News Flash

स्कूल चले हम ..

आजकाल मुलं शाळेतून येताना वा जाताना एक तर बसमधून येतात, रिक्षातून कोंबली जातात किंवा पालक बाइकवरून वा फोर व्हीलरच्या बंद काचांआडून मुलांना शाळेत पोहोचवतात आणि

| July 26, 2014 03:29 am

आजकाल मुलं शाळेतून येताना वा जाताना एक तर बसमधून येतात, रिक्षातून कोंबली जातात किंवा पालक बाइकवरून वा फोर व्हीलरच्या बंद काचांआडून मुलांना शाळेत पोहोचवतात आणि आणतात. शाळेत जाणं नि शाळेत येणं यांत खूप काही घडतं, जसं की, मित्रमत्रिणींशी हातवारे करत, गप्पा मारत वाद घालणं,चर्चा करणं, छोटी छोटी गुपितं शेअर करणं,  जाता-येताना आपसूकच एकमेकांची काळजी घेणं घडत जातं, त्यातून आपोआप समाजभान आणि सामाजिक जाणीव निर्माण होते. एवढंच नव्हे तर पावसाळ्यात लालबुंद पाण्याने भरून वाहणारे नाले, ओढे, हिवाळ्यात होणारी पानगळ, वसंतात बहरून येणारा निसर्ग हे ठळक जीवनानुभव घेता येतात. तसेच आजूबाजूची सामाजिक उतरंड, आर्थिक उतरंड, समाजातील दारिद्रय़, बेकारीसारख्या समस्या याची जाणीव मुलांना या प्रवासात होत असते; पण आता ते बहुतांशी अशक्यच बनलंय.

