13 August 2020

News Flash

खाणे पिणे आणि खूप काही : सुगरण मी – टँगी करेला आणि पालक डोसा

पदार्थ बिघडला की आधी निराशा येते, पण थोडं डोकं चालवलं तर त्यातून मस्त डिश तयार होते आणि त्याला काही तरी भन्नाट नाव दिलं की घरचे

| November 17, 2012 04:24 am

पदार्थ बिघडला की आधी निराशा येते, पण थोडं डोकं चालवलं तर त्यातून मस्त डिश तयार होते आणि त्याला काही तरी भन्नाट नाव दिलं की घरचे खूश, त्यातलाच एक टॅंगी करेला..
प्रत्येक सुगरणीच्या स्वयंपाकात एकदा तरी बिघडलंय-घडलंय असं असतंच. आणि ती मजा कसली हो, ही तर ‘सजा असते सजा!’कारण तो पदार्थ बिघडला की आधी निराश व्हायला होतं. अरे बापरे हे काय झालं? आणि मग सुरू होते तारांबळ. आता काय करायचं? त्यातच कधी सकाळचा नवऱ्याचा डबा किंवा मुलांचा डबा किंवा पाहुणे नाही तर काही तरी समारंभ असेल तर मग भलतीच पंचाईत. पण अशा वेळी ते पदार्थ त्याच्या नामकरणासहित मुलांच्या, नवऱ्यासमोर ठेवायचा की त्यांनी म्हटलं पाहिजे, ‘अरे वा! क्या बात है!’

टँगी करेला
एकदा माझ्याकडून कारलं बिघडलं. काय झालं की माझ्या मुलाने मला कारलं फ्राय करायला सांगितलं. मी कारलं कापलं. त्याला मीठ, हळद, चिंच लावून १० मिनिटं ठेवलं. मनात आलं, कुकर लावायचा आहे तर चला कुकरलाच एक शिटी घेऊ आणि एक शिटी घेतली. गॅस बंद केला. कुकर थंड झाल्यावर उघडला तर त्या कारल्याचा लगदा झाला होता. असा राग आला होता पण काय करणार? मग एक युक्ती सुचली. पटापट कांदा बारीक कापला. टोमॅटो कापला. शेंगदाणे जरासे जाडसर वाटलेले होतेच. आलं, मिरची, लसणची गोळी घेतली. गॅसवर कढईत तेल गरम केलं. त्यामध्ये हिंग, जिरं, मोहरी फोडणी घातली. कांदा छान परतला. हळद, लालतिखट, धणे-जिरे पावडर घातली. मीठ, गूळ घालून छान परतून घेतलं. नंतर टोमॅटो घालून छान परतून एकजीव झाल्यानंतर त्यात कारलं घातलं व एक छान वाफ घेतली. वरून शेंगदाणे व लिंबू पिळून घातलं. जरासा चिंचकोळ व कोथिंबीर, गरम मसाला घालून छान वाफ घेतली आणि १० मिनिटांनी झाकण काढल्यावर काय मस्त गंध दरवळला म्हणून सांगू आणि हो, त्या कारल्याचं नामकरण झालं होतं, ‘टँगी करेला.’

मिल्क पावडरची बर्फी
एकदा एका मैत्रिणीचा फोन आला, अगं खोबऱ्याची बर्फी बनवते आहे. पण मिळूनच येत नाही. मिश्रण सगळं मोकळं झालंय. मी तिला सांगितलं, काळजी करू नकोस. पुन्हा जरा वाटीभर खोबऱ्याचा अंदाज बघून, साखर घाल व साखरेच्या पाकात खोबरं चांगले शिजू दे. जेव्हा मिश्रण आटत येईल तेव्हा वाटीभर मिल्क पावडर घाल व गॅस बंद करून ताटाला तूप लावून मिश्रण पसरवून थापून घे. गरम असतानाच सुरीने वडय़ा पाड आणि काय आश्चर्य ‘मॅडम’चा लगेच संध्याकाळी फोन- बरं झालं बाई, तुला फोन केला. नाही तर कठीणच होतं! मुलाने तर सांगितलं, पुन्हा कर गं बर्फी!

पाकातल्या पुऱ्या
एकदा शंकरपाळी करायला घेतली. मस्तपैकी मैदा चाळला. दूध, साखर गरम करून थंड करून ठेवले आणि घाईघाईत दुधाच्या मिश्रणात मैदा घालून पीठ मळून घेतले. आणि अध्र्या तासानंतर, चला शंकरपाळी करू या, म्हणून लाटणं-पोळपाट घेतलं. बघते तर तूप तसंच! म्हटलं, बापरे, आता शंकरपाळी कडक होणार! मग लगेच (पाकातल्या पुऱ्या) खुणावू लागल्या. त्याच पिठाच्या पुऱ्या करायचं ठरवलं. मस्तपैकी लाटय़ा लाटून घेतल्या. एकावर एक पसरवून वरून कॉर्नफ्लोवर व तुपाचं मिश्रण लावून रोल केले. कापले व तेलात तळले व पाक करून पाकात घातले. पाकातून काढून वरून काजू-बदामाचे काप लावून वाढले.

ढोकळा झाला ठोकळा
 एकदा ढोकळा केला. ढोकळा कसला ‘ठोकळा’ होता तो. अजिबातच फुगला नाही. मग म्हटलं काय करावं? ताटात तो आधी मोकळा करून घेतला व हाताने बारीक चुरून एकजीव केला. यानंतर कढईत तेल घातलं. मोहरी घातली. वरील मिश्रण घातले. मीठ, साखर, सायट्रिक अ‍ॅसिड चिमूटभर घातलं व छान परतून घेतलं. वाफ काढून डिशमध्ये काढलं. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, शेव, डाळिंबाचे दाणे घालून सर्वाना खायला दिलं.

मिसळ वाटणाशिवाय
एका मैत्रिणीचा फोन आला. ‘‘अगं, आज सोमवार. दुकानं बंद. मिसळ करायची आहे. मटकीला फोडणी देऊन झाली. पण घरात खोबरंच नाही. आता काय करू?’’ म्हटलं, ‘अगदी सोपं आहे. मटकी अर्धी शिजल्यावर मिक्सरच्या भांडय़ात जरासं पाणी घालून थोडं फरसाण वाटून घे व टाक मटकीच्या मिश्रणात! वरून पाव-भाजी मसाला घाल. कळणारच नाही वाटण नाही आहे ते.

पालक डोसा
पालक, शेपू, चवळी या भाज्या मुलं खायला उत्सुक नसतात. त्यामुळे केल्या तरी शिल्लक राहतात. अशा वेळी गव्हाच्या पिठात पाणी+पालक+भाजी+मीठ+हळद+कोथिंबीर+जिरे+मिरची+दही+तांदळाचे+चण्याचे पीठ घालून मिक्सरमधून काढून घ्यावे. तव्यावर डोसे काढावेत. बघा मुले खातात की नाही? वरून चीज, पनीर किसून घालावे. पालकाचा आणखी एक प्रकार केला. उरलेला पालक मिक्सरच्या भांडय़ात घातला व पेस्ट केली. त्यात पनीर किसून घातला. एक बटाटा कुस्करून टाकला. तांदळाचे पीठ टाकले. (आलं+मिरची+लसूण+कोथिंबीर वाटण घातले व हे मिश्रण कुकरच्या भांडय़ात ठेवून शिट्टय़ा काढल्या व नंतर तेलात वडय़ा फ्राय केल्या. कळलंच नाही त्या पालकवडय़ा होत्या ते.

मसाला खाकरा
एकदा माझ्या मुलीने- श्रेयाने- मला मसाला पापड करायला सांगितला. घरात पापड नव्हता. आता काय? तयारी तर सर्व झाली होती. मग एक युक्ती सुचली. घरात खाकरा होता. तो प्लेटमध्ये ठेवला. त्यावर हिरवी कोथिंबीर, पुदिना चटणी लावली. वरून बारीक चिरलेला कांदा घातला. टोमॅटो घातला. चाटमसाला-मीठ घातले व शेव कोथिंबीर व टोमॅटो सॉस घालून तिला खायला दिला. ‘मसाला पापड’ दिला, पण त्यात पापडच नव्हता!

गवारीची चटणी
एकदा गवारीची भाजी करायला घेतली. गवार खारट झाली. कोणीच खाल्ली नाही. मग ती चाळणीत घेऊन धुतली. नंतर कढईत तेल घालून परतून घेतली. मिक्सरच्या भांडय़ात काढली. हिरवी मिरची+आलं+लसूण+जिरं+कोथिंबीर, लिंबूरस, साखर व दही घालून चटपटीत चटणी तयार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2012 4:24 am

Web Title: tangi karela and palak dosa
टॅग Recipe
Next Stories
1 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव
2 खाणे, पिणे आणि खूप काही – गावाकडची चव : झणझणीत खांडोळी
Just Now!
X