News Flash

आभाळाएवढय़ा..

आसाममधल्या ७२ वर्षीय आजी मात्र गेली २० वर्ष या चेटकीण प्रथेविरोधात लढत आहेत..

(संग्रहित छायाचित्र)

आरती कदम

चेटकीण, हडळ, डाकीण, डायन, चुडैल.. नावं वेगवेगळी आहेत, पण ज्यांच्यावर तो शिक्का बसतो त्यांच्या वाटय़ाला येतो तो छळ, मारहाण, गावाबाहेरची हद्दपारी किं वा थेट ठार होणं, तेही आपल्याच समाजातल्या माणसांकडून. अनेक राज्यांत ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू होती. आसाममधल्या ७२ वर्षीय आजी मात्र गेली २० वर्ष या चेटकीण प्रथेविरोधात लढत आहेत.. अगदी प्राणावर उदार होऊन. अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या, असंख्यांचं पुनर्वसन करणाऱ्या आणि मुख्य म्हणजे त्याविरोधात कायदा करण्यात आसाम सरकारला महत्त्वाचं योगदान देणाऱ्या बिरुबाला राभा यांच्याविषयी..

मानवी मन कमालीचं गुंतागुंतीचं असतं. एका बाजूला लोकांसाठी सर्वस्व वाहिलेले, आभाळाएवढे उंच झालेले लोक आपण पाहातो, तर दुसरीकडे अंधश्रद्धा, स्वार्थ, अहंकारामुळे लोकांना छळणारे, कित्येकदा तर त्यांना ठार मारणारे, विचारांच्या काळ्याकभिन्न दरीत कोसळणारे लोकही आपण पाहातो. या दोन्ही वृत्ती माणसाच्याच. बिरुबाला राभा यांनाही ते अनुभव आले. त्यांच्या गावच्या लोकांनी त्यांच्यावरच नाना आरोप करत त्यांना वाळीत टाकलं, पण आपल्या विचारांवर ठाम असणाऱ्या बिरुबाला राभा चेटकीण प्रथेविरोधात धाडसीपणे, अनेकदा तर जिवावर उदार होऊन आवाज उठवत राहिल्या आणि चेटकीण ठरवल्या गेलेल्या स्त्रियांना अक्षरश: जीवनदान देत आभाळाएवढय़ा उंच झाल्या..

त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ जाहीर करत केंद्र शासनानं त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. परंतु हा प्रवास नक्कीच सहजसोपा नव्हता.  वर्षांनुवर्ष अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्यांना चेटकीण नसते हे पटवून देणं खूपच कठीण होतं. त्याचमुळे संघर्ष अटळ होता. गेली २० वर्ष त्या हे काम करत असल्यानं अनेक जण त्यांना होणाऱ्या छळाविषयी त्यांच्याशी संपर्क  साधत. असाच मेघालयातून एका बाईचा फोन आला. त्याला उत्तर म्हणून त्या तिथं पोहोचल्या. पण पाहातात तो काय, संतप्त लोकांचा जमाव त्यांच्यावर चालून आला. त्यांच्या हातात परजलेल्या कु ऱ्हाडी होत्या. त्यांना लाठय़ांनी मारहाणही केली. चपलेचा हार घालायचा प्रयत्न झाला. परंतु बिरुबालांनी न डगमगता शांतपणे ते सारं सहन केलं. त्यांचं म्हणणं, मी माणूस आहे, माणसांना वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. अशीच गोष्ट आसाममधल्याच लखीपूर इथली. पाच जणींना डाकीण ठरवून त्यांना हद्दपार करण्यासाठी हालचाली त्या गावात सुरू झाल्या होत्या. बिरुबालांना ही गोष्ट कळताच त्या तिथं पोहोचल्या. गाववाल्यांची बैठक सुरू होती. त्या धाडसानं त्या सभेला सामोऱ्या गेल्या. हेच कशाला, अगदी सुरुवातीला साधारण २००० मध्ये जेव्हा महिला समितीमध्ये त्यांनी पहिल्यांदा या चेटकीण प्रथेविरुद्ध आवाज उठवला, तेव्हा त्यांच्या कु टुंबालाच वाळीत टाकलं गेलं. पण त्या थांबल्या नाहीत. म्हणूनच आत्तापर्यंत ४० जणींना त्यांनी ठार होण्यापासून वाचवलंय, तर १०० पेक्षा जास्त स्त्रियांचं पुनर्वसन केलं आहे. असंख्यांची या छळापासून सुटका केली आहे.

