राजन गवस

व्यासपीठावर व्याख्यान देणं किती सोपं असतं. ‘मुलगा काय आणि मुलगी काय, मुलामुलीत भेद करू नका. वंशाला दिवा हवाच कशाला?’ पण प्रत्यक्ष खेडय़ात जगतानाचे पेच कसे निस्तरायचे? म्हातारीच्या भाबडेपणाला कसं बदलवायचं? म्हातारीला वजा करून जगावं तर तिला बघणारं दुसरं कोणीच नाही. तिच्या मन:परिवर्तनासाठी काम करायला हवं. तिच्यासोबतच्या आयाबायांना गाठायला हवं.

या गावात आल्यापासून नाना उद्योग माझ्या मागं लागत गेले. आजवर तरी त्यातून सुटका झालेली नाही. कोण काय काम घेऊन येईल याचा भरवसा नाही. कोणी नवीन घर बांधले तर तो ‘घराचं नाव सुचवा’ म्हणून येतो. कोणाच्या मुलाचं लग्न ठरलं तर तो येऊन म्हणतो, ‘जरा वेगळी लग्नपत्रिका करून द्या.’ कुणाला मुलगा-मुलगी, नात-नातू झाला असेल तर ‘चांगलं नाव सुचवा’ म्हणून पाठलाग. कुणाच्या दुकानाचं उद्घाटन असलं तर त्याची जाहिरात तयार करण्याचं कामही माझंच. ही जरा सोसण्यासारखी, जमण्यासारखी कामं.

यापेक्षा कठीण कामंही लोक माझ्या अंगावर ढकलतच असतात. उदाहरणार्थ, कोणाची पोरगी पळून गेली. चला शोधायला. पळून गेलेल्या पोरीनं लग्न केलं असलं तर दोन्ही घरच्या लोकांची समजूत काढून शिव्याशाप घेत स्वागत समारंभ किंवा पुन्हा लग्न हा उद्योग मी आजवर अनेकवेळा करत आलोय. एखादी म्हातारी ‘पोरगा नोकरदार आहे; पण पैसेच पाठवत नाही.’ अशी तक्रार घेऊन आठ-पंधरा दिवसाला असतेच दारात. कुणा नवरा-बायकोची भांडणं तर कुणा बापलेकाची भांडणं. हा न्यायनिवाडा तर पाचवीलाच पुजलेला. या सगळ्यात निवडणुका आल्या की प्रत्येक पक्षाचा माणूस ‘भाषण लिहून द्या.’ म्हणून दारात हजर. मग ती निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा विधानसभेची. कुणाला स्लोगन लिहून द्या, कुणाला भाषण लिहून द्या. सगळ्या राजकीय पक्षांची भाषणं त्यांच्या-त्यांच्या मागणीनुसार लिहून द्यायची, पुन्हा ती ऐकायला जायचं. नंतर ते भाषण कसं झालं याचा अभिप्राय द्यायचा. असले सगळे खुळचट उद्योग. पण हा उद्योग गेल्या दोन-तीन निवडणुकींपासून कमी झालाय. कारण आता तोंडाला येईल ते बोलायची रीत सर्वमान्य झालीय. त्यामुळे हे लोक आता फक्त डिजिटल मजकुरासाठी येतात. बाकीचं त्यांचं ते निभावून नेतात. पण या सरकारी ऑफिसात हे काम, त्या सरकारी ऑफिसात ते काम, हे उद्योग असतातच. त्यामुळे मी मास्तर आहे. काही लिहितोबिहितो हे बरेच दिवस माझ्याच आठवणीत नसतं. लोक चोवीस तास लेखक-समीक्षक असतात याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय. ते भाग्य काही आमच्या वाटय़ाला नाही. कधी तरीच आठवतं आपण लिहितोबिहितो. बाकीच्या वेळी या बारा भानगडी. त्यात घराच्या शेतीच्या, पोराबाळांच्या, गावातल्या संस्था-मंडळांच्या लचांडी असतातच. त्या वेगळ्या. कुणाला नाही म्हणून चालत नाही. ‘भेटण्यासाठी अमुक वेळेलाच उपलब्ध’ असं दारावर बोर्ड लावता येत नाही. कोण कधी येईल याचा नेम नाही. दार बंद करून बसणं इथं मान्य नाही. रस्त्यातूनच हाक येते, ‘मास्तर हायत का घरात?’ उत्तराची वाट कोणीच बघत नाही. सरळ घरात. बठकीच्या खोलीत कोणी दिसलं नाही, की स्वयंपाकघरात. त्यामुळे ‘प्रायव्हसी’ वगैरे शब्दांना इथं फारसा थारा नाही. कपाळावर आठी पाडून चालत नाही. बारक्या गावात जगायचं तर तुम्हाला नियम अटीच्या भानगडी वगळाव्याच लागतात. सगळं एकदम मोकळंचाकळं. त्यामुळे या गावात जगताना थोर-थोर लोक काय म्हणतात ते आठवायलाही मला उसंत नसते. दर क्षणाला नवीनच चाललेलं असतं बरंच काही. या क्षणी समोर काय येईल सांगता येत नाही.

हे सगळं आत्मचरित्र सांगण्याचं कारण म्हणजे आमचे एक सन्मित्र आले. म्हणाले, ‘‘आत्ताच्या आत्ता घराकडे यायला लागतंय.’’  होकार नकाराचा प्रश्नच नाही. फक्त म्हटलं, ‘‘काय झालंय?’’ त्याचा चेहरा पूर्ण उतरलेला. बोलला काहीच नाही. पुन्हा पुन्हा खोदून विचारलं तर फक्त म्हणाला, ‘‘आईची समजूत घालायला पाहिजे.’’ मनातच ताडलं, झालं असणार जोरदार भांडण. त्याच्याबरोबर त्याचं घर गाठलं. तर म्हातारी तांदूळ निवडत बसलेली. म्हणाली, ‘‘तुझं तू आलास की ो घेऊन आला?’’ म्हंटलं, ‘‘काकू, तो कशाला घेऊन येईल?’’ माझा मी आलो. तर म्हातारीच्या तोंडाचा हा पट्टा सुरू. ‘‘तू मला अक्कल शिकवायची नाही. दोन पोरी सोन्यासारख्या हाय्येत. पहिला जमाना गेला. पोरी काय आणि पोरं काय सारखंच. उलट पोरीच चांगलं संभाळत्यात. पोरं कुठं बघत्यात म्हातारपणी. मग त्या ह्यचं बघ, त्याचं बघ. असलं उदाहरन द्यायचं नाही. सरकारनं ो नियम काढलाय, त्यो नियम काढलाय, असलं काय बोलू नको. मला घरात पोरगा पाहिजे म्हणजे पाहिजे.’’ आमच्या सन्मित्रानं न सांगताच डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काकूंनी ‘नातू पाहिजे’ म्हणून घरात हलकल्लोळ सुरू केलाय. तिला कुठंच न अडवता तिचं फक्त ऐकत बसलो. तिचे तेच-तेच मुद्दे. ‘नाव चालाय पाहिजे का नाही? वस बुडू दे का सांग?’ हे तिचे दोन कळीचे प्रश्न. समजूत घालायला मी काय बोलणार तर तेही तीच बोलत होती. एकूण मला निरुत्तर करण्यासाठीची सगळी माहिती तिनं गावभर फिरून गोळा करुन ठेवलेली होती.

एकही वाक्य मला उच्चारता येऊ नये याची भरभक्कम तयारी काकूनं करून ठेवली होती. सन्मित्राला दोन मुली. इस्टेट म्हणावी तर एकरभर जमीन. गावात घर. एकुलता एक. त्यामुळे म्हातारीच्या डोक्यात एकच – आपल्या घराण्याचं नाव चाललं पाहिजे. आता हे तिच्या घराण्याचं नाव तिच्या टाळक्यातनं कसं घालवायचं हा कळीचा प्रश्न होता. घराची सगळी शांतता काकूनं पार कुरतडून टाकली होती. सुनंचा खंक भाजून टाकला होता. सततची वटवट. अन्न गोड लागूच नये याची व्यवस्था. घरात पाऊलच टाकू नये असं वातावरण. मित्र हतबल, अगतिक होऊन गेलेला. त्याच्या पत्नीची अवस्था तर त्याहून अधिक केविलवाणी. बसता-उठता ठोसला. यातून काकूची समजूत काढायचे नवनवे मार्ग शोधत होतो. काकूसमोर ठेवत होतो. त्यावर तिचं उत्तर असायचंच. शेवटी म्हातारी बेकार फिरली. म्हणाली, ‘‘वांझोटी म्हणून मेलो असतो तर बरं झालं असतं. हे असलं थ्यार तर बघाय लागलं नसतं.’’ आता म्हातारी गल्ली गोळा करणार याचा अंदाज आल्यावर, ‘‘काकू शांत हो, शांत हो,’’ म्हणत जागा सोडली.

रस्त्याला लागलो, मित्र दारात हताश होऊन उभा. मनात सुरू झालं. व्यासपीठावर व्याख्यान देणं किती सोपं असतं. ‘मुलगा काय आणि मुलगी काय, मुलामुलीत भेद करू नका. वंशाला दिवा हवाच कशाला?’ पण प्रत्यक्ष खेडय़ात जगतानाचे पेच कसे निस्तरायचे? या म्हातारीच्या भाबडेपणाला कसं बदलवायचं? म्हातारीला वजा करून जगावं तर तिला बघणारं दुसरं कोणीच नाही. तिच्या मन:परिवर्तनासाठी काम करायला हवं. तिच्यासोबतच्या आयाबायांना गाठायला हवं. असं मनात सुरू असतानाच नाईक साहेबांची आठवण झाली. महाराष्ट्रानं वगळलेला माणूस. भारताचे पहिले शिक्षण सल्लागार. ‘युनेस्को’च्या शिक्षणतज्ज्ञांच्या यादीतले भारतीय नाव. याच गावात त्यांनी विविध शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची पहिल्यांदा सुरुवात केली. त्या गावातल्या माणसांची आजची ही मानसिकता. त्या काळी म्हणजे जवळजवळ सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी काय असेल? नाईक साहेब कसे उतरले असतील लोकात? कसं केलं असेल मन:परिवर्तन? किती सोसले असतील अपमानाचे क्षण? पण त्यांनी हार मानली नाही. महाराष्ट्रात नाईक साहेबांचं नाव माहीत असलंच तर ते शिक्षणक्षेत्रात थोडंफार. त्यांच्या इतर कार्याबाबत कोणासही काही माहीत नाही. त्यांनी शिक्षणातून ग्रामीण पुनर्र्चना आणि ग्रामीण पुनर्रचनेतून शिक्षण हा भारतीय पातळीवरचा अभिनव उपक्रम इथे सुरू केला. त्या काळी सव्हिस मोटारचा जमाना. सगळा प्रवास पायी. सह्य़ाद्रीचा डोंगराळ भाग, वाडय़ावस्त्या त्यांनी पायीच पालथ्या घातल्या. तिथली कुटुंबं, रोगराई, शेतीभाती, गुरंढोरं, आर्थिक परिस्थिती, देवदेवस्की या सर्वाचा शोध घेतला आणि शिक्षणाचा श्रीगणेशा केला.

