‘नॉर्मल’ प्रसूतीचं गणित

नैसर्गिक मार्गातून बाळाचा जन्म झाला म्हणजे प्रसूती नॉर्मल झाली, असा सर्वसाधारण समज आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. किशोर अतनूरकर

‘नॉर्मल डिलिव्हरी’मधील ‘नॉर्मल’ या शब्दामुळेच सगळा गोंधळ निर्माण झालाय. नैसर्गिक मार्गाने, सुलभ प्रसूती होण्याच्या प्रक्रियेला ‘नॉर्मल’ असंच म्हटलं गेलंय. मात्र गर्भावस्था आणि बाळंतपणाच्या काही बाबतीत, निसर्गाच्या मनात नेमकं काय आहे हे डॉक्टरांना प्रत्येक वेळेस सांगता येईलच असं नाही. प्रसूती नॉर्मल होऊनदेखील, जीवघेणी गुंतागुंत होणारच नाही, असं काही नाही, ही या बाबतीतली अनिश्चितता लोकांनी समजून घेतली पाहिजे..

‘बाळंतपण’ या शब्दाचा उपयोग आजकाल खऱ्याखुऱ्या बाळंतपणासाठी न होता आयुष्यातील किचकट, गुंतागुंतीच्या, त्रासदायक प्रसंगातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठीच होताना दिसतो. खरंखुरं बाळंतपण यासाठी ‘डिलिव्हरी’ हा इंग्रजी शब्दच रूढ झालेला आहे. खरंच, बाळंतपण हे ‘बाळंतपण’ म्हणण्याइतपत जिकिरीचं आहे का? या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असंच आहे.

नैसर्गिक मार्गातून बाळाचा जन्म झाला म्हणजे प्रसूती नॉर्मल झाली, असा सर्वसाधारण समज आहे. नॉर्मल प्रसूती म्हणजे काय? या प्रश्नाचं प्रसूतीशास्त्राच्या पुस्तकात दिलेल्या व्याख्येच्या आधारावर समजून घेऊ. नॉर्मल प्रसूती झाली, असं म्हणण्यासाठी काही बाबींची पूर्तता होणं आवश्यक आहे. पूर्ण दिवस भरलेले पाहिजेत, बाळ डोक्याकडून बाहेर आलं पाहिजे, बाळंतपणासाठी म्हणून कोणत्याही औषधाचा अथवा कळा येण्यासाठी सलाईनद्वारे वापरली जाणारी इंजेक्शने किंवा साधनांचा (उदाहरणार्थ- चिमटा लावणे) उपयोग केलेला नसावा, कोणत्याही प्रकारची गुंतागुंत (उदाहरणार्थ- सरासरीपेक्षा जास्त रक्तस्त्राव, ‘वार’ बाहेर पडण्यासाठी सर्वसामान्य वेळेपेक्षा जास्त वेळ लागणे वगैरे) न होणे आणि जिवंत-खणखणीत रडणारं बाळ जन्माला येणं, अशा प्रकारे होणाऱ्या बाळंतपणास ‘नॉर्मल प्रसूती’ असं म्हणतात. बाळंतपणाच्या कळा सहन केल्याशिवाय प्रसूती नॉर्मल होत नसते.

‘‘डॉक्टर, नऊ महिन्यांत  तुम्ही म्हणाल त्यावेळेस आम्ही तपासणीसाठी येत होतो, तुम्ही ज्या रक्त-लघवीच्या तपासण्या सांगितल्या, ज्या ज्या वेळेस सोनोग्राफी करा, असं सांगितलं, त्या त्या वेळेस सगळं काही केलं, तुम्ही प्रत्येक वेळेस सगळं काही नॉर्मल आहे असं सांगितलं, आम्हाला प्रसूती पण नॉर्मल होईल, असं वाटत होतं, पण आता तुम्ही प्रसूतीच्या ऐन वेळेवर सांगताय की सिझेरियन करावं लागेल?’’-  हे ऐकावं लागतं. अपत्यजन्म ही एक जोखमीची बाब आहे, असं समाजाला माहिती करून देणं आवश्यक आहे. सर्व आरोग्य चाचण्या तर चांगल्या आहेत मग प्रसूती नॉर्मल का नाही या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण नाही. ते उत्तर रुग्ण आणि नातेवाईकांना पुरेसा वेळ देऊन त्यांना समजेल अशा भाषेत सांगणं कठीण आहे.

मला तर ‘नॉर्मल डिलिव्हरी’मधील ‘नॉर्मल’ या शब्दामुळेच सगळा गोंधळ निर्माण झालाय असं वाटतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झालेल्या प्रसूतीशास्त्राच्या पाठय़पुस्तकापासून ते ग्रामीण भागातील अशिक्षित स्त्रियांच्या बोली भाषेपर्यंत, नैसर्गिक मार्गाने, सुलभ प्रसूती होण्याच्या प्रक्रियेला ‘नॉर्मल’ असंच अनेक वर्षांपासून संबोधित केलं गेलेलं आहे. गर्भाची नऊ महिने वाढण्याची आणि बाळंतपणाची प्रक्रिया या दोन्हीवर अनिश्चिततेची टांगती तलवार असते. या संदर्भातील, अभ्यास प्रक्रियेतून बदलत जाणाऱ्या पूर्वीच्या संकल्पना वेळोवेळी जगासमोर येत असतात. झपाटय़ाने होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे तर साधारणत: ३०-४० वर्षांपूर्वी गूढ वाटणाऱ्या गोष्टींच्या उलगडय़ाने जग स्तिमित झाले आहे. असं असूनदेखील, गर्भावस्था आणि बाळंतपणाच्या काही बाबतीत, निसर्गाच्या मनात नेमकं काय आहे हे डॉक्टरांना प्रत्येक वेळेस सांगता येईलच असं नाही. उदाहरणार्थ, कोणत्याही बाळंतपणानंतर, २४ तासाच्या आत, अतिरक्तस्राव होऊन मातेच्या जीवावर बेतू शकतं. कोणत्या रुग्णामध्ये ही गुंतागुंत निर्माण होईल हे आजही सांगता येत नाही. प्रत्येक रुग्णाच्या संदर्भात डॉक्टरांना या बाबतीत ‘तयार’ राहावं लागतं. अशा अतिरक्तस्रावाच्या (PPH) रुग्णांपैकी जवळपास दोन-तृतीयांश केसेसमध्ये नेमकं याच रुग्णांमध्ये जास्तीचा रक्तस्त्राव का व्हावा, याचं कारण सांगता येत नाही. प्रसूती तर नॉर्मल झाली! मग असं कसं काय झालं? या प्रश्नाचं उत्तर देता देता डॉक्टरची दमछाक होते. ‘नॉर्मल डिलिव्हरी’नंतर किमान २४ तास तरी, त्या स्त्रीला रुग्णालयात ठेवावं लागतं ते या कारणासाठी. नैसर्गिक प्रसूती झाल्यानंतर, प्रसूती तर झाली आता दवाखान्यात थांबून काय करायचं या विचाराने, लगेच रुग्णाला घरी घेऊन जाण्याची घाई नातेवाईक करतात. कित्येक नॉर्मल प्रसूतीनंतर तर काहीच होत नसताना आपण पाहतो. सगळं काही सुरळीतच होत असतं. प्रसूती नॉर्मल होऊनदेखील, जीवघेणी गुंतागुंत होणारच नाही असं काही नाही, ही या बाबतीतली अनिश्चितता लोकांनी समजून घेतली पाहिजे. पहिलं बाळंतपण नॉर्मल झाल्यानंतर दुसरं बाळंतपण नॉर्मल होईल याचीच शक्यता अधिक असते, पण नॉर्मलच होईल याची खात्री देता येत नसते. पहिल्या नॉर्मल प्रसूतीनंतर काही कारणासाठी सिझेरियन करण्याची वेळ येऊ शकते. ‘पहिली नॉर्मल है, अब कायका सिझेरियन?’ असा ‘आदेश’ नातेवाइकांकडून येऊ शकतो. अशा नातेवाइकांना जास्तीचा वेळ देऊन सिझेरियन करण्याची परिस्थिती का उद्भवली याबद्दल समजावून सांगावं लागतं.

गर्भावस्था आणि बाळंतपण या दोन्ही प्रक्रिया नैसर्गिक आहेत हे सत्य समजत असताना निसर्गाचे सर्व नियम, यासाठी लागू आहेत हे विसरून चालणार नाही. शेतकरी फक्त पेरणी करू शकतो. बीज मातीत मिसळून, पाणी आणि हवेच्या मदतीने त्या बीजाला अंकुर फुटून त्याचं रोप तयार होणं, रोपाचं रूपांतर झाडात होणं, त्या झाडाला फुलं-फळं लागणं, या पैकी एकही गोष्ट शेतकरी घडवून आणू शकत नाही. इतकंच नव्हे तर उभ्या पिकाची कापणी करून धान्य घरी आणेपर्यंत अवकाळी पाऊस किंवा गारपिटीने हाताशी आलेल्या पिकाचं नुकसान होणार किंवा नाही यावर शेतकऱ्याचं काहीही नियंत्रण नसतं. पिकाचं फक्त राखण करण्याचं काम शेतकऱ्याचं. डॉक्टरची भूमिका ही या बाबतीत शेतकऱ्यासारखी आहे, असं मला वाटतं. पिकाच्या योग्य वाढीसाठी, पाणी देणे, खत घालणे, कीड पडल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्लय़ाने फवारणी करणे, एवढंच शेतकऱ्याचा हातात असतं. निसर्गाने दिलेल्या ‘फळाचा’ कधी आनंदाने तर कधीतरी निराश मनोवृत्तीने स्वीकार करण्याशिवाय पर्याय नसतो. गर्भावस्था आणि बाळंतपणरूपी चमत्कार डॉक्टरांना जवळून पाहण्याची संधी असते. बाळाच्या योग्य त्या वाढीसाठी डॉक्टरांना आवश्यकतेप्रमाणे औषधरूपी ‘खतपाणी-फवारणी’ करावी लागते.

कळा सुरू झाल्यानंतर, लवकरात लवकर बाळंतपण होऊन जावं, असं वाटणं साहजिक आहे. बाळंतपणाच्या कळा चालू असताना, जवळपास प्रत्येक स्त्री विचारते, ‘अजून किती वेळ आहे डॉक्टर?’ त्यांचं विचारणं अयोग्य आहे असं नाही, पण ‘लेबर’ केसची प्रगती कशी होईल याचा फक्त अंदाज बांधता येतो, नक्की वेळ सांगता येत नाही. बाळंतपण होईपर्यंत खरंच काही सांगता येत नाही. कधी-कधी, आता दहा पंधरा मिनिटांत होईल, असं वाटत असताना, तास-दीड तास पण लागू शकतो. कधी कळा चांगल्या जोरदार असूनसुद्धा काही कारणाने बाळ खाली सरकत नाही. कधी रुग्ण कळा सहन करून करून खूप थकलेल्या अवस्थेत असल्यामुळे ऐन वेळेवर पाहिजे तसा जोर पडत नाही.तिची अगतिकता डॉक्टरांना समजत असते. वेदना सुस व्हाव्यात याच्या विविध पद्धती विकसित होत आहेत. काही शहरातील मोठय़ा खासगी हॉस्पिटल्समधून, प्रत्येक बाळंत होत असलेल्या स्त्रीसोबत एक प्रशिक्षित नर्स दिली जाते. ती त्या स्त्रीला प्रत्येक कळ सुस कशी होईल याचं तंत्र शिकवते, बाळंतपण होईपर्यंत तिला आधार देत असते. अर्थात या आरामदायी(!) बाळंतपणासाठी भक्कम शुल्क मोजावे लागते. वास्तविक पाहाता अशी व्यवस्था, रास्त दरात सर्वत्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. बाळंतपण सुरू असतानाच्या अवस्थेत स्त्रियांना ‘लेबर रूम’मध्ये जाऊन डॉक्टरच्या नव्हे तर सामान्य माणसाच्या नजरेतून पाहिल्यास, बाळंतपण बऱ्याचदा क्लेशदायक आणि स्त्रियांच्या आयुष्यातील एक ‘अमानवीय’ घटना आहे, असं वाटू शकतं. बाळंतपणाचं हे स्वरूप बदलता येऊ शकतं..

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr kishor atanurkar article on normal pregnancy

ताज्या बातम्या