आसाम आणि मेघालयाच्या सीमेवरील गोलपारा जिल्ह्य़ातील ठाकू रवीला हे बिरुबाला यांचं गाव.  सहा वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारले. घरात आर्थिक चणचण होतीच, ती आता आणखीनच वाढली. लहानगी बिरुबाला आईला मदत करत होतीच, पण पाचवीला त्यांची शाळा सुटली ती कायमची. आईबरोबर ती शेतमजूर म्हणून जायला लागली. घराला आर्थिक हातभार लावू लागली. गावच्या पद्धतीप्रमाणे लग्नही १५ व्या वर्षीच लागलं आणि लागोपाठ तीन मुलंही झाली. आणि ती संसारात अडकली. खरं तर चारचौघींसारखं त्यांचंही आयुष्य, पण त्यांचं वेगळेपण म्हणजे त्यांच्या बुद्धीला काही गोष्टी खटकत होत्या. साध्यासुध्या बायकांचा के वळ  संशयानं छळ होणं, त्यांना ठार केलं जाणं त्यांना पटत नव्हतं. त्यांच्या परिसरात शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधांचा अभाव, शिवाय गरिबी यामुळे अंधश्रद्धेचं वर्चस्व असणं, त्यासाठी असंख्य लोकांचा छळ होणं हे नवीन नव्हतं. बिरुबालांनाही त्याचा फटका बसला होताच. त्यांचा मोठा मुलगा धर्मेश्वरला मानसिक आजाराचं निदान केलं गेलं. त्याला देवधानीकडे नेण्यात आलं तेव्हा त्याच्यावर चेटूक करण्यात आलं असून तो तीन दिवसांपेक्षा जास्त जगणार नाही, असं सांगण्यात आलं. बिरुबालांचा यावर फारसा विश्वास नव्हताच आणि मुलगा तीन दिवसांनंतरही जगला तेव्हा मात्र त्यांची खात्री पटली की चेटकीण, हडळ वा त्यांच्याकडे लोकप्रिय असणारा शब्द म्हणजे डाकीण हा प्रकार अस्तित्वातच नाही. कुणी असं कुणावर चेटूक वा जादूटोणा करून कुणाला ठार मारू शकत नाही किंवा वाईटही घडवू शकत नाही. त्यांच्या मनाची खात्री झाली आणि त्याच्याविरोधात आवाज उठवणं हेच त्यांचं भागधेय झालं.

आजही त्यांना याविरोधात आवाज उठवत गावोगावी फिरायला लागतंय याचा अर्थ २० वर्षांपूर्वी काय स्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्या वेळी आसाममध्ये दरवर्षी किमान १२ ते १५ लोकांना डाकीण ठरवून ठार केलं जायचं. बिरुबालांचा या चेटकीण प्रथेवर विश्वास नाही. त्यांच्या मते, शिक्षण, आरोग्य, गरिबी या गोष्टींपेक्षाही भयंकर गोष्ट लोकांमध्ये असते ती म्हणजे स्वत:विषयीची असुरक्षितता, अंधश्रद्धा, मत्सर, अहंकार, वारसा-संपत्तीचे वाद. मनात विष आलं की ते असं बाहेर पडतं, असं त्या सांगतात. म्हणूनच त्यांनी काही जणांना सोबतीला घेऊन २०११ मध्ये ‘मिशन बिरुबाला’ संस्था सुरू केली. त्याच्या माध्यमातून चेटकीण प्रथेविरोधात जाणीवपूर्वक काम करायला सुरुवात केली आणि असंख्य स्त्री-पुरुषांना चेटकीण ठरवलं जाण्यापासून वाचवलं. पण त्याचबरोबर त्यांना असं एक हत्यार हवं होतं, ज्याच्या जोरावर त्या अधिक ठोसपणे काम करू शकणार  होत्या. त्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि अखेर २०१५ मध्ये आसाम सरकारनं त्याविरोधातला कायदा मंजूर केला. ‘आसाम विच हंटिंग (प्रोहिबिशन, प्रिव्हेन्शन अ‍ॅण्ड प्रोटेक्शन) अ‍ॅक्ट’ आणि याच्या जोरावर त्या आता अशा लोकांचं संरक्षण करणं, या प्रथेला प्रतिबंध करणं हे करू शकत होत्या आणि तेही कायदेशीररीत्या. ते त्यांनी त्यानंतर सुरूच केलं. २०१६ मध्ये आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी जनजागृतीसाठी आपल्या राज्याचा दौरा केला. आणि आता तर राज्य प्रशासनही त्यांच्या मागे आहे. म्हणूनच आजही त्या जिथं-जिथं अशा छळवणुकीच्या बातम्या ऐकतात तेथे तेथे प्रत्यक्ष जाऊन त्याविरोधात उभ्या राहातात. त्यासाठी आवश्यक कायदा करण्यामागे त्यांनी घेतलेले परिश्रम हे त्यांचं या कामातलं मोलाचं काम.

माणसाच्या शरीरात चेटकीण नसते, ती असते मनात. तिलाच हद्दपार करण्याच्या बिरुबाला राभा यांच्या प्रयत्नांमुळे माणसाच्या मनातल्या संतत्वाची खात्री पटते.

arati.kadam@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:38 am

Web Title: padma shri award winner birubala rabha abn 97
Next Stories
1 अढळ ध्येयनिष्ठा!
2 बहिष्कृता ते पद्मश्री
3 बँकवाली बाई!
Just Now!
X