रोहिणी हट्टंगडी

‘‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातील तीन वर्ष मी नाटक या विषयात आकंठ बुडालेली होते. ‘अभिनयासाठी भोवतालचं सगळं सजगपणे टिपून घ्या,’ हे अगदी सहजपणे मनावर बिंबवणारे इब्राहिम अल्काझी, उत्तम सहकलाकार कसा असावा हे आपल्या वागण्यातून दाखवणारा सहाध्यायी अभिनेता ओम पुरी, तिथल्या खूप विचार करायला लावणाऱ्या, पण पारंपरिक ‘पेपर’ लिहायला न लावणाऱ्या आगळ्यावेगळ्या परीक्षा, हा माहोल वेगळा आणि अभिनेत्री म्हणून घडवणारा. अगदी कमी वेळात मुख्य

भूमिकेची पूर्ण तयारी करण्यापासून ते बिनमहत्त्वाची वाटणारी गर्दीच्या प्रसंगातील भूमिकाही आत्मीयतेनं कशी साकारायची असते, याचे धडे ‘रा.ना.वि.’नं दिले.’’

राष्ट्रीय नाटय़ विद्यालय (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी)) -अविस्मरणीय तीन वर्ष. काय काय केलं त्या तीन वर्षांत! आकंठ बुडाले होते नाटक या विषयात. केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. पहिला इंटरव्ह्य़ू  कोलकाता आणि दुसरा दिल्लीला. दिल्लीला स्वत: अल्काझी (इब्राहिम अल्काझी) होते इंटरव्ह्य़ूसाठी (त्यांच्याबद्दल नंतर सविस्तर लिहीनच.). माझी निवड झाली आणि १३ जुलै १९७१ला मी ‘रा.ना.वि.’मध्ये दाखल झाले.

रवींद्र भवनमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर आमचं स्कूल होतं. तळमजला आणि पहिला मजला, साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमीचा होता. आणि बाजूला ललित कला अकादमी. रस्ता ओलांडून गेलं की अमेरिकन लायब्ररी (त्याच जागेवर आता राष्ट्रीय नाटय़ विद्यालय आहे.). वरच्या मजल्यावरची एकच विंग आमची. आत जाताना लक्ष गेलं- समोरच भिंतीवर बालगंधर्वाचं तैलचित्र, फेटय़ामधलं. काय बरं वाटलं म्हणून सांगू! अल्काझी सर बालपणी पुण्यात होते हे नंतर कळलं. सरांना भेटले. त्यांनी तिसऱ्या वर्षांच्या एका मुलीला मला हॉस्टेलवर घेऊन जायला सांगितलं.

हॉस्टेल म्हणजे काही मोठी बिल्डिंग वगैरे नव्हती. तीन मोठे फ्लॅट्स होते. एकाला एक लागून. एका फ्लॅटच्या तीन बेडरूममध्ये एकूण नऊ जणी. हॉलमध्ये बेड्स लावलेले चार-पाच. त्या फ्लॅटचं किचन म्हणजे स्टोअर रूम. ही मुलींची बाजू, तशीच मुलांची बाजू आणि मधल्या फ्लॅटचा हॉल आमचा कॉमन डायनिंग हॉल आणि किचन तिथेच. समोर छोटं लॉन. मुलामुलींचं एकच हॉस्टेल. कोर्स तीन वर्षांचा. तीन वर्षांत मिळून चाळीस विद्यार्थी. सगळे रात्रंदिवस एकत्रच असणार होतो. लॉनमध्ये उघडणारी एक छोटी खोली. तिथे आमचे.. काय म्हणू? केअरटेकर. आमचेच सीनिअर मनोहर सिंग. तीन वर्ष हे माझं जग असणार होतं.

आमचं दिवसभराचं वेळापत्रक भरगच्च असायचं. सकाळी नऊ वाजता क्लासेस सुरू व्हायचे ते दुपारी तीन वाजेपर्यंत. मध्ये जेवणाची सुट्टी. आणि मग तीन ते पाच-सहा वाजेपर्यंत तालमी. त्या वेळी जे चालू असेल त्याच्या. म्हणजे क्लासरूममधली, एक्सरसाइझची, स्कूलची नाटकं, ज्यात सगळे विद्यार्थी कोणती ना कोणती जबाबदारी उचलायचे (यावर वार्षिक परीक्षेचे गुण अवलंबून असायचे). आणि वर्षांच्या शेवटी तिसऱ्या वर्षांला असलेल्या दिग्दर्शनाच्या विद्यार्थ्यांच्या ‘डिप्लोमा प्रॉडक्शन्स’च्या तालमी होत. ते स्कूलमधलेच विद्यार्थी घेऊन एकांक  करायचे. या सगळ्यातून उरलेला वेळ तुमचा.

