या नावाने जॉइंट अकाऊंट असतं ना मग आमचं वेगवेगळं नाव असेल तर कुठे बिघडलं?’ तेव्हा कुठे त्यांनी ते अकाऊंट काढून दिलं. पण ‘असं होतं का कधी. एकदा का लग्न झालं की मुलीला नवऱ्याचंच नाव लावावं लागतं. त्याच्याच तर घरी जाते ती..’ ‘तुमचं रीतसर लग्न झालंय ना मग हा काय वेडेपणा. अशी नाव न बदलता राहणारी जोडपी फक्त लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतात. नाहीतर नुसतेच पार्टनर असतात. तुमचं नेमकं काय नातं आहे.’ हे बोलणंही त्यांना ऐकून घ्यावं लागलंच. पण स्नेहल आणि समीर त्यांच्या मतांवर ठाम होते. आहेत.
पण हे अगदीच क्षुल्लक होतं. खरा संघर्ष पुढेच होता. लग्नानंतर स्नेहल समीर यांनी जळगावमध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी शिधापत्रिकेसाठी अर्ज केला. जळगाव तहसीलदाराकडे अर्ज गेला, जुलै २०१३मध्ये. योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्याची शिधापत्रिका तयार झाली आणि ती अंतिम स्वाक्षरीसाठी तेव्हाच्या तहसीलदारांकडे आली ती ३० ऑगस्ट २०१३ला. तहसीलदारांनी त्याच्यावर नजर टाकली तर समीर शिवराम पवार यांच्या नावाखाली पत्नी म्हणून स्नेहल हिरालाल पाटील असे नाव दिसताच त्यांनी सर्व मजकुरावर रेषा मारत ती शिधापत्रिकाच रद्द करून टाकली. इतकंच नाही तर वर शेरा लिहिला की, पत्नीचे नाते लावल्यानंतर पत्नीच्या नावापुढे पतीचे नाव लावावे लागते. शिधापत्रिका पत्नीच्या वडिलांच्या नावाने बनविण्याचा अर्जदाराचा हट्ट बेकायदेशीर असल्याने शिधापत्रिका रद्द करत आहे, असे लिहून त्याखाली त्यांनी सही केली. पण
डॉ. स्नेहल व समीर आपला मुद्दा पुढे करीत आमचं लग्न झालं आहे. आम्ही पती-पत्नी आहोत, असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यायलाही तयार झाले. पण तहसीलदार आपल्या मतावर ठाम होते.
दोघंही सरकारी यंत्रणेपुढे हतबल झाले होते. स्नेहलला तर आपल्या वडिलांचं नाव आपल्या सोबत कायमस्वरूपी जोडलं जावं असं वाटत होतं आणि तिच्या या मताचा डॉ. समीर यांना आदरच होता. पण सरकारी यंत्रणेला त्यांच्या इच्छा आणि आदराविषयी काही देणं-घेणं नव्हतं. त्यांचा झगडा सुरू झाला. जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात पत्र देऊन झालं, पण काहीच घडत नव्हतं. स्नेहलच्या काही नातेवाईकांनीही तिला तिच्या आग्रहापासून परावृत्त व्हायला सांगितलं. एकदा पत्नी झालीस की तू त्यांचीच. कशाला वडिलांचं नाव लावायचं, असे सूचक टोमणेही मिळू लागले. एका वयस्क नातेवाईकांनी तर तिला दमातच घेतलं, ‘कशाला इतका हट्ट. छान चाललाय तुमचा संसार तर कशाला हे हवं.’ तेव्हा तिने सांगितलं की हा माझ्या सासरच्या मंडळींचाच आग्रह आहे, तेव्हा कुठे ती व्यक्ती गप्प बसली. पण दिवस सरकू लागले तसतसं स्नेहलचीही आशा मावळू लागली होती. या घटनेला आता सहा महिने होत आले. शिधापत्रिका नसल्याने अनेक कामं खोळंबून राहिली होती. तेव्हा मात्र डॉ. समीर यांच्या वडिलांमधला, शिवराम पाटील यांच्यामधला कार्यकर्ता बंड करून उठला. माझ्या सुनेला जर तिच्या वडिलांच्या नावाने शिधापत्रिका हवी आहे तर ती तिला मिळालीच पाहिजे. कशी नाही मिळत मी बघतोच, म्हणत त्यांनी आंदोलनाचा पवित्राच घेतला.
शिवराम पाटील मुळातच सुशिक्षित, चळवळीच्या वातावरणात वाढलेले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे त्यांच्या रक्तातच होतं. स्टेशन मास्तर म्हणून अनेक र्वष नोकरी केल्यावर मात्र त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सामाजिक कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलं. अन्यायाविरुद्ध त्यांनी उपोषणं केली होती. १५ ऑगस्ट १९९७ ला त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांवरच्या अन्यायाविरोधात आंदोलन केले होते. त्याचाच कित्ता इथे गिरवायचा असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ६ फेब्रुवारी २०१४ पासून आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत आम्हाला अपेक्षित शिधापत्रिका मिळत नाही तोपर्यंत सत्याग्रह सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी केला. तर त्यांच्या विरोधात, ‘हे आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर आहे व भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला तुम्ही स्वत: जबाबदार असाल,’ अशी नोटीस तहसीलदारांनी ७ फेब्रुवारीला बजावली. परंतु माघार न घेता शिवराम पाटील यांनी सुनेच्या न्यायहक्काच्या मागणीसाठी ‘गोधडी आंदोलन’ चालूच ठेवलं. तिथेच मुक्काम केलेल्या शिवराम यांच्या रात्रीच्या प्रवासात साथ दिली ती त्यांचे दोन्ही पुत्र डॉ. समीर आणि त्यांच्या धाकटा भाऊ अमितने. त्यांच्या आंदोलनाची बातमी सगळीकडे पसरू लागली तसे जळगावमधले अनेक लोक त्यांना पाठिंबा द्यायला पुढे आले. अनेक सामाजिक कार्यकर्तेही त्यांच्याबरोबर सहभागी झाले. अनेकांनी मग शिधापत्रिका मिळण्यासाठी जास्तीचे पैसे कसे आकारले जातात, याबद्दल तक्रार करायला सुरुवात केली. वातावरण तापू लागलं..
आणि अखेर १० फेब्रुवारीला त्यांना त्याचं फळ मिळालंच. तहसीलदार स्वत: नवीन शिधापत्रिका घेऊन आले, त्या वेळी त्यावर कुटुंबप्रमुख म्हणून नाव होतं, स्नेहल हिरालाल पाटील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2014 1:01 am

Web Title: married women using their fathers name as middle name
टॅग Husband,Marriage
Next Stories
1 माफ करशील मला?
2 अपमान जिव्हारी लागला आणि..
3 आरे रांग..आरे रांग रे
Just Now!
X