28 February 2021

News Flash

अपयशाला भिडताना : अल्पविराम

अपयश आणि यश हे जगण्यातले अविभाज्य घटक आहेत.

अपयशाचा अर्थ कळल्याशिवाय किंवा अपयश पचवल्याशिवाय यशाची खुमारी कळत नसते. मात्र ते कळण्यासाठी शहाणपण लागतं.

योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

अपयश आणि यश हे जगण्यातले अविभाज्य घटक आहेत. अपयशाचा अर्थ कळल्याशिवाय किंवा अपयश पचवल्याशिवाय यशाची खुमारी कळत नसते. मात्र ते कळण्यासाठी शहाणपण लागतं. ‘अपयशाला भिडताना’ हे सदर याच समंजस शहाणपणाचा स्वीकार करत जगण्यातल्या विविध अपयशाला, मग ते नात्यातलं असो, माणसांना समजून घेण्यातलं असो, कार्यालयीन तडजोडीमधलं असो वा आपल्याच मनातले गुंते सोडवण्यातलं असो, त्यांना कसं भिडता येऊ शकतं हे कथारूपानं सांगत गेलं. आज हे सदर संपत असलं तरी आपलं अपयशाशी सामना करणं सुरूच राहणार आहे.. त्याला भिडलात तर उत्तम..

या लेखमालिकेतला हा शेवटचा लेख लिहिताना जसं विलक्षण समाधान आहे, तसंच दर पंधरा दिवसांनी होणारा आपला संवाद थांबणार याचीही थोडी हुरहुर आहे, हे मी मोकळेपणानं मान्य करतो. गेलं वर्षभर सुरू असलेली ही लेखमाला माझ्यासाठी एक ‘रोलरकोस्टर राइड’ ठरली. असं म्हणण्याचं कारण वर्ष २०२०. जिथे २०२० च्या तडाख्यात संपूर्ण जग सापडलं तिथे ही लेखमाला तरी कशी अपवाद असेल?

वर्तमानपत्र प्रकाशित होऊनही ‘करोना’च्या भीतीमुळे त्याचं वितरण न होणं, वितरणाला सुरुवात झाल्यावरही अनेकांनी वर्तमानपत्र न घेणं, विचित्र परिस्थितीमुळे जगण्याचा संघर्ष वाढल्यानं वाचन हे अत्यंत स्वाभाविकपणे कमी होणं.. असे विविध चढउतार या लेखमालेनंही पाहिले. पण या सगळ्या परिस्थितीत ‘लोकसत्ता’ आणि ‘चतुरंग’ची टीम मागे हटली नाही. वर्तमानपत्रांचं प्रकाशन, वितरण यांच्यावर परिणाम झालेला असतानाही ‘डिजिटल’ माध्यमातून ‘लोकसत्ता’चं प्रकाशन होत राहिलं आणि लेखमाला सर्वांपर्यंत पोहोचली. लिहिणाऱ्या हाताबरोबरच ते लिखाण वाचकापर्यंत पोहोचवणारे अनेक हात किती जास्त महत्त्वाचे असतात याची प्रचीती या निमित्तानं आली. तेव्हा सर्वप्रथम ‘लोकसत्ता-चतुरंग’च्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार. टाळेबंदीच्या अत्यंत संघर्षपूर्ण परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवरही या लेखमालेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाचा अनुभव कायमच मनात राहील आणि हे श्रेय लेखमालिकेशी निगडित सर्वाचं आहे, हे निश्चित.