परवाच माझी एक मत्रीण खूप वर्षांनी भेटली. तिला मी आग्रहाने घरी घेऊन आले. खूप जोरजोरात गप्पा चालल्या होत्या आमच्या, बरोबर हसणं-खिदळणंही. आवाजाने दुपारच्या डुलकीतून जागी झालेली शेजारीण सहजच डोकावली. चेहऱ्यावर कुतूहल. मी लगेचच मत्रिणीची ओळख करून दिली. ‘शाळेतली मत्रीण का?’ शेजारणीने सहजच विचारलं. ‘‘नाही गं! शाळेत जाता-येतानाची. मला सीनिअर आहे दोन र्वष.’ मी. परत एकदा चहा वगरे झाला आणि दोघीही परत गेल्या; पण डोक्यात एक किडा वळवळलाच. हल्लीच्या मुलांना असतात का अशा शाळेत येता जातानाच्या वेळच्या मित्रमत्रिणी? मुलांशीच बोलावं याविषयावर म्हणून त्यांच्याशी संवाद सुरू केला, तर प्रमाण अत्यंत अल्प म्हणजे नाहीच्याच आसपास दिसलं. मग प्रश्न पडला, का नाही त्यांना अशा मित्रमैत्रिणी?
याचं उत्तर- एक तर मुलं रिक्षातून कोंबून शाळेत येतात आणि अनेकदा रिक्षामध्ये मत्री जमण्यापेक्षा भांडणंच जास्त होतात किंवा पालक बाइकवरून किंवा फोर व्हीलरच्या बंद काचांआडून मुलांना शाळेत पोहोचवतात आणि तसंच परत आणतात. मग याचं कारण काय याचा विचार करता जाणवलं ते शाळा, अभ्यास, टय़ूशन्स, स्पर्धा यांत प्रचंड बुडलेली आपली पाल्ये.
यांना हे अत्यंत सीधेसाधे आनंद घेण्यासाठी वेळच नाही. मग ते आनंद कसा मिळवतात विचारलं, तर मॉल्समध्ये हिंडणं, हॉटेलिंग, मल्टिप्लेक्समधला सिनेमा. कम्पुटर गेम्स, इंटरनेट सगळंच किती कृत्रिम आणि व्हच्र्युअल. विचाराने थोडंसं हलायला झालं आतून.
मुलांना माझ्या वेळच्या शाळेत जाताना घडणाऱ्या साध्या साध्या गोष्टींबद्दल सांगितलं, तर ते खूपच नावीन्यपूर्ण काही तरी ऐकावं तसे आ वासून ऐकत होते. मी म्हटलं, पावसाळ्यात शाळेत जाताना रस्त्यावरच्या छोटय़ा छोटय़ा डबक्यांमध्ये पाय मारून इतरांना भिजवण्यात जाम मजा यायची आम्हाला किंवा हातातल्या छत्र्या गोल गोल फिरवूनही इतरांना भिजवायचो आम्ही पावसाळ्यात, शाळेत येताजाता चिंचा, आवळे, बोरं, कैऱ्या पाडून चिमणीच्या दातांनी त्यांचं शेअरिंग करण्यात खूप थ्रिल असायचं, भातशेतीतून तरारलेल्या किंवा पिकू लागलेल्या रोपांना स्पर्श करत जाताना एक अनोखा स्पर्शानुभवच मिळायचा आणि वळवाच्या पावसात कुणा एकाकडेच असलेल्या छत्रीतून सहा-आठ जणांनी येताना जो काही हशा पिकायचा तो अजूनही तसाच ऐकू येतोय मला.
 ‘‘म्हणजे तुमचे ममा किंवा पापा नव्हते छत्री घेऊन लगेच शाळेत येत?’’ समोरच्या प्रश्नाने मी वर्तमानात शिरले. खरंच! तेव्हा नव्हतंच कोणी येत. शाळेत जाणं आणि परत येणं, त्या वेळी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेणं, त्या दरम्यान आलेल्या अडचणींना तोंड देणं हे त्या त्या विद्यार्थ्यांचं काम असं मानलं जात होतं. जीवन एवढं असुरक्षितही नव्हतं म्हणा.
शाळेत जाणं किंवा शाळेतून येणं यात फक्त घरातून बाहेर पडून विशिष्ट रस्त्याने शाळेत पोहोचणं किंवा शाळेतून बाहेर पडून तसंच परत घरी येणं एवढंच अभिप्रेत नसतं. खूप काही असतं शाळेत जाणं नि शाळेत येणं यांत, खूप काही. जसं की, मित्रमत्रिणींशी हातवारे करत, गप्पा मारत वाद घालणं, प्रसंगी थोडीशी ढकलाढकली किंवा दप्तर वगरेची ओढाओढी करणं, शिक्षकांविषयीची गॉसिप्स चघळत जाणं, शाळेतील बठक व्यवस्था, गृहपाठ, स्पर्धा वगरेवर चर्चा करत जाणं, मनातली छोटी छोटी गुपितं एकमेकांशी शेअर करणं असं खूप काही, कारण शाळेत जाणं यांत गटागटाने जाणं अंतर्भूत असतं. हा गट अगदी पार बालवाडीपासून बारावीपर्यंत असाही असू शकतो. मुलांची ‘पीअर ग्रुप’ची गरज या गटामुळे आपसूक भागू शकते, बरोबरीने आपसूकच एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांचा सांभाळ करणं, परस्परांना समजून घेणं, आधार देणं घडतच असतं. त्यातून आपोआप समाजभान आणि सामाजिक जाणीव निर्माण होते. आज मात्र बाइकवर पाठीमागे एकटाच बसून जात असल्याने त्याला या कशाचा गंधच नसतो. दोघं असतील तर एक मागे आणि एक पुढे असंच असतं अनेकदा, त्यामुळे एकमेकांना सांभाळणे वगरेची फारशी भानगड उरतच नाही. म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्याचाही विचार अशा जाण्या येण्यात करावा लागतो हे समजण्याची संधीच मिळत नाही या मुलांना. या प्रवासादरम्यान एक सोप्पासा खेळ खेळला जायचा, जो अगदी सर्वमान्य म्हणावा असा. रस्त्यावर पडलेलं एखादं डबडं किंवा एखादा दगड किंवा एखादी छोटी हलकी वस्तू जी पायाने सहजच ढकलत ढकलत नेता येईल अशी. कोणी तरी ती लाथेने पुढे न्यायला लागायचा. आपोआपच कोणी काही न बोलता किंवा न सांगता बाकीचे त्याला साथ द्यायचे, कोणी शक्तीचा वापर करून त्याला दूर उडवायचं, तर कुणी युक्तीनं त्याला अचूक दिशा देऊन