अरुणा ढेरे

एकेक पात्र म्हणजे जणू वटवृक्ष असावा, अशा असंख्य पात्रांचा समुच्चय असलेलं महाभारत विदुषी दुर्गा भागवत यांनी नव्या दृष्टीनं उकलून पाहिलं.निवडक पात्रांचा इतर पात्रांशी असलेला बंध, व्यक्तित्वांचे मानवी पैलू त्यांना जसे दिसले, त्यातून घडलं ‘व्यासपर्व’. हे छोटंसं पुस्तक महानाटय़ातला रस नेमका वेचून त्यावर आपलं भाष्य करत जातं. दुर्गाबाईंच्या व्यासंगी नजरेनं घेतलेला हा वेध वाचायलाच हवा असा..

duvartanacha vedh marathi book
वर्तन कारणांचे उत्खनन
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

दुर्गाबाई भागवत म्हणजे जुन्या-नव्याचं मोठं अजब मिश्रण होतं. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होतं, जीवनदृष्टीत होतं आणि मग स्वाभाविकपणे वाङ्मयीन दृष्टीतही होतं. त्यांचं ‘व्यासपर्व’ समोर ठेवून हे म्हणावंसं वाटतं आहे. दुर्गाबाईंनी ज्ञानाच्या क्षेत्राचा मोठ्ठा पैस आपल्याला दाखवला.महाप्रज्ञ व्यासांपासून महाश्वेता अहल्याबाईंपर्यंत आणि अपूर्वाईच्या कदंबवृक्षापासून उग्र, जंगली अस्वलापर्यंत किती तरी विषयांवर त्यांनी लिहिलं आणि दर वेळी अनेक ज्ञानशाखांची बांधबंदिस्ती मोडणारा त्यांचा अभ्यास हा एक संपूर्ण ज्ञानानुभव म्हणून समोर येत गेला. जीवनाचं ज्ञान किती अमर्याद असतं, किती परींनी थोर असतं आणि मानवी करुणेचा स्पर्श त्याला घडला, की ते किती समृद्धपणे सुंदर असतं, याची जाणीव करून देणारं पुस्तक म्हणून ‘व्यासपर्व’ हाती घ्यावं.

महाभारतातल्या व्यक्तिरेखांसंबंधीचं हे पुस्तक प्रसिद्ध झालं, त्याला आता साठ वर्ष झाली. मधल्या काळात त्याच्या आवृत्त्या निघाल्या. क्राउन साइझचं, जेमतेम एकशे चौतीस पानांचं पुस्तक. वीस पानांची प्रस्तावना आणि दहा ललित लेख. कृष्ण, द्रोण, अश्वत्थामा, दुर्योधन, कर्ण, अर्जुन, युधिष्ठिर, भीष्म, विदुर आणि द्रौपदी अशी महाभारतातली दहा माणसं. या दहा माणसांच्या व्यक्तित्वाचा वेध दुर्गाबाईंनी ‘व्यासपर्व’मधून घेतला आहे.

दुर्गाबाईंचा व्यासंग मोठा. महाभारतावर पूर्वसूरींनी केलेलं काम त्यांनी साक्षेपानं नजरेखालून घातलंच असणार. महाभारताच्या अभिजात संस्कृत संहितापरंपरेच्या प्रभावकक्षेतली काव्यं-नाटकं त्यांनी वाचली असतील. सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीनं महाभारताचं अवलोकन करणारे अभ्यास त्यांनी जाणून घेतले असतील आणि सहसा इतर कुणी ज्या परंपरेकडे पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत फारसं वळलं नव्हतं, त्या लोकपरंपरेतल्या भारती कथेची चित्तचक्षुचमत्कारिक रूपंही त्यांना ठाऊक असतील. हा सारा महाभारतविषयक लेखनसंभार जाणतेपणानं समजून घेत असतानाच एकीकडे त्यांच्या मनात भारती कथेचं स्वतंत्र चिंतनही सुरू झालं असणार. त्या प्रचंड, अतिप्रचंड अशा कृतीचा इतिहास म्हणून झालेला विचार त्यांच्यासमोर होता. राजकीय इतिहास म्हणून, धर्मशास्त्राचा इतिहास म्हणून, तत्त्वज्ञानाचा इतिहास म्हणून किंवा सामाजिक, भौगोलिक, वांशिक, भाषिक इतिहास म्हणून या कृतीचं विवेचन अनेकांनी कसं केलं आहे हेही त्यांनी समजून घेतलं होतं. त्या त्या अभ्यासाचीही आवश्यकता महाभारतासारख्या अवाढव्य आकाराच्या कृतीबाबत कशी आहे याचं भान त्यांना होतं; तरीही महाभारताच्या ‘सुबक समग्रते’चं दर्शन त्या अभ्यासातून नेमकं घडतंच असं नाही, याची जाणीव त्यांना झाली आणि महाभारताचं सामथ्र्य आणि सौंदर्य कशात आहे, याचा शोध सुरू झाला.

‘व्यासपर्व’च्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं आहे, ‘महाभारताच्या एका अंगाचे दर्शन हे त्याच्यातल्या सामथ्र्यपूर्ण आणि सौंदर्यशाली गाभ्याचे संपूर्ण दर्शन नव्हे. वर उल्लेखलेल्या (म्हणजे इतिहास म्हणून विश्लेषित केल्या गेलेल्या) विविध अंगांत महाभारताच्या सामर्थ्यांची नि:संशय प्रचीती येते. त्यातल्या यौगिक भूमिकेचाही प्रत्यय येतो. ज्ञानाचे वैदग्ध्य सहज भासते. मानवी व्यवहाराची जटिलता जाणवते. दैवगतीची वक्रता मनाला थरकवते. कथेचा ओघ प्रबळ आहे हे पटते. पात्रांचे परिमाण विलक्षण विशाल आहे याचे भान प्रारंभापासून अखेपर्यंत क्षणभरही ढळत नाही. हाच महाभारताच्या सामर्थ्यांचा निर्वाळा.
परंतु महाभारताचे सौंदर्य त्याच्या या उत्तुंग बलावेगातच केवळ नाही. या स्थूल सामर्थ्यांहूनही एक अतिसूक्ष्म, अभेद्य असा कोमलतेचा कंद काव्य-छंदाच्या अनुरोधाने, कथेच्या लालित्याच्या अनुषंगाने महाभारताच्या कठीण कवचाच्या अंतर्यामात भरून राहिला आहे.. याचा साक्षात्कार झाला तरच महाभारताच्या कलाकृतीचे भान येण्याचा संभव.’

हे उमजून आले आणि दुर्गाबाईंना महाभारताच्या कर्त्यांच्या प्रतिभेची जाण आली. कथेची चौकट तीच, पण पात्रांची परिमाणं बदलली. समग्र कथेतलं त्यांचं प्रयोजन वेगळय़ा संदर्भात कळू लागलं. ‘घाट कवितेचा, ताल छंदाचा, पण आत्मा नाटय़ाचा’ अशी ती समग्र कृती भासू लागली. या नव्या दृष्टीनं, निवडक पात्रांच्या अनुरोधानं महाभारताचं आकलन म्हणजे ‘व्यासपर्व’! व्यासांचं अनुपम नाटय़ावधान, भारती कथेतली शोकात्म भावाची लय, सर्व कल्पनाबंधांसह, सर्व आकृतिबंधांसह करुणेचं जीवनाच्या कलेकलेला स्पर्शणारं दिग्दर्शन, यांकडे दुर्गाबाईंचं लक्ष वेधलं गेलं आहे. व्यासाच्या प्रतिभेची उन्नत, विशाल आणि दूरगामी अशी ‘दु:खोन्मेषाची शक्ती’ आणि नियतीचे क्रूर आणि विराट खेळ मांडूनही माणसाचं आत्मिक जीवन भौतिकापलीकडच्या चिन्मय शक्तीशी निगडित असल्याचा व्यासांनी दिलेला प्रत्यय त्यांना विस्मयकारक वाटला आहे. जीवनाच्या सर्व अवस्थांना समरूप बनवताना व्यासाचं आत्म्याच्या गतिमानतेचं सामथ्र्य आणि गद्य-पद्याची त्यात झालेली नेटकी विभागणी, यांचीही नोंद दुर्गाबाईंच्या तरल आणि सूक्ष्म जाणिवांनी घेतली आहे. किंबहुना भारतीय सौंदर्यानुभवाचं तत्त्व समजलं, की महाभारत हा एकाच वेळी श्रेष्ठ धर्मग्रंथ आणि श्रेष्ठ कलाकृती कशी आहे हे कळून येतं, याचा साक्षात्कार जो दुर्गाबाईंना झाला, तो त्यांनी ‘व्यासपर्व’मधून पुनश्च घडवला आहे.

