‘तुमची अक्कल फक्त चुलीपुरती’ हेच त्यांनीही लहानपणापासूनच ऐकलं होतं, पण पुढे जाऊन ते खोटं ठरवणाऱ्या  कोल्हापुरातल्या मानकरवाडीतील या स्त्रिया! त्यांनी संपूर्ण वाडीचाच कायापालट केला तो स्वकर्तृत्वावर! जयश्री मानकर आणि त्यांच्या १२ जणींच्या ‘सरस्वती महिला बचत गटा’ने दूध डेअरी सुरू केली. गावातील व्यसनाधीनता कमी केली. आज येथील प्रत्येक स्त्री आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र आहे. एकत्र येऊन महिला काय करू शकतात, याचे हे उत्कृष्ट उदाहरण. आजच्या महिला दिनानिमित्ताने खास..
टी कात्मक प्रतिक्रियांना छेद देत वाटचाल करणाऱ्या, विधायक कामाचा आणि स्वत:साठी, गावासाठी काही चांगलं करण्याचा ध्यास घेतलेल्या स्त्रिया इतर अनेकींसाठी आदर्श ठरतात. शाहूवाडी तालुक्यातील मानकरवाडीच्या सरस्वती महिला बचत गटाच्या या बाराजणी त्यापैकीच काही! जयश्री बाबासाहेब मानकर त्यांची नेता. एखादी अल्पशिक्षित ग्रामीण भागातील गृहिणी चार महिलांना एकत्र करून परिस्थितीशी झगडत या महिलांच्यात आत्मविश्वास निर्माण करते, फक्त महिलांची दूध डेअरी चालवते हे उदाहरण इतर अनेक महिलांना प्रेरणा देणारे निश्चितच आहे.
ग्रामीण स्त्रीला संधी-सुविधा सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. तिचा रोजचा दिवस कष्टाचा, संघर्षांचा, शेण-गोठा, चळण-काटूक, अनेकदा व्यसनाधीन नवरा, कटकटी सासू, किरकिरणारी पोरं, मजा बघणारे, चालत्या गाडीला खीळ घालणारे शेजारी नातेवाईक असा असतो. या सगळय़ा आव्हानांना अंगावर घेत ग्रामीण स्त्रीचा संसार सुरू असतो. ग्रामीण स्त्री गुणवत्ता जिद्द, परिश्रम या बाबतीत कशातच कमी नसते. परंतु असणारी आव्हाने आणि संधीची सुलभता यांच्या मर्यादा लक्षात घेऊनच परावलंबत्वाकडून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत असते. किलकिलत्या फटीतून डोकावणाऱ्या संधीचं स्वागत करत असते.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका. स्वातंत्र्याच्या पासष्ट वर्षांनंतरही या तालुक्यातील वाडय़ा-वस्त्यांवर विकासाची गंगा पोहोचली नाही. दुर्गम डोंगराळ भाग, वाडय़ा-वस्त्यांवर विखुरलेली गावं-घरं, पाणी, वीज, शिक्षण यांच्या उपलब्धतेचा अभाव. धुळीनी भरलेले कच्चे रस्ते, दारात गोठा, मातीची पुटं चढलेली दारं-घरं, कर्त्यां पुरुषांनी रानात राबायचं नाही तर नोकरीसाठी शहराकडे धावायचं. महिलांचं शिक्षण यथातथाच. आणि एखादी सासुरवाशीण शिकलेली असली तरी तिच्या शिक्षणाचा उपयोग खेडय़ात काय होणार? पोरवडा, घर सांभाळत तिला रानात जावं लागतं. जयश्री त्यापैकीच एक. माहेर करमाळे (ता. बत्तीसशिराळा जिल्हा. सांगली) १९९७ साली दहावीत असताना लग्न झाले. हिंदी, गणित विषयात तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली तरतरीत जयश्री. लग्नानंतर माहेरी राहून बारावीपर्यंतच शिक्षण पूर्ण केले.  नवरा तारापूर-मुंबई येथे एका कंपनीत कामाला. सासऱ्यांना पॅरालिसिस झालेला. माहेरी, सासरी स्त्रियांनी, मुलीनीं बाहेर जाण्याची, चारचौघात वावरण्याची पद्धत नाही. डी.एड. करण्याची जबरदस्त इच्छा, पण त्यावेळी फीसाठी ४० हजार रुपये देणे शक्य नसल्याने प्रवेश रद्द केला. रस्ता नसलेला भाग, एस.टी. तर अजूनही या वाडीत येत नाही. जयश्रीचा संसार सुरू झाला. त्यातच नवऱ्याची कंपनी बंद पडली, नोकरी गेली. धडपडय़ा जयश्रीला काही तरी करावे असे सतत वाटायचे. आपल्या शिक्षणाचा उपयोग होत नाही. छोटय़ा गावात नवीन काही शिकता येत नाही. दोन लहान मुले, शेतीचा खटाला. घुसमट सुरूच. जयश्री शेतात जायला लागली. रानात राबू लागली. २००२ साली एका योजनेअंतर्गत ‘निरंतर शिक्षण केंद्रात’ साहाय्यक म्हणून जयश्रीची निवड झाली. घराबाहेर पडायला मिळतंय, चार घरच्या बाया-बापडय़ांशी बोलता येतंय, त्यांची गाऱ्हाणी समजतात आपल्या शिक्षणाचा थोडाफार उपयोग होतोय. यामुळे जयश्री सुखावली. काम नेटाने व हौसेने करू लागली. कामाचा मोबदला महिना ५०० रुपये मिळायचा. कामापेक्षा जयश्रीला स्त्रियांमध्ये मिसळता, बोलता येते याचा आनंद झाला. जयश्रीला स्वत:ला एक ओळख मिळाली. वेगळं करण्याची उमेद निर्माण झाली. जयश्री आता ‘आशा’चे, ग्रामीण नर्सचे काम करते.
२००३ मध्ये ग्रामसेवक जोशी यांनी बचत गटाच्या प्रशिक्षणासाठी जयश्रीला शाहूवाडीला पाठविले. त्या बचत गटाची कार्यपद्धती, बचतीचे महत्त्व, स्त्रियांचे नियमित एकत्र येणे, परस्परांशी संवाद याचे महत्त्व कळले. गावी आल्यावर बायकांच्या बचत गट काढण्यासाठी मानकरवाडी, सोनवडेतील अनेक जणींना भेटली. ‘आपण बचत गट काढू या. रोज एक रुपयाप्रमाणे महिना ३० रुपये भरा. स्वत:साठी काही तरी करू या, चला घराबाहेर पडा.’ जयश्रीने कितीही समजावले तरी स्त्रियांचा प्रतिसाद थंड. ‘महिन्याला ३० रुपये आणायचे कुठून? लई आली श्याणपण शिकविणारी. आमास्नी नायबा वेळ?’ व्यवधानांनी जखडलेली स्त्री शरीरआणि मनावरचा अन्याय सहन करत वाटय़ाला आलेलं आयुष्य भोगत राहते. पुढे जाण्याची उमेद, आत्मविश्वास तिच्यात नसतो.
जयश्री हरली नाही. तिनं ‘सरस्वती महिला बचत गट’ सुरू केला. स्वत: अध्यक्ष झाली. आनंदी यादव सचिव झाली आणि मंगल यादव, हिराबाई मानकर, सुनीता मानकर, आक्काताई यादव, सखुबाई मानकर, शारदा पाटील, सविता मानकर अशा बाराजणींचा बचत गट सुरू झाला. बैठका होऊ लागल्या. चर्चा घडू लागल्या. स्त्रिया एकत्र येऊन बोलू लागल्या. लग्न, आजारपण, शिक्षणासाठी कर्ज घेऊ लागल्या. पैशांची परतफेड कशी करायची याचे गणित मांडू लागल्या. समाजाच्या भोचक नजरांतून, तिरकस टोमण्यांतून स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड करू लागल्या. पंखांना एकीचे बळ लाभले.
मानकरवाडीच्या स्त्रियांना घरातले दूध डेअरीला घालण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ सोनवडेत जायला लागयचं. कामाची घाई, अर्धवट स्वयंपाक, काखेला किरकिरणारं पोर, हातात किटली आणि वेळत दूध घालण्याची धडपड. रोजच्या दगदगीने स्त्रिया कावल्या. यावर उपाय काय! आपणच एखादी दूध डेअरी सुरू केली तर? एक विचार- कसे जमणार आपल्याला? निराशावादी सूर! शेवटी बाराजणींच्या उमेदीला यश आलं. २०१० मध्ये ‘सरस्वती महिला दूधसंस्था’ सुरू झाली. परावलंबित्वाकडून स्वावलंबनाकडे प्रवास सुरू झाला. ‘मला कसं जमणार?’चा न्यूनगंड कमी झाला. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळू लागली. स्त्रियांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज आले. मनातील नकारनाथाला दूर सारून पिढय़ान्पिढय़ांच्या परंपरेला छेद देत बायका शेण-गोठा करत धारा काढू लागल्या. आपल्याच डेअरीला दूध घालून महिन्यातून तीनदा दुधाचे पैसे घेऊ लागल्या. वारणा दूध संघाची दूध संकलनाची गाडी आल्यावर स्वत: लक्ष घालून दूध वेळेत देऊ लागल्या. संस्थेचे ऑफिस थाटले. वाडीतल्या दोन गरजू तरुणांना हिशेबाचे काम दिले. १९ हजाराचे फॅट मशीन घेतले. मानकरवाडीतील स्त्रियांच्या कर्तृत्वाची चर्चा पाच-दहा मैलाच्या परिसरातील वाडय़ा-वस्त्यांवर होऊ लागली. मानकरवाडी आदर्श बनली. घरच्यांचा पाठिंबा वाढला. गावच्यांचा विरोध मावळला- ‘मानकरवाडीच्या बायकास्नी काय काम नाही. निसत्या फिरत्यात?’ असे म्हणणारे याच स्त्रियांचे, वाडीचे गुणगान गाऊ लागले. ग्रामीण भाग बदलला तर देश बदलेल. बायकांच्या हाती अर्थसत्ता आली तर घराचा, गावचा कायापालट होईल याचे प्रत्यंतर आले. गाव सुखावला.
गावात जागृती कार्यक्रम सुरू झाले. मानकरवाडी निव्र्यसनी झाली! ‘गावातलं एक प्वार गुटखा खाईत नाही’ हे इथल्या आजीबाईंचे सांगणे. स्वयंसिद्धा कोल्हापूर आयोजित ‘हेल्थ कँप’मध्ये ३०-३५ बायकांनी हजेरी लावली. पैकी २० जणीनी गर्भाशयाच्या कर्करोगाची पॅपस्मिअर टेस्ट करून घेतली. स्त्रियांचा उत्साह प्रचंड वाढला. आमच्या वाडीला कोणतीही स्कीम द्या. आम्ही चांगली राबवून दाखवूच याचा धोशा लावण्या इतपत त्यांच्यात आत्मविश्वास आला.
१५ ऑगस्टला मलकापूर, बांबवडय़ात जाऊन जिलेबीचा स्टॉल लावला. इतकंच नव्हे तर शेतात पिकविलेली भाजी मेथी, पोकळा, पालक, कोथिंबीर, गाजर जाऊन विकू लागल्या. गेली तीन वर्षे गावात सत्संग सुरू आहे. त्यांच्या हिंदी कीर्तन, अभंगाचे वाचन ठरावीक वेळी एका घरात केले जाते. स्त्री-पुरुष मुले सर्व जमतात. ऐकतात. ध्यान करतात. गावातील भांडणे, व्यसनाधीनता कमी होऊन वाडी सन्मार्गाकडे वाटचाल करू लागली.
मानकरवाडीत एकूण २९ घरे. ४०० लोकसंख्या असलेल्या गावाचा कायापालट जयश्री आणि तिच्या १२ सख्यांनी केला आहे. या महिलांना आपले कार्य वाढवायचे आहे. वाडीसाठी रॉकेल डेपो हवा आहे. पापड केंद्र पाहिजे, आदर्श गाव स्कीम राबवायची आहे. पशुखाद्य वेळेवर मिळावे. दूधसंकलन वाढवायचे आहे. आज वार्षिक उलाढाल कमी आहे. आगामी काळात त्यात वाढ करायची आहे. या महिलांच्यात जिद्द आणि उत्साह भरपूर आहे. कष्टाची तयारी आहे. बाई म्हणून वाटय़ाला आलेले आयुष्य समर्थमणे पेलत संगठन शक्तीच्या जोरावर बायकाही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात, यशस्वी होतात हा संदेश मानकरवाडीच्या महिलांच्या धडपडीतून मिळतो. प्रत्येक गावातून अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया निर्माण होत आहेत. गावाची प्रगती, त्यातून जिल्ह्य़ाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती होत आहे. स्त्री कर्तृत्वाचा हा नवा चेहरा निश्चितच आशादायी आहे.    

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी