चविष्ट प्रांतिक फराळ!

दिवाळी हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण. जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये अतिशय उत्साहानं दिवाळी साजरी केली जाते.

|| रेश्मा भुजबळ

भारतभर दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतींत प्रांतांनुसार वैविध्य आहे. तसंच वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिवाळीच्या निमित्तानं आवर्जून के ले जाणारे पदार्थही वेगळे. निवडक राज्यांमधील दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती आणि चविष्ट पारंपरिक पदार्थ-

दिवाळी हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण. जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये अतिशय उत्साहानं दिवाळी साजरी केली जाते. घरासमोर दररोज सकाळ-संध्याकाळ काढली जाणारी रांगोळी हे दिवाळीचं खास वैशिष्ट्य. वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिवाळीच्या पाच दिवसांचं महत्त्वही वेगवेगळं आहे. वसुबारस ते भाऊबीज किंवा काही ठिकाणी वसुबारस ते छटपूजा, तर ओडिशा राज्यात मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळी आणि फराळ भारताच्या शेतीप्रधानतेशी जोडलेले आहेत. शेतीच्या दिवसांत कष्ट करून थकलेल्या शेतकऱ्यांचा हा निवांत होण्याचा काळ. या काळात गोडधोड खाऊन, तेलकट-तुपकट पदार्थांच्या माध्यमातून, येणाऱ्या थंडीसाठी शरीरात स्निग्धता साठवून घ्यायची, अशी संकल्पना. या प्रयोजनानं दिवाळीचं निमित्त साधून फराळाची परंपरा निर्माण झाली. या सणासाठी बनवल्या जाणाऱ्या गोडधोड आणि तिखट पदार्थांतही राज्यांनुसार खूप वैविध्य आणि स्थानिक खासियत असते. ही काही राज्यांमधील चवदार फराळाची परंपरा- 

राजस्थान

राजस्थानात दिवाळीचा संबंध रामकथेशी जोडला जातो. राम १४ वर्षांच्या वनवासातून परत आला, तो मंगल दिवस राजस्थानी लोकांमध्ये दिवाळीसाठी खास असतो. दिवाळीतल्या चतुर्दशीला ‘रूपचौदस’ म्हणतात. त्या दिवशी संध्याकाळी मुली डोक्यावर ‘घुडल्या’ घेऊन (म्हणजे सच्छिद्र घडा व त्यात दिवा लावलेला असतो) घरोघर फिरतात. प्रतिपदेला ‘खेंखरा’ म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकोट करतात. भाऊबिजेला घरोघरी दौत व लेखणीची पूजा होते. पाडवा आणि भाऊबिजेला

‘बडी दिवाली’ संबोधलं जातं. राजस्थानात दिवाळीला विविध प्रकारची मिठाई बनवली जाते. यात मावा कचोरी, तिळाचे लाडू, मोतीपाक, मिठी मठरी असे अनेक पदार्थ आवडीनं खाल्ले जातात.

मावा कचोरी

साहित्य- १०० ग्रॅम मैदा, अर्धी वाटी तूप, १/२ चमचा वेलची पूड, १/२ चमचा जायफळ पूड, ५०० ग्रॅम मावा (खवा), ५०० ग्रॅम साखर, अर्धी वाटी सुक्या मेव्याचे काप, सजावटीसाठी चांदीचा वर्ख, तळायला साजूक तूप.

कृती- मैद्यात तुपाचं मोहन व चिमूटभर सोडा टाकून अंदाजानं पाणी घालून मऊसर पीठ मळा. खवा परतून घ्या व त्यात वेलदोड्याची पूड, जायफळ पूड मिसळा. मैद्याची पारी करून त्यात खव्याचा गोळा भरून पारी बंद करून मंद आचेवर तुपात तळून घ्या. साखरेचा दोनतारी पाक करून त्यात कचोरी बुडवून काढा. चांदीचा वर्ख व सुक्या मेव्याचे काप घालून सजवा.

गोवा

इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याची दिवाळी आगळीवेगळी असते. गोव्यात इतर राज्यांमध्ये केले जातात तसे मिठाईचे जास्त प्रकार केले जात नाहीत. तर इथे ‘फोवां’चे विविध प्रकार आवर्जून केले जातात. ‘फोव’ म्हणजे पोहे. गोव्यात दिवाळीला नवीन पोहे वापरले जातात. शेतांमध्ये नवीन धान्य तयार झालेलं असतं आणि त्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी नवीन पोहे दिवाळीत वापरतात. गोव्यात लाल आणि पांढरे असे दोन प्रकारचे पोहे मिळतात. बहुतांश गोवेकर दिवाळीला लाल किंवा तांबडे पोहे वापरतात. तिखट पदार्थांमध्ये चिवडा आणि गोड पदार्थांमध्ये साखर-खोबरं घालून केलेले पोहे, गूळ-खोबरं घालून केलेले पोहे, दुधातले पोहे, नारळाच्या रसातले पोहे यांचा समावेश असतो.

 गूळपोहे

साहित्य- लाल पोहे किंवा साधे पोहे, गूळ, मीठ, खोबरं, वेलची पूड

कृती- फोडणीच्या पोह्यांसाठी ज्याप्रमाणे आपण पोहे भिजवतो, तसेच भिजवा. त्यात चवीपुरतं मीठ, आवडीप्रमाणे किसलेला गूळ, वेलची पूड घाला. वरून खोबरं भुरभुरवा आणि खायला द्या.

