नागालँडची राणी गिडालू हिचे आंदोलन असो वा बीना दासचा बंगालचे गव्हर्नर जॅक्सन यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न असो वा प्रीतिलता वाडेदाराचं साहसी मरण. स्त्रीचं स्वत:तून बाहेर पडून देशासाठी योगदान देणं हा तिच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरला.
ज्यां च्या दहनभूमीवर कधी पाटी वा पणती लागली नाही, एवढंच काय ज्यांची नावं ही कधी क्रांतिकारकांच्या विजयगाथेत झळकली नाहीत, अशा तरुण भारतीय क्रांतिकारी स्त्रियांच्या कहाण्या प्रत्येक भारतीय स्त्रीची मान अभिमानाने उंचावणाऱ्या अशाच आहेत. राणी गिडालू. नागालँडच्या उत्तर कछार पहाडी भागात राहणारी ही केवळ तेरा वर्षांची मुलगी. आपला चुलतभाऊ जाडोनांग याच्या स्वातंत्र्य संग्रामातील कार्याने प्रेरित होऊन गिडालूनेही स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. १९३१मध्ये जाडोनांगला फासावर चढवण्यात आलं, तेव्हा आंदोलनाचं नेतृत्व गिडालूकडे आलं. तिने आपले कार्यालय मणीपूरहून आदिवासीबहुल असलेल्या पहाडी भागात आणले. १९३१मध्ये ‘सरकारला कर भरू नका’ हे आंदोलन तिने सुरू केले. तेव्हा सरकारने सार्वजनिक कर लादले. लोकांकडची शस्त्रास्त्रे जप्त केली. गिडालूने आपले आंदोलन अधिक तीव्र केले. गिडालूला पकडण्यासाठी इंग्रजांनी अनेक प्रयत्नांची शर्थ केली, पण बहाद्दर गिडालू बराक नदीकाठच्या जंगलात पसार झाली, आणि कधीच इंग्रजांच्या हाती सापडली नाही. स्वराज्यासाठीच्या चळवळीत जशा अहिंसक सत्याग्रहात हजारो स्त्रिया सामील झाल्या, तशा अनेक स्त्रिया सशस्त्र क्रांतिकारक गटांमध्येही समर्पित वृत्तीने सहभागी झाल्या. प्रथमत: प्रचारपत्रके वाटणे, भूमिगतांना खाणे पुरवणे वगैरे वरवरच्या कामांत भाग घेणाऱ्या स्त्रियांचा हळूहळू आतल्या गुप्त क्रांतिकारक गटातही प्रवेश झाला.
बंगालमधील चटगाव इथे क्रांतिकारकांचा असा एक गट आकाराला येत होता. १८ एप्रिल १९३०मध्ये त्यांनी पोलिसांचे शस्त्रागार लुटले. टेलिफोन एक्सचेंज उखडून टाकले. युरोपीयन लोकांच्या क्लबवर बॉम्बफेक करून आपली रणनीती जाहीर केली. अनेक लोकांवर पोलिसांनी गोळीबार केला. कित्येक क्रांतिकारी मरण पावले, पण तरुण स्त्री-पुरुषांमध्ये एक उत्साहाची लाट आली आणि या क्रांतिकारी गटात ते शेकडोने सामील झाले. क्रांतिकारकांना पुरविण्यासाठी विस्फोटक पदार्थ घेऊन जाणाऱ्या तीन स्त्रियांना मेमनसिंह जिल्ह्य़ाकडे जाताना सारशबाडीमध्ये पहिली अटक झाली.
पुढची ठिणगी पडली ती डिसेंबर १९३१मध्ये. शांती घोष आणि सुनीती चौधरी या दोन तरुण मुलींनी टीपर जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टिफंस यांची गोळी झाडून हत्या केली तेव्हा. सरकारी नियमांचा दुरुपयोग करून महिलांचे शोषण करणारा म्हणून तो कुख्यात होता. बंगाली मुलींवर त्याने केलेल्या अत्याचारामुळे संतापाने पेटून उठलेल्या या दोन बेडर युवतींनी मॅजिस्ट्रेटच्या कार्यालयात प्रवेश केला आणि त्याच्यावर धडाधडा गोळय़ांचा भडिमार केला. त्यांना पकडण्यात आलं, थोडीफार चौकशी झाली. मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यावरही दोघी अतिशय शांत होत्या आणि तितक्याच शांतपणे त्यांनी फाशीला आपलंसं केलं. या तरुण मुलींच्या अंगात कुठून आलं असेल हे धैर्य? सुडाचा अग्नी पेटलेला हृदयात आणि त्यात शांतपणे जळणारी देशप्रेमाची धगधगती ज्वाला!