नाटक म्हटलं की त्यात सगळ्या कला आल्याच. म्हणजे निदान त्या-त्या भागांची ओळख आणि प्राथमिक ज्ञान हवंच. त्यामुळे पहिल्या वर्षी आम्हाला सगळे विषय होते. म्हणजे नाटकांच्या संहितांचा अभ्यास, यात भारतीय ‘क्लासिकल’ (भास, भवभूती, कालिदास यांच्या कलाकृती), भारतीय आधुनिक (विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, आद्य रंगाचार्य, मोहन राकेश, वगैरे), पाश्चात्त्य नाटकआणि आशियायी नाटक आलंच. अभिनयामध्ये नृत्य, संगीत, योगासनं, अभिनयाचं ‘प्रॅक्टिकल’ आणि थिअरी. तांत्रिक विषयांमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना, थिएटर आर्किटेक्चर, रंगभूषा, वेषभूषा आणि सुतारकामसुद्धा. पहिल्या वर्षांला हे सगळं शिकावं लागायचं. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांत तुमच्या विषयाप्रमाणे शिकायचं. म्हणजे ‘अभिनय’ निवडला तर तांत्रिक विषय सुटायचे. ‘स्टेज क्राफ्ट’ घेतलं तर अभिनयाचे विषय सुटायचे. दिग्दर्शकांना मात्र सगळं करावं लागायचं. आता अभ्यासक्रमात काळानुरूप बदल झाले आहेत. यातलं ‘स्कूल प्रॉडक्शन’ खूप शिकवणारं असायचं. वर्गात जे शिकलोय ते प्रत्यक्षात करायचं, अनुभवायचं. पहिल्या वर्षी फार मोठय़ा भूमिका मिळायच्या नाहीत. मग ते सगळे जण ‘क्राऊड सीन’मध्ये! तुम्ही काम करत असा, की नसा, तालमीला हजर असावंच लागायचं. दुसरे काय करताहेत, सर त्यांना काय समजावताहेत, यातूनही खूप शिकायला मिळायचं. पहिल्या वर्षांला मी मागे बसून वर्गात शिकवलेल्या स्टेजवरच्या हालचाली स्क्रिप्टच्या  डाव्या कोऱ्या पानावर लिहून घेत बसायची. आमच्या सुरुवातीच्या तालमी छोटय़ा स्टुडिओ थिएटरमध्ये व्हायच्या, पण प्रयोग मात्र ‘ओपन एअर थिएटर’मध्ये व्हायचे. ते एवढं मोठं होतं, की तिथे गेल्यावर मी स्क्रिप्टवर लिहून घेतलेल्या सगळ्या हालचाली बदलून गेलेल्या असायच्या! क्राऊड सीनमध्येही खूप मजा यायची. तिथेही आपापल्या, लेखकानं न लिहिलेल्या व्यक्तिरेखा आम्ही उभ्या करायचो. त्याची गंमतच झाली.. सरांनी आम्हाला आमच्या भूमिकेबद्दल लिहून आणायला सांगितलं होतं. आम्ही सारे क्राऊड सीनमधले. आम्ही काय लिहिणार? सर म्हणाले, की ‘मग कॅरेक्टर्स तयार करा!’ आणि त्या नगण्य भूमिकांबद्दलही एक आत्मीयता निर्माण झाली.

पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना इतर विभागांमध्ये साहाय्यक म्हणून काम करायला लागायचं. त्यामुळे सर्व भागांची ओळख झाली. कपडेपट सांभाळायचं काम जास्त करून मुलींनाच मिळायचं. अल्काझी सरांच्या पत्नी (रोशन अल्काझी) उत्तम डिझायनर होत्या. वेशभूषेचं काम त्यांचं आणि आम्हाला शिकवायच्यासुद्धा. अगदी बाजारातून कापड आणण्यापासून त्यांच्या हाताखाली काम करायला मिळायचं. स्कूलमध्येच टेलर्सना बसवायचे. रंगीत तालमीच्या वेळी सगळं ठरायचं, त्याबरहुकूम पुढे प्रयोगांमध्ये काम करायचं. प्रयोगाच्या दिवशी सकाळपासून कपडय़ांना इस्त्री करून घेण्यापासून काम सुरू व्हायचं ते प्रयोगानंतर सगळे कपडे पेटय़ांमध्ये भरून कुलूप लावेपर्यंत! प्रयोग चालू असतानाही ‘चेंजेस’कडे, वेशभूषाबदलाकडे लक्ष द्यावं लागायचं. पण मजा यायची. हे प्रयोग बाहेरच्या प्रेक्षकांसाठी असायचे. वर्तमानपत्रांत त्याची परीक्षणंही छापून यायची. पण आम्ही ती वाचलेलं सरांना आवडायचं नाही. लक्ष नका देऊ म्हणायचे! विद्यार्थिदशेत तितकीशी ‘मॅच्युरिटी’ नसते ना!

पहिल्याच वर्षी मला स्कूल प्रॉडक्शनमध्ये  मुख्य भूमिका करायची अचानक संधी मिळाली. प्रत्येक पात्रासाठी दोघे निवडलेले असायचे (डबल कास्टिंग). त्यांनी आलटून-पालटून ती भूमिका होणाऱ्या प्रयोगांमध्ये करायची. ‘सूर्यमुख’ नाटकात तिसऱ्या वर्षांला असणाऱ्या सुहास जोशीबरोबर माझी निवड झाली. अगदी ऐनवेळी! नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला पंधरा दिवस असताना. मला खूप टेन्शन आलं. पाठांतर करायचं, हालचाली समजून घ्यायच्या, तेही पंधरा दिवसांत?  सुहास तिसऱ्या वर्षांची अभिनयाची एकटीच विद्यार्थिनी. तिला वेळच मिळत नव्हता. मग ज्याच्याबरोबर काम होतं त्याला गाठलं. ओम पुरी! मला एक वर्ष सीनियर. तो म्हणाला, ‘‘ठीक हैं, बताऊंगा. कल सुबह साढेछह बजे ओपन एअर थिएटर पहँुच जाना!’’ म्हटलं, भारीच आहे हा.. उगाच सीनिअ‍ॅरिटी दाखवतोय. पण पोहोचले. काय करणार! पाहाते तर हा माझ्या आधीच पोहोचलेला. आपले संवाद मोठमोठय़ानं म्हणत होता.  मला त्याने स्टेजच्या एका कोपऱ्यात जायला सांगितलं आणि स्वत: प्रेक्षागृहाच्या बरोबर विरुद्ध कोपऱ्यात गेला आणि म्हणाला, ‘‘आता म्हण तुझ्या लाइन्स!’’ खुल्या रंगमंचावर काय, कुठल्याच थिएटरमध्ये माइक वापरण्याची प्रथाच नव्हती.. सवयच नव्हती. म्हणून मोठय़ानं बोलण्याचा असा सराव. शिवाय एकमेकांकडे पाठ करूनही लाइन्स म्हणायला लावल्या त्यानं. स्पष्ट आणि स्वच्छ उच्चारांसाठी. तो मला तेच करायला लावत होता जे तो शिकला होता. नंतर त्यानं हालचालीही दाखवल्या. तशा त्या मला काही आधीच माहीत होत्या, पण माहीत असणं वेगळं आणि प्रत्यक्ष करणं वेगळं. ‘एण्ट्री’लाच धावत जाऊन त्याला मिठी मारायची होती. मनात म्हटलं, आता आली का पंचाईत! आतापर्यंत आमची स्टेजवरची मजल खांद्यावर हात ठेवण्याची. आता काय करावं? पण त्यातही त्यानं मदतच केली. मिस्कील हसत म्हणाला, ‘‘कोई नहीं, हिम्मत बटोरो और आ जाओ!’’ सहकलाकार कसा असावा हे ओमकडून शिकले मी.

याच नाटकाच्या वेळी मी सरांना ‘मला काही कळत नाहीये, मी गोंधळले आहे माझ्या भूमिकेविषयी’ असं सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी मला जवळ बसवून घेतलं आणि म्हणाले, ‘‘मी समजावतो कसं करायचं. पेन्सिल काढ आणि मी सांगतो तिथे खुणा कर.’’ मी खुणा करून  घ्यायला लागले पण कागदावर पेन्सिल उमटेचना ना. सरांनी ते बघितलं. म्हणाले, ‘‘रोहिणी, युअर माईंड इझ अ‍ॅज ब्लंट अ‍ॅज युअर पेन्सिल. शार्पन इट.’’ ते वाक्य माझ्या मनात दिवसभर घोळत राहिलं. आयुष्यभराचं ज्ञान एका वाक्यात ते बोलून गेले होते. रात्रंदिवस सजग असलं पाहिजे, भोवतालचं अनुभवलं पाहिजे, टिपून घेतलं पाहिजे. म्हणजे ते तुमच्या मनात कुठे तरी राहातं आणि जरुरीच्या वेळी आपोआप वर येतं.

‘सूर्यमुख’ नाटक हे स्कूलमधलं मोठं असं माझं पहिलंच नाटक. लक्ष्मीनारायण लाल यांनी लिहिलेलं. महाभारताचा काळ होता त्यात. श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि श्रीकृष्णाची शेवटची पत्नी वेणूरती यांची कहाणी. त्या नाटकाची वेशभूषा पाहून चकितच झाले मी. पुरुषांना कातडी कच्छे, दंडावर, मनगटावर आणि पायालाही तशाच पट्टय़ा, हातात भाले, डोक्यावर पिसांचा मुकुट, बाकी उघडे. आणि स्त्रियांना लुंगीसारखं अधोवस्त्र, कंचुकी, ओढणी बस्स! इतर पुरुषांना गोणपाटाचं कापड, त्याला मध्ये डोकं जाण्याएवढं वर्तुळ कापून कफनीसारखं घालायचं आणि कमरेला दोरी बांधली की झालं! ‘शिवलेलं’ काही नाही. दागिने धातूचे. हिरे-माणकं नाहीत. ‘सौभद्र’ वगैरे नाटकांमधून राजा रविवम्र्याच्या चित्रांमधल्यासारखे पोशाख बघायची सवय आम्हाला. हे म्हणजे भलतंच वेगळं प्रकरण. पण त्या काळी कापड कितपत वापरत असतील? मेलेल्या जनावरांची कातडी, जाडीभरडी वस्त्रच असतील ना? वेगळा विचार मिळाला. वेगळ्या तऱ्हेनं वेशभूषा या प्रकाराकडे पाहिलं. तो विषय होताच अभ्यासक्रमात.

आणखी एक खासियत सांगायची तर परीक्षेच्या तऱ्हेची. तीन तास बसून लिहायचा ‘पेपर’ आम्ही कधीच दिला नाही. प्रत्येक विषयासाठी आम्हाला एक विषय द्यायचे. म्हणजे समजा, ‘मॉडर्न इंडियन ड्रामा’मध्ये मला ‘‘आषाढ का एक दिन’मधल्या मल्लिकाची व्यक्तिरेखा’ असा विषय मिळाला किंवा ‘अ‍ॅक्टिंग थिअरी’मध्ये ‘यूज ऑफ हॅण्डस् अ‍ॅण्ड आइज ऑफ अ‍ॅन अ‍ॅक्टर’ असा विषय मिळाला, तर त्यावर तुम्हाला काय अभ्यास करायचाय तो करा, चर्चा करा आणि मोठा निबंध अमुक तारखेला लिहून द्या. मग परीक्षेच्या दिवशी स्कूलचे सगळे शिक्षक आणि तुमच्या वर्गातले सहाध्यायी एकत्र बसायचे आणि विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयावर बोलायचं. तुमचा विषय तुम्हाला नीट समजला असेल तरच त्यावर तुम्ही नीट बोलू शकाल ना? समजा एखादा मुद्दा निसटतोय असं वाटलं तर कोणी तरी एखादा प्रश्न विचारून आठवण करून देऊ शकत होतं किंवा कधी कधी प्रतिप्रश्न करू  शकत होतं. लिहिलेलं समजून लिहिलं असेल तर बोलता आणि त्यावर उत्तरं देता येतील ना!

पहिल्याच वर्षी एवढं सगळं शिकायला, अनुभवायला मिळालं. उत्साह वाढला. सुट्टीत घरी आले की तिकडच्या गोष्टी बाबा कौतुकानं ऐकत असत. मित्रमंडळींच्या प्रोत्साहनानं एक एकांकिकाही बसवली. फार काही ग्रेट नव्हती, तरी आपण शिकलेलं सर्वाबरोबर ‘शेअर’ करावंसं वाटत होतं ना! असो.

‘रा.ना.वि’मधल्या पुढच्या दोन वर्षांत चांगल्या भूमिका करायला मिळाल्या. पुढची दोन वर्ष अभिनय ‘स्पेशलायझेशन’ असणार होतं. ‘सुलतान रझिया’, ‘अंधायुग’, जपानी नाटक ‘इबारागी’, कर्नाटकच्या यक्षगान शैलीतलं ‘भीष्म विजय’.. त्याबद्दल पुढच्या (१३ मार्च) लेखात!

hattangadyrohini@gmail.com