महाभारत हे एकटय़ा व्यासांचं नाही. तरीही दुर्गाबाई आपल्या कृतीला ‘व्यासपर्व’ म्हणतात आणि अंतरंगातलं सर्व विवेचन व्यासांच्या परिणत प्रज्ञेच्याच संदर्भात करतात. कारण त्यांच्यासाठी व्यास हेच महाभारताचे कर्ते आहेत. वैशंपायन आणि सौतीचा भारती कथेच्या घडणीतला सहभाग त्या जाणतात, पण व्यासांनी ‘जया’च्या रूपानं जो एक आदर्श निर्माण केला आणि जो विशाल पट, जी परिमाणं, जो कलावस्तूचा घाट निर्माण केला, त्याची उत्तरोत्तर सांगताच वैशंपायन आणि सौती यांनी केली. वेरूळचं कैलास लेणं निर्माण करणारा एकच. ते लेणं एका हातानं घडलेलं नाही; पण त्याची मनोमय निर्मिती ज्याच्याकडून झाली, तोच त्याचा कर्ता. या अर्थानं महाभारताचे कर्ते व्यासच. ते एकच निर्माणक्षम प्रज्ञा असलेलं मन महाभारताच्या रूपाकृतीमागे आहे.
महाभारताच्या एकात्म सौंदर्याचा अनुभव घेता-देताना दुर्गाबाईंनी सौंदर्यानुभवाचा आस्वाद घेण्याची अभिनवगुप्तानं सिद्ध केलेली रीत मनोज्ञपणे अनुसरली आहे. एकीकडे इंद्रियगम्य जाणिवांशी निगडित असणारं, पण तरीही त्याहून भिन्न असं आत्मवृत्तींना प्रस्फुरित करणारं, सच्चिदानंदाच्या सीमेला भिडणारं रसतत्त्व महाभारतात कसं पाझरतं, याचा उत्कट अनुभव दुर्गाबाई दहा व्यक्तिरेखांमधून देतात, तेव्हा धर्मज्ञान आणि कलानुसंधान हे एकाच प्रज्ञेचं स्फुरण कसे असतं, याचा अनुभव आपण घेत राहातो.