६ फेब्रुवारी १९३२, बंगालचे गव्हर्नर सर स्टॅनली जॅक्सन कलकत्ता विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात भाषण करत होते. समोर प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग शांतपणे त्यांचं भाषण ऐकत होता. अचानक एक स्नातक विद्यार्थिनी बिना दास आपल्या खुर्चीवरून उठली आणि हळूहळू व्यासपीठाकडे जाऊ लागली. गव्हर्नरांपासून थोडय़ा अंतरावर उभं राहून तिने पिस्तुलातून तीन गोळ्या मारल्या. तिचा पहिला नेम चुकला आणि विद्यापीठाचे उपकुलपती सर हसन सुहरावर्दीनी तिला धरलं, तरी तितक्यात शिताफीने तिने आणखी दोन गोळ्या मारल्या, परंतु कोणालाही इजा न होता गोळ्या हवेत उडाल्या. कमला दासगुप्तांना तिने हा बेत सांगितला होता, पण त्यांनी तिला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. बीनाचा ठाम निर्धार पाहून त्यांनीच तिला पिस्तूल खरेदी करून दिले, अन्य मुलींकडून पैसे गोळा करून! एका कॉम्रेडने तिला पिस्तूल चालवायचे शिक्षण दिले, पण सुदैवाने अगर दुर्दैवाने तिचा नेम लागला नाही. बीना दासला नऊ वर्षे कठोर कारावासाची शिक्षा झाली. कमला दासगुप्तांनी स्वत:ला अटक करवून घेतली आणि त्यांना सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.
 वंग कन्यांच्या साहसकथा एकापेक्षा एक रोमहर्षक आहेत. कल्पना दत्त यांनी सांगितलेली प्रीतिलता वाडेदाराची कथा अशीच काळजाचा ठोका चुकवणारी आहे. दोघी जणी बालपणीच्या मैत्रिणी. बालवयात दोघींनी ‘ईश्वर आणि राष्ट्र’ यांच्याशी एकमेव निष्ठा ठेवण्याचं व्रत घेतलेलं. महाविद्यालयात दोघी जणी राष्ट्रवादी गटात सामील झाल्या. तिथेच त्यांनी लाठी आणि तलवार चालवण्याचं शिक्षण घेतलं. पदवीनंतर कल्पना पुढील शिक्षणासाठी कलकत्ता विद्यापीठात गेली. सुट्टीत या दोन मुली आणि त्यांच्या आणखी दोन मैत्रिणी चटगावच्या क्रांतिकारकांच्या संपर्कात आल्या. मे १९३२ मध्ये प्रीती मास्टरदा यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालघाट या गावी गेली होती. संध्याकाळची वेळ होती. कॅप्टन कॅमेरॉनच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चारी बाजूंनी घराला घेराव घातला होता. कॅमेरॉनने मशीनगनने गोळ्या उडवायला सुरुवात केली. घरातूनही रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या चालू झाल्या. अशा एखाद्या कारवाईत प्रीती यापूर्वी कधी नव्हती, पण आता बाहेरच्या परिस्थितीचा एकूण अंदाज आल्यावर तिनेही आतून गोळ्यांचा भडिमार केला. कॅमेरॉन मारला गेला, पण आत निर्मलदा ही घायाळ झाले. तिला पळून जाण्यासाठी सांगण्यात आलं, पण आपल्या सहकाऱ्याची ही अवस्था पाहून तिला त्यांना सोडून जाववेना. मास्टरदांच्या संदेशानुसार पुढे ती भूमिगत झाली. मग पोलिसांनी तिची मैत्रीण कल्पना दत्ताकडे आपला मोर्चा वळवला, पण तिने प्रीतिलताबद्दल थांगपत्ता लागू दिला नाही.
पुढे २४ सप्टेंबर १९३२ प्रीतीने पहाडताली क्लबवर हल्ला केला. मुख्य हॉलवर बाँबफेक झाली. रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडण्यात आल्या. हॉलमध्ये जवळ-जवळ चाळीस लोक होते, त्यातले कित्येक जखमी झाले, एक स्त्री मरण पावली. कोणीतरी या गडबडीत दिवे विझवले आणि क्रांतिकारकांची पांगापांग झाली. पुरुषांच्या वेशात असलेली प्रीतिलता हॉलपासून लांब मरून पडली होती. इंग्रजाच्या हातात सापडण्याआधीच तिने सायनाइड प्राशन करून मरणाला कवटाळले होते.त्याच दिवशी सर्वत्र चार पत्रके वाटण्यात आली होती. त्यात तिने अध्यापक, विद्यार्थी आणि जनतेला ब्रिटिश शासकांविरुद्ध लढण्याचे आवाहन केले होते.
    प्रीतिलता गेली, परंतु तिने किंवा तिच्यासारख्या असंख्य सक्रिय स्त्रियांची ताकद त्यामुळे लोकांसमोर आली. स्त्री बदलत गेली, स्वत:तून बाहेर पडून प्रगतीच्या पथावर पुढे जात राहिली, त्या साऱ्या प्रवासात भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील तिचं योगदान खूप महत्त्वाचं राहील.     
ashwinid2012@gmail.com

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल