02 June 2020

News Flash

अचपळ मन माझे- भयगंड

काही जणांना ठरावीक प्राण्यांबद्दल वा विशिष्ट परिस्थितीबद्दल प्रचंड भीती निर्माण होते

काही जणांना ठरावीक प्राण्यांबद्दल वा विशिष्ट परिस्थितीबद्दल प्रचंड भीती निर्माण होते. काही वेळा ती भीती आत्मघातकीही ठरू शकते किंवा त्यामुळे संसारही उद्ध्वस्त होऊ शकतो. याला ‘फोबिया’ किंवा ‘भयगंड’ म्हणतात. मात्र वेळीच उपचार केल्यास हा आजार आटोक्यात आणणे शक्य असते.

आ मच्या संगीताच्या क्लासमध्ये एक बाई यायच्या. उत्तम गायच्या. पेटीही चांगली वाजवायच्या. पण मध्येच अचानक थांबायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड भय दिसायचे. जोरजोरात ओरडायच्या, रडायच्या. त्यांचा श्वास जोरात चालायचा. थंड पडायच्या. स्वत:च्या शरीराची जवळजवळ गुंडाळी करायच्या. डोळ्यांवर व चेहऱ्यावर दोन्ही हात घट्ट पकडून चेहरा झाकायच्या. हे सगळे त्या छताजवळच्या िभतीच्या टोकाला झुरळ दिसले की करायच्या. पुढच्या वर्गात त्या यायच्याच नाहीत. त्यांच्या आईने असेही सांगितले की, त्या घरातही असे वागतात. घरात तर त्या रोज िभती, कपाट साफ करायच्या. कपडय़ाच्या घडय़ा झटकत बसायच्या. एकदा तर रेल्वेच्या डब्यात त्यांनी दुसऱ्या एका बाईच्या पर्समधून छोटे झुरळ बाहेर पडताना पाहिले व त्या तशाच किंचाळत, रडत घाबऱ्याघुबऱ्या डब्याच्या दरवाजात पोहोचल्या. भान हरपल्यासारखे त्या रेल्वेच्या डब्यातून उडी मारणार तेवढय़ात तेथे उभ्या असलेल्या दोघी मुलींनी त्यांना पकडून ठेवले म्हणून अपघातातून त्या त्यावेळी वाचल्या.
अशा पद्धतीने झुरळाची भीती रुग्णाला अत्यंत भयानक संकटात नेऊ शकते. विचार करा ड्रायिव्हग करताना एखादीला झुरळाची अशी झलक जरी दिसली किंवा भर ट्रॅफिकमध्ये एखादी झुरळाला घाबरून सरावैरा पळत सुटली तर काय भयानक परिस्थिती होईल? अशा पद्धतीने काही जणांना ठरावीक प्राण्यांबद्दल वा विशिष्ट परिस्थितीबद्दल मनात प्रचंड भीती निर्माण होते. ही परिस्थिती व्यक्ती व प्राणी खरेच तितक्या प्रमाणात भीतीदायक असतात असेही नाही. पण या गोष्टी समोरे आल्यानंतर मनात तीव्र चिंता निर्माण होते किंवा चिंतेचा अ‍ॅटॅकही येतो. त्यामुळे व्यक्ती त्या गोष्टी हेतूपूर्वक टाळायचा प्रयत्न करते. जेव्हा या वस्तू डोळ्यांसमोर नसतात किंवा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना येत नाही तेव्हा ती व्यक्ती इतरांसारखीच पूर्णपणे सामान्य व व्यवस्थित वागते. त्यांना पाहताना त्यांच्या वागण्या-बोलण्यात आपल्याला काही विचित्र जाणवत नाही. याला ‘फोबिया’ किंवा ‘भयगंड’ म्हणता येईल. हा आजार चिंतेच्या विविध आजारांमधील एक आजार आहे. या व्यक्ती त्यांना फोबिया असलेल्या कुठल्याही गोष्टीला सामोरे जाण्याची परिस्थिती टाळतात. मग मागचा- पुढचा विचार करीत नाहीत. आपले किती नुकसान होईल हे पाहात नाहीत. किंबहुना अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात येताच कामा नये याची पूर्ण काळजी घेतात.
प्रणोती नावाची माझी एक तरुण रुग्ण एम.बी.ए. करून बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगल्या नोकऱ्या मिळवीत असे. पण विमानाने जायची वेळ आली तर ती भयग्रस्त होत असे. वेडीपिशी व अस्वस्थ होत असे. नंतर ती विमानाने जायचे टाळायची व प्रसंगी नोकरी सोडूनही मोकळी होत असे. हळूहळू ती आपले करिअर करायची, आयुष्यात पुढे जायची महत्त्वाकांक्षा सोडून देऊन प्रवास करायला लागू नये असे साधे जॉब घेऊ लागली. त्यात तिला खूप आनंद मिळत नव्हता. त्यामुळे हळूहळू दुसऱ्या बाजूने तिची उदासीनता वाढायला लागली. प्रणोतीला फोबिया झाला होता पण ती त्या आजारासाठी उपचार घेत नव्हती. कारण विमानाने जायची परिस्थिती टाळल्यावर तिचे रोजचे आयुष्य जरी अपेक्षेप्रमाणे उंचावणारे नसले तरी तिचे दैनंदिन व्यवहार मात्र व्यवस्थित चालू होते. तिथेच तर खरी समस्या आहे. या फोबियावर व्यवस्थित उपचार घेतले तर परिस्थिती हाताबाहेर जात नाही व स्वप्नांचा चुराडाही होत नाही. फोबिया हा मानसिक आजारात अधिक प्रमाणात आढळणारा आजार आहे. साधारणत: ५ ते १२ टक्के लोकांमध्ये हा आजार कमी-जास्त दिसून येतो. पौगंडावस्थेत फोबियाची सुरुवात झालेली दिसते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये फोबिया जास्त प्रमाणात आढळतो. ठरावीक प्रकारचे फोबिया (स्पेसिफिक फोबिया) जास्त प्रमाणात आढळतात. यामध्ये खालील फोबिया सर्वसामान्य प्रमाणात दिसून येतात.
१) प्राणी – कुत्रा, पाल, झुरळ, साप.
२) ठरावीक वस्तू – इंजेक्शन, रक्त.
३) विशिष्ट जागा – दवाखाना, बंद घर, लिफ्ट, बोगदा, विमान.
४) ठरावीक परिस्थिती – लोकांसमोर भाषण करणे, स्टेजवर कला सादर करणे.
काही वेळा दु:खद घटना घडल्यामुळेसुद्धा अवास्तव भीती वाढते. कालिंदीबाईंना फोनवरून त्यांचा भाऊ अपघातात अचानक गेला ही बातमी त्या घरात एकटय़ा असताना कुणीतरी दिली. त्यांना चिंतेचा तीव्र झटका आला. जीव जातो का राहतो अशी परिस्थिती आली. त्या कशाबशा त्या भयानक अनुभवातून बाहेर आल्या खऱ्या, पण त्या प्रसंगानंतर त्यांना फोनच्या आवाजाने पॅनिक अ‍ॅटॅक येऊ लागले. त्या फोनजवळ जातसुद्धा नसत. पती कामाला गेले व मुले शाळेत गेली की त्या चक्क फोन काढून ठेवत असत. आपली भीती अवास्तव आहे व अनाठायी आहे याची कल्पना रुग्णांना असते. पण भीती टाळण्यासाठी व त्या अनुषंगाने येणारा चिंतेचा तीव्र झटका टाळण्यासाठी रुग्ण ती परिस्थिती व वस्तूच टाळतात.
मोहनराव त्यांच्या पत्नीवर सदैव वैतागलेले असायचे. कारण लग्नाला ३० वष्रे झाली तरी त्या त्यांच्याबरोबर नाटक-सिनेमे पाहायला जायला नकार द्यायच्या. त्यांना ही बाई इतकी अरसिक आणि कंटाळवाणी कशी हे कळायचेच नाही. कारण त्या म्हणायच्या, मला नाही आवडत थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला. उगाचच दोन-तीन तास का वाया घालवायचे. गावात जत्रेला जायचे किंवा लग्नाला गर्दीत जायचे तर त्या मोहनराव असल्याशिवाय किंवा कोणी सोबतीला असल्याशिवाय जायच्याच नाहीत.
गर्दीच्या ठिकाणी वाटणाऱ्या फोबियाला ‘अगोरा फोबिया’ म्हणतात. अशा ठिकाणी जायची कारणाशिवाय वाटणाऱ्या भीतीची तीव्रता वाढू लागली की मग रुग्ण गर्दीची जागाच टाळायला लागतात. अशा ठिकाणी आपल्याला चिंतेचा झटका आला तर कुणाची मदत मिळणार नाही, असे त्यांना वाटते. हा प्रकार ‘सोशल फोबिया’ म्हणून ओळखतात. ‘सोशल फोबिया’मध्ये लोक आपल्यावर कॉमेंट करतील, टीका करतील, आपण काहीतरी चुकीचे बोलू अशी भीती रुग्णांना वाटते. आपल्याकडे, आपल्या दिसण्याकडे, वागण्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे असे त्यांना वाटते. ते एकटे राहणे पसंत करतात. आपल्याकडून काहीतरी चूक होईल व सर्वजण आपल्याकडे पाहून हसतील. आपली फजिती होईल. आपण ओशाळे होऊ. आपला अपमान होईल. यामुळे काहीजण लोकांसमोर बोलायचे वा भाषण करण्याचे टाळतात. स्टेजवर जाणे टाळतात. या सर्व अनुभूतीची रुग्णांना उत्तम जाणीव असते. सर्वात जास्त गरसोय केव्हा होते जेव्हा नोकरीचा इंटरव्ह्य़ू द्यायचा असतो किंवा तोंडी परीक्षा द्यायची असते. लेखी परीक्षा उत्तम प्रकारे देऊन तोंडी परीक्षेला न बसणारे अनेक विद्यार्थी आहेत. तोंडी परीक्षेला जायच्या नुसत्या कल्पनेने चारूची जीभ टाळ्याला चिकटायची आणि ती धपापायला लागायची.
