‘पोस्टमनकाका-डाकिया-पोस्टमन’ हा (१ नोव्हेंबर) शशिकला लेले यांचा लेख आवडला. माझ्या लहानपणी ठाण्यात, नौपाडा येथे ग्रामपंचायत होती व माझे आई-वडील जगन्मित्र असल्याने घरात दिवसभर माणसांची ऊठबस असे, त्यातील महत्त्वाची व्यक्ती होती पोस्टमनकाका.
आमच्या घरात हक्काने येऊन कांदेपोहे, उपमा, चहा घेऊनच जाणारी प्रेमाची व्यक्ती, पत्र आईच्या हाती दिल्यावर वसईची आत्या, पुण्याचे, गणपतीपुळय़ाचे सगळे नातेवाईक खुशाल आहेत ना, याची चौकशी पोस्टमनकाका करीत असत, कुणी आजारी असल्याचे सांगितले की ते दु:खी होत, पण आनंदाची बातमी सांगितली की तेही आमच्या आनंदात सहभागी होत असत. ते कुटुंबाचा एक सदस्यच होऊन गेले होते. दुसरी आठवण- माझी आई १९४५ ते १९५० ही पाच वर्षे मुंबई जनरल पोस्ट ऑफिसात कार्यरत होती. तिचे गणित उत्तम असल्याने तिला ब्रिटिश अधिकारी कायम बचत खाते सांभाळण्यास सांगत, व्याजाचा हिशेब ठेवणे, मोठमोठय़ा बेरजा ती तोंडी व अत्यंत वेगात करीत असे, दिवस संपल्यावर तिच्या रजिस्टरवर सही करताना, ब्रिटिश अधिकारी हसत हसत म्हणत की, हे एकच रजिस्टर असे असते की येथे आम्ही डोळे मिटून सही करू शकतो, कारण येथे आम्हाला कधीच चूक सापडत नाही. या दोन्ही स्मृती या लेखामुळे जाग्या झाल्या.
– प्रदीप करमरकर, ठाणे

तथ्यहीन फॉवर्ड्स

‘आला मेसेज केला फॉर्वर्ड’ (८ नोव्हेंबर) हा सावनी गोडबोले यांचा लेख वाचला. अचूक वेळी छापून आलेला लेख, असेच याचे वर्णन करता येईल. दुर्दैवाने हा लेख सर्व फॉर्वर्डशौकीन लोकांपर्यंत पोहोचणे कठीण वाटते. कारण मुळातच एखादी गोष्ट वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन मेसेज फॉरवर्ड करणारे कमी आणि नुसतेच फॉर्वर्ड करणारे असंख्य नमुने पाहायला मिळतात. ‘व्हॅलेंटाइन डे’ला भगतसिंग, राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती त्यामुळे तो दिवस साजरा करू नका,’ ‘अमुक अमुक व्यक्ती आजारी असून तिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा’ असे कित्येक संदेश आपल्या मोबाईलवर येऊन आदळत असतात. त्यात तथ्य नसते. एकूणच सध्याच्या सोशल मीडियाला पाणवठय़ावरील गप्पांचे स्वरूप आल्याचे दिसते.
— तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)