साधेपणात माणूस आहे तसा उठून दिसतो. आपण जसे नाहीत तसे दाखविण्यासाठी करावी लागणारी यातायात माणसाच्या मूळ रूपाला बाधा आणते. जे आहे, जसे आहे ते झळाळून व्यक्तिमत्त्व उन्नत करण्याचे काम साधेपणा करीत असतो.
आजच्या जगात भपक्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. बाह्य़रूपावरून अनेकदा व्यक्तीची, वस्तूची किंमत केली जाते, त्यामुळे अनेकदा फसगत होते. जाहिरातीची दुनिया मोठी अजब आहे. जाहिरातीत दाखवले जाते, माझे कपडे साधे असल्यामुळे बुद्धिमत्ता असूनही माझी परदेशी जाण्याची संधी हुकली आणि ‘ब्रँडेड’ कपडे घालताच हुकलेली संधी पुन्हा चालून आली. पानमसाल्याच्या जाहिरातीतला मुलगा सांगत असतो, ‘‘माझेही स्वत:चे ऑफिस असावे असे स्वप्न होते. अमुक कंपनीचा पान मसाला खाल्ल्यामुळे ते पूर्ण झाले.’’ पानमसाल्याचा आस्वाद घेत तो बोलत असतो. तेव्हा मोठेपणाच्या संकल्पना परिश्रमात, साधनेत, बुद्धिमत्तेत न राहता भपक्याभोवती आणि वस्तूभोवती फिरू लागतात. बाहेर हॉटेलात जेवायला जाताना ते हॉटेल किती स्टार आहे, याचा आपण विचार करतो. विचित्र नावांचे महागडे पदार्थ मागवतो अन् चव नसलेल्या पदार्थाचे बिल देऊन बाहेर पडतो. मुलीसाठी तिच्या जीवनाचा साथीदार निवडताना त्याचा बंगला, गाडी, पगार या गोष्टींकडे प्राधान्याने पाहतो पण ज्याच्याबरोबर मुलीला आयुष्य काढायचे आहे, त्याचा स्वभाव आणि वर्तन कसे आहे याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. व्यक्तीचे बाह्य़रूप हाच आपल्या अनुमानाचा अनेकदा निकष असतो.
भव्यतेचे आणि दिव्यतेचे माणसांना वाटणारे आकर्षण स्वाभाविक असले तरी त्यामुळे साधेपणाचे मोल कमी होत नाही. अनेकदा वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेल्या, दिव्यांच्या लखलखाटात आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या एखाद्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपण केवळ भारावून जातो पण वाकून नमस्कार करावा अशी भावना मनात येत नाही. त्यापेक्षा एखाद्या साध्या मंदिरात कसलाही डामडौल नसतानाही समईच्या प्रकाशात उजळून निघालेल्या देवाचे दर्शन घेताना मनाला प्रसन्नता वाटते आणि हात जोडले जातात. लग्नकार्यात उंची कपडे आणि दागदागिन्यांनी नटलेल्या सुंदर स्त्रियांमध्ये साधेपणाने वावरणारी एखादी विदुषी अधिक उठून दिसते. एखाद्या घराचे इंटेरिअर इतके मनमोहक आणि भारावून टाकणारे असते की आपण घरात वास्तव्याला नसून हॉटेलात राहायला आलो आहोत असे वाटते. घराचे घरपण तिथे जाणवत नाही. साधेपणातले सौंदर्य भावणारे असते. ते चिरंतन राहते.
साधेपणातच जीवनाची स्वाभाविकता आहे. साधेपणा हे एक मूल्य आहे. साधेपणामुळे मोठेपणाला बाधा येत नाही. मोठेपणाला झळाळी आणण्याचे काम साधेपणा करीत असतो. त्यामुळे मोठय़ा माणसांचे साधेपण हा नेहमीच कौतुकाचा आणि औत्सुक्याचा विषय असतो.
समाजात अनेकदा आपण झकपक पोषाख करून वावरलो तरी समाजातील आपले स्थान, आपली प्रतिष्ठा अंगी असणाऱ्या गुणवत्तेवरून ठरते. स्वामी विवेकानंद भगवी वस्त्रे परिधान करून अमेरिकेत वावरले. आपल्या वक्तृत्वाने त्यांनी सर्वधर्म संमेलन जिंकले. अमेरिकेतल्या वास्तव्यात एका बठकीत विवेकानंदांचे मोठेपण सहन न झालेला एक विद्वान म्हणाला, ‘‘यांच्या पोषाखावरून हे गृहस्थ सभ्य वाटत नाहीत.’’ त्यावर विवेकानंद म्हणाले, ‘‘तुमच्या देशात माणसाची सभ्यता कपडे शिवणारे िशपी ठरवतात. आमच्या देशात माणसाची सभ्यता त्यांच्या चारित्र्यावरून ठरते.’’ हे एकून तो विद्वान दिङ्मूढ झाला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कलात्मक जीवन जगणारे रसिक होते. त्यांना सुंदर फाऊंटन पेन्स, नवे शब्दकोश, फिरावयास जाताना हाती घ्यावयाच्या काठय़ा यांचा संग्रह करणे आवडत होते. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाला एका अंगाने राजप्रासादाचे आणि दुसऱ्या अंगाने मठीचे रूप त्यांनी दिले होते. त्यांची अभ्यासिका, स्वयंपाकघर आणि विश्रांतीची खोली अतिशय साधी होती. पण त्यांचा दिवाणखाना आणि उरलेले घर सदैव सजवलेले असे. रंगीबेरंगी फुले, अधूनमधून अत्तराचे फवारे, अंगणात मन उल्हसित करणारे कारंजे असा डामडौल दिसे. एका पत्रकाराने डॉ. आंबेडकरांना विचारले, ‘‘बाबासाहेब, एकाच वेळी ही साधी आणि उच्च अशी दुहेरी राहणी कशासाठी?’’
