07 July 2020

News Flash

कथा दालन : आठवणींच्या हिंदूोळ्यावर

वंदना अमेरिकेतून फक्त एक महिन्यासाठी औरंगाबादला आली होती. जवळपास चार वर्षांनी भारतात आली होती.

प्रिया आणि वंदना महाविद्यालयातली पाच र्वष नांदगावला एकत्रच होत्या शिकायला.

प्रज्ञा पंडित – pradnyapandit1@gmail.com

वंदना अस्वस्थ झाली होती. विचारांचं काहूर माजलं होतं मनात.  रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते, अशा वाटेनं जाणाऱ्या एसटी बसमध्ये तिचं अंगही मोडून आलं होतं. बस रडतखडत आपला रस्ता संपवत होती. शेजारच्या सीटवर एक लेकुरवाळी बाई आपल्या दोन लहानग्यांना खाऊ घालत होती. बहुधा माहेरी जात असावी, कारण मुलं कल्ला करत असतानाही अजिबात न चिडता हसतमुखानं त्यांना गोंजारत होती. समोरच्या सीटवरचे आजी-आजोबा खिडकीबाहेर बघत होते. अमेरिकेत १७ र्वष राहून वंदना आता तिकडचीच झाली होती. इकडची धूळ, माती, खड्डे याची तिला सवयच राहिली नव्हती. राहून-राहून ती आपल्या वस्तूंवरची धूळ झटकत होती. एवढय़ात तिची बस नांदगावच्या स्टॅण्डला पोहोचणार होती. वंदनाबरोबर तिची जिवलग मैत्रीण प्रियासुद्धा होती.

‘‘किती बदललं आहे गं सगळं.. इतक्या वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खरंच झालाय बदल?’’ वंदना म्हणाली.

प्रिया हसत म्हणाली, ‘‘अगं, तू नाही का या सतरा वर्षांत बदललीस? मग आम्हीही बदललो.’’

‘‘खरं आहे तुझं..’’ वंदनानं विषयच संपवला. आपण उगाचच जातोय नांदगावला.. जाऊ, की मागे फिरू, या विचारानं तिचं डोकं भंडावून गेलं. अचानक उठून ती प्रियाला म्हणाली, ‘‘परत जाऊया का आपण औरंगाबादला? माझं मन का कोण जाणे तयार होत नाहीये पुढे जायला.. चल उतरू.. परत जाऊ. दुसरी कामं संपवून टाकीन म्हणते मी.’’

‘‘वेडी आहेस का गं?.. मधुरा आली पण असेल स्टॅण्डवर आपल्याला न्यायला,’’ प्रिया जरा कातावूनच म्हणाली.

वंदना अमेरिकेतून फक्त एक महिन्यासाठी औरंगाबादला आली होती. जवळपास चार वर्षांनी भारतात आली होती. त्यामुळे कमी वेळात सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारीपाजारी, सासर-माहेर अशा सगळ्या गोतावळ्याला भेटायचं होतं. त्यात गावची जमीन विकायचं दादा म्हणत होता. तो व्यवहारही वेळेत पूर्ण करायचा होता. त्यातच अचानक हे ठरलं, प्रियाबरोबर नांदगावला जायचं. तेही ती भेटली बाजारात, भारतात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणून.

प्रिया आणि वंदना महाविद्यालयातली पाच र्वष नांदगावला एकत्रच होत्या शिकायला. अगदी जिवलग मैत्रिणी. त्यामुळे वंदनाला भेटल्या-भेटल्या प्रियानं ठरवून सुद्धा टाकलं, की दोन दिवस नांदगावला जायचंच. आठवतील त्या मित्र-मैत्रिणींचे फोन नंबर शोधले. बाकीच्या सगळ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवले. जायचं पक्कं  केलं आणि निघाल्याही.. बोलता बोलता बस स्टॅण्डला लागली. मधुरा भेटली.  तिघींच्या गळाभेटी झाल्या. त्या थेट मधुराकडेच जाणार होत्या राहायला. खरं तर अमेरिकेला गेल्यापासून कुणाकडे जाऊन राहायची वंदनाची सवयच मोडली होती. थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं.  त्यांची रिक्षा मधुराच्या घराजवळ थांबली. त्या रात्री कुणीही झोपलं नाही. मधल्या काळात आयुष्यात घडलेल्या घडामोडी एकमेकींना सांगण्यातच वेळ कमी पडला. परदेशात स्थायिक झालेल्या लोकांच्या बाबतीत सगळ्यांना जी उत्सुकता असते तीच त्या दोघींच्या मनात वंदनाच्या बाबतीत होती. वंदनाला तिथे आवडतं का, भारताची आठवण येते का, तिकडे ती रोजच्या स्वयंपाकाचं कसं करते, असे अनेक प्रश्न मधुरा आणि प्रिया न थकता तिला विचारत होत्या. वंदनाही भरभरून बोलत होती तिच्या सख्यांबरोबर.

भूतकाळातल्या आठवणींमध्येही त्या रमल्या. महाविद्यालयात असताना वर्गाना दांडी मारून केलेल्या सहली, खाल्लेले बटाटेवडे आणि कटलेट, कुणाकुणाबरोबर झालेली भांडणं, कुणाची प्रेमप्रकरणं, किती तरी विषय होते. ‘‘ए, कोण-कोण आहेत गं इथे आपल्या वर्गातले?’’ वंदनानं मधुराला विचारलं.

‘‘खूप आहेत. उद्या भेटू सावकाश. सगळ्यांना आधीच तसं कळवलं आहे मी,’’ मधुरा म्हणाली.

‘‘तू जयंतच्या घरी जाणार असशील ना?’’ अचानक मधुरानं वंदनाला विचारलं.

‘‘अर्थातच. आता बघवत नाही त्याचा भिंतीवर लावलेला फोटो. त्या काळातली आमची घनिष्ट मैत्री सगळ्यांच्याच चर्चेचा विषय झाली होती.’’ वंदना म्हणाली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर वंदनाचं कुटुंब नांदगाव सोडून औरंगाबादला स्थायिक झालं होतं. जयंत अधूनमधून भेटायला यायचा, पत्रही पाठवायचा. वर्षही नसेल झालं आणि अचानक त्या बातमीनं सारं बदललं. मित्रांबरोबर दिल्लीत फिरायला गेलेला जयंता बसच्या अपघातात हे जग सोडून गेला. वंदनाला समजल्यावर मिळेल ती गाडी पकडून ती धावली होती नांदगावला. त्याच्या जाण्यानं दु:खाचा डोंगर कोसळला होता त्याच्या घरावर.. त्याच्या आईबाबांवर.. नीलेशच्या- जयंतच्या भावाच्या खांद्यावर मान टाकत तिनं दु:खाला वाट मोकळी करून दिली होती.

त्यानंतर या गावात ती परतली नव्हती. पण जयंताच्या घराचा तीही एक घटक झाली. अधूनमधून पत्र, फोनवर आस्थेनं चौकशी करत राहिली जयंतच्या आई-बाबांची. पण मग अमेरिकेला गेल्यानंतर हळूहळू सगळं कमी झालं, आणि मग थांबलंच.

‘‘नीलेशला सांगितलं आहे मी, तू येणार आहेस ते.’’ मधुराच्या वाक्यानं वंदना विचारातून जागी झाली.

‘‘कधी येणार आहे तो? नाही तर मीच सकाळी जाऊन भेटून येईन म्हणत होते,’’ ती म्हणाली.

‘‘रात्रीच चक्कर टाके न म्हणाला होता. नऊ वाजले आहेत ना, येईल कदाचित अजूनही..’’

पण तो आलाच नाही. थोडी अस्वस्थ झालीच  वंदना. जयंत असता तर झालं असतं असं? धावत-पळत आला असता. जयंताची आई फार आवडायची तिला. त्याही मुलीसारखं कौतुक करायच्या तिचं. तिचा बराच वेळ जयंताच्याच घरी जायचा.

सकाळी उठून, आवरून ती नीलेशची वाट पाहात गॅलरीत उभी राहिली. तेवढय़ात समोरून भरभर चालत येणारी आकृती ओळखीची वाटली म्हणून ती टक लावून पाहात राहिली. जयंता?.. छातीत धस्स झालं तिच्या. कितीदा तरी कुठून तरी अचानक तो समोर उभा ठाकेल असं नेहमी वाटायचं तिला. इतक्या वर्षांत तो या जगात नाही हे सत्य ती स्वीकारू शकली नव्हती.

‘‘रात्रीच यायचं होतं, पण घरी आलो उशिरा. आई म्हणाली,  सकाळी जा लवकर. कशी आहेस? चल आता आमच्याकडे..’’ नीलेशला खूप आनंद झाला होता.  किती बोलू आणि किती नको, असं झालं होतं त्याला.

वंदना कानात जीव गोळा करून ऐकत होती. कधी एकदा जयंताच्या घरी पोहोचतोय असं झालं होतं तिला. त्यांचं घर तरुण आणि कर्त्यां-सवरत्या मुलाला मुकलं होतं, तसाच तिनंही तिचा परममित्र गमावला होता. त्या वेळी त्या घराचं दु:ख सर्वानी गृहीत धरलं, पण तिचं दु:ख कुणी समजून घेतलं नव्हतं. कितीतरी दिवस ती आतल्या आत गुदमरत राहिली होती. पण नंतर तिचं तिलाच वाटून गेलं होतं, की आपल्याला कुठे सिद्ध करायचीय त्याची आणि आपली मैत्री.. मनाची समजूत पटल्यावरच ती शांत झाली होती..

जयंत गेल्याचं कळल्यावर फार एकटं पडल्यासारखं वाटायचं तिला बरेच दिवस. दोन दिवस पत्रांचा गठ्ठा उलगडून बसली होती ती. ‘‘तुझं आणि माझं नातं काय आहे कुणास ठाऊक, पण मागच्या जन्मात बहीण असावीस बहुधा माझी तू.. काय दादागिरी करतेस गं..’’ ‘‘तुझ्याशी गप्पा मारताना मी स्वत:शीच बोलतोय असं वाटतं मला..’’ ‘‘तू माझ्या आयुष्यात आलीस ती मैत्रीण म्हणून. पण हळूहळू भाऊ, बहीण अशी सगळी नाती मला तुझ्यातच सापडली.’’ त्याची वाक्यं त्यांच्या नात्याचा तळ शोधत राहिली..  ती पत्रं वाचताना ती हमसून हमसून रडली होती. त्यानं तिला जेवढं समजून घेतलं होतं तेवढी ती मात्र त्याला समजून घेऊ शकली नव्हती या दु:खानं वेडंपिसं व्हायला झालं तिला. ‘‘नको होतंस असं तडकाफडकी जायला तू. अरे, लक्षात आलं असतं माझ्या, की मी स्वत:भोवतीच गिरक्या घेतीय. पण सवडच नाही दिलीस तू मला..,’’ तिला वाटलं होतं.

नीलेशला पाहिल्यावर मनातल्या विचारांबरोबर कुठल्या कुठे भरकटली ती. मधुराच्या घरातल्या माणसांबरोबर तो इकडचं तिकडचं बोलत होता.

‘‘तू चांगलं केलंस वंदना. बाहेर पडलीस इकडून. अमेरिका काय म्हणतेय?.. किती वर्ष झाली गं तुला तिकडे जाऊन? मी पाठवलं होतं तुला एक पत्र. पण नंतर नाहीच झालं लिहिणं,’’ घडाघडा बोलणारा नीलेश तिला वेगळाच वाटत होता. नेहमी अलिप्त, अबोल असलेला. आज मात्र भडभडून बोलणारा. जयंतासारखा!  तिला एकदम जवळचा वाटला तो.

जयंताच्या जाण्यानं नीलेशमध्ये हा फरक पडला असेल का?

जयंतच्या घरी पोचल्यावर तिची नजर चाहूल घेत राहिली. काही तरी शोधत राहिली. कुणाच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेत. समोरच असलेल्या जयंतच्या फोटोकडे तिनं पाहिलं मात्र, छातीत एक कळ उठली. तिला किती तरी बोलायचं होतं जयंताबद्दल. पण मन अस्वस्थ झालं होतं. तो असताना त्या घरची लेकच असल्यासारखी हक्कानं वावरलेली ती आज गोंधळून, बावरून परक्यासारखी उभी होती. अंतर राखून त्याच्या आईशी बोलत राहिली. आठवणींची उजळणी झाली. कोण कोण भेटतं, सगळी जण कशी आहेत, असं वरवरचं बोलणं चाललं होतं. क्षणभर तिला वाटून गेलं, की नाही म्हटलं तरी जखमेवर खपली धरली आहे. आज आपण आल्यामुळे ती खसकन ओढल्यासारखं तर नाही ना झालीय?  काळ काही कुणासाठी थांबत नाही. त्याच्याबद्दलच्या आठवणी त्याच होत्या, पण तो गेल्यानंतर खूप काळ गेला होता. तिला मात्र जयंतच्या आठवणींनी घेरून टाकलं होतं. नाक्यावर गेलेला नीलेश परत आला तेव्हा जरा शांत वाटलं तिला.