त्या काळात फक्त याच खेडय़ात नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक खेडय़ात बाईला दहा-बारा बाळंतपणं सहज पेलायला लागायची. रोगराईतून जगतील तेवढी पोरं जगायची. ‘मूल होणं ईश्वराची करणी’ अशी समजूत असलेल्या काळात वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न नाईक साहेबांना हैराण करून गेला होता. आपल्या केंद्र व राज्य सरकारच्या अजेंडय़ावरही लोकसंख्यावाढ हा विषय नव्हता. त्या काळात शैक्षणिक प्रयोगाबरोबरच संतती नियमनाची चळवळ उभी केली पाहिजे हे त्यांनी निश्चयपूर्वक ठरवलं. पण सुरुवात कशी करावी यासाठी सर्वाशी सल्लामसलत सुरू केली. त्या वेळी त्यांच्यासोबत चित्रा नाईक काम करत होत्या. लग्नाचा निर्णय झालेला नव्हता. ज्या वेळी लग्नाचा निर्णय झाला त्या वेळी त्यांनी मिरजेच्या मिशन हॉस्पिटलात जाऊन दोघांचीही कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. त्यानंतर लग्न केलं. ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या भागात पसरली.

नाईक साहेबांनी स्वत:च्या उदाहरणावरून लोकांच्या मन:परिवर्तनाला सुरुवात केली. लोक जमायचे, त्यांच्यासमोर मान डोलवून त्यांचे विचार ऐकायचे. ‘छोटं कुटुंब सुखी कुटुंब’ अशी घोषणाही द्यायचे. मुलं देवामुळं नाही तर माणसामुळं होतात हेही त्यांना पटायचं. पण प्रत्यक्षात संततीनियमनाला मात्र कोणीच तयार व्हायचं नाही. जसे जसे नाईक साहेब अधिक पाठलाग करू लागले तसं तसं लोकांनी त्यांना टाळायला सुरुवात केली. या साऱ्यांनी हिंमत हरली तर ते नाईक साहेब कसले? लोकांच्या मन:परिवर्तनासाठी नवीनच शक्कल काढली. गावातल्या मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली. सहा महिने एकच कार्यक्रम. दिसेल त्या कुत्र्याची नसबंदी. लोक नसबंदी केलेल्या कुत्र्यावर नजर ठेवायचे. मरतं का पाहायचे. दुसऱ्या वर्षी गावात नवीन कुत्रंच जन्माला आलं नाही. गावात आक्रीत घडल्यासारखी लोक चर्चा करायचे. हळूहळू लोकांचं मन:परिवर्तन होत गेलं. पुष्पनगर गावातील आठ-दहा लोक शस्त्रक्रियेसाठी तयार झाले. शस्त्रक्रियेचा दिवस ठरला. मिरजेच्या ‘मिशन हॉस्पिटल’ची टीम आली आणि एकाएकी गावच गायब झालं. नाईक साहेबांनी धीर सोडला नाही. आठ-दहा लोकांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली. नंतर गावोगावच्या लोकांत ही चळवळ पसरत गेली. त्यानंतरच्या काळात किती तरी वर्षांनी भारत सरकारने कुटुंब नियोजनाची मोहीम हाती घेतली. तोवर या तालुक्यात ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ ही गोष्ट घर करून गेली होती. अशा ऐतिहासिक नाईक साहेबांच्या प्रयोगभूमीत ही म्हातारी नवंच आव्हान प्रातिनिधिक स्वरूपात उभं करते आहे. तिला बदलवण्यासाठी नव्हे संपूर्ण खेडय़ापाडय़ातील आयाबायांची मानसिकता बदलवण्यासाठी आता पुन्हा एकदा नव्या मार्गाचा शोध घेतला पाहिजे. नाही तर वंशाचा हा दिवा वर्षांनुवर्ष आग लावतच बसणार आहे. ही आग विझवायची असेल तर खेडय़ापाडय़ात, गावगाडय़ात लिंगभाव समतेची चळवळ रुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला हवेत. नगर-महानगरात लिंगभाव समतेची ही चळवळ थोडीफार रुजल्याचं चित्र आज आपल्याला दिसतं आहे. ते खेडय़ाकडे परावर्तित होण्यासाठी शिकल्या-सवरल्या लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. पण या शिकल्यासवरल्या लोकांची मानसिकता बदलायची असेल तर करायचं काय? हा प्रश्न पुन्हा उरतोच!

chaturang@expressindia.com