आज लेखमालेचा समारोप करताना, वर्षभरातला अनुभव थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. नेहमीच पोरकं असणाऱ्या अपयशाबद्दल लिहिलं गेलं पाहिजे, आपल्याला आलेलं अपयशही आपलंच असल्यामुळे त्याला आपलं म्हणता आलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयशाकडेही अत्यंत सकारात्मक दृष्टीनं पाहता आलं पाहिजे, हे लेखमालेमागचे मुख्य उद्देश होते. ‘अपयशाला भिडताना’ या नावामधील ‘भिडताना’ या शब्दाचं प्रयोजन, आपण अपयशापुढे गुडघे टेकलेले नाहीत आणि अपयश आल्यानंतरही गोष्ट संपत नाही, हे होतं. असं असलं तरी कोणत्याही परिस्थितीत ‘अपयशावर मात करण्याचे १०१ उपाय’ किंवा ‘अपयशाला पळवून लावण्याच्या सोप्या युक्त्या’ अशा धाटणीचं काहीही लिहायचं नव्हतं. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत अपयश आहे, कारण तोपर्यंत यशही आहे. तेव्हा बदलत्या परिस्थितीनुसार, काळानुसार, आयुष्याशी निगडित असलेल्या घटकांनुसार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण घेतलेल्या निर्णयांनुसार अपयशाला हाताळण्याचं तंत्रही ठरावीक काळानं नव्यानं शोधत राहावं लागणार हे निश्चित आहे.

‘अपयश’ या विषयाशी निगडित असलेल्या पैलूंचा विचार केला तर लेखमाला कंटाळवाणी होणार नाही ना, ही शंका जशी अनेकांनी बोलून दाखवली, तशीच ती माझ्याही मनात होती. तेव्हा लेखांची मांडणी ही मुद्दामहून गोष्ट स्वरूपात केली. कोणतीही गोष्ट ऐकल्यावर साधारणपणे ती आवडते किंवा आवडत नाही, असे दोनच पर्याय असतात. त्याचबरोबर गोष्ट कोणत्या पातळीवर स्वीकारायची याचं स्वातंत्र्य वाचकाला मिळत असल्यानं गोष्टरूपानं विषय मांडणं मला योग्य वाटलं. अर्थात असं असलं, तरी ती गोष्ट आपल्या वातावरणातली, त्यामधील संघर्ष अधोरेखित करणारी असावी यावर मी कटाक्षानं भर दिला. गोष्टी वाचताना आपल्याला माहिती असणारे संदर्भ, घटना, माणसं समोर आल्यावर मूळ मुद्दा जास्त चांगला पोहोचतो असा माझा अनुभव आहे. त्याचबरोबर गोष्ट लिहिताना त्याचा पहिला वाचक म्हणून मला ती गोष्ट आवडते आहे का, हाही नियम पाळला.

संपूर्ण लेखमालेसाठी एक सूत्र ठरवलं होतं. त्यात ‘करोना’मुळे उद्भवलेल्या कमालीच्या नकारात्मक परिस्थितीमुळे थोडा बदल करावा लागला, तो म्हणजे ‘अपयश म्हणजे नेमकं काय?’ हे प्रामुख्यानं अधोरेखित करण्याची गरज. टाळेबंदी सुरू झाल्यावर घडणाऱ्या गोष्टी पाहून आणि आपल्या नियंत्रणात नसलेल्या परिस्थितीमुळे आलेल्या अपयशासाठीही लोक स्वत:लाच जबाबदार मानत आहेत, हे लक्षात आल्यामुळे तसं करणं गरजेचं वाटलं. अपयशाशी निगडित असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयशाला लिंग, जात, वय, वर्ण असं कोणतंही बंधन नसतं. अपयश हे प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक भाग असतं. याच गोष्टीला प्रमाण मानून गोष्टीतल्या पात्रांना ठरावीक नावांच्या, आडनावांच्या प्रतिमेत न अडकवण्याची मुभा मी घेतली. अर्थात हे असं करताना वाचकानं नावात अडकण्यापेक्षा त्या गोष्टीतल्या संघर्षांकडे डोळसपणे बघावं हा हेतू होता. शिवाय असं केल्यानं ‘तो’,‘तरुण’,‘काका’,‘आजी’, अशा पात्रांना स्वत:च्या मनातील व्यक्तिचित्रांची जोड देऊन वाचकांना गोष्ट वाचता येईल, असं वाटून हा प्रयोग केला.

चांगली गोष्ट अशी, की नावं लिहिलेली नसूनही ‘युरेका’ या लेखातला उद्योजक कोण आहे?, ‘घरचा अभ्यास’ या लेखातली शिक्षिका आम्हाला गणित शिकवू शकेल का?, ‘जुगाड’ लेखामधल्या कॅब ड्रायव्हरला नोकरी मिळाली का?, ‘लग्नाच्या बाजारात’मधल्या त्या तरुणाशी बोलता येईल का?, ‘अतिक्रमण’मधल्या पेटीवादकाचं नाव समजू शकेल का?, अशा आशयाचे असंख्य ई-मेल्स आले. थोडक्यात नावं नसलेली गोष्टीतली ती पात्रं जिवंत झाली. त्याच्या जोडीला ‘अवांतर’मधला तो तरुण मुलगा आमच्या शेजारीच राहतो, ‘मानगुटीवरचं भूत’मधला बायकोपेक्षा कमी पगार मिळवणारा आमच्याही नात्यात आहे आणि आम्ही त्याच्याशी चुकीचं वागत आलो, अशी कबुलीही

ई-मेलमधून अनुभवली. ‘ऋण’मध्ये नमूद केलेल्या सांपत्तिक स्थितीमुळे होणाऱ्या दुजाभावाची दखल तसं करणाऱ्या अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष माध्यमातून घेतली.

‘नेहमीचे यशस्वी’, ‘शून्य’सारख्या लेखांना ‘रिक्रुटमेंट’ क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जमाखर्च’, ‘आमच्या वेळी असं नव्हतं’, ‘ओळख’, ‘ओझं’ या लेखांना ज्येष्ठ पिढीतल्या मंडळींची दाद मिळालीच, पण खूप मोकळेपणानं अनेक मंडळी ई-मेलच्या माध्यमातून व्यक्तही झाली. ‘सर्वोत्तम उत्तर’, ‘भय इथले’, ‘सूत्र’ हे लेख स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांना विविध पातळ्यांवर आपलेसे वाटले. ‘नावात काय आहे?’सारखा लेख मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी उचलून धरत फार बोलका प्रतिसाद दिला. एका वरिष्ठ पोलीस अधिकारींनी ‘थोडं जास्त बरोबर’ला आवर्जून केलेला ई-मेल माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होता.‘घरचा अभ्यास’मध्ये नमूद केलेली गणितं एका वाचकांनी सोडवून पाठवणं, हे फार मस्त होतं.

थोडक्यात सांगायचं तर वाचकांमुळे ही लेखमाला माझ्यासाठी अत्यंत संस्मरणीय ठरली. लेखक म्हणून वेगळ्या प्रकारचं लिखाण करण्याची संधी मिळालीच, पण हे लिखाण करताना स्वत:ला नव्यानं शोधता आलं. लेखक म्हणून एक नवीन ओळख या लेखमालेमुळे मिळाली आणि नामवंत प्रकाशकांनी त्याची दखलही घेतली ही माझ्यासाठी आणखी एक जमेची बाजू. या सगळ्यात जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट अशी होती, की आयुष्य जगताना त्याच्याशी निगडित काही संदर्भ असतात, मर्यादा असतात. काही मर्यादा आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यामुळे असतात, काही आपल्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमुळे असतात, काही पूर्णपणे आपण घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून असतात. अशा मर्यादांचा तोल सांभाळून पुढे जावं लागतं. हा तोल सांभाळण्यातून कोणाचीच कधी सुटका होत नाही. पण असं असलं तरीही दोन गोष्टी आपण कधीही सोडू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