दुर्गाबाईंमध्ये जुन्या-नव्याचं वेगळंच मिश्रण होतं, याची जाणीव ‘व्यासपर्व’ची विस्तृत प्रस्तावनाच आपल्याला करून देते. ही प्रस्तावना म्हणजे महाभारताकडे एक रसवंत सौंदर्यानुभव म्हणून पाहणाऱ्या दुर्गाबाईंच्या मर्मदृष्टीची ओळख आहे आणि त्यांची दृष्टी घडवली आहे, ती जशी महाभारताच्या प्राचीन संहितांनी आणि तज्ज्ञ इतिहासकारांनी घडवली आहे, तशी ती आधुनिक कलाकोविदांनीही घडवली आहे. एरिक गिल, क्लाइव्ह बेल, गेडीज मॅकग्रेगर, आंद्रे मार्लो, जॉन स्टुअर्ट आणि रवीन्द्रनाथ ठाकूर (टागोर) किंवा आनंदकुमारस्वामी, अशांसारख्या कलेच्या अंगानं वाङ्मयाकडे पाहणाऱ्या आधुनिक अभ्यासकांनी आणि चिंतकांनीही घडवली आहे. या दृष्टीमुळेच कलानुभव म्हणून, सौंदर्यानुभव म्हणून महाभारतासारख्या भव्योज्ज्वल कृतीकडे पाहाण्याचा त्यांचा मराठीतला प्रथम प्रयास यशस्वी झाला आहे.

ज्या दहा व्यक्तिरेखा दुर्गाबाईंनी विवेचनासाठी निवडल्या आहेत, त्यात युधिष्ठिर, अर्जुन, द्रौपदी यांसारखी पांडव पक्षातली माणसं आहेत. दुर्योधन, कर्ण, अश्वत्थामा आणि म्हटलं तर भीष्मांसारखी कौरव पक्षातली माणसं आहेत आणि देहानं कौरवांमध्ये वसणारा, पण मनानं पांडवांमध्ये असणारा विदुरही आहे. त्याच्या जोडीला आहे दोन्ही पक्षांपलीकडच्या मेरेवर उभा असलेला आणि द्रोणांच्या आयुष्याशी जोडलेला एकलव्य आणि या सगळय़ांवर आपली झळाळती छाया पसरून कथेच्या गाभ्याशीच असलेला कृष्ण!

दुर्गाबाईंना दिसलेला कृष्ण पूर्णपुरुष आहे. सृष्टीतल्या साऱ्या नरांच्या प्राणशक्तीचा वास एकत्र आणला आणि तो साऱ्या फुलांच्या गंधात मिसळला तर येईल, तसा वास कृष्णाच्या अनेक रंगांनी बनलेल्या आकृतीतून येतो आणि त्या वासाच्या गाभ्यात स्वराचा एक लसलसता कोंबही असतो. अर्थात अशा अतितरल पातळीवर कृष्णाला पाहणाऱ्या दुर्गाबाईंनी कृष्णाचं वेगळेपणही नेमकं टिपून घेतलं आहे. त्या कृष्णाची आदमशी तुलना करतात. त्या म्हणतात, ‘कृष्ण शरीरानं आणि वासनेनं आदमच्या जवळ आहे, पण आदमपेक्षा किती तरी अधिक दैवी देणं त्याच्याजवळ आहे. आदमला नव्हती ती संस्कृती कृष्णाजवळ आहे. बागेची- बागेच्या सुखाची जाणीव होण्यापूर्वीच आदम बागेबाहेर पडला आणि इंद्रियांचे फटकारे खात िहडला; पण कृष्ण मात्र ‘पौरुषाची, मानव्याची सारी रग पचवून आणि मरणाच्या, विरहाच्या सर्व कळांना हळुवार स्पर्शित जगला.’ कृष्णचरित्र नुसतं एका ग्रंथात कोंडून राहिलेलं नाही. अनेक ग्रंथांनी, काव्यांनी, नरनारींच्या जीवनांनी तीळतीळ देऊन ते घडवलं आहे. राम, ख्रिस्त, बुद्ध यांचं बाळपण प्रौढत्वानं गिळून टाकलं; पण कृष्णाचं बाळपण घरोघरी खेळतं आहे. कृष्णाचं यौवनही लोभसवाणं; पण त्याच्या आणि गोपींच्या यौवनोन्मादाचं सार्वत्रिक स्वैराचारात परिवर्तन झालं नाही. कृष्णातून निघून कृष्णाकडेच परत येणारं ते अतिदृढ असं आकर्षण होतं. त्याचं सर्वोत्कृष्ट प्रतीक म्हणजे राधा. दुर्गाबाईंचं मार्मिक निरीक्षण असं, की भारतीय संस्कृती लालित्यानं क्वचितच फुलते. पण राधा-कृष्णाच्या प्रेमानं एकदाच फुलली. काही तरी सदा फुलतं, घमघमतं असं मागे ठेवून गेली. राधेच्या प्रीतीनं कृष्णाचं व्यक्तित्व विस्तारलं, उंच झालं, अतीव मृदू आणि गढही झालं.

