योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

‘आमच्या वेळी असं नव्हतं,’ हे जणू प्रत्येक पिढीनं आपल्या आधीच्या पिढीला ऐकवायचं पालूपदच! जुनं ते टिकवावं, अशी तळमळ तरुण पिढीला वाटत नसल्याचं बहुतेक वेळा आधीच्या पिढीचं मत असतं. आणि आम्ही आमच्या करिअरवर लक्ष देऊ, की जुनं सांभाळण्यास वेळ देऊ, असं नव्या पिढीला वाटतं. दोघंही आपल्या जागी चूक नाहीत असंच म्हणावं लागेल. पण मग यावर उपाय काय? मैदानाच्या कट्टय़ावर बसलेल्या एका वयस्कर काकांची आणि त्याची याच विषयावर चर्चा रंगली आणि बोलण्याच्या ओघात त्यानं त्यांच्या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकलं.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न

त्या रविवारी मैदानासमोरच्या कट्टय़ावर आपली क्रिकेटची बॅट घेऊन तो सगळ्यांच्या आधी पोचला. नोकरी लागल्यापासून गेली चार-पाच वर्षं रविवारचं क्रिकेट हे त्याच्यासाठी जीवनसत्त्वासारखं होतं. सगळे लोक जमेपर्यंत आपला एक चहा नक्की होईल, या विचारानं शेजारीच असलेल्या चहाच्या टपरीवरून त्यानं एक स्पेशल चहा घेतला. सकाळच्या गार हवेत आणि शांत वातावरणात गवती चहाचा गंध आणि चव असलेल्या चहाचा आस्वाद घेणं ही पर्वणीच होती.

‘आपल्या वेळी असं नव्हतं’ या वाक्यानं त्याची तंद्री भंग पावली. त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं, तर कट्टय़ाच्या दुसऱ्या टोकाला ‘सीनिअर सिटीझन्स’चा नेहमीचा ग्रुप जमला होता. त्याला चेहऱ्यानं त्या ग्रुपमधली मंडळी माहिती होती. पण आज त्या ग्रुपमध्ये एक नवीन काका दिसत होते. कोरा करकरीत ट्रॅक सूट घातलेल्या त्या काकांचं प्रस्थ त्या घोळक्यात जाणवत होतं. त्या काकांची सध्या बदलत असलेल्या किंवा बदललेल्या बहुतेक गोष्टींबद्दल तक्रार होती. त्यामुळे रस्ता, वीज, पाणी, शहर नियोजन, कुटुंबव्यवस्था, शेती असे कोणत्याही विषयाचे संदर्भ आले, तरी प्रत्येक चर्चेच्या शेवटी त्यांचं ठरलेलं वाक्य – ‘आपल्या वेळी असं नव्हतं’ हेच होतं. बोलता बोलता ते काका म्हणाले, ‘‘मी तिकडे मुलाकडे असतो तेव्हा बघतो ना, की तिथे नुसता ई-मेल केला की कामं होतात. तिकडे पुढच्या पन्नास वर्षांंचं शहराचं नियोजन तयार असतं. जुन्या गोष्टी तिथे आवर्जून टिकवल्या जातात.’’ ते ऐकल्यावर काका परदेशात येऊन-जाऊन असतात हे त्याला समजलंच, पण त्याचबरोबर ग्रुपमधले बाकीचे लोक इतक्या भक्तीभावानं त्यांचं का ऐकत होते हेही त्याच्या लक्षात आलं.

सलग पाच-सहा वेळा काकांचं तेच ठरलेलं वाक्य कानावर पडल्यावर शेवटी तो न राहावून म्हणाला, ‘‘काका.. सॉरी, मी काही संबंध नसताना बोलतोय. पण आता तुमचा तो काळ राहिला नाही, आणि ती वेळही राहिली नाही. मग तुमच्या वेळी गोष्टी जशा होत्या तशाच त्या आता का राहतील?’’ त्याचा तो अनपेक्षित प्रश्न ऐकून काका काहीसे चपापले. पण अर्थातच शांत न बसता ते आक्रमकपणे म्हणाले, ‘‘तुझं अगदी बरोबर आहे. पण गोष्टी तशा न राहण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे इथल्या तरुण पिढीला जुन्या चांगल्या गोष्टी टिकवण्यापेक्षा त्या बदलण्याच्या ‘ट्रेंड’मध्ये जास्त रस असतो. मग ती गोष्ट घरातली असो किंवा बाहेरची असो.’’

