मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

सीमाआंटींना वाटे, की हल्लीच्या लहान मुलांच्या हाताशी काय नाही म्हणून विचारा! फक्त अभ्यासात पहिलं येऊन ती थांबत नाहीयेत. समस्त कला आणि क्रीडांमध्येही त्यांनी पारंगत व्हावं, अधिकाधिक अनुभव घ्यावेत, म्हणून पालक झटताहेत. या चिमुरडय़ांना सारं काही मिळतं आहे, बिचाऱ्यांच्या जवळ ‘लहान मुलांसारखं’ वागण्यासाठी वेळ मात्र नाहीये.. मुलांना हवंय हे सारं, की कसलीशी सक्ती आहे त्यांच्या आई-वडिलांवर? आपले हे विचार मनातच ठेवण्यापेक्षा सीमाआंटींनी वत्सलावहिनींच्या आधुनिक अ‍ॅडव्हाइस देणाऱ्या ‘व्वा’ हेल्पलाइनला फोन लावला.

आपल्या सोसायटीतल्या पाच  इमारतींमधल्या, ७५ कुटुंबांमधल्या, लहान-मोठय़ा ९०-१०० मुलांमधून ८-१० उत्साही पोरंपोरी गोळा करायची आणि ‘सोसायटी-डे’साठी एक छोटासा करमणुकीचा कार्यक्रम बसवून द्यायचा, अशी जबाबदारी सीमाआंटींनी घेतली होती खरी, पण आपल्याकडल्या मुलांपाशी हुशारी, कौशल्यं, साधनं असं सगळं मुबलक असलं, तरी कुणापाशीच मोकळा वेळ नसेल हे काही त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. जे बघावं ते मूल ‘व्हेरी बिझी यू नो’ गटातलं!

आपापल्या अभ्यासाच्या क्लास-शिकवण्या-प्रॅक्टिस सेशन्स हे तर प्रत्येकाचं झालंच, पण त्याखेरीजही जगाच्या पाठीवर जे जे म्हणून शिकण्यासारखं असेल, ते ते शिकण्यात-गिळण्यात-फस्त करण्यात मुलं नुसती गढून गेलेली. १४ (आता कदाचित १४ हजार) विद्या आणि ६४ (आता कदाचित ६४ हजार) कला यातलं काहीही सोडायचं नव्हतं पठ्ठय़ांना. कुणी ‘जेंबे’ वाजवायला शिकतोय, कुणी ‘किक बॉक्सिंग’चे धडे घेतोय, कुणाला ‘ट्रायथलॉन’ ट्राय करायचं आहे, कुणी सुकन्या ‘कंटेंपररी डान्स’ला जात्येय, कुणाला ‘पॅरासेलिंग’, झालंच तर ‘पॅराग्लायडिंग’चा नाद आहे, कुणी ‘योगा’ करतोय, कुणी ‘व्हॉइस कल्चर’ला धरलंय.. असा चौफेर कला आणि क्रीडांचा माहोल माजलेला होता. त्यासाठी लागेल तेवढा वेळ, पैसा, शक्ती खर्चायला पालक तयार होते, आणि ही ज्ञानगंगा पार करताना पोरांची फार दमछाक होत होती. बिचाऱ्यांपाशी एवढं सगळं होतं, पण वेळच नव्हता. आता आई-वडिलांनासुद्धा पोरांची ‘अपॉइंटमेंट’ घ्यावी लागायची म्हणे. दिवसाकाठी  काही मिनिटं मुलांकडून मिळाली तरी खूप!

‘अश्राप’ सीमाआंटींनी अशाच अपॉइंटमेंट्स घेऊन, फोन-मेसेजेस वगैरेंचा ‘लक्ष’ वाहून आज पहिल्यांदा प्रॅक्टिससाठी मुलांना बोलावलं होतं. पण दुपारपासून एकेक भिडू गळायला लागलेला. आधी ‘बी-१७’मधून फोन आला, ‘‘सॉरी हो.  आज आमची माही येऊ शकणार नाही प्रॅक्टिसला.’’

‘‘तिला विचारूनच तर वेळ ठरवली होती मी.’’ सीमाआंटी.

‘‘कबूल आहे. पण नेमका तिचा ‘झुंबा डान्सिंग’चा क्लास सुरू होतोय ना.’’

‘‘थोडं पुढे ढकलून, म्हणजे आपला ‘सोसायटी-डे’ झाल्यावर नाही का करता येणार झुंबा?’’

‘‘नेमकी आजच एक लॅटिन अमेरिकन कोच येत्येय ना इथे.. दुर्मीळ संधी घ्यायला हवी. पुढे जगात कुठेही गेलं तरी आपल्या मुलांचं अडायला नको. आमच्या वेळी नव्हत्या अशा संधी. आता आहेत..’’

‘‘ठीक आहे. तिच्या ‘झुंबा झोंबी’नंतर पाठवा.’’ सीमाआंटींनी हसून साजरं केलं. पण झुंबाचं एवढं प्रेम अचंबा वाटायला लावणारंच होतं. आफ्रिकेतला झुंबा माहीला आवडेल, की कॉलनीतल्या पोरांबरोबरचा दंगा आवडेल, हा प्रश्नही मनात डोकावत होता. त्याचं उत्तर मिळवण्याच्या आतच पुढचे एकेक प्रश्न आदळत गेले. ‘सी-४२’मधल्या नकुलला ‘स्केटस्’ विकत आणायला जायचंय,

‘ए-५’मधल्या विराटचं ‘भगवद्गीता अ‍ॅट ए ग्लान्स’चं ‘सेशन’ वेळ बदलून  आजच आलंय, ‘डी’ बिल्डिंगमधल्या जोहानाचा ‘सेल्फ डिफेन्स कोर्स’ सुरू झालाय, कुणाचं ‘फोनेटिक्स’ आहे, कोण ‘क्ले मॉडेलिंग’ला जातंय.. करता करता ही मुलं सर्वज्ञच होणार की एक दिवस! तेसुद्धा जन्मल्यानंतरच्या पहिल्या अवघ्या पंधरा-वीस वर्षांमध्येच. केवढा हा उरक, केवढी ही जबर ज्ञानलालसा! प्रत्येकाचे पालक कौतुकानं एकच गोष्ट सांगत होते,‘‘काय आहे, आमच्या वेळी नव्हत्या या सोयी. आता आहेत म्हटल्यावर द्यायला हव्यातच ना आम्ही.. मी त्याला/ तिला म्हटलंय, तू शिकायचं तेवढं शीक. आम्हाला हे कुणी ‘शिकू दिलं नाही’ असं पुढे म्हणू नकोस.’’ याच्या पुढे सीमाआंटी काय बोलणार? त्या आपल्या टिपायचं तेवढं टिपत होत्या. आपल्या वेळी नसलेली प्रत्येक गोष्ट कशी काय देता येईल? सीमाआंटींची गेली तीन-चार र्वष परदेशात गेली म्हणून, एरवी हा सहनिवास स्थापन झाल्यापासूनच्या त्यांच्या इथल्या वास्तव्यात त्यांनी मुलांच्या कार्यक्रमांची जबाबदारी हौसेनं खूपदा घेतली होती. त्यांना मजा वाटायची,  पोरंही मजा करायची. पूर्वी एकेका नाटकात तिघा-तिघांना ‘शिवाजी’ किंवा ‘रामदास’ यांची भूमिका करायची वेळ यायची. हवेत पुठ्ठय़ाच्या तलवारी फिरवायला मावळ्यांची एवढी गर्दी व्हायची स्टेजवर, की शेवटी ती मुलं एकमेकांवरच वार करायची, आणि आता बघावं तर नाटकासाठी एक अख्खा ‘शिवाजी’ मिळाला तरी ‘हर हर महादेव’ म्हणायची वेळ. काय करणार? मुलांना वेळच नाही. प्रॅक्टिससाठी तरी तीन-चार पोरांचा एकत्र ताळमेळ घालावा कसा? पर्याय म्हणून नाइलाजानं एकेकटय़ा मुला-मुलींची नाचगाणी ठेवल्यावर गॅदरिंगचा खेळ रंगावा कसा?  सीमाआंटी विचारात पडल्या. त्या सध्या काहीही शिकत नसल्यानं त्यांना वेळच वेळ होता.

गंमत म्हणजे त्यांना स्वत:च्या मूलपणातही वेळच वेळ असायचा. रोजची शाळा आणि गृहपाठ झाला की हुंदडायला सगळीच मुलं मोकळी असायची तेव्हा. ‘मोठेपणी अमुक ज्ञानासाठी अडायला नको,’ असं म्हणून फारसं काही ज्ञानामृत पाजलंच नाही त्यांना त्यांच्या घरच्यांनी. पुढे आयुष्याचा रेटाच एवढा होता, की कशासाठी अडून बसण्याइतपतही सवड सापडली नाही कधी. फारसा व्यक्तिमत्त्व विकास खरोखर झाला नाही, पण म्हणून सगळं भकास झालं असंही नाही.  नवनव्या गोष्टी समोर येत गेल्या. सीमाआंटी जमेल तशा त्यांना सामोऱ्या जात राहिल्या. काही गोष्टी नक्कीच हातून राहून गेल्या. त्या आपल्या/आपल्यासाठी नव्हत्या, असं सीमाआंटींनी परस्पर स्वत:ला समजावून टाकलं. अख्ख्या आयुष्याची नौका एकदा हाकायला घेतल्यावर एखादं ‘पॅरासेलिंग’ किंवा ‘पॅराग्लायडिंग’ न जमल्यानं काय मोठं बुडणार होतं..

आपले असले कोमट, प्रतिगामी विचार सीमाआंटींनी अर्थातच चारचौघांत सांगितले नाहीत. पण एकतर्फी निरीक्षण सुरूच होतं. तालमीची वेळ सतत मागे-पुढे करणं, दोघा-दोघांची त्यांच्या त्यांच्या सोयीनं तालीम घेणं, फोनवर संवाद किंवा ‘स्काइप’वर पात्रांच्या हालचाली घटवून घेणं, अशा प्रकारे कार्यक्रम ‘बसत’ होता. तसा तो फार उठण्याची शक्यता नव्हतीच. पण निदान करणाऱ्यांची मनं त्यावरून उडू नयेत, ओढवून घेतलेली कामगिरी निभावता यावी इतपत धडपड सुरू होती. आता अजून कुणाची काही ज्ञानपिपासा उफाळून येऊ नये म्हणजे झालं, असं वाटेवाटेपर्यंत ‘डी-५१’ मधल्या सिद्धान्तकडून तातडीचा निरोप आला. ‘‘सॉरी.. पण आमच्या पोराला रिप्लेस करा.’’

‘‘अहो, पण कार्यक्रमाला ४ दिवस उरले असताना..’’ सीमाआंटी.

‘‘होतंय खरं तसं, पण इलाज नाही. नेमकं त्याच दिवशी शाळेत फुटबॉल टीमची निवड होणारे. बार्सिलोनाला पाठवायचं चाललंय जिंकणाऱ्या टीमला. लोन-बिन सगळं शाळाच अ‍ॅरेंज करतेय. खिशाला जडच पडणारे, पण मुलाला फॉरेनच्या मुलांशी खेळण्याचा अनुभवपण यायला हवा ना.’’ सिद्धान्तची आई मनापासून सांगत होती. कॉलनीतल्या मुलांमध्ये सिद्धान्त खरंच हुशार, चटपटीत होता. त्याला कळत नाही असा विषय शिल्लक राहिलेला नव्हता. त्याच्या बालमुठीतला खुळखुळा काढून घेताच त्याच्या मनगटावर एक अदृश्य मनगटी घडय़ाळच लावलं होतं जसं काही त्याच्या मातापित्यानं. तोही पठ्ठय़ा सतत त्याच्या तालावर नाचून एकामागून एक क्षेत्र काबीज करत चालला होता. फुटबॉलच्या आंतरशालेय स्पर्धामध्ये तो ‘तारा’ होता. तरीपण आता आंतरशालेय अनुभवासाठी थेट बार्सिलोना गाठायचा, तेही कर्ज काढून?.. सीमाआंटींनी धीर करून हा मुद्दा मांडला तर लगेच समोरून उत्तर आलं,

‘‘अहो, गेल्या वर्षी शाळेच्या स्कॉलर बॅचला शैक्षणिक सहलीसाठी ‘नासा’ला नेलं होतं. केवढा ‘रिच’ सायंटिफिक एक्स्पीरिअन्स मिळाला असणार मुलांना.. आणि आम्ही सिद्धान्तला पाठवू शकलो नाही. किती चुटपुट लागली होती जिवाला.. तेव्हाच ठरवलं, त्यांचा पुढचा फॉरेन चान्स सोडायचा नाही. पुढे-मागे परदेशात खेळावं लागलं तर तयारी नको?’’

‘‘वेळ आली की मोठेपणी खेळेल की तो. एवढा हुशार मुलगा!’’ सीमाआंटी.

‘‘नाही नाही.. त्याच्या प्रगतीसाठी पडेल ते केलंच पाहिजे आम्ही. आता आमच्या वेळी नव्हत्या या गोष्टी. सोलापुरातल्या शाळेतल्या पटांगणात पायांनी फुटबॉल उडवत बडवत बसलो.. फार तर अकलूजला नाही तर बार्शीला गेलो असू खेळायला.’’

‘‘तेव्हा सोलापुरास्नं बार्शी म्हणजे आज मुंबईहून बार्सिलोना की हो! तेवढंच परकं. उमेदीचं वय सगळ्याला कवेत घेऊ शकतं बघा. आपण कशा कशाची तयारी करून घेणार? कुठे कुठे पुरे पडणार पालक म्हणून?’’ सीमाआंटींनी सुचवून पाहिलं. उपयोग झाला नाही. ऐनवेळी सिद्धान्तचं पात्र गाळूनच नाटक करावं लागेल या आशंकेनं सीमाआंटी खचून गेल्या. कुणावर त्यांनी कशाची सक्ती करण्याचा प्रश्नच नव्हता. पण ही कोणती छुपी सक्ती पालकांवर आहे, मुलांना चौफेर वाव मिळालाच पाहिजे हा कसला दबाव आहे, यानं त्या अस्वस्थ होत्या. कुणीतरी सुचवलं म्हणून त्यांनी अखेर वत्सलावहिनींना फोन लावून आपली सगळी खळबळ व्यक्त केली.

‘‘वत्सलावहिनी, आपापल्या पोरांना किती किती आणि काय काय आलं म्हणजे आताचे लोक समाधानी होतील हो?’’

‘‘आता संधी आहेत, लोक धडपडून, पदरमोड करून त्या मुलांना द्यायला बघताहेत, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?’’ वत्सलावहिनी.

‘‘मला नाहीये मोठासा प्रॉब्लेम. पण या मुलांनाच पुढे-मागे तो येईल अशी भीती वाटते एकेकदा. अहो वयाच्या पहिल्या १५-२० वर्षांमध्ये सगळ्या कला, क्रीडा, सगळे महत्त्वाचे अनुभव, वगैरेंचा फडशा पाडल्यावर पुढच्या लांबच लांब आयुष्यात करण्याजोगं उरणार काय त्यांच्याजवळ?’’ सीमाआंटींनी मुद्दा मांडला.

‘‘का? नव्या नव्या कल्पना, आव्हानं येत राहतीलच ना पुढेही?’’

‘‘येतील थोडीफार.. पण आपल्या ‘झडपतंत्रा’त काय नवलाई टिकणार सांगा. इकडे माणसं जग-जग-जगणार आणि तिकडे लहान वयापासून कशाचं कौतुक, नावीन्य राहिलेलंच नसणार. किती कंटाळवाणं होईल ना हे? ‘नथिंग टू लुक फॉरवर्ड टू,’ असं तर नाही होणार?’’

‘‘कुणी पाहिलंय एवढय़ा पुढचं? आजचे पालक मुलांना सगळं सगळं देण्याच्या नादात आहेत. काय, किती त्यांच्या गळी उतरतंय हे बघायलाही थांबायला तयार नाहीयेत. आपल्याला जे जे मिळालं नाही, ते ते मुलांवरून ओवाळून टाकायलाच निघालेत जसे काही..’’ वत्सलावहिनी.

‘‘ते तर ऐकून ऐकून कान किटलेत माझे. गेले पंधरा दिवस हेच येतंय कानावर. मी म्हणते, आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना द्यावंसं वाटणं ठीकच आहे. पण काय हो, आपल्याला जे जे मिळालंय ते थोडं तरी मुलांपर्यंत जाऊ द्यावं असं का नाही वाटत हो त्यांना?’’

‘‘सच अ‍ॅज?’’

‘‘का? मातृभाषा म्हणा, तिच्यातलं साहित्य म्हणा, स्थिर कुटुंब म्हणा, दैनंदिनीची शिस्त म्हणा, ‘कम्युनिटी लिव्हिंग’- म्हणजे सहजीवन म्हणा, या वारसारूपात आलेल्या गोष्टी सगळ्या फालतू ठरतात का आता?’’

‘‘फालतू नका म्हणू अगदी.. पण त्या काय, आसपासच्याच असतात, गृहीत धरलेल्या असतात. त्यांना ना मोठं नाव, ना मोठा भाव. आज सगळीकडे ‘तारे जमींपर’ यायला बघताहेत. पंचतारांकित जगणंच हवंय सगळ्यांना. मग त्यातून मुलं तरी कशी सुटणार?’’

‘‘अच्छा.. म्हणजे हे असंच चालणार, आपल्यासारख्यांनी नुसतं बघत बघायचं, एवढाच सल्ला आहे का तुमचा?’’ सीमाआंटी कातावून म्हणाल्या.

‘‘नाही नाही. आम्ही सांत्वन करायला बसलेलो नाही. सल्ला वगैरे द्यायला बसलोय. राइट?’’

‘‘मग द्या की पटकन.’’

‘‘मी म्हणेन, आपण आपले प्रयत्न चालूच ठेवायचे. शेवटी कुठे ना कुठे ते पोहोचतीलच. कुणी ना कुणी बघेल, ऐकेल, आवडल्यास प्रसार करेल. पूर्वी कुणा कवींनी म्हणून ठेवलंय ना, ‘अंधार फार झाला.. पणती जपून ठेवा,’ याच्या पुढे आपण जायचं. बाहेर खूप झगमग, लखलखाट असला, तरी आपल्या पणत्या आपण जपून ठेवायच्या. लखलखाटानं शिणलेल्या नजरा कधी चुकून आत वळल्याच तर त्यांना जाणवेल त्या शांत तेवत्या ज्योतीचं महत्त्व! शेवटी फुंकरीसरशी विझवणं सोपं.. प्रयत्नांनी तेवत ठेवणं कठीण, नाही का?’’ सांगता सांगता वत्सलावहिनींची वेळ संपली, मुख्य सल्लाही संपला असणार. पण सीमाआंटींच्या मनात काहीतरी हलकेच प्रकाशत होतं. गेल्या काही दिवसांत खूपदा वाटायचं, कशाला हवीए  ही कार्यक्रम बसवण्याची उचापत आपल्याला?.. पण आता नक्की ठरलं .. आपण यंदाचा कार्यक्रम तर करायचाच.. पण.. पुढेही.. जमेल तेवढी र्वष.. का नाही?’’