त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘‘साधेपणा माझ्यासाठी! दिमाख तो माझ्या दलित बांधवांना आत्मप्रत्ययाची स्फूर्ती देण्यासाठी ! आपल्यापकी एक जण विद्य्ोच्या बळावर अशा ऐश्वर्याचा ध्वनी होतो हे दलितांच्या ध्यानात यावे यासाठी.’’ आंबेडकरांच्या विचारांची प्रगल्भता पाहून तो पत्रकार भारावून गेला.
प्राचार्य मामा दांडेकर हे एक संपन्न व्यक्तिमत्त्व होते. अंतरी निर्मळ आणि वाचेचे रसाळ असे वारकरी होते. १९४० मध्ये मामांना संस्थेने मुंबईच्या रुईया कॉलेजचे उपप्राचार्य म्हणून पाठवले. आपले नवे उपप्राचार्य वारकरी असल्याची बातमी विद्यार्थ्यांना माहीत झाली होती. हा वारकरी इंग्लिश कसे बोलणार, लॉजिक कसे शिकवणार अशी चर्चा सुरू होती. मामांची गंमत करण्याचे मुलांनी ठरवले. धोतर, सदरा, कोट, उपरणे, फेटा आणि कपाळावर गंध अशा वेशातले मामा वर्गात गेल्यानंतर मुले मोठय़ा बेहोषीत ओरडली, ‘‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’’ हा गजर संपताच मामा शांतपणे हसत मुलांना म्हणाले, ‘‘माझ्याकडे पाहून तुम्हाला देवाचे नाव घ्यावेसे वाटत असेल तर त्यामुळे देवालासुद्धा बरे वाटेल.’’ हे ऐकून मुले शांत झाली. त्यानंतर विचारांची पखरण करणारे मामांचे उस्फूर्त इंग्रजी वक्तृत्व ऐकून विद्यार्थी त्यांचे भक्त बनले. मामांनी बाहेर जाण्यापूर्वी मुलांना सांगितले, ‘‘दिसण्यापेक्षा माणसात काही तरी असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी समर्थ वचन लक्षात ठेवा, चातुय्रे शृंगारे अंतर। वस्त्रे शृंगारे शरीर। दोन्हीमध्ये कोण थोर। विचार करावा॥’’
ज्ञानयोगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राजदूत म्हणून रशियास गेले. कोट, धोतर आणि फेटा असा त्यांचा पेहराव पाहून पत्रकारांना गंमत वाटायची. रात्री लवकर झोपणारे, पहाटे लवकर उठणारे, शासकीय खानपान समारंभात न रेंगाळणारे आणि सतत पुस्तकात रमणारे डॉ. सर्वपल्ली स्टॅलिनच्या कुतूहलाचा विषय बनले. कोणालाही कधीही न भेटणारा स्टॅलिन दोन तास त्यांच्यापुढे एखाद्या निरागस बालकाप्रमाणे बसला आणि जाताना म्हणाला, ‘‘साधेपणातून प्रकटणाऱ्या उत्तुंगतेचे दर्शन मी तुमच्या रूपात आज पहिल्यांदा घेतले आहे.’’ सर्वपल्ली जेव्हा भारतात परत यायला निघाले तेव्हा त्यांचा हात हातात घेत सद्गदीत होऊन स्टॅलिन म्हणाला, “You are the first person to treat me as a human being not as a monster.” तेव्हा सर्वपल्लीही भावुक झाले.
पूर्वीच्या काळी साधेपणा, विद्वत्ता, सद्वर्तन आणि चारित्र्य हे प्रतिष्ठेचे निकष होते. आज हातातला मोबाइल, अंगावरचे कपडे, घातलेले दागदागिने, वापरत असलेली गाडी, ज्या परिसरात घर आहे त्या परिसराची बाजारातली किंमत, त्या व्यक्तीकडे असलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता यांवरून माणसाची प्रतिष्ठा ठरते. त्यामुळे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एखाद्या विद्वानाकडे दुर्लक्ष होते आणि भरधाव वेगाने महागडय़ा मोटारीतून जाणाऱ्या अज्ञानी माणसाकडे लोक माना वळवून पाहत राहतात.
‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा जीवनमंत्र मानणारे अनेक महापुरुष ही या देशाची श्रीमंती आहे. ‘Simplicity is the essence of universality’ असं बजावणारे आणि कमरेला केवळ पंचा गुंडाळणारे गांधीजी जगाच्या आदराचा आणि कौतुकाचा विषय होते. त्यांच्या दर्शनासाठी जनसागर उसळत असे. आनंदासाठी निर्माण केलेली पंचतारांकित संस्कृती हा सामाजिक प्रमाद आहे, असं गांधीजी म्हणत. हा प्रमाद करीत राहणे हीच आजची जीवनशैली झाली आहे.
साधेपणात माणूस आहे तसा उठून दिसतो. आपण जसे नाहीत तसे दाखविण्यासाठी करावी लागणारी यातायात माणसाच्या मूळ रूपाला बाधा आणते. जे चकाकते ते सगळेच सोने नसते. जे आहे, जसे आहे ते झळाळून व्यक्तिमत्त्व उन्नत करण्याचे काम साधेपणा करीत असतो. साधेपणाची जीवनशैली अंगीकारली तर केवळ व्यक्तिमत्त्वाचीच नव्हे तर जगण्याचीही उंची वाढेल.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…