07 August 2020

News Flash

सही रे सही!

सही, स्वाक्षरी, सिग्नेचर. डिकशनरीत अर्थ आहे, ‘अ पर्सन्स नेम, रिटन बाय हिमसेल्फ’. सह्य़ांच्या किती तऱ्हा..! कुणाची अक्षरे एका वर्तुळात बंद असतात. कुणाची सही म्हणजे

| April 20, 2013 01:03 am

सही, स्वाक्षरी, सिग्नेचर. डिकशनरीत अर्थ आहे, ‘अ पर्सन्स नेम, रिटन बाय हिमसेल्फ’. सह्य़ांच्या  किती तऱ्हा..! कुणाची अक्षरे एका वर्तुळात बंद असतात. कुणाची सही म्हणजे गिचमिड असते. कुणी सहीखाली टिंब काढतात. (का कोण जाणे!) कुणी शेवटी रेषा खाली सर्पासारखी नागमोडी नेतात. व्यक्ती तितक्या प्रकृती..!
मा गे एका बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून बोलावलं होतं. मी पण ऐटीत गेले. १० मिनिटाचं भाषण ठोकायचं, बक्षिसं द्यायची.. आहे काय आणि नाही काय..! पण तिथे पोचल्यावर माझा भ्रमनिरास झाला. स्टेजवर पाहुण्यांची ओळख करून दिली गेली. स्वागतगीत वगैरे सुरू झालं. आणि संयोजकांनी माझ्यासमोर एक गठ्ठा आणून ठेवला. मी म्हणलं, ‘हे काय!’ तर म्हणे, ‘स्पर्धकांना वाटायची सर्टिफिकेट्स आहेत. त्यावर तुमची सही करी.’ जवळजवळ १५०-२०० सर्टिफिकेट्स होती. अर्थात स्पर्धा मोठी होती. संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांनी निबंध पाठवले होते. विजेत्यांना बक्षीस, सर्टिफिकेटस दिली जाणार होतीच; पण ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला, त्यांनासुद्धा सर्टिफिकेटस दिली जाणार होती. माझ्याबरोबर आणखी दोन पाहुणे होते. पण त्यांना सह्य़ा ठोकायची सवय होती. त्यामुळे ते पटापट सह्य़ा करत होते. आणि मी? माझी सही कोरून काढत होते. त्यामुळे त्या पाहुण्यांची, प्रमुख वक्तयांची.. बाकी सगळ्यांची भाषणं झाली. मी मात्र आपली खाली मान घालून सही करतेय.. करतेय! आणि वर संयोजक म्हणले, ‘मॅडम, तुमचं संपूर्ण नाव कशाला लिहित बसलाय? सही ठोका ना! मी म्हटलं, ‘हीच माझी सही आहे.’
सही, स्वाक्षरी, सिग्नेचर म्हणजे नेमकं काय हो? डिक्शनरीत अर्थ आहे, ‘अ पर्सन्स नेम, रिटन बाय हिमसेल्फ’ म्हणजे एखाद्या व्यक्तीनं स्वत:चं लिहिलेलं नाव. पण समजा, मी पुस्तक विकत घेतलं किंवा वही विकत घेतली किंवा समजा एखादा अर्ज भरताना माझं नाव मी रकान्यात लिहिलं, तर ती माझी सही होईल का? ‘सही’ या शब्दाला अजून वेगळा अर्थ आहे. मला वाटतं, सही म्हणजे, केवळ बाळबोध अक्षरात आपलं नाव न लिहिता वैशिष्टय़पूर्ण लिहिणं. ‘ये आपुनकी साईन है। आपुनकी स्टाईल है।’
एखाद्याच्या सहीवरून म्हणे त्या व्यक्तीचा स्वभाव, सवयी कळतात. कॉलेजात असताना आमच्या ग्रुपमध्ये एका मुलीनं असा अभ्यास केला होता. शिवाय ती चांगली आर्टिस्टही होती. तिने उदार मनाने प्रत्येकीला तिच्या नावाची आद्याक्षर घालून अतिशय कलात्मक अशी सही बनवून दिली होती. ती बघून आपण फक्त ती गिरवायची. मी तिला म्हटलं, ‘माझ्या नावाची अशी सही बनवून दे जिच्यातून मी कलाकार, हुशार, आनंदी, महत्त्वाकांक्षी मनमिळाऊ वगैरे असतील नसतील तेवढे सगळे गुण माझ्यात आहेत हे लोकांना म्हणजे सहीवरून स्वभाव ओळखणाऱ्यांना कळू देत. मी ती सही छान गिरवेन.. (अगदी एक तुतारी द्या मज आणूनी, फुंकुनी मी ती स्वप्रेमाने.. भेदून टाकीन सगळी गगने.. दीर्घ तिच्या त्या किंकाळीने..च्या चालीवर)
तिने मला अतिशय सुंदर सही बनवून दिली. मी म्हटलं, ‘आता आधी परीक्षा आलीय, तर अभ्यास करावा. नंतर सही गिरवत बसावी.’ पण कसलं काय नि कसलं काय! परीक्षा झाल्यावर लगेच लग्नच ठरलं.. लग्न झाल्यावर नावच बदलून गेलं. म्हणजे माझं नाव वेगळं, मधलं नाव वेगळं, आडनाव वेगळं.. संपूर्ण नावच वेगळं झालं. कशी करणार ती सही मी आता? (स्त्री जन्मा ही तुझी कहाणी..!) शेवटी  लोकांना माझ्यात नसलेले गुण माझ्या सहीवरून दाखवून देऊन शाईनिंग मारण्याचं माझं स्वप्न अधुरंच राहिलं (हाय रे दैवा..!)
त्यावरून एक मजा आठवली. आमच्या परिचितांपैकी एक जण आहेत, त्यांची बायको पहिल्यांदा गरोदर राहिली. त्या माणसाने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यामुळे तिचे दिवस भरत आल्यावरचा त्याने आधीच मुहूर्त काढून ठेवला. त्या दिवशी त्या मुहूर्तावर बाळ जन्माला आलं, तर जगावर राज्य करणार होतं. बरोबर त्या मुहूर्तावर आपल्या बायकोचं सिझेरियन करायला डॉक्टरांना सांगायचं असं त्यानं ठरवलं.
पण कसलं काय.. तारीख दिली होती, त्याच्या आधीच किती दिवस तिच्या पोटात दुखायला लागलं. आणि त्या ज्योतिषाने काढलेल्या मुहूर्ताच्या चार दिवस आधी बाई बाळंतीण झाली.. सुंदर मुलगा जन्माला आला. पण तो जगावर राज्य करणाऱ्या मुलाचा मुहूर्त काही साधता आला नाही. तुम्ही ठरवणारे कोण?
तसंच झालं ना.. हं तर काय सांगत होते, लग्नानंतर बाईचं विशेष करून भारतीय बायकांचं पूर्ण नाव बदलतं. आधी बाईला प्रत्येक नावाची म्हणजे बदललेल्या स्वत:च्या नावाची, मधल्या नावाची, बदललेल्या आडनावाची सवय करून घ्यावी लागते. मग सही तयार करावी लागते. मग, ‘आता ही माझी सही आहे’, हे मनाशी घोकावं लागतं..
तर लग्नानंतर मैत्रिणीनं मला माझ्या नावाची इतकी सुंदर सही बनवून दिली. एस. अक्षराचं बदक केलं. दुसऱ्या एस. अक्षराचं बदकाचं पिल्लू केलं. वा! काय सुंदर सही दिसत होती.. माझ्याकडून घोटून घ्यायचा प्रयत्न केला. पण नाही जमलं बुवा..! परत मी आपली नेहमीसारखीच बाळबोध सही करू लागले. (नुकतंच वाचनात आलं की, सरळ सही करणारी माणसं स्वभावानं सरळ मनाची असतात.)
सह्य़ांच्या तर किती तऱ्हा..! कुणाची अक्षरे एका वर्तुळात बंद असतात. कुणाची सही म्हणजे गिचमिड असते. कुणी सहीखाली टिंब काढतात. (का कोण जाणे!) कुणी शेवटी रेषा खाली सर्पासारखी नागमोडी नेतात. व्यक्ती तितक्या प्रकृती..!