त्यावर तो हसून शांतपणे म्हणाला, ‘‘काका, जेव्हा तुम्ही आमच्या वयाचे होतात, तेव्हा तुमच्या आधीची पिढीही तुमच्याबद्दल असंच म्हणत असणार.. आणि जेव्हा आम्ही तुमच्या वयाचे होऊ, तेव्हा आम्हीही त्या वेळी तरुण असणाऱ्या पिढीला हेच ऐकवणार. नाही का?  म्हणजे ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ असं वाटणं स्वाभाविक आहे, पण ‘चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट’ हे सर्वमान्य सत्य आहे. तेव्हा त्याबद्दल तक्रार करण्यात काय अर्थ आहे?’’

काकांना त्याचा मुद्दा लक्षात आला. थोडं शांत होत ते म्हणाले, ‘‘माझ्या असं म्हणण्याचे दोन पैलू आहेत. पहिला तू नेमकेपणानं सांगितलास. पण दुसरा पैलू हा आहे, की जुनी गोष्ट जाऊन त्याच्या जागी जी नवीन गोष्ट येते, ती अनेक वेळा दर्जाहीन, घाईघाईत उरकून टाकण्यासाठी बनवलेली, वेळ मारून नेण्यासाठी तयार केलेली असते. मग ते यंत्र असो, वा तंत्र असो. त्यामुळे अनेकदा त्या बदलामुळे प्रश्न सुटण्यापेक्षा गुंताच वाढत जातो. पूर्वी जे होतं ते बरं होतं, असं म्हणायची वेळ येते आणि हे अनेक बाबतीत लागू होतं, त्याचं काय? परदेशात हे असं होताना दिसत नाही.’’

काकांच्या बोलण्यातलं तथ्य ओळखून होकारार्थी मान हलवत तो म्हणाला, ‘‘हा दुसरा पैलू मला बऱ्याच प्रमाणात मान्य आहे. पण मग त्याच्या जोडीनं असा एक प्रश्न येतो, की बदल ही टप्प्याटप्प्यानं घडत असणारी क्रियाआहे. म्हणजे असं एकेदिवशी ठरवलं आणि सगळं काही बदललं, असं तर नक्कीच होत नाही. मग ज्या क्षणी हे जाणवतं, की काही जुन्या पण चांगल्या गोष्टी बदलल्या जात आहेत, आणि त्या जागी येणाऱ्या गोष्टी दुय्यम दर्जाच्या आहेत, तेव्हाच आरडाओरडा का केला जात नाही? सगळं झाल्यावर ‘पूर्वीसारखं काही राहिलं नाही’ असं म्हणून काय साध्य होणार आहे?, आणि त्यात फक्त नवीन पिढीचा दोष कसा काय?’’

त्यावर काका म्हणाले, ‘‘जुनी पिढी जे जे सांगते ते सगळं चूक, जुन्या पिढीनं ज्या काही गोष्टी केल्या त्या सगळ्या कालबाह्य़, असा या तुमच्या पिढीचा दृष्टिकोन असतो. त्यामुळे गोष्ट जुनी झाली, की ती दे फेकून, हेच सूत्र आज घराघरांत दिसतं. त्यापुढे जाऊन बोलायचं झालं, तर तुमची शासकीय यंत्रणा काही बदल घडवत असेल तर ते बदल खरोखरच पूरक आहेत का, याची पडताळणी करण्यासाठी तुम्हा लोकांकडे वेळच नसतो. किंबहुना तो दिला पाहिजे असं अनेकांना वाटतही नाही. म्हणजे सगळेच जण तसे आहेत असं मी म्हणत नाही. पण एकुणात दुर्लक्ष होतं. चांगल्या गोष्टींची वाट लागते, आणि काहीतरी कामचलाऊ पर्याय आपल्या माथी मारला जातो.’’

त्यावर क्षणभर विचार करून तो म्हणाला, ‘‘काका, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण अशी स्थित्यंतरं प्रत्येक काळात घडत असतात, आणि त्यासाठी तेव्हा असणाऱ्या सर्व पिढय़ा तितक्याच जबाबदार असतात. शिवाय प्रत्येक काळात तेव्हाची तरुण पिढी हेच म्हणणार, की मी माझं करिअर करू, की या सगळ्या गोष्टींसाठी वेळ देऊ?  तर त्याआधीची पिढी ‘आमचं वय झालं’ हे कारण देणार. आता तुमच्या तरुणपणात तुम्हीही करिअर घडवण्याला, आर्थिक बाजू भक्कम करण्याला, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं असेलच. आणि ते अतिशय स्वाभाविक आहे. प्रत्येक पिढीकडून स्थैर्यासाठी  केला जाणारा शोध ही काळाच्या ओघात बदलत न जाणारी एकमेव गोष्ट आहे. अर्थात हे स्थैर्य म्हणजे नेमकं काय, याची व्याख्या पिढीप्रमाणे बदलते. मग स्थैर्य शोधताना काही गोष्टी बदलल्या गेल्या तर त्याचं वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे?.. आपण आपली सोय बघितली. तेव्हा त्याची किंमत चुकवावी लागणार आहे, असं समजूनच या बदलांकडे बघायला हवं. नाही का?..’’

