काही दिवसांपूर्वी एक स्त्री आपल्या तरुण वयातील मुलाला घेऊन चिकित्सालयात आल्या होत्या. ‘‘हल्ली त्याचे कशातच लक्ष नसते. नुसता हरवलेल्या मन:स्थितीत असतो. काहीही काम करत नाही. काय झालंय काहीच सांगत नाही. बरेच समुपदेशक व  मानसोपचारतज्ज्ञ झाले; पण काहीच फरक नाही. तुमचे निदान वेगळे असते, म्हणून म्हटलं बघावं आयुर्वेदात काही उपाय सापडतोय का? आता तुम्हीच पाहा काय ते. आम्ही तर आशाच सोडली आहे याची. फार हुशार व गुणी होता हो, पण आताच असा का करू लागला आहे काहीच कळत नाही,’’ असे म्हणून त्याला माझ्या ताब्यात देऊन त्या बाहेर जाऊन बसल्या. मलाही त्याच्याशी काय बोलावं कळत नव्हतं म्हणून सहज विचारलं, ‘‘काय झालंय ते मला सांग, नाही तर लोक आता तुला वेडं म्हणायला लागतील आणि मला माहीत आहे तू वेडा नाहीस एक शहाणा मुलगा आहेस.’’ माझे हे शब्द ऐकताच तो रडू लागला. ‘‘डॉक्टर, मला सांगायलाही लाज वाटते. आता फार भीती वाटते.’’ त्याला थोडा धीर देताच तो बोलू लागला. ‘‘ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाला रात्री आपण मोरीत जाऊन लघवी करत आहोत असे स्वप्न पडते व बिछाना ओला झाला की त्यास जाग येते त्याचप्रमाणे माझेही झाले आहे. फक्त मला स्वप्न वेगळे पडते, स्वप्नात नेहमी सुंदर मुलीच येतात आणि झोपेतच वीर्य बाहेर पडते आणि मग घटना घडून गेल्यावर मला जाग येते. मला खरंच काही कळत नाही, मुद्दामहूनपण करत नाही; पण काही कळायच्या आतच शरीरातून वीर्य बाहेर गेलेले असते. मग पश्चात्ताप करण्याशिवाय माझ्याकडे काहीच राहत नाही. आता सतत तोच विचार डोक्यात असतो दिवसभर. मग रात्री परत तेच स्वप्न. पूर्वी फार छान वाटायचं. गंमत वाटायची, पण आता भीती वाटते हो. आता तसे झाले की दिवसभर थकवा जाणवतो. फक्त झोपून राहावंसं वाटतं. कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नाही. नको वाटतं आहे आता हे सगळं. घरच्यांनाही काही सांगता येत नाही. कोणाशी बोलावं काहीच कळत नाही. मानसोपचारतज्ज्ञांच्या औषधाने फार झोप लागते. मग परत आळस येतो.’’ तो खिन्न होऊन बोलतच होता. तोपर्यंत माझे मात्र निदान झाले होते. प्रज्ञापराध घडला की असे होते. म्हणून आयुर्वेदीय ग्रंथात इंद्रियांना फार पीडा देऊ  नये व त्यांच्या फार आहारीही जाऊ  नये, असे सांगितले आहे. बोलीभाषेत या आजाराला ‘स्वप्नदोष’ असे म्हणतात. आयुर्वेदात स्वप्नाचे ‘दृष्टं श्रुतानुभूतं च प्रार्थितं कल्पितं तथा। भाविकं दोषजं चैव स्वप्नं सप्तविधं विदु:।’ चरक संहिता. असे एकूण सात प्रकार सांगितले आहेत. आपण जे पाहतो, ऐकतो, अनुभवतो, प्रार्थना करतो, कल्पना करतो तशीच स्वप्ने आपल्याला पडत असतात. भाविक म्हणजे भविष्यकालीन फल दर्शवणारी, तर दोषज म्हणजे दोष प्रकोपातून उत्पन्न होणारी. म्हणून आजकाल आपली मुले दिवसभर काय पाहत आहेत, ऐकत आहेत, कसल्या गप्पा मारत आहेत, काय इच्छा त्यांच्या मनात आहे या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्या मनावरती होत असतो व पर्यायाने तशी स्वप्नं पडत असतात आणि जाहिरातीपासून मोबाइलपर्यंत आजकाल तरुण वयात मुलांना असे केल्यावर – तसे केल्यावर मुली तुमच्यामागे लागतील  हेच दाखवले जात आहे व स्वप्नं विकली जात आहेत; पण यामुळे कित्येक पालकांची व मुलांची चांगली स्वप्नेही भंग पावत आहेत. ही स्वप्ने जर दोषयुक्त असू नयेत असे आपल्याला वाटत असेल तर आपण दिवसभर काय पाहत आहोत, काय करत आहोत याचा क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. म्हणून तर आपल्याकडे एवढे सणवार आहेत त्याचा उद्देश दुष्ट विचारांपासून आपल्याला दूर ठेवणे हा आहे.

पूर्वीच्या काळी दुष्ट स्वप्ने पडू नयेत म्हणून उशीखाली चप्पल ठेवणे, जाईच्या पानाने दात घासणे, वेखंड दंडाला बांधणे, कंबरेला करगोटा व हळकुंड किंवा दगडीगोटा बांधणे असे उपचार सांगितले जात. यामुळे झोपेत चुकून हालचाल झाली की काही तरी रुतायाचे व जाग यायची आणि पुढचा अनर्थ टळायचा. आजकाल आज्जीबाईच्या या उपचारांबरोबरच योग्य समुपदेशनाचीदेखील गरज आहे. लक्षात ठेवा, शरीराचा आणि मनाचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणून तर मानसिक आजारांचे शारीरिक आजारात आणि शारीरिक आजारांचे मानसिक आजारात लगेच रूपांतर होत असते.

mahesh manjrekar reacts on trolling
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
What Uddhav Thackeray said?
“मंगळसूत्राचं महत्व मोदींना कधीपासून कळायला लागलं?” उद्धव ठाकरेंचा सवाल
amruta khanvilkar reveals her shooting experience
“तुम्हाला किडनॅप करून घेऊन जातील”, अमृता खानविलकरने सांगितला शूटिंगचा भयानक किस्सा; म्हणाली, “गुन्हेगारी, बेरोजगारी…”
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”

 

वैद्य हरीश पाटणकर

harishpatankar@yahoo.co.in