पण मला हे कळत नाही, सहीवरून स्वभाव सांगणारे नक्की कुठली सही बघतात? आपल्या सह्य़ा बदलत्या असतात बुवा. मध्येच मराठी भाषेचा अभिमान असणाऱ्यांनी दरडावून सांगितलं, ‘खरे मराठी असाल, तर मराठीत सही करत जा.’ तेव्हापासून मी मराठीत सही करायला लागले. तर बँकेनं माझा मी दिलेला चेक चक्क नाकारला. म्हणे सही मिळतीजुळती नाही. शेवटी बँकेची म्हणून आहे तीच सही कायम केली.
पण आता सिलेंडरवाला आला, सिलेंडरच्या रिसीटवर दिली आद्याक्षरं टाकून. कुरीयर घेताना.. तसंच पण तेच कुणी चाहत्यानं सही मागितली तर कोरून काढावी लागतेच ना..?
सही करताना सहसा म्हणजे इंग्रजी किंवा देवनागरीत दोन्हीमध्ये आपल्या नावाची आद्याक्षरे किंवा स्वत:च्या आणि वडिलांच्या किंवा पतीच्या नावाचे आद्याक्षरं आणि आडनाव पूर्ण लिहितात.
परवा काय झालं, घरी एक गृहस्थ आले. काहीतरी श्रीधर शेटय़े वगैरे नाव होतं. त्याच्या मुलाची नावं, अरुण आणि अनिकेत. त्या मुलांची आद्याक्षरं होणार ए. एस. एस. (.. म्हणजे गाढव) अरेरे! बिचारे कशी सही करतील? आमचे ते अच्युत दाते.. त्यांच्या मुलांची नावे माधव, भास्कर आणि शीला आहेत. मग त्यांची मुले मॅड (एम. ए. डी.), बॅड (बी.ए.डी.) आणि सॅड (एस. ए. डी.)च ना? काय हे!
फाल्गुनी लक्ष्मण यादवचं फ्लाय (माशी) होणार.
मराठीत तर त्याहून मजा. अरुण बबन बनसोडे.. अ.ब.ब.! नलीनी कपिल कोरडे ‘नक्को’..! हंसा मधुकर माने ‘हंममा’! कामिनी कुलकर्णी ‘काकू’. पण त्याहीपेक्षा सुलेखा सुळे.. ती आली की टारगट मुली म्हणायच्या ‘सुसु’ आली. आमच्या वर्गात एक मंगल किर्दत होती. तिला आम्ही ‘मंकी’म्हणायचो. त्यामुळे सहीमध्ये आद्याक्षरच फक्त घालणाऱ्यांनो सावधान..!
खरं तर कुणी नाव विचारलं की संपूर्ण नाव सांगायची आपली सवय.. वडिलधाऱ्यांनी लावलेलं वळण. पण हल्ली कोणी पूर्ण नाव सांगतात का? मधलं नाव गाळतात. वडिलांचं असू दे किंवा नवऱ्याचं असू दे.. मधल्या नावाची गरज वाटत नाही. इतकंच काय लग्न झाल्यावर सौ. म्हणजे सौभाग्यवती लिहिणार ना? पण हल्ली तेही लिहीत नाहीत. इंग्रजीत मिस किंवा मिसेस लिहितील, पण मराठीत कु. (कुमारी) किंवा सौ. अजिबात लिहीत नाहीत.
आजकाल तर म्हणे नोकरीवर घेताना अर्ज स्वत:च्या अक्षरात भरून द्यायचा असतो. अक्षरावरून आणि सहीवरून माणसाची पारख करायला भरपूर पगार देऊन तज्ज्ञ ठेवलेले असतात. आता मात्र सहीचा गंभीरपणे विचार करायला हवा.. जरा स्टाईल परत बदलावी का? नको.. नाहीतर कुणी अनुमान काढायचे, सारखी सह्य़ा बदलणारी व्यक्ती रंग बदलणाऱ्या सरडय़ासारखी असते. नकोच बुवा..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2013 1:03 am

Web Title: story of signatures
टॅग Story
Next Stories
1 बायकोची ‘किंमत’
2 प्रकाशनाला ‘धार्मिक ’ स्पर्श
3 अनुभव सद्प्रवृत्तीचे
Just Now!
X