‘‘चल, एक चक्कर मारून येऊ. मग कळेल तुला नांदगाव किती बदललंय,’’ तो म्हणाला. तिला खूप छान वाटलं. त्याच्या आपुलकीनं ती सुखावली. नीलेशचं हे रूप तिला नवीन होतं. नाही म्हटलं तरी ती थोडीशी अस्वस्थ होतीच. किती म्हटलं तरी नीलेश, जयंताची जागा कसा घेऊ शकणार? पण त्याच्यासारखेच प्रश्न, त्याच्याचसारखं तिच्या मनातलं ओळखून एकेका ठिकाणी तिला घेऊन जाणं, आणि तरीही ‘तो असता तर..’ असा आपण विचार करतो आहोत, या जाणिवेनं ती बावरली. पण न राहावून म्हणाली, ‘‘तू बदललास नीलेश..’’

तो हसला. ‘‘त्या वेळेस माझं विश्व वेगळंच होतं गं.. मला कल्पना आहे तुला आश्चर्य वाटत असेल आता मी तुला नेतोय सगळीकडे, स्वत:हून. पण त्या वेळेस मी पार गुंतून गेलो होतो माझ्या कामांमध्ये. एकेका प्रसंगात आपल्या वाटणाऱ्या माणसांची खरी ओळख समजते. लक्षात येतं, आपण चुकीच्या ठिकाणी गुंतलो. एकदा हे लक्षात आलं, की त्रास होतो. हळूहळू दरी रुंदावते..  मग पुन्हा शोध नात्यांचा, माणसांचा, मैत्रीचा. हल्ली-हल्ली जाणवायला लागलंय, की जयंताच्या मित्रमैत्रिणींत मी सहज सामावून जातो. तीच जवळची वाटतात मला.’’

वंदना त्याच्याकडे बघत राहिली. त्या वेळेस जयंतचा मोठा भाऊ म्हणून केवढं आकर्षण होतं सगळ्यांना त्याचं. तो मात्र त्याच्याच तोऱ्यात. तुटक, अलिप्त. त्यांच्या घरी गेलं, की कितीदा तरी तो बोलायचाही नाही. आज त्याच्याकडून हे ऐकणं कठीण जात होतंच, पण त्यापेक्षाही ते स्वीकारणं फारच अवघड होतं. तिला वाटलं, ओरडून सांगावं त्याला, की नको प्रयत्न करू तू जयंतची जागा घेण्याचा. तू होतास तसाच राहा. आपल्याच धुंदीत. फार केविलवाणा वाटतोस असा तू. प्रत्यक्षात मात्र ती बोलून गेली, ‘‘जयंताच बरोबर आहे असं वाटतंय मला आज.’’

नीलेश एकदम गप्प झाला.

रात्री त्याच्या घरच्यांनी आग्रह करूनही ती थांबली नाही. तिला सोडायला आलेल्या नीलेशबरोबरही तिला फार बोलावंसं नव्हतंच वाटत. मधुराकडे तिला सोडल्यावर उद्या स्टेशनवर येतो, असं सांगून त्यानं तिचा निरोप घेतला. रात्र जागवून प्रिया आणि मधुरा गप्पा मारत राहिल्या. तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत राहिल्या. पण झोप येतेय, म्हणत तिनं बोलणं टाळलं. स्वत:च्याच मनाला विळखा घातल्यासारखी मूक होऊन गेली.

सकाळी नीलेश लवकरच आला. मधुराचा निरोप घेऊन प्रिया आणि नीलेशबरोबर ती रेल्वे स्टेशनवर पोहोचली.

‘‘आता केव्हा येणार तू? जयंता असता तर खूश झाला असता..,’’ नीलेशच्या डोळ्यांत पाणी तरळल्यासारखं वाटलं तिला.

‘‘नीलेश, जयंत व्हायचा नको रे प्रयत्न करू.

तू आहेस तसाच राहा,’’ त्याचे दोन्ही हात हातात घेऊन सांगावंसं वाटत होतं, पण ती फक्त पाणावल्या डोळ्यांनी पाहात राहिली.

‘‘येईन रे, नक्की येईन भारतात आले की..’’ पुढे काही बोलण्याआधीच गाडी आली. गाडीनं वेग घेतला तशी ती हात हालवत राहिली. गजांमधून दिसेल तितकं ती नीलेशला डोळे भरून साठवून घेत होती.

जयंताला तर काळानं हिरावून नेलं होतंच, पण जयंतानं जाता-जाता नीलेशलाही सोबत नेलं होतं. सतरा र्वष ‘एकदा तरी नांदगावला जायला हवं,’ म्हणणारी वंदना आता पुन्हा कधीही इथे येणार नव्हती..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 1:31 am

Web Title: story of vandana katha dalan dd70
Next Stories
1 चित्रकर्ती : बंधन बांधणीचं!
2 महामोहजाल : माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आपण…
3 जग बदलण्याची संधी!
Just Now!
X