पहिली गोष्ट म्हणजे कुतूहल. जे लहानपणी आपल्या सगळ्यांकडे भरपूर असतं, मात्र काळाच्या ओघात आणि व्यवहाराच्या ओझ्याखाली ते कमी होत जातं. कुतूहल असेल तर नवीन गोष्टी समजण्याबरोबरच गोष्टींकडे नव्यानं बघण्याची दृष्टी विकसित होते आणि त्यामुळे विविध गोष्टींमध्ये दडलेले अर्थ, त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घेता येतो. थोडक्यात ‘डॉट्स कनेक्ट’ करता येतात. अपयशाशी निगडित असणारे विविध संदर्भ किंवा विविध बिंदू जोडता आले, तर अपयशाचं नेमकं आकलन होतंच, पण त्याचबरोबर अनेक शक्यताही दिसायला लागतात. तेव्हा भावनांवर नियंत्रण ठेवून आपल्यामधील कुतूहल जागृत ठेवणं हे सध्याच्या जगात फार महत्त्वाचं वाटतं.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वत:शी असलेली मैत्री कधीही न तोडणं. आपल्याला स्वत:कडून ज्या अपेक्षा असतात, त्या जेव्हा काही कारणानं पूर्ण होत नाहीत किंवा एखाद्या विषयात आपल्याला जेवढं अपेक्षित होतं तेवढं योगदान आपणच देऊ शकत नाही, तेव्हा स्वाभाविकपणे आपण स्वत:ला दोष द्यायला सुरुवात करतो. मग कित्येक वेळा त्या विषयापासून दूर जाण्यासाठी आपण स्वत:बरोबरचा संवादच पूर्णपणे तोडून टाकतो. थोडक्यात स्वत:शी असलेली मैत्री आपण संपवतो. मग त्या संपलेल्या मैत्रीमुळे जी पोकळी तयार होते, त्या जागी निराशा आपले हातपाय पसरवायला सुरुवात करते. त्यानंतर आपल्या मनातली एकटेपणाची आणि अयशस्वी असल्याची भावना फक्त वाढतच राहते.

तेव्हा कोणत्याही वयात स्वत:शी असलेली मैत्री, संवाद तोडता कामा नये. मैत्रीत कितीही भांडणं झाली, वादावाद झाले तरीही एकमेकांना माफ करण्याची, या बाबतीत स्वत:ला माफ करण्याची ताकद सामावलेली असते. अपयशाशी भिडत असताना काही चूक झालेली असेल तर ती प्रामाणिकपणे कबूल करून स्वत:ला माफ करणं अत्यंत निर्णायक ठरतं. एकदा ते तंत्र जमलं की मग अपयशाची भीती वाटणं कमी होतं. तेव्हा स्वत:शी असलेली मैत्री आणि होणारा संवाद हा नेहमीच समृद्ध करणारा अनुभव असतो. कधीही स्वत:ला त्यापासून वेगळं करता कामा नये. कुतूहल आणि स्वत:बरोबरचा संवाद हा आपल्या विचारांना, दृष्टिकोनाला कमालीचा मोकळेपणा देतो. ‘ओपन माइंड’ हे त्यामुळेच तयार होतं.

तेव्हा कुतूहल जपा आणि स्वत:बरोबरची मैत्री तोडू नका, अशी विनंती करून आता थांबतो. लेखमालेच्या लांबीची एक विशिष्ट मर्यादा असते आणि ती पाळावीच लागते. पण पुन्हा कधी संधी मिळाली तर राहिलेल्या काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न असेल. तेव्हा समारोपाचा हा लेख एक अल्पविराम आहे, असं मी मानतो. आणि लेखमालेच्या निमित्तानं

ई-मेलच्या माध्यमातून वा समाजमाध्यमांवर व्यक्त झालेल्या वाचकांचे, मित्रमंडळींचेही मनापासून आभार मानतो.

शेवटी, कळावे.. आणि लोभ असाच राहावा ही एकच विनंती

(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:15 am

Web Title: success and failure apayashyala bhidatana dd70
Next Stories
1 पोटगीसाठी यातायात?
2 आर्थिक सहजीवन
3 गर्जा मराठीचा जयजयकार : बहुभाषिकत्वाची गरज?
Just Now!
X