डॉ. राधिका टिपरे – radhikatipre@gmail.com

‘मैं और मेरी तनहाई’ म्हणजे आपल्याला आपल्याशी संवाद साधायला लावणारी स्थिती, पण सध्याच्या टाळेबंदीच्या परिस्थितीत ती प्रसंगी नको इतकी अस्वस्थ करणारी ठरतेय.  माणसं माणसाला भेटायला, मोकळं व्हायला बैचेन आहेत. सध्या ती भूक भागतेय आभासी दुनियेतल्या जगात.  या अस्वस्थ, उदास मनावर फुंकर घालणारं काय शोधता येईल?

अंगाची लाही लाही करणाऱ्या गर्मीनंतर तिन्हीसांजेला अचानक आकाशात ढग गोळा होताना दिसले. पाऊस पडेल असं वाटत होतंच. हल्ली अंथरुणाला पाठ टेकल्यानंतर तिला लवकर झोपही येत नव्हती. अगणित प्रश्न मनात घोंगावत असायचे. त्यामुळे रात्री या कुशीवरून त्या कुशीवर होत कितीतरी वेळ तळमळून काढल्यानंतर कधीतरी डोळ्यात सादळून आलेलं आभाळ उशाशी घेऊनच ती झोपून गेली..

सकाळी जाग आली तर आकाश अधिकच गहिरं झालं होतं. ग्रीष्माची धग सरून हवेत चक्क हवाहवासा वाटणारा गारवा होता. खिडकीतून पाहिलं तर बाहेर पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या. दरवर्षी किती आतुरतेनं या दिवसांची वाट पाहायची ती! परंतु आज मात्र बाहेर रिमझिमणाऱ्या पावसामुळे काही फरकच पडला नाही. इतर वेळी वय विसरून चटकन बाल्कनीत धावली असती ती. पावसाचे थेंब  झेलायला ओंजळ पुढे करून उभी राहिली असती. पण आज असं काही करावंसं वाटलं नाही तिला. पावसाच्या सरींकडे पाहत कितीतरी क्षण ती निश्चल उभी राहिली. मनातलं काहूर काही केल्या कमी होत नव्हतं. तिला एकदम गहिवरून आल्यागत झालं आणि डोळ्यांतून घळाघळा पाणीच वाहायला लागलं..

वाफाळत्या कॉफीच्या कपाबरोबर नित्याच्या सवयीनुसार हातात वर्तमानपत्र नव्हतं.. आता सगळ्या बातम्यांसाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’च होतं. तिनं पाहिलं, मैत्रिणीचा एक मेसेज आला होता. मेसेजला उत्तर म्हणून ‘थँक्स’ लिहिण्याऐवजी तिनं नकळत काही ओळीच लिहून पाठवल्या-

आभाळ भरून आलंय,

हलकीशी सरही येऊन गेली..

हवेतला गारवा ग्रीष्माच्या माघारीची

चाहूलच देतोय,

पण का कुणास ठाऊक,

नेहमीसारखा आनंद जाणवतच नाहीये..

आकाशातील ओलावा मनाला

स्पर्श करीतच नाहीये!

डोळे मात्र उगाचच ओले होताहेत

काहूर काही कमी होत नाहीये,

मुलं दूर देशी असल्याची हुरुहुर

मनातून जात नाहीये..

एकटं असल्याची भीती

उगाचच कुरतडते मनाला,

हळवं तर करत नाहीये?

का कुणास ठाऊक, आज कधी नाही ते,

इतकं उदास का वाटतंय, कळतच नाहीये!

लिहून झाल्यावर धुकं उतरत जावं तसं मनावर आलेलं उदासपणाचं मळभही आपोआप विरत गेलं. तिनं रोजच्या कामांना सुरुवात केली. टाळेबंदी होती. बाई कामाला येत नसल्यामुळे त्या कामांतून सुटका नव्हतीच. दूधवाला आणि कचरा नेणारा येऊन गेला की जगाशी संबंध संपला. दरवाजा बंद करून घेतला की चार भिंतींच्या आत तुम्ही आणि तुमची ‘तनहाई’!

हा ‘तनहाई’ शब्द इतका काटेरी असेल असं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. बाकी दिवसाचं वेळापत्रक असं नव्हतंच. कोणी येणारं नव्हतं, कुठे जायचं नव्हतं, ती आणि नवरा- दोघे दोन खोल्यांत, आपापल्या लॅपटॉपसमोर.  सोबतीला मुक्या झालेल्या भिंती. टीव्हीवर त्याच त्याच बातम्यांचं दळण.. थोडय़ा वेळासाठी कुठल्यातरी वाहिनीवरच्या बातम्या ऐकायच्या. कान किटले की फोनमध्ये घुसायचं. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरचे मेसेज चेक करायचं काम असतंच की! या ‘व्हॉट्स अ‍ॅप’चाच आधार असल्यासारखं झालंय हल्ली. मग मत्रिणींच्या ग्रुपवर तीच कविता टाकली, ‘फेसबुक’वरही चिकटवून दिली.  याला पाठव, त्याला पाठव करत जिवलग मत्रिणींना पाठवली.

हल्ली वेळ कसा घालवायचा हाच प्रश्न असतो. काल-परवाच सुनेला विचारलं होतं,‘‘अगं, तुझ्या सोफ्यावरच्या उशांसाठी मी माझ्या प्युअर सिल्कच्या साडीची कव्हरं शिवू का?..तुला कधी बदलावीशी वाटली तर बदली सेट म्हणून?’’ तिनं गोड बोलूनच, पण ठामपणे नकार दिला. लेकीला विचारलं,‘‘तुझ्यासाठी शिवू का गं पिलो कव्हर्स?’’ तर तिनं,‘‘अजिबात नको. तुझी ती फ्रीलवाली कव्हर्स मला अजिबात आवडत नाहीत.’’ असं उत्तर देऊन तिच्या शिवणकामाच्या उत्साहातली हवाच काढून घेतली. मग उरलं होतं एकच काम. घराची साफसफाई. या कामात ती गुंतली असतानाच रेखाचा फोन आला,

‘‘काय गं ठीक आहेस ना?’’

‘‘का गं? असं काय विचारते आहेस..?’’ तिनं थोडं आश्चर्यानंच विचारलं.

‘‘अगं ती कविता पाठवली आहेस ना. म्हणून विचारते आहे. बरी आहेस ना? काही झालंय का?’’ तिच्या स्वरात काळजी होती.

‘‘काही झालेलं नाहीये. काचेचं कपाट साफ करतेय.’’ ती शांतपणे उत्तरली.

‘‘मग अशी कविता का केली आहेस?’’ रेखानं काकुळतीला येऊन विचारलं.

‘‘अगं, ते जरा सकाळी मूड ठीक नव्हता. कविता कसली, काही शब्द सुचले. लिहिले आणि दिले पाठवून सगळ्यांना.’’

मग दुसऱ्या मत्रिणीचा फोन आला. ‘‘अगं, ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर कविता पाठवली आहेस. तुझी कविता होती म्हणून वाचली. काही झालंय का?..बरी आहेस ना?’’ पुन्हा तेच!

बापरे. ती धसकलीच. तिनं तातडीनं मोबाइल पाहिला. अनेक हितचिंतकांचे मेसेज होते. ‘काळजी घ्या. काही होणार नाही’, ‘आमची पण हीच अवस्था आहे गं!’. ज्या मत्रिणींची मुलंही बाहेरदेशात आहेत त्यांनी आपल्या मनाचा भार हलका  करण्यासाठी काहीबाही संदेश पाठवले होते. ‘फेसबुक’ पाहिलं. बापरे.. त्या भिंतीवर तर कुणाकुणाचे मेसेज! ‘होतं असं कधी कधी. नका काळजी करू’, ‘ काळजी घ्या मॅडम. सर्व काही ठीक होईल.’ तेवढय़ात भाचीचा फोन. ‘‘काय झालंय तुला? बरी आहेस ना? मग ती तसली कविता का टाकलीयस ‘फेसबुक’वर..आणि काकांना कुठं जाऊ देऊ नकोस. आनंदी राहा!’’

