19 October 2019

News Flash

शोध जगण्याचा

तळ ढवळताना

नीरजा  neerajan90@yahoo.co.in

‘‘या सदरातून आपण भूतकाळात घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांचे साक्षीदार होणार आहोत. अंधारावर मात करणाऱ्या प्रकाशाच्या किरणांचा मागोवा घेणार आहोत. आजही अनिष्ट परंपरांच्या डबक्यात डुंबत राहणाऱ्या आपल्यासारख्यांची मानसिकता तपासून पाहणार आहोत. एखादी घटना, एखादी साहित्यकृती, एखादा चित्रपट, एखादी कविता आपलं आयुष्यच ढवळून काढते तेव्हा नेमकं काय होतं, याचा विचार करणार आहोत. मुख्य म्हणजे स्वत:च्या मनाचा तळ ढवळणार आहोत आणि मन ढवळून काढणाऱ्या गोष्टीही शोधणार आहोत.’’ संवेदनक्षम कवयित्री, लेखिका नीरजा यांचं हे सदर दर पंधरवडय़ाने..

कवयित्री नीरजा यांचे ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निर्थकाचे पक्षी’, ‘मी माझ्या थारोळ्यात’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत, तर ‘जे दर्पणी बिंबले’, ‘ओल हरवलेली माती’, ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’, ‘अस्वस्थ मी अशांत मी’ या कथासंग्रहांसह त्यांचे ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्र सरकारचा विशेष पुरस्कार, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, दमाणी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

जन्म-मृत्यूमधला विलक्षण प्रवास करताना काहीच ठरवलेलं नसतं आपण. कुठून निघायचं आणि कुठं पोहोचायचं हे ठरवण्याआधीच सुरू होतो प्रवास अथांग नदीच्या विस्तीर्ण पात्रावरून किंवा समुद्राच्या ढालगज लाटांवरून. वर निरभ्र आकाश असतं कधी, तर कधी ढगांची दाटी झालेली असते. पाऊस आणणारे क्षण नेहमी वाटय़ाला येतीलच असं नाही, पण त्या क्षणांच्या शोधात वल्हवत राहतो आपण आपली नाव किंवा सोडून देतो लाटांवर आपलं जहाज. शिडात श्वास भरून निघालो तरी आपल्याला हव्या त्या दिशेला ते जाईलच असं नाही. तरीही आपल्याला वाटत असतं ते जावं आपण म्हणू त्या प्रदेशात, त्या गावात, त्या स्वप्नात.

खरं तर डोळे अनेकदा वरच लागलेले असतात आपले, आकाशाकडे. उत्तुंगतेची आस मनात असते. अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवलंच जातं आकाशाकडे पाहायला, भरारी घ्यायला. ध्येय, महत्त्वाकांक्षा, उत्तुंग स्वप्न वगैरे शब्द सतत आदळले जातात आपल्या कानामनावर. आकाशाला गवसणी घाला म्हणून भरवलं जातं आपल्या इवल्याशा मेंदूत. त्यामुळेच कदाचित पायाकडे, पायाखालच्या जमिनीकडे, त्या जमिनीत रुतलेल्या मुळांकडे, मुळांना घट्ट धरून ठेवणाऱ्या मातीकडे पाहायचं राहून जातं आपलं. आपण मारत राहतो हात वरवरच्या पाण्यावर. कधी एखादी डुबकी मारण्याचा प्रयत्न करतो खोल पाण्यात. पण सवय नसतेच खोल शिरायची. मग घुसमटायला होतं. श्वास कोंडतो की काय असंही वाटायला लागतं आणि सूर मारून पुन्हा वर पृष्ठभागावर येतो आपण. असं पृष्ठस्तरीय जगायची सवय लागली की मग साहजिकच तळापर्यंत पोहोचण्याची गरज वाटत नाही आपल्याला. मनाचे आंतरिक स्तर उलगडायला वेळही मिळत नाही. नदीच्या संथ प्रवाहातून नाव वल्हवता वल्हवता हळूहळू आपण जगण्याचा विस्तार वाढवत नेतो. किनाऱ्याकडे पोहोचायची आस मनात असल्यानं खोल प्रवाहात शिरण्याची गरज वाटत नाही आपल्याला. कदाचित भयच वाटत असेल आत खोल पाण्यात शिरण्याचं. तळ गाठण्याचं.

खरं तर अनेकदा भीतीच वाटत असते आपल्याला पाण्याची. त्या पाण्याच्या तळाशी जाऊन बसलेल्या हजारो गोष्टींची. पण तरीही आपण या अथांग डोहाच्या काठावर पाण्यात पाय सोडून बसतोच बालकवींच्या औदुंबरासारखे. निळासावळा झरा, हिरवीगार कुरणं, शेतमळ्यांची हिरवी गर्दी असं रंगांनी भरलेलं जग असतं आपल्या आजूबाजूला. पण या जगातून अचानक आपल्याला पांढऱ्या पायवाटेनं कोणी तरी काळ्या डोहाकडे घेऊन जातं. आणि त्या डोहातल्या झाकळलेल्या पाण्यावर वाढणाऱ्या औदुंबराची मुळं आपल्याला वेढायला लागतात. आपली मुळं पाण्यात सोडून बसलेला हा औदुंबर खोल डोहासारखं हाती न लागणारं एक व्यक्तित्व घेऊन आपल्यासमोर येतो. त्याच्याकडे पाहून मनात हजारो प्रश्नांची साखळी तयार होत जाते. कोणत्या विचारात पडला असेल तो? पाय सोडून जळात बसताना नेमकी काय होती त्याची भावावस्था? निवांतपणे बसला असेल की डोक्यात काही चाललं असेल त्याच्या? आजूबाजूची हिरवळ, शेतमळे आणि चार घरांचं चिमुकलं गाव पाहत असेल की केवळ त्या डोहाच्या तळात डोकावत असेल? आणि डोकावत असेल तर नेमकं काय पाहत असेल तो वाकून खोल आत? आपली मुळं शोधत असेल की आपल्या मुळाखोडावर चढत गेलेल्या पुटांखाली लपलेल्या आपल्या सत्त्वाच्या केंद्राशी पोहोचण्याचा प्रयत्न करत असेल तो?

अथांग डोहाचा तळ ढवळून काढून त्यात जमलेला गाळसाळ उपसताना तो स्वत:लाही तपासून पाहत असेल. कदाचित आभाळभर पसरलेल्या त्याच्या फांद्या आणि पानातून अविरत पाझरणारा जीवनरस नेमका कोठून येऊन पोहोचतो आहे त्याच्या मुळांपर्यंत याचाही शोध घेत असेल तो. ठाव घेऊ पाहत असेल आपल्या तळाचा.

या औदुंबरासारखं काळाबरोबर वाढताना मागे काय काय घडून गेलं आहे, आज काय काय घडतं आहे आणि उद्याच्या पटलावर नेमकं काय घडणार आहे किंवा काय घडवायचं आहे याचा विचार करायला हवा. त्यासाठी आपली मुळं तपासून पाहायला हवीत. असं वाढत जाताना स्वत:चा, स्वत:च्या जगण्याचा अन् त्याबरोबरच समाजाचा आणि या समाजातील लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या मानसिकतेचा शोध घेत राहायला हवा.

हजारो वर्षांचा इतिहास आहे आपला. हा इतिहास केवळ घटनांनी आणि माणसांनी भरलेला नाही, तर माणसाच्या आदिमतेकडून नागर होण्याच्या प्रवासानं भरला आहे. या प्रवासात कुठं तरी उगम पावून नदीसारखी प्रवाहित होत गेलेली माणसाच्या जगण्याची, त्याच्या संघर्षांची, हजारो अडथळ्यांबरोबरच समाधानाचे क्षण देणारी त्याच्या आनंदाची, त्याच्या समृद्धीची कहाणी दडलेली आहे. साहित्य, संगीत, चित्र, शिल्प इत्यादी कलांतून व्यक्त होत इथवर पोहोचलेली संस्कृती आहे. आपल्यावर झालेली अनेक आक्रमणं आणि या आक्रमणांनंतर जेत्यांनी सोबत आणलेली त्यांची संस्कृती, त्या संस्कृतीत सामावलेल्या साऱ्या कला, तत्त्वज्ञान, विज्ञान अशा हजारो गोष्टींचा आपल्या कला, तत्त्वज्ञान वगैरे गोष्टींशी झालेला संकर आहे. आपलं समाजजीवन, त्यातल्या सुंदर तरल गोष्टी, त्यातल्या सुष्ट-दुष्ट रीतीभाती, परंपरा, कर्मकांड, धर्म-राजकारण अशा किती तरी गोष्टींनी भरलेला आपला भूतकाळ आज आपण मागे सोडून आलेलो आहोत. या संस्कृतीतल्या किती गोष्टी आपण कायमच्या सोडून आलो आहोत, किती गोष्टी आपण आपल्या सोबत आणल्या आहेत, आणि त्यातलं काय काय पुढे सोबत घेऊन जाणार आहोत? एखादी गोष्ट सोबत नेणार असू तर का नेणार आहोत? आणि नेणार नसू तर का नाही? या साऱ्या गोष्टींचा आता हिशेब मांडायला हवा. आणि त्यासाठी आपल्यासमोर पसरलेल्या संस्कृती नावाच्या या अथांग डोहाचा तळ सातत्यानं ढवळत राहायला हवा. विशेषत: जगण्याचे सारे संदर्भ बदलू पाहणारी, इतिहास विस्कटू पाहणारी आणि आपण सांगतो तोच इतिहास, तीच संस्कृती असं आक्रमकपणे सांगणारी माणसं आजूबाजूला असण्याच्या काळात तर हा उपसा करणं  फारच गरजेचं आहे असं वाटतं.

तळ ढवळताना जे काही हाताला लागेल ते काय असेल नेमकं हेही पाहायला हवं. आपल्याला हवं ते सापडेल का, हाही प्रश्नच आहे. अनेकदा कधी विचारही केला नसतो अशा आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात, तर कधी अकस्मात उभे ठाकलेले गुंते विठ्ठलासारखे कटीवर हात ठेवून आडवे येतात. परंपरांचा गाळसाळ, नात्यांची वीण, सलणाऱ्या चौकटी, वेगवेगळ्या काळात केली गेलेली क्रांती, चळवळींच्याद्वारे घडवून आणलेले सामाजिक बदल आणि त्याच्या मागच्या कहाण्या. कधी खऱ्या, कधी खोटय़ा, तर कधी संदिग्ध! वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून उमटलेल्या या कहाण्यांचे अन्वयार्थ लावताना दमछाक होण्याचीच शक्यता जास्त असते.

हा तळ ढवळताना आनंद देणाऱ्या गोष्टी हाती लागतातच, पण अनेकदा विषण्ण करणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या, मळभ आणणाऱ्या अनेक गोष्टी हाती लागतात आणि मग वरवर दिसणारं नितळ पाणीही गढूळ होत जातं. मला वाटतं, पाणी गढूळ झालं तरी चालेल, पण पुन्हा पुन्हा हा तळ ढळायला हवा. गाळसाळ उपसून स्वच्छ करायला हवेत गढुळलेल्या पाण्याचे लोट, त्यांचं डबकं होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. प्रवाही ठेवायला हवंच त्याला, पण कधी कधी नव्यानं लिहायला हव्यात कहाण्या.

या सदरात तेच करणार आहोत आपण. भूतकाळात घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांचे साक्षीदार होणार आहोत. अंधारावर मात करणाऱ्या प्रकाशाच्या किरणांचा मागोवा घेणार आहोत. आजही अनिष्ट परंपरांच्या डबक्यात डुंबत राहणाऱ्या आपल्यासारख्यांची मानसिकता तपासून पाहणार आहोत. राजकीय आणि सामाजिक जाणिवांबरोबर आपल्या आंधळ्या भक्तीत, श्रद्धेत हरवलेलं वैज्ञानिक वास्तवही तपासून पाहणार आहोत. आजच्या वर्तमानात नेमकं काय काय घडतं आहे याच्यावरही चर्चा करणार आहोत. माणसाच्या मनाच्या तळाचा ठाव घेतानाच उद्याच्या पोटात काय दडलेलं असेल त्यातही डोकावून पाहणार आहोत. एखादी घटना, एखादी साहित्यकृती, एखादा चित्रपट, एखादी कविता आपलं आयुष्यच ढवळून काढते तेव्हा नेमकं काय होतं याचा विचार करणार आहोत. मुख्य म्हणजे स्वत:च्या मनाचा तळ ढवळणार आहोत आणि मन ढवळून काढणाऱ्या गोष्टीही शोधणार आहोत.

chaturang@expressindia.com

First Published on January 5, 2019 4:17 am

Web Title: tal dawaltana article about marathi poetess neerja