‘राम हा मर्यादापुरुषोत्तम तर कृष्ण हा प्रत्येक बाबतीत शीग ओलांडणारा झाला.’ पण प्रत्येक गोष्टीला त्यानं पारंगतता आणली. त्याची कलासक्ती प्रीतीप्रमाणेच भूमीशी नातं राखणारी. त्यानं वीणा नाही घेतली; बासरी घेतली. गुराख्यांच्या साध्यासुध्या वाद्याला जिवंत केलं. त्याला चिरंतन कलामूल्य दिलं. आसक्तीची आणि विरक्तीची परमावधी त्यानं गाठली. मेघासारखा तो रिता होऊन गेला.दुर्गाबाईंनी इतर नऊ लेखांमधून नऊ माणसांच्या ‘भारतीय’ व्यक्तित्वाचं त्यांना झालेलं नवं आकलन मांडलं आहे. त्या लेखांची शीर्षकं म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या जीवनाचं त्यांना सापडलेलं मर्म आहे. एकलव्याच्या एकाकी करणाऱ्या दु:खाचा त्या मागोवा घेतात. एकलव्य न बोलता गेला, तरी द्रोणांचं आयुष्य उरलंच. मग एकलव्याचं दु:ख द्रोणाच्या चिरव्यथेत एकरूप झालं. द्रोणांच्या रूपात बुद्धिमंतांच्या अविकसित आकांक्षांची भीषण शोककथाच एकलव्याच्या निमित्तानं अवतरली. असहिष्णू, कोत्या मनाच्या बुद्धिवंतांचं विशाल जग केवळ मोहरीएवढं आहे आणि त्यात ईष्र्येची ठिणगी पेटली की जे घडतं, तेच द्रोणांच्या आयुष्यात घडलं आहे. अश्वत्थामा त्यांचा मुलगा. तो कधी जाणता झालाच नाही. तो योद्धा झाला, पण पुरुष झाला नाही. बापाचा मुलगा म्हणूनच तो जगला. त्याच्या व्यक्तित्वाचा इतर अंगांनी विकास झालाच नाही.


दुर्योधनाला बाईंनी ‘व्यक्तिरेखा हरवलेला माणूस’ असं म्हटलं आहे. व्यासांनी त्याच्या खुरटय़ा मुळांचंच सातत्यानं दर्शन घडवलं आहे. ‘सर्व काही हवे,साऱ्यांचे हवे आणि सर्वदा हवे’ याच भावनेनं दुर्योधनाची बुद्धी भरलेली आहे. एककल्ली, उद्दाम आणि मत्सरी असा दुर्योधन लाडावलेला मुलगा होता. तो मनानं कधी वाढलाच नाही. मात्र त्याच्याजवळ मैत्रीला जागणं होतं आणि व्यक्तित्वात एक कणखर पीळही होता. म्हणून तर कर्ण त्याच्याबरोबर अखेपर्यंत राहिला. कर्ण सुंदर होता. त्यागभावनेनं भारलेला होता, मानी होता, आत्मकेंद्री होता; पण कर्तव्यदक्षही होता. त्याच्या नैसर्गिक प्रवृत्ती उदात्त, पण त्यांच्यावर संस्कार मात्र नव्हते. कर्णाचं सर्वात मोठं भूषण म्हणजे त्याचं औदार्य. कर्ण स्वत: एकाकी आहे; पण सर्वाच्या वेदनेचं, अभिमानाचं, पराक्रमाचं आणि नेकीचं तो प्रतीक आहे.