आंध्र प्रदेश

हरिकथा किंवा भगवान कृष्णाची संगीत कथा आंध्रात दिवाळीच्या दरम्यान अनेक ठिकाणी सादर केली जाते. असं सांगितलं जातं, की भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिनं नरकासुराचा वध केला होता. म्हणून सत्यभामेच्या मातीच्या मूर्तीची पूजा-प्रार्थना केली जाते. बलिप्रतिपदेला बळीराजाचं स्मरण करून त्याची प्रतिमा तयार करतात व ती गोठ्यात ठेवून तिची पूजा करतात, तर काही लोक बळीराजाची घोड्यावर बसलेली प्रतिमा करतात. ही प्रतिमा उंच जागी ठेवून तिला २१ दिव्यांची आरास केली जाते. गाईबैलांची शिंगं रंगवतात, त्यांना फुलांच्या माळा घालतात. त्यांची मिरवणूक काढून त्यांच्यासमवेत मशाली घेऊन नाचतात. आंध्र प्रदेशमध्ये दिवाळीला गव्वालू, पोट्टारेकुलू, गोरुमिथिलू, अरिसेलू असे विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात.

गव्वालू

साहित्य- दोन कप मैदा, दोन मोठे चमचे तूप, चिमूटभर मीठ, एक कप साखर, तळण्यासाठी तेल, पाणी

कृती- एका भांड्यात मैदा, तूप, मीठ घालून योग्य प्रमाणात पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ जास्त घट्ट अथवा जास्त सैलही नसावं. पिठाचे लहान लहान गोळे करून घ्या. हे गोळे    काट्या-चमच्याच्या मागच्या भागावर हलकासा दाब देऊन शंखाच्या आकारासारखे वळावेत. काट्या-चमच्यामुळे त्यावर रेघा उमटून विशिष्ट आकार येतो. हे गव्वालू तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. एका मोठ्या कढईत एक कप साखर आणि दोन कप पाणी घ्या. त्याचा एकतारी पाक करा. गॅस बंद करून त्यात तळलेले गव्वालू सोडा. सगळीकडे पाक व्यवस्थित लागला की गव्वालू ताटलीत काढून घ्या. त्यावर पिस्त्याचे काप पसरवून सजवा. कारम गव्वालू, बेल्लम गव्वालू, थिपी गव्वालू असे गव्वालूचेही अनेक प्रकार आहेत.

ओडिशा

मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला ओडिशात दिवाळी साजरी केली जाते. नवीन पीक आल्यानं शेतकऱ्याच्या हातात पैसा असतो व शेतातही फारसं काम नसतं. त्या वेळी ते दिवाळी साजरी करतात. नवीन आलेल्या तांदळाची पेस्ट बनवून घरात चित्रं काढतात. लक्ष्मीची पावलं, जनावरांची चित्रं, झाडं इत्यादी या पेस्टनं काढतात. तांदळाचीच लक्ष्मीची मूर्ती बनवतात व तिची पूजा करतात. तांदळाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला

‘यूत प्रतिपदा’ म्हणतात. त्या रात्री सर्व जण द्यूत खेळतात. या दिवशी जो जिंकेल त्याचं संपूर्ण वर्ष आनंदाचं, भरभराटीचं जाईल अशी समजूत आहे. तसंच अनेक ठिकाणी लक्ष्मीपूजन हा महत्त्वाचा दिवस असतो. इथं सकाळच्या वेळी लक्ष्मीपूजन केलं जातं. दिवाळीत छेना पोडा, रसबली, अडिस्सा, काकरा, तांदळाची खीर, रव्याची खीर असे पदार्थ के ले जातात.

छेना पोडा

साहित्य- एक लिटर दूध, एका लिंबाचा रस, ९ मोठे चमचे साखर, चार मोठे चमचे रवा, एक मोठा चमचा तूप, वेलची-जायफळ पूड, सजावटीसाठी काजू

कृती- प्रथम ‘छेना’ म्हणजे पनीर बनवून घ्यावं. त्यासाठी  दूध तापत ठेवून चांगली उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस घाला. दूध फाटायला सुरुवात होईल. सर्व छेना गाळून घ्या. त्यात थोडंसं थंड पाणी ओतून निथळून घ्या. त्यामुळे त्याचा आंबट वास निघून जाईल. नंतर पनीर वा छेन्यात रवा, साखर, तूप, वेलची-जायफळ पूड घालून एकजीव करून घ्या. यात छेना बनवलेलं ४ ते ५ मोठे चमचे पाणी घाला. त्यामुळे मिश्रण थोडं पातळ होतं. इडलीच्या पिठाप्रमाणे हे मिश्रण असावं. आता हे मिश्रण एका तूप लावलेल्या भांड्यात ओता. कुकरची रिंग आणि शिटी काढून ठेवा आणि कु करच्या तळाला मिठाचा एक पातळ थर द्या. ५ मिनिटं कु कर मोठ्या आचेवर गरम करून घ्या. कुकर गरम झाल्यावर त्यात छेन्याच्या मिश्रणाचं भांडं ठेवून ४० मिनिटं मंद आचेवर बेक करा. गार झाल्यावर तुकडे करून काजूने सजवा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Author reshma bhujbal article diwali festival delicious traditional food akp

Next Story
लढा दुहेरी हवा!
ताज्या बातम्या