आम्ही शाळेत असताना आमच्या वर्गात अशा मुली होत्या की त्या सात बहिणी होत्या. अशी एक नाही तर तीन घराणी होती. जामकर, खरवडकर आणि पाटणकर. त्यांच्यापकी प्रत्येक बहीण कुणाच्या ना कुणाच्या तरी वर्गात असायचीच. आत्ता आठवलं की गंमत वाटते आणि मैत्रीच्या माझ्या या संपत्तीचा हेवाही वाटतो.
स ध्याच्या काळात ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ असा आशीर्वाद देण्यास कुणी धजणार नाही आणि कुणी देणारा असला तरी तो घेण्याची िहमत कुणी करणार नाही. पण एक काळ असा होता की प्रत्येक घरात कमीत कमी पाच ते सहा आणि जास्तीत जास्त दहा ते बारा बहीण-भावंडे असायची. घर म्हणजे कसं गोकुळ असायचं. कृष्ण हा देवकीचा आठवा मुलगा असल्यामुळे आठव्या मुलाचं महत्त्व विशेष. (मुलाचं हं , मुलीचं नाही. जणू काही प्रत्येक घरातला आठवा मुलगा म्हणजे कृष्णाचा अवतारच) कोजागरी पौर्णिमेला जसे पहिल्या अपत्याला (मुलगी असली तरी) औक्षण करावयाचे असते तसेच आठव्या मुलाला पण ओवाळण्यात येई. सध्याच्या काळात पहिल्या अपत्याला औक्षण करण्याची पद्धतच जिथे लोप पावत चालली आहे, तिथे आठव्याचे काय? आणि आठव्या क्रमांकावर तर कुणी असण्याची सुतराम शक्यता  नाही.
सध्या मुलींच्या जन्माचे कमी होत जाणारे प्रमाण बघितले की साहजिकच तो जुना काळ आठवतो. आम्ही शाळेत असताना आमच्या वर्गात अशा मुली होत्या, की त्या सात बहिणी होत्या. अशी एक नाही तर तीन घराणी होती. जामकर, खरवडकर आणि पाटणकर. त्यांच्यापकी प्रत्येक बहीण कुणाच्या ना कुणाच्या तरी वर्गात असायचीच. माझ्या वर्गात त्यापकी दोन घरांतील मुली होत्या आणि एका घरातील एक जण माझ्या मोठय़ा बहिणीच्या वर्गात होती. त्या वेळेस शाळेत शिकायला जाणारी मुलींची जी पिढी होती त्या साधारण चौथ्या-पाचव्या वर्गातील मुली असायच्या. त्यांच्या एखाद् दुसऱ्या बहिणींचे लग्न झालेले असायचे. त्यांच्या घरी अभ्यासाला गेले की खूप मज्जा यायची. घरात सगळीकडे या बहिणींचा वावर असायचा. घरात कसे चतन्य सळसळत असल्यासारखे वाटायचे. गोड चिवचिवाटाने घर कसे भरून गेलेले असायचे. सगळ्या जणी मिळून पटापट कामे करायच्या. आवराआवर करायच्या. त्यावेळी मुली धाकाने आणि आवडीने पण घरातली कामे करायच्या. कपडय़ांची तर मज्जाच. सगळ्यांना सारखे फ्रॉक, सारखी परकर-पोलकी असायची. एकच ताग्यातले कपडे शिवले जात. शिवाय बऱ्याच वस्तू सामायिक असायच्या. मोठय़ा बहिणींच्या वस्तू लहान बहिणींना मिळायच्या. भांडणं, मारामारी, रडारडी व्हायची. त्यातली एखादी फटकळ असायची. पण ही भांडणं मोठय़ांपर्यंत क्वचित जायची. गेली तरी आईपर्यंतच.. वडिलांपर्यंत कधीच नाही.
यापकी कुणाच्याही मोठय़ा बहिणीचे लग्न असले की आम्ही धमाल करायचो. शिवाय या मोठय़ा बहिणी सणावाराला, बाळंतपणाला आल्या की घर कसे दणाणून जायचे. या ज्या तीन घरातील मुली आमच्या मत्रिणी होत्या त्यांना कुणाला एक, कुणाला तीन भाऊ होते. अर्थात मुलींपेक्षा मुलाचं कौतुक जास्तच व्हायचं आणि ते सर्वानी गृहीत धरलेलं असायचं.
त्यावेळी काहीच कळत नव्हतं. पण आता जाणवतंय की त्या सगळ्या मुली किती समंजस होत्या. सगळ्यांशी मिळून मिसळून वागायच्या. पण तशी वेळ आली तर फटकन काही तरी बोलून पण जायच्या.
कॉलेजमध्ये असतानाची एक आठवण. कॉलेज नुकतंच सुरू झालेलं. आगरकर नावाचे एक सर शिकवायला आले होते. त्यांनी सर्वाचा परिचय करून घेतला. मुलांनी, मुलींनी नावे सांगितली. आमच्या वर्गावर ते सर्वात शेवटी आले होते. मुलींनी नाव सांगितले की ते विचारायचे त्या सेकंड इयरच्या जामकर तुमच्या कोण? त्या पी.यू.सी.च्या खरवडकर तुमच्या कोण? असे त्यांनी प्रत्येक वर्गात प्रत्येकीला विचारले. शेवटी त्यातली एक जण म्हणालीच, ‘सर, आगरकर तुमचे कोण लागतात हो?’ सगळा वर्ग हास्यकल्लोळात बुडाला. सरपण हसले होते. त्या वेळी भर वर्गात एखाद्या मुलीने सरांना हे असं काही बोलायचं म्हणजे केवढी ही  िहमत!
कालांतराने कॉलेज संपलं. शिकत असतानाच कुणाकुणाची लग्नं झाली. त्या तीन घरांतल्या सात बहिणी लग्न होऊन एकवीस घरामंध्ये गेल्या. मुली सुसंस्कृत होत्या. त्यांना मात्र दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं झाली नाहीत. प्रत्येकीची मुलं हुशार निघाली. कुणाची मुले डॉक्टर, तर कुणाची इंजिनीअर तर कुणी प्रोफेसर, बिझिनेस, ऑफिस अशा वेगवेगळ्या उद्योगाला लागले.
विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही आम्ही काही जणी संपर्कात आहोत. ज्या संपर्कात नाहीत त्यांची माहिती इतरांकडून कळते. जुन्या आठवणी, जुन्या गप्पा निघतात आणि मन एकदम  ताजंतवानं होऊन जातं. आमच्या मुलामुलींना असे काही सांगितले की त्यांना या गोष्टींची गंमत  वाटते. हा असा आमचा सगळा मित्र परिवार बघितला की मुली म्हणतात, आई, कित्ती मत्रिणी गं तुझ्या.. आणि विशेष म्हणजे तुम्ही अजूनही संपर्कात आहात, फोनवर मधूनमधून बोलत असता . कित्ती छान!  
विचार करायला गेले की मलाच माझ्या या संपत्तीचा हेवा वाटायला लागतो. त्यावेळी माझी नात मात्र ‘डािन्सग प्रीन्सिस’ असलेली बार्बीची सी.डी. लावून एकटीच बसलेली असते.