आता मात्र तिला वाटलं, हे काही खरं नाहीये. ही कविता फारच जिव्हारी लागलीय सर्वाना.  मग तिच्या लक्षात आलं, खरं तर प्रश्न तिच्या कवितेचा नव्हताच. इतर वेळी कुणी वाचलीही नसती तिची कविता. कुणाला काही पडलेलं नसतं. उगा ‘लाइक’चं बटण क्लिक केलं झालं! पण या वेळी ओळींमधल्या भावना अगदी लोकांच्या वर्मी लागल्या होत्या. कारण या टाळेबंदीमुळे माणसाचं मन हळवं झालंय. इतर वेळी कुणी ढुंकूनही त्या कवितेकडे पाहिलं नसतं. पण या ‘करोना’नं सर्वाच्या मनाची अवस्था पार वाईट होऊन गेलीय हे नाकारता येत नाहीये. प्रत्येकाच्या मनात  एक धास्ती घर करून बसलीय आणि ती कमी होत नाहीये हे मात्र खरं. भाजी घ्यायला गेलं तरी भीती.. भाजी कशी आहे हे पाहायच्या ऐवजी तो विकणारा कसा दिसतो आहे याकडेच लक्ष. घरी परत येईपर्यंत ना ना विचार येतच राहातात. औषधं संपली, किराणा संपला तर बाहेर पडणं अनिवार्य होऊन जातं. कुणाला सांगणार?

भाजी आणायला म्हणून दोघंही कार घेऊनच घरामधून बाहेर पडले. नवऱ्याला एकटं बाहेर जाऊ द्यायलाही भीती वाटत होती. दोघांच्याही तोंडावर मुखपट्टय़ा बांधल्या होत्या. तरी पोलिसांनी अडवलं. ‘‘अहो आजी, दोघंही बाहेर पडलात.  एकटय़ानं यायचं ना कुणीतरी.’’ ‘‘बाबा रे. आता एकटय़ानं बाहेर पडायलासुद्धा भीती वाटतेय. आणि आमच्याकडे पर्याय नाहीये दुसरा. कुणाला पाठवणार सांगा?’’ तिनं पोलिसालाच विचारलं. त्यानंही  मुकाटय़ानं मान हलवत गाडी सोडली. अनेकांच्या घरी हीच परिस्थिती आहे. मुलं बाहेरदेशात असल्यामुळे प्रत्येक घरात फक्त दोन वयस्क मंडळी.  बरं, या परिस्थितीत आपली कामं इतर कुणाला सांगणं योग्यही वाटत नाही. कारण जो तो त्याच्या परीनं या परिस्थितीशी सामना करत आहे. त्यामुळे  रोजचा दिवस ढकलणं एवढंच हातात उरलं आहे.  आणि हे कधी आणि कुठे जाऊन संपणार आहे? आता आपली आणि मुलांची भेट होणार की नाही? आपल्याला काही झालं तर मुलं येऊही शकणार नाहीत. आपण त्यांच्याकडे जाऊ शकणार नाही. हे असं किती दिवस चालणार आहे?,  हे असे प्रश्न मनात आले की काळीज कुरतडत राहतं. मुलांचे फोन येतात तेव्हा त्यांच्या शब्दांतून व्यक्त होणारी काळजी, भीती नजरेआड करता येत नाही. कितीही नाही म्हटलं तरी आवाज कापरा होतोच. डोळ्यांच्या कडा ओलावल्या जातातच. सांगणार कुणाला? तिकडच्या भयावह परिस्थितीमुळे आपलं मनही कापरासारखं जळत असतं. आपल्याकडच्या बातम्या बघून त्यांच्या जीवाची होणारी घालमेल त्यांच्या शब्दांतून निथळत असते.. हे सर्व विचार तिच्या मनाची बचेनी वाढवत होते. त्यामुळे मनाची उलाघाल काही संपत नव्हती. एखादा दिवस उजाडतोच मुळी उदासवाणा!

काल तिनं कपडय़ांचं कपाट आवरलं. महागडय़ा प्युअर सिल्कच्या साडय़ांची बोचकी बाहेर काढली होती. त्या मऊसूत रेशमी वस्त्रांच्या घडय़ांवरून हात फिरवताना उगाचच तिचे डोळे पाझरायला लागले होते. तिच्या मनात आलं, सून आणि लेक दोघी परदेशी.. दोघींनाही साडय़ांचं कौतुक नाही. या साडय़ांचं काय होणार? तिनं तिच्या लग्नातली ‘तनछोई’ बाहेर काढली. अजून जशीच्या तशी आहे. आता तर असल्या साडय़ा मिळतही नाहीत. काय करायचं या महागडय़ा साडीचं?  आहेत की अनेकजणी. आवडीनं नेसतील. तिनं आपल्याच विचारांना थोडं थोपवलं. मनातल्या प्रश्नांची जळमटं झटकून टाकली.  तेवढय़ात कांचनचा फोन आला..