अर्जुन दुर्गाबाईंना परिकथेतला राजपुत्र वाटतो. तो वास्तवात आला समरांगणावर. दुर्गाबाईंनी अर्जुनाला परिकथेचा नायक म्हटलं आणि भीमाला प्रतिनायक. अर्जुन युद्धप्रसंगी जागा झाला. पराक्रमानं स्फुरणारा आणि चुकीच्या जाणिवेनं शरमणारा, अतिशय तरल संवेदनक्षमता असलेला अर्जुन, लवचीकपणा कायम ठेवून सतत शांतीच्या मूलाधाराचा वेध घेत राहिलेला मुक्त पथिक युधिष्ठिर, कुणासाठीच रडू न शकलेला, अश्रू हरवलेला आणि विशीर्णतेच्या दैवगतीनं बांधला गेलेला भीष्म, सत्ताविहीन चांगुलपणाचं प्रतीक होऊन गेलेला, मानवताप्रेमी, सरलहृदयी विदुर आणि नितांतसुंदर देहात लपेटलेली अशांतता, जिला म्हणावं अशी कामिनी द्रौपदी- दुर्गाबाईंनी भारती कथेतल्या माणसांकडे पाहाण्याची एक अतिशय सूक्ष्म तरल पातळीवरची दृष्टी आपल्याला दिली.

दुर्गाबाईंचं चिंतनशील व्यक्तित्वही ‘व्यासपर्वा’त जागोजागी प्रकट झालं आहे. उदाहरणार्थ, एकलव्याच्या दु:खावर भाष्य करताना त्या लिहितात, की ‘चिरडलेल्या दु:खाचा आवाज साध्यासुध्या माणसांनाच ऐकू येतो आणि समजतो, पण त्यांच्या समजण्याला वाचा नसते.’ किंवा त्या लिहितात, ‘दु:ख गिळणे ही एक श्रेष्ठ तपस्या आहे. साऱ्या कला, तत्त्वज्ञाने, सौंदर्ये यांचा साक्षात्कार याच दु:ख गिळण्याच्या शक्तीत आहे.’ द्रोणांविषयीचं आकलन मांडताना त्या लिहितात, ‘विद्यावंतांची बधिरता हा संस्कृतीला लागलेला मोठा शाप आहे.’ भीष्मांचं वार्धक्य त्यांना परिपक्वतेचं दुसरं नाव वाटतं. त्यांच्याविषयी लिहिताना त्या सहजपणे सत्याचं स्वरूप सांगून जातात. लिहितात, ‘हे सत्य करुणावृत असते. सर्व प्रकारच्या दंभापासून मुक्त असते आणि म्हणूनच भीरू नसते.’ दुर्गाबाईंच्या चिंतनातून उमललेली अशी मर्मभाषितं ‘व्यासपर्व’मध्ये जागोजागी आढळतात.

इतिहास म्हणून महाभारताचं नाना अंगांनी आकलन तर आपल्या विचारकक्षा विस्तारणारं आहेच, पण काव्यग्रंथ म्हणून हे आकलन किती भावपोषक आहे, याचा समृद्ध अनुभव ‘व्यासपर्वा’नं आपल्याला दिला आहे. दुर्गाबाईंची शैली एकाच वेळी मृदू आणि कणखर आहे. भारती कथेची लय त्यांनी मर्मज्ञपणे पकडली आहे. आदिमाचे अंतिमाशी चाललेले खेळ व्यासांनी कसे मांडले, ते समजून त्यांनी आपल्यालाही दाखवले आहेत आणि संस्कृतीचं प्राणतत्त्व मानवी जीवनातून कसं स्पंद पावतं, याचा रसरशीत प्रत्यय ‘व्यासपर्व’च्या निमित्तानं आपल्याला दिला आहे.
aruna.dhere@gmail.com