घरची गरिबी, मात्र तिला शिक्षणाची ओढ. याचमुळे रोज दहा किलोमीटर अनवाणी रपेट करणारी ती स्पर्धेमध्येही धावायची तीही अनवाणीच. पुरुष क्रीडापटूकडून कायम अपमानास्पद वागणूक मिळणारी, आपले ट्रेनिंग थांबू नये म्हणून पुरुषगटाचे जेवण, त्यांचे कपडेही धुणारी ती, इतकंच नव्हे तर स्पर्धेमध्ये भाग घेऊ नये म्हणून विषबाधा सहन करणारी ती. १९९४ सालच्या मॅरेथॉन स्पध्रेत भाग घेणारी आणि जिंकणारी, इतिहास घडवणारी पहिली आफ्रिकी महिला- तेगला लोरूपे! आज ‘तेगला लोरूपे पीस फाउंडेशन’ स्थापन करून देशात आणि जगात शांतीचा संदेश पसरवते आहे. त्या जागतिक ख्यातिप्राप्त केनियन महिला एथलीट तेगलाला महिला दिनानिमित्त सलाम!
न्यूयॉर्क येथील १९९४ सालच्या मॅरेथॉन स्पध्रेत प्रेक्षक आणि निरीक्षकांना केनियातील एक वेगळीच शलाका नजरेस पडली. या स्पध्रेत भाग घेणारी आणि जिंकणारी ही पहिली आफ्रिकी महिला होती, तेगला लोरूपे!
केनियन पुरुष आतापर्यंत अनेक स्पर्धामध्ये विजेते म्हणून गणले गेले होते. पण महिला नव्हत्याच. तेगला लोरूपे ही एक सुरुवात होती. केनियातील महिलांच्या आकांक्षांना धुमारे फुटू लागले आहेत, त्याही कुठे कमी नाहीत या जाणिवेचे! एकोणीस वर्षांनंतर याच स्पध्रेत सहा जागतिक विक्रम मोडणाऱ्या स्त्रिया केनियन होत्या आणि या स्त्रियांचे प्रेरणास्थान होते, तेगला लोरूपे!
तेगलाचे बालपण सर्वसामान्य केनियन गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसारखेच म्हणजे अभावग्रस्ततेतच गेले! तिचे वडील म्हणजे उत्तर नरोबीतील केनिया प्रांतात राहणारे एक शेतकरी! त्यांच्या चार बायका आणि चोवीस मुले असा हा भलामोठा कबिला! आíथक परिस्थिती अर्थातच गरिबीची. घरातल्या बायकांनी पोरे जन्माला घालायची आणि थोडय़ा मोठय़ा झालेल्या मुलांनी विशेषत: मुलींनी आपल्या पाठच्या भावंडांना सांभाळायचं. वर शेतावरची कामंही उरकायची. मग जमल्यास शाळा वगरे. या चोवीस भावंडांमध्ये तेगला सर्वात हसतमुख आणि चुणचुणीत मुलगी. घरातील सर्व जण तिला लाडाने ‘कॅमेशिया’ (कधीही दुर्मुख नसणारी) म्हणत.
अशी ही तेगला जेव्हा सात वर्षांची झाली तेव्हा तिला शाळेत जाण्यासाठी रोज दहा किलोमीटर अनवाणी रपेट करावी लागे. शेतातली कामे, भावंडांना सांभाळणे अशी कामे उरकता उरकता शाळेसाठी रोजच उशीर व्हायचा. मग धावतच शाळेची वेळ गाठावी लागे. कदाचित तिच्या पुढच्या यशाचं बीज इथंच रुजलं गेलं. शाळेत तेगलाच्या धावण्याच्या क्षमतेबद्दल कौतुकाचे बोल तिच्या कानावर पडत. तिला शाळेतील क्रीडास्पर्धामध्ये ८०० ते १५०० मीटर धावण्याची संधी मिळाली आणि तिने त्यात आपले वर्चस्व सिद्ध केले.
शाळेत होणाऱ्या कौतुकामुळे आणि प्रोत्साहनामुळे तेगलालादेखील आपण एक उत्तम धावपटू होऊ शकतो, असं वाटू लागलं होतं. अर्थात तिच्या घरात आई आणि मोठी बहीण याव्यतिरिक्त तिच्या या स्वप्नांकडे केवळ एक खूळ म्हणूनच बघितले गेले. तेगलाच्या वडिलांनी तर हे मुलीबाळींचे काम नसून तिने घर व आपली बहीण-भावंडे सांभाळावी, आणि यापुढे हे नसते उद्योग बंद कर, असा सज्जड दम दिला! तिचे किशोर मन कधी कधी बंड करून उठे. वडिलांच्या सततच्या अशा वागण्यामुळे, बहिणींच्या तुलनेत भावांना मिळणाऱ्या विशेष सवलतींमुळे पुरुषी वर्चस्वाविषयी तिच्या मनात एक अढी निर्माण होऊ लागली.
आजही आपल्या वडिलांच्या विचारसरणीविषयीची तिची ही अढी कायम आहे. ‘माझे आणि वडिलांचे संबंध आता मत्रीपूर्ण आहेत’ असे तिने एका मुलाखतीत सांगितले. पण ‘तुम्ही जेव्हा यशस्वी असता तेव्हा सारेच तुमचे मित्र होऊ इच्छितात’, ही मल्लिनाथी करायला ती विसरत नाही.
तिच्या करिअरचे सुरुवातीचे दिवस तिच्यासाठी आव्हानात्मकच राहिले आहेत!
केनिया अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने तिला ती अतिशय कृश व नाजूक प्रकृतीची असल्याने तिचा टिकाव लागणार नाही, असे जाहीर केले होते. पण १९८८ साली झालेल्या एका प्रतिष्ठित क्रॉस कंट्री स्पध्रेत तेगलाने जी उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे तिची वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी निवड करणे भाग पडले! आणि पहिल्याच प्रयत्नात तिने मिळवलेले नेत्रदीपक यश तेगलाला हुरूप देऊन गेले!
पण तरीही पुरुष खेळाडूंच्या तुलनेने तिला सतत मिळणारी दुय्यम वागणूक तेगलासाठी अपमानास्पद होती. तिच्या प्रशिक्षकांकडूनच जेव्हा ‘आफ्रिकन महिला कधीच धावू शकत नाहीत’ अशी टिप्पणी तिने ऐकली तेव्हा ती अतिशय निराश झाली. आपल्या देशात महिलांना काही करून दाखवणे अवघड आहे असे वाटून तेगलाने १९९१ मध्ये जर्मनीमध्ये प्रस्थान केले. परंतु आपल्या महिला म्हणून मिळणाऱ्या ‘खास’ वागणुकीचे केवळ स्थान बदलले आहे, हे दोन आठवडय़ांतच तिच्या लक्षात आले. तिथे तिला ट्रेिनग तर दिले जात होते, पण त्या बदल्यात सर्व ग्रुपसाठी (ज्यात केवळ पुरुष होते) स्वयंपाक करणे, त्यांचे कपडे धुणे इ. कामेही करावी लागत. पण आपण या विरोधात ‘ब्र’ जरी काढला तरी आपली रवानगी परत घरी होईल या भीतीने ती निमूट सहन करत राहिली. ह१’ िटं१ं३ँल्ल उँंेस्र््रल्ल२ँ्रस्र् सारख्या अनेक स्पर्धामध्ये विजय खेचून आणणाऱ्या तेगलाने दोनदा १९९५ व १९९९ मध्ये कांस्यपदक मिळवले. २००० सालच्या समर ऑलिम्पिक्सचा सीझन आला. तेगला सर्वाचीच ‘हॉट फेव्हरिट’ असल्याने तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. आदल्या रात्री अचानक तेगलाला उलटय़ा आणि जुलाब होऊ लागले. तिला अन्नातून विषबाधा झाल्याचे निदान झाले. खरेतर त्या वेळी तेगलाने विश्रांती घ्यायला हवी होती. पण दुसऱ्या दिवशी तशाही परिस्थितीत स्पध्रेत उतरली आणि दहा हजार मीटर स्पध्रेत पाचवा क्रमांक तिने मिळवला!
रॉटरडॅम, न्यूयॉर्क, बíलन, रोम आणि लंडन, वर्ल्ड हार्मनी रन (स्वित्र्झलड) इथल्या प्रत्येक मॅरेथॉन स्पध्रेत सर्व जुने विक्रम तेगलाने मोडीत काढले.
अनेक स्पर्धामध्ये अनवाणी धावलेल्या तेगलाला १९८९ साली पहिला ‘शूज’चा जोड मिळाला तोही ती ठेवणीतल्या स्पर्धा, ज्या ओबडधोबड रस्त्यांवर होत त्यासाठी जपून वापरत असे.
 न्यूयॉर्कमध्ये १९९४ साली झालेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा मॅरेथॉन स्पध्रेत धावणारी आणि ती जिंकणारी तेगला ही पहिली आफ्रिकी महिला म्हणून नोंदली गेली! आता केनियाला आपल्या पुरुष अ‍ॅथलीट्सच्या सोबत एका तेवढय़ाच किंबहुना अधिकच गुणवत्ता असलेल्या तेगलाचे नाव सन्मानाने यादीत घेणे भाग पडले! तेगला आता सर्व केनियन युवा मंडळींचे ‘रोल मॉडेल’ बनली.
२००३ साली तेगलाने ‘तेगला लोरूपे पीस फाउंडेशन’ची स्थापना केली! जगात सर्वत्र शांतता नांदावी यासाठी तेगलाने स्वत:ला आता वाहून घेतले आहे. ती राहत असलेल्या प्रांतातील विविध जाती-जमाती आणि त्यांच्या आपापसातील सततचा संघर्ष पाहतच तेगला मोठी झाली. या लढाया इतक्या तीव्र असत की त्यात भाग घेणाऱ्यांना ‘वॉरिअर्स’ (लढवय्ये) म्हटले जात होते.
केवळ लढाया, दंगे, मारामाऱ्या यातून कधीही कुठलेच निष्कर्ष निघत नाहीत, गुंते सुटत नाहीत, तसेच कुणाचाच विकास होऊ शकत नाही. त्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. मग एकजूट होईल कशी? तर त्यासाठी तेगलाने तिने ज्यात जागतिक विक्रम केले त्या मॅरेथॉन स्पध्रेचाच सहारा घेतला. आपल्या नावाभोवती असलेल्या ग्लॅमरचा असाही उपयोग तिने केला.
२००६ पासून दहा किमीची ‘पीस रेस’ आयोजित करून तिने सतत आपसात झगडणाऱ्या विविध जमातींतील दोन हजारांवर लोकांना एकत्र आणले. यात राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, राजदूत, सरकारी उच्चाधिकारी यासोबतच आफ्रिकेतील ‘वॉरिअर्स’ हेही उत्साहाने भाग घेतात. पण केवळ धावण्यामुळे या वॉरिअर्सची मानसिकता बदलली का, तर नक्कीच नाही!  या स्पर्धाच्या निमित्ताने आपल्यातील क्षमता जोखून पाहण्याची संधी या वॉरिअर्सना मिळाली. तेगलाने त्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला. शिक्षण, मेहनत, गुणवत्ता, चिकाटी इ.ची योग्य सांगड घातल्यास आपलेही आयुष्य बदलता येऊ शकते आणि लढाई हा त्याचा मार्ग नाही हे ‘पीस रेस’च्या माध्यमातून तेगलाने या मंडळींना पटवून दिले. तिच्या या कार्याची फलनिष्पत्ती म्हणून हजारो वॉरिअर्सनी आपली शस्त्रे खाली ठेवून आता शांततेचा मार्ग अवलंबला आहे.
‘मी ज्या समाजात वाढले त्या लोकांनीच मला मोठे केले आहे. काही लोक माझ्या स्वप्नांच्या आड आले असतील, पण बहुतेकांनी मला प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या ऋणातून अल्पांशाने का होईना मुक्त होण्याची ही नामी संधी होती’ असे लोरूपे हिने म्हटले आहे!
तिच्या या उपक्रमाची दखल ‘ऑक्सफॅम’सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आणि तिला सतत प्रोत्साहन दिले. २००६ साली ‘युनायटेड नेशन्स’ने तेगलाला अॅम्बेसेडर फॉर स्पोर्ट म्हणून नियुक्त केले. तसेच ‘इंटरनॅशनल स्पोर्ट्स अॅम्बेसिडर फॉर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर अॅथलेटिक्स फेडरेशन’ म्हणूनदेखील तिची नियुक्ती केली गेली. ‘चॅम्पियन्स फॉर पीस’ या संघटनेचेही सदस्यत्व तिले मिळाले आहे. नामवंत ‘अॅथलीट्स’ची ही संघटना आपल्या ग्लॅमर व पॉवरचा उपयोग शांततेच्या प्रसारासाठी करते. तेगलाने या कार्याच्या माध्यमातून केनियन महिलांसाठी विविध प्रशिक्षण, रोजगार संधी, तर अनाथ मुलांसाठी, निवारा, शाळा, असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
आपल्याला प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागलं म्हणून आपल्या पुढच्या पिढीसाठी शांततेचा राजमार्ग तयार करणारी तेलगा आज स्त्री जातीचा एक आदर्श आहे. आजच्या जागतिक दिनानिमित्ताने तिला सलाम!