भरकटण्यापासून वाचवायचं. केवढं संघटन सामथ्र्य निर्माण होत होतं त्यात, अचूक निर्णयक्षमता विकसित करण्यासाठीची एक ताकदही होती त्यात, चौफेर नजर आणि विचार करण्याची सवयही लागत होती. आपले सहकारी काय करतात, कसे वागतील याचाही अंदाज बांधता येणं गरजेचं होतं, नाही तर पायात पाय अडकून पडण्याची भीती. बरं! अध्र्या रस्त्यात हा खेळ काही कारणाने थांबला किंवा थांबवावा लागला तर हसून टाळ्या देऊन वगरे ते एन्जॉयच केलं जायचं. याचं हे चुकलं, त्याच्यामुळे ते करावं लागलं, अशी दूषणं किंवा भांडणं सहसा व्हायची नाहीत आणि जर का झालीच तरी ती लगेचच मिटवली जायची म्हणजे आपोआपच खिलाडूवृत्ती निर्माण व्हायची. त्यासाठी वेगळं उद्दिष्ट वगरे ठेवून तासिका किंवा शिबीर घेतलं जाण्याची गरजच नसायची. सहजच अनेक गोष्टी साधणारा हा खेळ शाळेत जाण्याच्या त्या वेळात चतुरस्र बनवून जायचा,
वेगवेगळे ऋतू, ऋतूंनुसार बदलणारा परिसर यांची ओळख शाळेला जाण्याच्या या प्रवासात व्यवस्थित व्हायची. शाळेत जाण्यासाठी मलोन्मैलांचा रस्ता काटणं हे आता कोणाच्या बाबतीत फारसं खरं नसतं, त्यामुळे ऋतूंनुसार निसर्गात घडणाऱ्या बदलांचं निरीक्षण आपसूक करण्याची एक संधी दवडलीच जाते. म्हणजे पहा हं! फार छोटय़ा छोटय़ा नकोच, पण ठळक गोष्टींचा जर का विचार केला तरी ते सहजच पटेल. पावसाळ्यात लालबुंद पाण्याने भरून वाहणारे नदी, नाले, ओढे, हिवाळ्यात होणारी पानगळ, वसंतात बहरून येणारा निसर्ग हे ठळक जीवनानुभव घेण्यापासून वंचितच राहावं लागतं. एवढंच कशाला, आजूबाजूची सामाजिक -आर्थिक उतरंड, समाजातील दारिद्रय़, बेकारीसारख्या समस्या यांचं दर्शन आपोआपच घडत असतं, त्यामुळे नकळतच त्याची जाणीव मुलांना या प्रवासात होत असते; पण गाडीवरून भुर्रकन जाताना किंवा रिक्षातून कोंबून प्रवास करताना किंवा बसमधून तासन्तास प्रवास करताना हे सारं अशक्यच बनतं.
हे असं शाळेत जायला द्यायचं म्हणजे वेळेचा कित्ती अपव्यय. आजकाल अभ्यासक्रम कित्ती अवघड आहे. शाळा, टय़ूशन्स, गृहपाठ यात आमची मुलं भरडून निघतायत आधीच. त्यात असा वेळ वाया घालवून कसं चालेल? एक ना अनेक कारणांचं मोहोळच उठेल मुलांना असं शाळेत जाऊ दे म्हटलं तर. पण अभ्यासासाठी उपयोगी असलेलं निरीक्षण कौशल्याचं व्यवस्थित विकसन या काळात होईल की नाही? म्हणजे सहजगत्या बेडकासारख्या प्राण्यांचं निसर्गचक्र, पशुपक्षी, झाडे, वेली यांची विविधता, निसर्गातील बारकावे टिपण्याची मुलांना संधी तर मिळेल. शहरात हे सगळं कुठेय? बरोबरच आहे, हे सगळं नसेल, पण कचऱ्याच्या भल्याथोरल्या ढिगांमुळे होणारं प्रदूषण, पाण्याचा होणारा अपव्यय, नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत असणारी अनास्था, नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची नसलेली जाणीव हे त्यांच्या दृष्टोत्पत्तीला येईलच, त्याचबरोबर समाजात अजूनही असणारी मदत करण्याची वृत्ती, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे सरणाऱ्या व्यक्ती यांचंही दर्शन त्यांना घडेलच. बरं, पुस्तकी शिक्षणापेक्षा हे अनुभवातून मिळणारं शिक्षण, जीवन आणखी समृद्ध नाही का करणार? मग या जीवनशिक्षणापासून का बरं वंचित करायचं आपण आपल्या भावी पिढीला? कारण शरीर बळकट करणारा चालण्याचा व्यायाम आणि मन आणि भावनांचं पोषण करणारा मानसिक व्यायाम एकाच वेळी होण्यासाठी ही शाळेत जाण्यायेण्याची क्रिया खूप महत्त्वाची ठरते.
आजकाल शिक्षणांत सहजशिक्षण आणि सहजानुभव यांचा खूप बोलबाला आहे आणि हे सहजशिक्षण पुस्तकांत नसून प्रात्यक्षिकात असतं, असंही वारंवार सांगितलं जातं. बरोबर ज्ञानरचनावादाचाही पुरस्कार केला जातो. मुलांना मिळणाऱ्या ज्ञानाची अनुभवांशी सांगड घालणं गरजेचं आहे हे पटवलं जातं, पण अनुभव मिळवण्याची ही येताजातानाची छोटी छोटी संधी मात्र आपण मुलांना मिळू देत नाही. शहरात अगदी नाही निसर्ग पाहता येत, पण रस्ते, दुकानं, माणसं तर वाचता नि पाहता येतील ना. शिक्षणातल्या नवीन वाटा चोखाळाव्यात अशा मोठाल्या अपेक्षा मुलांकडून बाळगण्यापूर्वी त्यांना शाळेला येण्याजाण्याचे वेगवेगळे रस्ते वापरून त्यातील दूरचा-जवळचा, सुकर-दुष्कर ठरवण्याची संधी का बरं देत नाही आपण?
शेवटी आपल्या मुलांनी शाळेत कसं यावं-जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न फक्त आमच्या पिढीने काय मिळवलं आणि काय मिळू शकतं, हेच सांगायचा हा प्रयत्न.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:29 am

Web Title: we go to school
Next Stories
1 देता मातीला आकार : मदर
2 मदतीचा हात : रुग्णसेवक
3 कलाविज्ञानाचं सहजीवन
Just Now!
X