तो जे काही म्हणत होता ते काकांना कळत तर होतं. पण वळत नव्हतं.  ते थोडं उसळून म्हणाले, ‘‘म्हणजे मग जे काही होतं ते फक्त आम्ही बघत राहायचं. काही वाटलं तरी त्याबद्दल काही बोलायचंही नाही. असं तुला वाटतं का? ’’

‘‘असं अजिबात नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, की ‘आमच्या वेळी असं नव्हतं’ असं म्हणून फक्त भूतकाळाकडे बघत सुस्कारे सोडण्यात काहीही अर्थ नाही. उलट अजूनही जे काही चांगलं टिकून आहे. ते टिकवण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. त्याला यश मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. पण जाणवलं असतानाही आपण काहीही न करता फक्त बघत राहणं हे सर्वांत मोठं अपयश आहे.’’ तो ठामपणे म्हणाला.

‘‘ठीक आहे. पण हे सगळं करताना वय आमच्या बाजूनं नाही, ही वस्तुस्थिती तर मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.’’ काका काहीसे हताशपणे म्हणाले. त्यावर तो म्हणाला, ‘‘बरोबर आहे. पण आज तुमच्या पिढीकडे आमच्या तुलनेत जास्त असलेली गोष्ट म्हणजे दिवसभरात मिळणारा वेळ. शिवाय वर्षांनुवर्षं मेहनत घेऊन उभा केलेला जनसंपर्क ही आणखी एक जमेची बाजू आहे. थोडक्यात, एखादी गोष्ट बदलण्याची खरोखर गरज वाटत नसेल, तर नव्या-जुन्या अशा दोन्ही पिढय़ांनी एकत्र येऊन काम करायची गरज आहे. तुमच्या पिढीकडे अनुभवाचं शस्त्र आहे, तर नव्या पिढीकडे तंत्रज्ञानाचं शास्त्र आहे. या दोघांनी एकमेकांचं कौशल्य मान्य केलं, तर ‘आमच्या वेळी जे होतं, त्यातलं थोडं तरी अजून शिल्लक आहे,’ असं म्हणायची संधी भविष्यात एखाद्या पिढीला तरी नक्की मिळेल, नाही का?’’

त्याच्या इतक्या रोखठोक बोलण्यावर काका निरुत्तर झाले. तेव्हा तोच म्हणाला, ‘‘काका, आपण इतकं बोललो आहोत म्हणून आणखी एक विचारतो. तुम्ही कायमचे परदेशात मुलाकडेच का जात नाही? तो पर्याय तुमच्याकडे आहेच ना?’’ त्यावर काका म्हणाले, ‘‘अरे, माझं सगळं तर इथे आहे.. आमचं वडिलोपार्जित घर, नातेवाईक, मित्र. तिथे अधूनमधून जाणं ठीक आहे. पण कायमचं शक्यच नाही.’’

तेव्हा तो म्हणाला, ‘‘काका, इथं जे काही आहे ते तुमचं असेल, तर मग इथले प्रश्नही तितकेच तुमचे आहेत. मग त्यातला एखादाच प्रश्न निवडून तो सोडवण्यासाठी काही केलं तर?  परदेशात बघितलेल्या चांगल्या गोष्टींचे संदर्भही तुमच्यापाशी आहेत. मुख्य म्हणजे या सगळ्यात तुम्ही मेहनतीनं कमावलेला पैसा खर्च करणं अपेक्षित नाही, तर थोडासा वेळ खर्च करणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही सुरुवात केलीत, की माझ्या वयाचे लोकही हळूहळू तुमच्या बरोबर येतील. तुम्हाला महत्त्वाचा वाटणारा एक प्रश्न निवडा आणि तो लावून धरा. त्यानं बरंच काही बदलेल, आणि बरंच काही टिकूनही राहील.’’

त्याचा मुद्दा समजून काकांनी फक्त होकारार्थी मान हालवली. तेवढय़ात त्याचे मित्र आले आणि तो निघाला. पण काहीतरी आठवून तो पुन्हा काकांना म्हणाला, ‘‘काका, मैदानावरच्या या खेळात वाढत्या वयामुळे कधी ना कधी निवृत्ती घ्यावीच लागते. पण आयुष्याच्या खेळात निवृत्तीचं कोणतंही वय नाही. तुम्ही ठरवलंत तर तुम्ही आजही तुमच्या आयुष्यातली सर्वोत्तम ‘इनिंग’ खेळू शकता. तेव्हा नक्की विचार करा.. गेम इज स्टिल ऑन!’’ असं म्हणून तो मित्रांमध्ये मिसळला.