फोबिया मग तो विशिष्ट फोबिया असो वा अगोरा फोबिया, सोशल फोबिया असो त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. या आजारात मेंदूतील सिरोटोनिन आणि नॉरएपीनेफ्रीन ही रसायने असमतोल झालेली असतात. हा समतोल साधण्यासाठी योग्य औषधे द्यावी लागतात. त्यामुळे लक्षणे काबूत येतात. ही औषधे साधारणत: ६ ते १२ महिने घ्यावी लागतात. त्यानंतर रुग्णांना समुपदेशन द्यावे लागते. यात आजाराचे स्वरूप समजावून सांगून चिंतेवर मात कशी करायची हे सांगितले जाते.
मुळात अमुक परिस्थिती किंवा विशिष्ट वस्तू वा प्राणी यापेक्षा आपल्या मनात त्याबद्दल निर्माण होणाऱ्या भीतीवर मात करणे महत्त्वाचे आहे. सापाची भीती वाटणाऱ्या माझ्या एका रुग्णाला, नेहाला मी प्रथम मन व शरीर शिथिल करण्यास शिकविले, यामुळे चिंतेच्या तीव्र झटक्यांवर त्यांना ताबा मिळवता येऊ लागला. मग शिथिलीकरणाच्या स्थितीत मनात सापाची आकृती पाहायला शिकविली. हे करताना मन व शरीर शिथिल/रिलॅक्स्ड ठेवायला शिकविले. सापाला नजरेसमोर पाहात पाहात मन व शरीर रिलॅक्स्ड ठेवल्यामुळे मनातली भीती कमी होऊ लागली. पॅनिकचे झटकेही कमी झाले. हा सराव अगदी मनापासून तिने केला. आता सापाचे पूर्ण रूप हुबेहूब नजरेसमोर ठेवून नेहाला रिलॅक्स्ड राहता येत होते. यामुळे कल्पनेच्या पातळीवर तिने सापाच्या भीतीवर मात केलीच. गंमत म्हणजे नेहाने नागराजाचा एक छान फोटो आपल्या पर्समध्ये ठेवला. तिला तिच्या मत्रिणी नागराजाची गर्लफ्रेंड म्हणून आजही गमतीने चिडवितात. मग आम्ही एका सापाच्या प्रदर्शनात तिला सापांना हात लावायला व नंतर साप हातात घ्यायला शिकवला. हे सारे टप्प्याटप्प्याने करायला पाहिजे. फोबियावर प्रथम कल्पनेच्या माध्यमातून व नंतर प्रत्यक्ष मात करणे शिकवले जाते. कालांतराने रुग्ण या भीतीवर व्यवस्थित मात करतात. विचारात बदल घडवणे खूप महत्त्वाचे आहे.
या सगळ्या नियमित दिसणाऱ्या फोबियांबरोबर स्त्रियांमध्ये लंगिक संबंधांशी जोडलेले फोबिया दिसतात. एका स्त्रीने दहा वष्रे पतीचा भयंकर मार खाल्ला होता. तिला पतीबरोबर लंगिक संबंध ठेवायची भीती वाटायची. ती नवऱ्याला स्पर्श करू द्यायची. पण लंगिक संबंधांपासून दूर राहायची. ‘मला घाण वाटते’ असे सतत सांगायची. नवरा सुरुवातीला समजूतदारपणे वागला पण नंतर मात्र त्याला कळले की तिला फोबिया आहे. काही बायकांना भावनिकदृष्टय़ा जवळ जाण्यास भीती वाटते. आपण भावनिकदृष्टय़ा कोणात तरी गुंतले जाऊ ही प्रचंड भीती स्त्रियांना कधी कधी वाटते. तर नुसता पुरुषाचा स्पर्श झाल्यामुळे पॅनिक अ‍ॅटॅक येणारी तरुणी मी पाहिली आहे. अर्थात हा रोमँटिक स्पर्श नाही, विकृत स्पर्शही नसेल तर साधा असाच लागलेला अनाहूत धक्कासुद्धा फोबिया निर्माण करू शकतो. त्या दृष्टिकोनातून कुणी स्त्रियांकडे पाहतच नाही. ही एक मानसिक विकृती असेल याचा अंदाज कुणालाच येत नाही. पण अशा प्रकारची भीती फोबिया तर नाही, हे पडताळून घेणे गरजेचे आहे.
स्त्रियांना यामुळे प्रचंड भावनिक जाचातून जावे लागते. संसार उद्ध्वस्त होऊ शकतात. यानंतर त्यावर उपचार देणे व जोडीदाराला विश्वासात घेणेही गरजेचे आहे. लंगिक फोबियाचे उपचार आव्हानात्मक आहेत. पण स्त्रिया या उपचारांतून बऱ्या होऊ शकतात हे महत्त्वाचे! ल्ल
pshubhangi@gmail.com

– डॉ. शुभांगी पारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2015 2:14 am

Web Title: obsessive compulsion disorder
Next Stories
1 भीती अनामिक भीतीची!
2 चिंतेचा आजार
3 आईपण सांभाळताना…
Just Now!
X