कांचन, तिच्या कोल्हापूरच्या शाळेतली मत्रीण. त्यांची अकरावीची बॅच त्यांच्या शाळेतली पन्नास वर्षांपूर्वीची बॅच होती. कुणा एकीला, म्हणजे सरोजला वाटलं, आपल्या शाळेच्या मत्रिणींना एकत्र आणायचं छान प्रयोजन आहे. मग एक एक करत तिनं जवळजवळ पन्नास जणींचे फोन नंबर शोधून जुन्या मत्रिणींचा ग्रुप तयार केला. पन्नास वर्षांत कधीही एकमेकींना न भेटलेल्या साऱ्याजणी अलीकडेच कोल्हापुरात भेटल्या होत्या. पुण्यातही एक गेट टुगेदर झालं होतं. प्रत्येक जण आता पासष्टीच्या पुढे गेलेली. सुरकु तलेल्या. पण सगळ्या कशा प्रसन्न. काय धमाल आली होती तेव्हा. प्रत्येकीचे गुडघे दुखत असल्याची तक्रार असूनही आनंदानं सळसळत भेटल्या होत्या साऱ्याजणी. किती गप्पा, किती आठवणी! निरोपाच्या वेळी पुढच्या भेटीची ओढ मनात ठेवूनच प्रत्येकीनं एकमेकीचा निरोप घेतला होता. आणि आता फोनवर कांचन म्हणत होती, ‘‘अगं, आता आपलं पुढचं गेट टुगेदर कधी होईल कु णास ठाऊक?

अमेरिकेतही ‘करोना’मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढतानाच दिसत होती. तिचा जीव धास्तावला होता. तिनं मुलीला फोन केला. ‘‘सगळं ठीक आहे ना गं तिकडे? खरं सांगू, आता वाटतंय तुम्ही इथं असतात तर बरं झालं असतं बघ. जग कुठं चाललंय कुणास ठाऊक. काय होणार आहे कळत नाहीये.’’ तिच्या मनातली वेदना  बाहेर पडलीच.

‘‘आई, अगं नको काळजी करूस. आमच्या इथली परिस्थिती नियंत्रणात आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि आम्ही बाहेरच पडत नाही. त्यामुळे फारसा धोका नाही..’’

‘‘ऐलतीरावर राहून पलतीरावर घडणाऱ्या घटनांशी आमचा काही संबंध नाहीये असं म्हणणं खरं नाही गं. नदीला पूर आल्यानंतर नदीचं पाणी फक्त एकाच तीरावर विध्वंस नाही करत गं बाई.. तिच्या दोन्ही काठांवर पुराचं पाणी तेवढय़ाच वेगानं पसरतं. तेवढाच विनाश घेऊन येतं. एक विषाणू जेव्हा अख्ख्या पृथ्वीला वेठीस धरतो, तेव्हा आपलं-तुपलं काहीच शिल्लक उरत नाही. मग ऐलतीर आणि पलतीर कसे कोरडे राहणार?’’ फोन ठेवता ठेवता तिनं एक खोल निश्वास सोडला. पण मनात आलं.. असं हार मानून जगण्यात काय अर्थ आहे?

तिनं कांचनला फोन लावला, ‘‘कांचन, अगं एकत्र भेटायला नाही जमलं तरी आपण भेटू गं एकमेकींना. हल्ली ते ‘झूम’ की काय म्हणतात बघ.. माझ्या मुलीनं  सांगितलंय, ‘झूम’वर कसं भेटायचं ते. आपणही भेटूया सगळ्याजणी त्यावर.’’ कांचनचा होकार मिळताच तिचं मन एकदम प्रसन्न झालं. आता सगळ्याजणी लवकरच एकमेकांना ऑनलाइन तरी भेटणारच होत्या.

संध्याकाळी नातवानं ‘व्हिडीओ कॉल’ करून त्यांच्या नव्या घराची बाग दाखवली. बागेत नव्यानं लावलेल्या झाडाला लागलेली सफरचंदं दाखवत तो म्हणत होता,‘‘आजी, इटस् व्हेरी ब्यूटिफुल व्हेदर हिअर. व्हेन आर यू किमग टू एडमंटन? नाऊ वुई कॅन हॅव ब्रेकफास्ट आऊटसाईड इन द गार्डन यू नो.. कम सून.’’ डोळ्यातलं पाणी पुशीत ती आनंदानं म्हणाली, ‘‘आय विल कम व्हेरी सून शोनू. व्हेरी सून!’’

मनानं मात्र ती तिच्या नातवाबरोबर न्याहरी करण्यासाठी कधीचीच तिकडे पोहोचली होती.